दहशतवादाचे सर्वात मोठे हत्यार म्हणजे पैसा. प्रचंड पैशाच्या आधारावरच दहशतवाद उभा राहिलेला आहे. साधारणत: गेल्या दशकात जवळ-जवळ २०००अब्ज डॉलर दहशतवादावर खर्च झाले. यावरून आपल्याला लक्षात येईल की दहशतवाद उभारण्यासाठी प्रचंड पैशाची गरज आहे. हा पैसा कुठून येतो? तर गुन्हेगारीतून. १९९१च्या अगोदर अमेरिका आणि रशिया मध्ये जागतिक द्वंद्व झाले. त्या देशातील गुप्तहेर संघटना म्हणजे अमेरिकेची सी.आय.ए. आणि रशियाची के.जी.बी.शीत युद्धात लढले. ही लढाई लढण्यासाठी जो पैसा लागत होता तो त्यांच्या सरकारच्या बजेटमधून खर्च करणे शक्य नव्हते. म्हणून या महाकाय गुप्तहेर संघटनांनी व त्याच बरोबर अनेक देशाच्या गुप्तहेर संघटनांनी नवीन गुन्हेगारी व्यवस्था निर्माण केली.
प्रत्येक देशातील माफियाला ताकद देण्यात आली. पैसा, हत्यार आणि जे जे लागेल ते गुन्हेगारांना देण्यात आले व आपल्या प्रतिस्पर्धी देशांमध्ये अनेक कारवाया करण्यात आल्या. जातीय व धार्मिक दंगे घडविणे, त्या सर्व कारवाया करण्यासाठी माफिया द्वारे दहशतवादी संघटना उभ्या करण्यात आल्या. परिणामत: अमेरिके सारख्या मोठ्या देशांनी प्रत्येक देशामध्ये माफियाला ताकद दिली आणि त्या माध्यमातून दहशतवाद्यांचे एक जबरदस्त असं हत्यार बनवण्यात आले. नुकतेच रशियाच्या के.जी.बी.च्या सहाय्याने जबरदस्त हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यातून शीत युद्धाची पुनरावृत्ती होत आहे आणि सगळीकडून सामान्य माणसावर क्रूरपणे हल्ला करण्यात येत आहे.
युक्रेनचे युद्ध कोणी निर्माण केले? हा प्रश्न जगाला भेडसावत आहे. पण मागच्या अनेक युद्धामध्ये आपण बघितले आहे अमेरिका अफगाणिस्तानमध्ये, इराकमध्ये घुसला आणि पळून पण गेला. अशाच प्रकारे अमेरिकेने इजिप्त, ट्युनिशिया, मोरोक्को, युगोसलाविया आणि अनेक देशांमध्ये हल्ले केले. तेथील व्यवस्था बरबाद केली आणि मग पळून गेले. आतादेखील आपण बघता युक्रेन हा सोवियत संघाचा भाग होता. म्हणजे युक्रेन आणि रशिया हे एकच देश होते. सोवियत संघ नष्ट झाल्यावर युक्रेनने स्वतंत्र राष्ट्र बनवले. पण त्यामध्ये रशियन भाषिक आणि युक्रेन भाषिक असे वेगवेगळी जमात एकमेकाच्या सहयोगाने सहकार्याने वावरत होती. पण २०१६ पासून अमेरिकेने रशियन भाषिक आणि युक्रेन भाषिक लोकांमध्ये फूट पाडली. मग तिथे यादवी सुरू झाली. रशियन भाषिक लोकांनी मागणी केली की त्यांचा प्रदेश हा रशिया मध्ये सामील करण्यात यावा. क्रेमिया मध्ये मतदान देखील घेण्यात आले. ८०टक्के लोकांनी रशिया मध्ये जाण्यासाठी मतदान केले. त्यामुळे क्रेमिया रशियात सामील झाली. पण त्याचबरोबर डोनट्स आणि इतर भाग जे पूर्व युक्रेनचे भाग आहेत. यांनीदेखील रशियामध्ये सामील होण्यासाठी बंड केले व आपला विभागयुक्रेनपासून वेगळा केला. आता जातीयवादी, धार्मिक कट्टरवादी सरकार युक्रेनवर राज्य करत आहे. ह्या उजव्या युक्रेनच्या राज्यकर्त्यांनी रशियन भाषिकावर जबरदस्त अत्याचार आणि अन्याय सुरू केला. तो थांबवण्यासाठी रशियाने अनेक वेळा मागणी केली. पण अमेरिकेने आणि युरोपियन देशांनी युक्रेनला फोडून आपल्या बरोबर जोडण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच रशियाने हे आव्हान उचलले आणि जोरदार हल्ला आता युक्रेन वर केला आहे. अंतिमत: अमेरिका पूर्ण जगावर आपले प्रभुत्व लादण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि त्यामधून प्रत्येक राज्यामध्ये आणि देशांमध्ये जातीय, धार्मिक,संघर्ष निर्माण करून लोकांना फोडून आपली पोळी भाजून घेत आहे.
