घोडेबाजार (भाग १)_२३.६.२०२२

शिवसेनेचे अनेक आमदार फुटले आणि गोहाटीला गेले. ते आमदार कुठल्या कारणामुळे घोडेबाजार मध्ये सामील झाले ते सर्वानाच माहीत आहे. कुठल्या भूमिकेवर हा निर्णय घेण्यात आला नाही.  असा व्यापार पैशावरच होतो हे सर्व जनतेला माहिती आहे. पैसा बरोबर सत्ता हस्तगत करण्यासाठी असे कुटील कारस्थान करण्यात येतात. देशामध्ये खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण आल्यापासून असे धंदे वाढत गेले. कारण ह्या तत्त्वाचा स्वामी, हा स्वार्थ असतो.  पक्ष, तत्व हे सर्व विषय आता गेल्यात जमा आहेत. उरला तो फक्त धंदा. एका हाताने घ्या आणि एका हाताने द्या.

            ज्यावेळी मी राजकारणात आलो, काँग्रेस पक्षाचा खासदार झालो,  त्यावेळी अशी परिस्थिती नव्हती. पक्षांतर्गत गटबाजी होती.  पण  पक्ष  तोडायची भावना लोकांमध्ये नव्हती. ती सुरुवात केली त्यावेळी छगन भुजबळ आणि अनेक आमदार शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आले. त्यावेळी घटनेला मी विरोध केला होता स्पष्टपणे सांगितलं होतं अशा घोडेबाजारने पक्ष काही मोठा होतो आणि पुढे झालं तसंच. जे लोक फोडून शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आणले होते हे १९९५ च्या निवडणुकीमध्ये सर्व पराभूत झाले. काँग्रेसचा पूर्ण धुव्वा उडवला.   काँग्रेस नेस्तनाबूत झाले. पण तरीदेखील नैतिक बळ काँग्रेसमध्ये होते. पून काँग्रेसचा कार्यकर्ता नाउमेद झाला नाही. आम्ही सर्वांनी लढण्याची भूमिका ठेवली. पण हळूहळू काँग्रेसमधील अंतर्गत वाद बळावत चालले. सोनिया गांधी या परदेशी आहेत या मुद्द्यावर शरद पवारने काँग्रेस फोडली व कारगिल युद्धानंतर, निवडणुका झाल्या. काँग्रेस असताना देखील भरघोस मतांनी काँग्रेस निवडून आली. त्यावेळेस सर्व दिग्गज काँग्रेसचे नेते राष्ट्रवादी मध्ये गेले होते. पण आम्ही छोट्या नेत्यांनी सर्व काँग्रेस कार्यालयावर ताबा मिळवला. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला   काँग्रेसचे २ तुकडे होऊन सुद्धा काँग्रेसचा मुख्यमंत्री बसला व काँग्रेसचा मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख कार्य करू लागले. पण हे सरकार राष्ट्रवादीबरोबर युती करून निर्माण झाले होते. ह्या युतीला आम्ही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. आघाडी करून काँग्रेस  सरकार  हळूहळू  संपत आहे.

            काँग्रेसने १९९१ नंतर हे आघाडीचे राजकारण सुरू केले.  परिणामतः अनेक जागावर अनेक वर्षे पक्ष लढला नाहीं. म्हणून आम्ही सातत्याने काँग्रेस मध्ये मागणी केली होती की आघाडी करून निवडणूक लढवू  नको. सत्ता आली नाही तरी चालेल. पण काँग्रेस आणि सर्व पक्ष सत्तेसाठी आघाडी करत राहिली आणि अनेक राज्यात पक्ष संपला. त्यात काँग्रेस महाराष्ट्रात शिवसेनेचे तेच झाले. काँग्रेसला विरोध करण्यासाठी भाजप बरोबर युती केली. परिणामत: अर्ध्या महाराष्ट्रात शिवसेना नाही पण भाजपने मात्र शिवसेनेचा फायदा घेऊन आपला विभाग महाराष्ट्रभर पसरला आणि तेच शिवसेनेला वरचढ झाले. ही जाणीव झाल्यावर शिवसेनेने मुख्यमंत्र्यांसाठी हट्ट धरला. भाजपने नाकारला त्यातूनच आजचे राजकारण निर्माण झालं.  आघाडी सरकार शिवसेना- काँग्रेस – राष्ट्रवादीना घेऊन निर्माण झालं. हे कारण पुढे करून आता एकनाथ शिंदे साहेब यांनी बंड केलं व शिवसेनेचा नवीन गट बनवला आहे. आता त्या मागे भाजपचा पूर्ण पाठिंबा आहे.  म्हणून साहेब आपली लोकं घेवून  सुरतला गेले आणि आता गौहाटीला  जाऊन बसले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब एकाकी पडलेले दिसतात.  पण त्यांनी कुठलीही चिंता करण्याची गरज नाही.  आमदार गेले तरी काळजी करायची कारण नसते,  निर्धार केला पाहिजे व कार्यकर्त्यांच्या जोरावर पक्ष पुन्हा मजबूत केला पाहिजे.जे गेले त्यांना त्यांच्या घरी सुखी राहू द्या.

