शेक्सपिअरचे हम्लेट आजही गाजत आहे. पण छत्रपती संभाजींच्या यातना अजून आपल्याला जाणवत नाहीत. हम्लेट पेक्षा संभाजी महाराजांची दु:खभरी कहाणी आहे. कुठल्याही राजांनी आपल्या प्रजेसाठी व राज्यासाठी एवढे हाल सोसले नाहीत. जगाच्या इतिहासात ९ वर्ष सतत यशस्वीपणे औरंजेबसारख्या बलाढ्य सम्राटाविरुद्ध जीवघेणा संघर्ष केला नाही. शिवरायांचा अकाली मृत्यू झाल्याबरोबर सत्ता संघर्षानी जोर धरला. सर्व दृष्टीकोनातून योग्य असलेल्या युवराजाला छत्रपती न बनू देण्यासाठी मंत्र्यांनी आणि दरबाऱ्यांनी कुटनीतीचा वापर करून प्रचंड विरोध केला. शिवरायांनी जो स्वराज्य संकल्प केला तो अकालीच संपतो कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पण सर्व विरोध मोडून काडून रयतेच्या जीवावर उभा राहिला तो वीर संभाजी. प्रचंड मेहनत, युदध शास्त्रात पारंगत, अनेक भाषा जाणणारा. समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्रात आणि अनेक विषयात सर्व गुणसंपन्न असा राजा. शिवरायांनी आणि जीजामातेनी प्रशिक्षित केलेला वाघ. तलवारबाजी आणि घोडस्वारीत कोणीही त्यांचा हात धरू शकत नव्हता. ६ फुटापेक्षा उंच, प्रचंड ताकदीचा राजा. पूर्णपणे औरंगजेबाशी दोन हात करायला तयार होता.
कर्नाटकची स्वारी करून शिवरायानी औरंगजेबासाठी सापळा रचला. लांबच्या पल्ल्याच्या लढ्यासाठी तयारी केली. सर्व मावळ्यांना ह्या लढ्यासाठी प्रशिक्षित केले. त्यात संभाजी महाराजांना पूर्ण तयार केले. कारण त्यांना माहित होते कि एक वेळ अशी येणार जेंव्हा औरंगजेब स्वत: महाराष्ट्रावर चाल करून येणार. त्यावेळी १० मोगलांच्या समोर एक मावळा लढणार. अशा परिस्थितीत काय करणार. शिवरायाच्या आणि संभाजी महाराजांच्या युदध शास्त्राचा पाया म्हणजे निर्णयाच्या ठिकाणी सैन्य एकाच वेळी केंद्रित करणे व शत्रूला विस्कळीत करून त्याच्या एक एक तुकड्यावर हल्ला करणे. थेट तमिळनाडूपर्यंत औरंगजेबाच्या सैन्याला खाली ओढून त्याचे ४ लाखाचे सैन्य अनेक तुकड्यात विस्कळीत केले आणि महाराष्ट्रापासून दक्षिण टोकापर्यंत गतिमान मावळ्यांनी एक एक तुकड्यावर हल्ले केले. त्या निर्णयाच्या ठिकाणी आपल्या सैन्याचे संख्याबळ शत्रूपेक्षा प्रबळ करने, शत्रूचा नायनाट करणे, लगेच वेगाने आपले सैन्य वेगवेगळ्या ठिकाणी कूच करणे. हा गतिमान युद्धाचा विक्रमी नमुना होता. जगाच्या पाठीवर अश्या प्रकारचे युद्ध नव्यानेच बघायला मिळाले.
म्हणूनच शिवराय गेल्यावर २७ वर्ष मराठे लढले. अगदी निकराने लढले. कारण शिवरायांनी, संभाजी राज्यांनी आपल्या जिवंत नेतृत्वाने स्वराज्याचे रक्षण केले. वादळासारखा सुसाट दक्षिण भारतात धावणारा संभाजी. मोगलांना थांग पत्ताच लागू दिला नाही कि तो कुठून येणार आणि कुठे जाणार. १००० x ५०० कि. मी. क्षेत्रफळाचे युद्ध क्षेत्रावर संभाजी महाराजांनी सातत्याने आपले वर्चस्व ठेवले. अगदी सुरुवातीलाच छत्रपती झाल्यावर त्यांनी आक्रमक पवित्र घेतला. औरंगजेबाच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी मोघलांची प्रतिष्ठीत बुऱ्हानपूर आणि औरंगाबाद लुटून फस्त केले. ह्याला युद्धशास्त्रात offensive defence म्हणतात. शत्रूंनी हल्ला करायच्या आधीच आपला हल्ला अत्यंत आक्रमकपणे करणे. म्हणजेच आक्रमक संरक्षण. त्यापेक्षा आपली संख्या असंख्य पटींनी मोठी आहे हे भासविणे. गतिमानता ही सैन्याची श्रेष्ठ बाजू असते. त्याच बरोबर शत्रूला आश्चर्यचकित करून टाकणे ही दोन युद्धशास्त्रातील तत्व संभाजी महाराजांनी अत्यंत आक्रमकपणे वापरली. जिजाऊ आणि शिवरायांनी त्यांना शिकवले. शत्रूच्या कब्जात असलेल्या भागात संभाजी महाराज घुसून हल्ला करत व क्षत्रुपक्षात गोंधळ उडवून दयायचे. त्यामुळे औरंगजेबाचे सरदार नेहमी संभ्रमात राहत असत. सैन्य पुढे गेले तर पाठून हल्ला होत असे. दुसरीकडे मोघल सैन्याचा लवाजमा मोठा असे, म्हणून अनेक ठिकाणी मोगली तळ असत. त्यावर प्रचंड सैन्य फक्त पहारा देण्यासाठी लागत होता. त्यामुळं हल्ला करायला उपलब्ध सैन्य कमी असे. पण मराठ्यांना हि टिकणे आयतीच हल्ला करण्यासाठी मिळाली.
संभाजी महाराज छत्रपती झाल्यानंतर त्यांचा वेळ त्यांच्याविरुद्ध कपट कारस्थान करणाऱ्या विरूद्ध कडक कारवाई करण्यात गेला. कारण शिवरायांना आणि संभाजी महाराजांना विरोधकांनी घेरले होते. विषप्रयोग देखील झाले. स्वकीय मराठा सरदार वतनदार, त्याचबरोबर पुजारी, हे बरेच लोक स्वार्थासाठी देश विकायला निघाले होते. म्हणूनच सर्व पुजाऱ्यांनी शिवरायाचा राज्याभिशेक करण्यास विरोध केला. त्यातच संभाजी महाराजांसारख्या अष्टपैलू राजाला छत्रपती बनवण्यापासून विरोध केला. कारण अल्पवयीन राजारामला छत्रपती बनवून राज्याचा ताबा ठेवण्याचा घाट मंत्र्यांनीच घातला. म्हणून संभाजी राजाना बदनाम करण्याचे अनेक प्रयत्न झाले. म्हणे मोहित्यांची मंजुळा, थोरातांची कमला. संभाजी राजे बदफैली असल्याचा प्रचार करण्यात आला. उलट त्याविरुद्ध राजांचा स्वभाव होता. त्यावेळी कितीही पत्नी राजे आणि समाज करू शकत होते. पण संभाजी महाराजांनी तसे केले नाही. चारित्र्यसंपन्न राहिले. विरोधकांनी तर अकबरला संभाजी महाराजांचा खून करण्याची सुपारी दिली. अकबर हा औरंगजेबचा पुत्र मैत्रीला जागला व संभाजी महाराजांना हे षड्यंत्र सांगितले. मग मात्र ह्या सर्वांचा कडेलोट करावा लागला. ह्याला कारणीभूत महाराजांचे संस्कार होते. रयतेवरील माया होती. दलित आदिवासी पिडीत लोकांना, शेतकऱ्यांना, छातीशी कवटाळण्याची रीत होती. म्हणून हा विरोध केवळ सत्तासंघर्षाचा नव्हता. पण वर्ण व्यवस्थेतून निर्माण झाला होता.
त्याचीच परिणीती आता भीमा कोरेगावच्या दंगलीत दिसते. संभाजी महाराजांच्या शवाला एकत्र करणारा बहादुराविरूद्ध हा हल्ला होता. त्यात संभाजी महाराजांना धर्मरक्षक बनवण्याचा प्रयत्न करणारे तथाकथित गुरुजी आणि एकबोटेचा जातीयवाद होता. संभाजी औरंगजेबाचा संघर्ष हा काही धार्मिक संघर्ष नव्हता. पण राजकीय संघर्ष होता. छ शिवरायांचे आणि संभाजीचे अनेक निष्टावंत मुस्लिम सैनिक होते. मंदिराबरोबर मस्जिद बांधणारे संभाजी महाराज होते. ह्या स्वराज्य रक्षक संभाजीना धार्मिक स्वरूप देण्याचा प्रयत्न होत आहे. तो रोखलाच पाहिजे. धार्मिकतेचा कलंक लावून जगात छ शिवाजी आणि संभाजीना जागतिक दर्जा मिळू नये म्हणून हा मानुवाद्यांचा प्रयत्न आहे. नाहीतर इतका विशाल दृष्टिकोनाचा राजा, स्त्रियांचा सन्मान करणारा राजा, झालाच नाही. त्यांना धार्मिकतेचा कलंक लावण्याचा प्रयत्न हा त्यांच्या कार्याचा अपमान आहे.
संभाजी महाराज अनेक भाषा जाणणारे, साहित्यिक असणारे, बुधभूषण हा ग्रंथ लिहिणारे. रयतेशी प्रेम करणारे युवराज स्वराज्याला लाभले म्हणूनच स्वराज्य टिकू शकले. नाहीतर औरंजेबाला थेट सामना करणारा राजा उरलाच नसता. ९ वर्षाच्या युद्धात अनेक लढायामध्ये संभाजी महाराज समोरून लढले. त्यांचा एकही लढाईत पराजय झाला नाही. ते अजिंक्य राहिले. हा चमत्कारच आहे. अखेर संभाजीचा नाद सोडून औरंगजेब बिजापूर आणि कुतुबशाहीवर वळला. ६ महिन्यात बिजापूरवर कब्जा केला, कुतुबशाही संपवली. पण संभाजी महाराजांना काही करू शकला नाही. सेवटी शिर्केनी गद्दारी केली. कपटाने संभाजी महाराजांना पकडून दिले. औरंगजेबच्या कोठडीत महाराजांनी प्रचंड वेदना सहन केली. डोळे काढले पण राजा नमला नाही. जिभ काढली, कातडी सोलून काढली आणि शेवटी शीर कलम केले. ४० दिवस अनंत यातना भोगणार शिवरायांचा छावा, बलिदान केले स्वराज्यासाठी. महाराष्ट्रात रयत क्रोधाने उठली. राजाराम महाराज आणि ताराराणीच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याची ज्योत पूर्ण महाराष्ट्रात तळपत होती. त्याच प्रेरणेतून महाराष्ट्र घडला. महाराष्ट्राच्या लाडक्या राजाला माझा सलाम. त्याच प्रेरणेतून आजच्या मोगलांना उद्ध्वस्त करूया आणि श्रद्धांजली अर्पण करू.
लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत
वेबसाइट : www.sudhirsawant.com
मोबा. नं. ९९८७७१४९२९