भारतात सुद्धा अमेरिकेने आपले भांडवलशाही तत्त्वज्ञान पेरण्यासाठी मनमोहन सिंग द्वारा अमेरिकन अर्थनीती भारतात लागू केली. त्यातूनच १९९१ साली खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण (खाउजा) धोरण भारतात लागू केले. हे काँग्रेस आणि भाजप जोमाने लागू करत आहे. हे साध्य करण्यासाठी अमेरिकेने निर्माण केलेली गुप्तहेर व्यवस्था यांनी पूर्ण जगामध्ये आपले स्थान मजबूत केले आहे. त्यासाठी त्यांनी दोन गोष्टीचा उपयोग केला. एक म्हणजे बहुराष्ट्रीय कंपनी व दुसरे म्हणजे आंतरराष्ट्रीय माफिया. आज परिस्थिती अशी झाली आहे कि या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये अमेरिकेचे मोठ्या संख्येने हेर आहेत व हे गुप्तहेर माफिया मध्ये सुद्धा आहेत. म्हणून आपण बघत असाल मोठमोठे डॉन असतात, त्यांना काहीच होत नाही त्यांना कोणच पकडत नाही कारण काळ्या पैशाच्या आधारावर, गुन्हेगारी पैशाच्या आधारावर या जगामध्ये एकवटी राजवट चालू आहे.
मुंबईच्या बॉम्ब ब्लास्ट नंतर आम्ही गुप्तहेर संघटनांच्या प्रमुखांची एक समिती करून घेतली. भारताचे गृह सचिव श्री.एन.ए.व्होरा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती बनवण्यात आली. सर्व गुप्तहेर खात्यांच्या प्रमुखाने एक मुखाने आपले मत मांडले. त्यात सर्वात प्रथम ते म्हणाले माफिया, भ्रष्ट राज्यकर्ते, भ्रष्ट सरकारी नोकर यांचे एक समांतर सरकार देशावर राज्य करत आहे. म्हणून या समितीचा काय उपयोग आहे. कारण कुठलेही सरकार यावर कुठलीही कारवाई करणार नाही. हे वक्तव्य, कुणी राजकीय नेत्यांनी केलं नाही किंवा पत्रकारांनी केलं नाही तर राष्ट्रीय सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर आहे, त्या गुप्तहेर संघटनाच्या प्रमुखांनी केलेले आहे आणि हे भारताला किती धोक्याचा आहे हे स्पष्टपणे दिसत आहे. तो अहवाल राजेश पायलट यांनी लोकसभेमध्ये मांडला आणि लोकसभेत स्विकारला. पण आजपर्यंत कुठल्याही सरकारने भारतातील गुन्हेगारांवर काम केले नाही. दाऊद इब्राहिम तर गेली चाळीस वर्ष गुन्हेगारी जगताचा शेहनशा झाला. जगातील १० श्रीमंत यामध्ये जर कोण असेल, तर दाऊद इब्राहिम आहे. पण जागतिक पातळीवर काम करणारे सर्व सरकारत्याच्या विरोधात काहीच काम करत नाही आणि कुठल्याही पक्षाचे सरकार भारतावर राज्य करत असले, तरी या गुन्हेगारांना काहीच होत नाही.