            अलिकडे हा घोडेबाजार नित्य नियमाने चालत आहे.  विशेषत: भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी विरोध हा कुणी केलाच नाही.  विरोधी पक्षाच्या आमदारांना फोडून स्वतःचे राज्य आणण्याचा प्रयत्न केला, असे अनेक ठिकाणी झाले आहे.  मध्यप्रदेश, कर्नाटक, उत्तरखंड, आता महाराष्ट्र. आमदार फोडणारा पक्ष आपले हस्तक निवडतो, साधारणत: हे श्रीमंत लोक असतात. उद्योगपती, माफिया हे फोडाफोडी करतात. मग  भांडवलदार आमदार खासदारांना भेटतात. आपल्या जाळ्यात पैश्याची लालुच दाखवून ओढतात. हळूहळू ते विश्वास संपादन करतात. थोडा पैसा सुद्धा दाखवतात. उद्योगपती बरोबर संबंध जोडायला सर्वच उत्सुक असतात. भाजपकडे अत्यंत निष्णात लोक हे काम करत असतात.  ह्या कलेतील कौशल्य प्राप्त केलेली लोक सगळ्यांनाच माहीत आहेत. पण हे इतके गोडबोले आहेत की सर्वच फसतात. प्रचंड पैसा दाखवल्यावर फार कमी लोकांना मोह टाळता येतो. तिराहित माणसे सल्ला आमदारांना देतात  व आमदारांची सदविवेक बुद्धी नष्ट करतात.

            निवडणुकीमध्ये प्रचंड पैसा खर्च करावा लागतो.  म्हणून जिथून पैसा मिळेल तेथून घेण्याची प्रवृत्ती आज मोठ्या प्रमाणात वाढली आहे.निवडणुकीमध्ये प्रचंड पैसा खर्च करावा लागतो, म्हणून जिथून पैसा मिळेल तेथून घेण्याची प्रवृत्ती आज मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राजकारण हे पैसेवाल्यांची झाले आहे. एक सामान्य माणूस ग्रामपंचायत निवडणुकीत देखील उभा राहू शकत नाही. मी  २निवडणूका पैशामुळे लढलो नाही.त्यामुळे जो आमदार बनून मग मंत्रिसुद्धा बनतो तो पैसा ओढायला लागतो. त्यात पक्ष बदलणे मात्र फार सोपे झाले आहे. साधारणत: एक आमदार पक्ष बदलायला ५०कोटी मिळवतो. म्हणून निष्ठा, तत्व, ह्यांना काही अर्थ नाही. अलिकडे पक्ष बदलायला कुणाला काही वाटत नाही. जसे आमच्याकडे शिवसेनेचे मुख्यमंत्री नारायण राणे हे काँग्रेस मध्ये येणार म्हणून मी भाकीत केले.तर राजापूर कोर्टात माझ्यावर हल्ला झाला. इतका दंगा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलाकी काय बघायलाच नको. जज्ज तेथील गुंडांवर चालून गेले.मगच पोलिसांनी मारेकऱ्यांना पकडले. नारायण राणे काँग्रेस मध्ये आले. मी म्हणून आमदारकीचा राजीनामा देवून काँग्रेस सोडली. नंतर राणे भाजप मध्ये गेले. आता त्यांना फक्त राष्ट्रवादी शिल्लक आहे.  त्यामुळे कोणी कुठे जाईल हा अंदाज करणे कठीण आहे.

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS