जगबुडी (भाग-१)_25.11.2021

सर्व धर्मातील ग्रंथात कुठे ना कुठे पृथ्वी बुडाल्याचे संदर्भ आहे. बायबलमध्ये नोहाचा आर्क (विमान) बद्दल स्पष्टपणे लिहिले आहे की देवाने नोहाला सांगितले, प्रचंड असा  आर्क बनव ज्यामध्ये पृथ्वीतलावरील प्रत्येक प्रकारचे प्राणी आणि वनस्पती ठेव. पण मानवाला ठेवू नको. कारण मानव हा भ्रष्ट आहे आणि त्यामुळे पृथ्वीवर जगणे असह्य झाले आहे. नोहा त्याप्रमाणे आर्क बनवतो व पृथ्वीतील प्रत्येक प्रकारचे जीवन वस्तू ठेवतो. पण त्याच्या नकळत त्याची होणारी सून आर्कमध्ये घुसते. नोहा आर्कचे दार बंद करतो आणि पृथ्वी बुडून जाते. पण जिवंत राहतात ते सर्व प्राणी आणि नोहाच्या सुनेपासून होणारे बाळ. नोहा त्या बाळाला मारायला जातो पण त्याचे हृदय द्रवते व मानव पण जिवंत राहतो. मनू बद्दल सुद्धा याच प्रकारची कथा आपण ऐकली आहे. जग बुडाल्याचे सत्य आहे. वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा जग बुडाले याचे पुरावे आहेत. आता पुन्हा ते होऊ पाहत आहे.
२१२५ पर्यंत  पृथ्वी बुडेल, असे काही जणांचे मत आहे. तोपर्यंत कल्पना करा की मुंबई सकट सर्व तटवर्ती प्रांत बुडून जाणार आणि पाणी हळूहळू सह्याद्रीचा तट पार करायचा प्रयत्न करणार. कधीतरी समुद्र पुणे आणि औरंगाबादला सुद्धा पोहोचणार. अशाप्रकारचे प्रचंड संकट मानव जातीवर येऊ पाहत आहे. त्याचे कारण म्हणजे जगातील वाढते तापमान. त्यामुळे प्रचंड पाऊस पडणार. आता आपण बघत आहोत अनेक ठिकाणी प्रचंड पाऊस पडतो. पूर सगळीकडे वाढायला लागले आहेत. म्हणजे मानव जातीला जगबुडीचे परिणाम आतापासून भोगावे लागत आहेत आणि पुढच्या काळात कदाचित आमच्या नातवांच्या काळात मुंबई बुडून जाणार. आतापासून तोपर्यंत या जगामध्ये अशी प्रचंड वादळ, वारा, पाऊस येणार आणि पृथ्वीला झोडपणार आणि मानव जात या संकटात स्वतःला वाचवण्यासाठी धडपड करणार. हे जर वाचवायचे असेल तर मानव जातीला आता ठोस निर्णय घेऊन जगातील तापमान वाढण्यापासून थांबवले पाहिजे. औद्योगीकरणाच्या आधीचा काळ आणि आता पर्यंत पृथ्वीचे तापमान १.११ डिग्री सेंटीग्रेडने वाढले आहे. ते ज्या दिवशी १.५ डिग्री सेंटीग्रेडच्या वर जाईल त्या दिवशी जगातील बराच भाग बुडून जाणार आहे.
जगबुडी पासून पृथ्वीला वाचवण्यासाठी अनेक संमेलन झाली. तसेच २६ वे संमेलन ग्लासगो स्कॉटलंड येथे २ नोव्हेंबरला संपन्न झाले. ज्यात १०९ देशाचे प्रमुख हजर होते व इतर नेते पकडून जगातील सर्वच राष्ट्र हजर होती. या संमेलनाला जगातील मोठे भांडवलदार, उद्योजक हजर होते आणि मुले पण होती. त्याशिवाय तेथे पर्यावरणवादी लोक मोठ्या प्रमाणात जमले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सुद्धा त्यात भाग घेत होते. जगाचे तापमान तापमान १.५ डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त वाढू नये यासाठी शब्दछल चालला आहे. पण कृतीमध्ये जग कमी पडत आहे.   Intergovernmental Panel on Climate Change (IPCC) ही युनोने गठित केलेली समिती आहे. त्यांनी म्हणजेच जगातील सर्व सरकारांनी  दिलेल्या अहवालाप्रमाणे जगबुडी किंवा पृथ्वीला नष्ट होण्याची परिस्थिती निर्माण होत असल्याची सर्व जगाला धोक्याची सूचना दिली आहे. ठोस कारवाई केली नाही तर जगामध्ये प्रचंड प्रमाणात मनुष्य हानी होणार आहे. जगातील अनेक भाग बुडून जाणार आहेत. त्यात प्रथम मुंबई आणि कोकण याचा नंबर लागतो.
पुढील धोका टाळण्यासाठी  IPCC ने ४५% प्रदूषित गॅस २०३० पर्यंत कमी केला पाहिजे असे नमूद केले आहे. ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी युनोने हे संमेलन आयोजित केले. ज्याला  COP26  म्हणतात. संमेलन अगदी वाजत गाजत सुरू झाले. यजमान ब्रिटीश प्राईम मिनिस्टर बोरिस जॉन्सनने ते सुरू केले.  ते गोड बोलून लोकांचे गळे कापण्यात पटाईत आहेत. ते म्हणाले की मानवता एका वळणावर आली आहे. पृथ्वीला आपण वाचविले पाहिजे. असे अनेक राष्ट्राच्या प्रमुख यांनी फोकनाड मारले. पण काही ठोस कार्यक्रम या संमेलनातून निघाला नाही. या संमेलनाला विशेष संमेलन म्हणतात. कारण पॅरीसमध्ये झालेल्या COP21 मध्ये जे उद्दिष्ट जगासमोर ठेवण्यात आले होते. त्यावर काय कृती करण्यात आली, त्याबद्दल हे संमेलन होते. पॅरिस मधील करार तर अमेरिकेने धुडकावून लावला होता. आता कुठे जो बाईडन राष्ट्रपती झाल्यानंतर अमेरिका पुन्हा चर्चेमध्ये सामील होत आहे. नाही तर सर्वात जास्त विषारी वायू अमेरिका निर्माण करत आहे. औद्योगीकरण झाल्यानंतर जगामध्ये पाश्चिमात्त्य राष्ट्रांनी, श्रीमंत राष्ट्रांनी विषारी वायू निर्माण केला आहे. त्यामुळेच पृथ्वी संकटात आली आहे. जगातील तापमान कमी करून ठेवण्यासाठी आता श्रीमंत राष्ट्रांनी विषारी वायू निर्माण करण्याचे बंद केले पाहिजे आणि म्हणून २०३० पर्यंत ४५% विषारी वायू निर्माण करणे कमी केले पाहिजे. असे उद्दिष्ट निर्धारित  करण्यात आले आहे. पण ह्याला श्रीमंत राष्ट्र तयार नाहीत. त्याचे कारण म्हणजे कोळशापासून आणि तेलापासून जो विषारी वायू निर्माण   होतो, तो बंद केल्यास कारखाने बंद पडतील आणि राहणीमान प्रचंड बदलेल. भारता सकट विकसनशील राष्ट्रांचे म्हणणे आहे की तुम्ही २०० वर्ष जगातील संपत्ती लुटली, खनिज वापरले, कारखाने चालवले यामुळे विषारी वायू निर्माण झालेला आहे. याची जबाबदारी तुम्ही घ्या. आम्हाला पण पुढे येऊ द्या आणि त्यासाठी कारखाने चालले पाहिजेत. म्हणून आम्हाला पण कोळसा जाळू द्या.  विकसित म्हणजे श्रीमंत आणि गरीब राष्ट्रामधील हा संघर्ष पृथ्वीला  वाचण्यापासून अडथळे आणत आहे. म्हणून ४ विषयावर काम केले पाहिजे. गाड्या पासून निर्माण होणारे विषारी वायू कमी करा, कोळसा जाळू नका, पैसा कमविण्यासाठी पृथ्वीला नष्ट करू नका आणि चौथा जंगल तोडू नका. या प्रत्येक विषयावर cop26 अपयशी ठरले आहे.  फक्त घोषणा  झाल्या त्यावर कृती कार्यक्रम काहीच झाला नाही.