पूर्ण जगामध्ये गुप्तहेर संघटनेने निर्माण केलेले माफी याचा एक समांतर सरकार राज्य करत आहे. त्यासाठी पैसा निर्माण करण्यासाठी ड्रग आणि हत्यार तस्करीची एक प्रचंड मोठी व्यवस्था निर्माण झाली आहे. अफगाणिस्तान मध्ये तालिबानने सुरुवातीला तस्करीला विरोध केला होता, पण आता ते त्यात सामील झाले आहेत आणि जगातील ९०टक्के हीरोइन अफगाणिस्तान मधून पूर्ण जगामध्ये वितरीत केले जाते. अशाप्रकारे अनेक देशांमध्ये ड्रग्सची तस्करी केली जाते. पैसा निर्माण केला जातो आणि दहशतवाद निर्माण केला जातो. पाकिस्तानने सर्वात जास्त अत्याचार भारतीय नागरिकांवर केला आहे. लष्कर-ए-तोयबा, जैसे मोहम्मद सारख्या संघटना निर्माण करून भारतामध्ये ड्रग्सतस्करी करतात. त्यातून पैसा निर्माण होतो आणि मग दहशतवादी हल्ले करण्याचा सपाटा पाकिस्तानने चालवलेला आहे तो त्यांना फायद्याचा आहे. पण त्याविरोधात आंतरराष्ट्रीय संस्था काहीच काम करत नाही. लष्कर-ए-तोयबा तर अल-कायदाला सुद्धा मदत करते आणि चीन मध्ये असलेले मुस्लिम उघर दहशतवाद्यांना सुद्धा मदत करतात. हे नष्ट करण्याचे काम चीन आणि भारताने मिळून केले पाहिजे. पण चीनपाकिस्तानलाच मदत करतो आणि अमेरिका सुद्धा पाकिस्तानलाच मदत करते आणि जोपर्यंत हे थांबणार नाही तोपर्यंत भारतात दहशतवाद वाढत जाणार आहे.
आपल्याला वेळीच यावर उपाययोजना केली पाहिजे. आंतरराष्ट्रीय जगताने एकत्र आलं पाहिजे आणि या जगाला लागलेली कीड म्हणजे दहशतवाद आणि ड्रग्सतस्करी नष्ट केलं पाहिजे. जर सर्व देशांनी हा निर्णय घेतला तर फार सोपं काम आहे. पण ते एकत्र कोणीच येत नाहीत आणि एक दुसऱ्या देशावर कुरघोडी करण्यासाठी दहशतवादी व्यवस्था वापरण्यात येते. आणि त्यातून जो पैसा निर्माण होतो तो सुद्धा स्वतःला वापरतात. त्यात प्रचंड भ्रष्टाचार सुद्धा होत आहे. जगभरात गुन्हेगारी विश्व निर्माण झालेले आहे. या गुन्हेगारी विश्वाला जो पैसा लागतो तो काळा असतो. तो आंतरराष्ट्रीय बँकिंग सिस्टम मधूनच वितरित केला जातो. आजच्या जगतामध्ये गुन्हेगार, चोर, लुटारू, प्रचंड श्रीमंत झालेले आहेत आणि सरकारी यंत्रणा कमकुवत आणि कमजोर झालेली आहे. म्हणूनच कुंपणच शेत खातय अशाप्रकारची व्यवस्था या जगामध्ये निर्माण झाल्यामुळे गुन्हेगारी, तस्करी, दहशतवाद वाढत चालला आहे आणि त्याला थांबवण्यासाठी कोणी काही करत नाही. म्हणूनच दहशतवाद आणि गुन्हेगारी वाढविण्यामध्ये जगातील बऱ्याच सरकारांचा हात आहे. जे आंतरराष्ट्रीय करार होतात ते थोतांड आहेत आणि त्याची अंमलबजावणी होत नाही आणि दुसरीकडे हजारो युवक ड्रग्समुळे आणि दहशतवादामुळे मृत्युच्या मगरमिठीत अडकलेले आहेत.
लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा. न. ९९८७७१४९२९