ब्रिटनचे पर्यावरण मंत्री आलोक शर्मा हे cop26 चे अध्यक्ष होते. त्यांनी घोषणा केली की कोळशाला आपण इतिहास जमा करू. म्हणून जगाची आशा वाढली की सर्वात घाणेरडे ऊर्जेचे स्तोत्र, कोळसा यावर नक्की काहीतरी करण्यात येईल. पण दुर्दैवाने यावर काहीच करण्यात आले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे जग दोन भागात वाटले गेले आहे. जे श्रीमंत देश आहेत, ज्याने गेली २०० वर्ष कोळसा, तेल आणि अशा प्रकारचे अनेक गोष्टी जाळून पृथ्वीमध्ये विषारी वायू निर्माण केले आहेत. त्यांना आपली जबाबदारी स्वीकारून आता विषारी वायू निर्माण करणे ४५% तरी बंद केले पाहिजे. पण उद्योगपती भांडवलदार ह्याला आपल्या देशात विरोध करतात व सरकारे त्यांच्या दबावाखाली कोळसा, तेल जाळणे कमी करत नाही. कारण कोळसा हे सर्वात स्वस्त ऊर्जा सूत्र आहे आणि भांडवलशाहीचा तो पाया आहे. म्हणून प्रत्येक सरकार अनेक घोषणा करते. पण त्यावर उद्योगपती आणि भांडवलदार यांच्या संरक्षणासाठी अंमलबजावणी करत नाही. म्हणून प्रत्येक देश स्वतःच्या श्रीमंतांना त्रास होईल असं काही करत नाही व दुसऱ्या देशांनी हे सर्व करावं असा प्रयत्न करते. ह्यासाठी याचे पैशात रूपांतर केले आहे. याला ‘कार्बन क्रेडिट’ म्हणतात. कुठल्या देशाने किंवा उद्योगाने विषारी वायू कमी केला तर त्याला कार्बन क्रेडिट मिळते. मग तो कार्बन क्रेडीट दुसऱ्या देशाला विकू शकतो. याचा अर्थ अमेरिकेमध्ये कारखाने चालू ठेवण्यासाठी दुसऱ्या देशातील कार्बन क्रेडीट तो विकत घेतो आणि बिनबोभाट विषारी वायू हवेत सोडून स्वतःचे कारखाने चालू ठेवतो. हे भांडवलदारांचे फार मोठे कारस्थान आहे.  COP26 सुरुवातीला ४० देशांनी आपल्या देशात आणि जगात कोळसा जाळायचे हळूहळू बंद करण्याचे ठरवले. पण प्रत्यक्षात करारावर सही करायची वेळ आली त्यावेळेला त्यांनी भाषा बदलली. ठरावात असे लिहिले की २०३० पर्यंत जगाचे तापमान १.५ डिग्री सेंटीग्रेड पेक्षा वाढू न देण्यासाठी, श्रीमंत देशांना २०३० पर्यंत कोळशाचा वापर बंद केला पाहिजे आणि विकसनशील देशांनी २०४० पर्यंत कोळशाचा वापर बंद केला पाहिजे. म्हणजे यात फार फरक पडला असं नव्हे कारण कॅनडासारखे राष्ट्र कोळशाच्या खाणी चालू ठेवतील आणि बाहेरच्या राष्ट्रांना कोळसा पुरवत राहतील. त्यामुळे कोळशाच्या जाळण्यामध्ये फार परिणाम होणार नाही.
COP26 मध्ये सर्वाना प्रतिक्रिया देण्यास सांगण्यात आले. एक अंतिम करार बनवा जो एकमताने पारित झाला पाहिजे. ज्यामध्ये कोळशाचा वापर व त्यावरील अनुदान हळूहळू नष्ट केले पाहिजे असे नमूद करण्यात आले होते. पण याला प्रचंड विरोध झाला. रशिया, चीन आणि भारताने याला एकमताने विरोध केला. शेवटी कुठलाही ठोस आकडा न ठरवता करार संपन्न झाला. मोठे देश हे मानवतेला फसवत आहेत. cop26 नंतर चार दिवसांनी अमेरिकेने इतिहासातील सर्वात मोठा लिलाव तेल आणि गॅस उत्पादनासाठी  केला. त्यातून जवळजवळ ६०० मिलियन टन विषारी वायूची निर्मिती होणार आहे आणि म्हणून जे श्रीमंत देश बोलतात ते फसवे असते. हे अनेकदा सिद्ध झाले आहे.
जगामध्ये पृथ्वीला वाचवण्याची आणीबाणीची वेळ आली असताना, जगातील श्रीमंत राष्ट्र अतिशय बेजबाबदारपणे वागत आहेत. ही खरी शोकांतिका आहे. सर्वांना माहीत आहे की तेल व कोळसा असे ऊर्जा सूत्र हे जगाला धोक्याचे आहेत. पण सर्व नेत्यांनी या महत्त्वाच्या प्रश्नाकडे बघण्याचा टाळले. सर्व लोकांना माहिती आहे विषारी वायू सोडल्यामुळे काय परिणाम होतात. पण त्याच्यावर उपाय करण्याचे स्वार्थापोटी सर्व लोक पळतात. त्यात जगातील कारखानदार, उद्योगपती आणि श्रीमंतांचे फार मोठे कारस्थान आहे की फायदा जास्त होण्यासाठी ते जगाची वाट लागली तरी चालेल अशाप्रकारे काम करत आहेत. त्याच्यावर ठोस तोडगा काढणे हे प्रत्येक देशाला क्रमप्राप्त आहे. इलेक्ट्रिक गाड्या चालवणे, तसेच सौर ऊर्जा आणि इतर ऊर्जाचे स्तोत्र निर्माण करून जगाला विषारी वायूपासून मुक्त करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्यात जर आपण मागे राहिलो तर या जगाला बुडण्यापासून कोणी थांबू शकत नाही हे स्पष्टपणे सर्वांना कळले पाहिजे.
लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा. न. ९९८७७१४९२९

Please follow and like us:

Author: Brigadier SS