जगातील सर्वश्रेष्ठ राजा छत्रपती शिवाजी महाराज_८.६.२०२३

६ जून १६७४  हा दिवस सुखाचा, महाराष्ट्राच्या मुक्तिचा. छत्रपती शिवरायांचा याच दिवशी राज्याभिषेक झाला. अवघा आसमंत दुमदुमला.  “बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय” जयघोष झाला.  हजारो वर्षाचे साखळदंड मोडून पडले. गुलामगिरीत आयुष्य काढणारे मुक्तिचे श्वास घ्यायला लागले. अनेक वर्ष अतिशय क्रूर अशा सुलतानाच्या हाताखाली भारतीय जनता भरडली गेली होती.  गावच्या गाव उद्ध्वस्त केले होते.  गाढवाचा नांगर अनेक गावावर फिरवला होता.  त्यात बादशहाचे नोकर म्हणून पाटील, देशपांडे, कुलकर्णी, मनसरदार, जागीरदार हे आणखी लुटत होते.  धन संपादन करून बादशहाला त्यातला एक भाग देत होते, पण या धन संपादनेला मर्यादा नव्हती.  आपल्या मनाच्या इच्छेप्रमाणे रयतेला नागवण्यात येत होते.  त्यांच्या आया बहिणीची इज्जत दिवसा ढवळ्या लुटली जात होती.  पण जनतेचा वाली कोणीच नव्हता.  म्हणून जनतेला ही राजाची परवा नव्हती, एक राजा गेला आणि दुसरा आला तर रयतेला काहीच फरक पडत नव्हता.  जनतेला अन्याय आणि अत्याचारा समोर झुकावे लागत होते.

राजाला देखील जनतेची काही चिंता नव्हती.  जोपर्यंत जमीनदार जागीरदार त्यांना पाहिजे तेवढा महसूल आणून देत होते,  तोपर्यंत त्यांना जनतेची फिकीर नव्हती.  न्याय निवाडा देखील हे जागीरदार आणि वतनदार करायचे.  त्यामुळे जनतेला या जागीरदार आणि वतनदारा पलीकडे काहीच माहित नव्हते.  तो म्हणेल तो कायदा, ते सांगतील तो आदेश.  त्यामुळे जनतेला राजा कुठलाही असला तरी फरक पडत नव्हता.  म्हणून ते राजा विषयी बेफिकर होते.  राष्ट्र, राज्य या कल्पना त्यांना फार दूरच्या वाटत होत्या.  राजासाठी आणि राष्ट्रासाठी मर मिटण्याची जिद्द कुणाचीही नव्हती.  हे सर्व अचानक बदलले.  छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यांच्या कर्तुत्वाने त्यांच्या शौर्याने विद्वतेने स्वराज्याची मुहुर्तमेढ लावण्यात आली. स्वराज्य संघर्षातून समृद्धीकडे वाटचाल करू लागले आणि ६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला.  एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाले. महाराष्ट्र सुखावला.

अशा राजाचा जन्म झाला की जनता मर मिटायला तयार होती नव्हे तर राजासाठी मरण्याची जणू स्पर्धाच होती. तानाजी मालुसरे आपल्या रायबाच्या लग्नाचे निमंत्रण घेवून शिवरायांकडे गेले होते.  राजांची घालमेल ऐकताच ते उदगारले  “आधी लग्न कोंडण्याचे मगच रायबाचे.” आपल्या मुलाचे लग्न सोडून तानाजी लढाईवर गेले ते परत आलेच नाहीत. विजयी वीरांचे कौतुक करायला महाराज कोंडाण्यावर गेले तेव्हा त्यांना म्हणावे लागले. “गड आला पण सिंह गेला.” अशीच शिवरायांची कथा ही आत्मसमर्पण करणार्‍या वीरांची कथा आहे. अफझलखानचा वध करताना, होता जिवा म्हणून वाचला शिवा म्हणतात.  शिवा न्हाव्याची तर कथा ही त्यागाची परिसीमाच  होती.  शिवा काही सरदार नव्हता, एक सामान्य माणूस होता.  त्याने असे काय बघितले की जान कुर्बान करण्यासाठी तयार झाला.  छत्रपतींसारखा दिसणारा शिवा तयार झाला छत्रपतींचे सोंग घ्यायला.  तो पकडला गेला तर मृत्युमुखी पडणार याची त्याला पूर्णपणे खात्री होती. तरी तो डगमगला नाही.  लाखो मेले तरी चालतील पण लाखोंचा पोशिंदा जगाला पाहिजे.  या भावनेने तो पुढे गेला.  शिवरायांचा वेश परिधान करून तो गेला.  शेवटी फजलखानने त्याला ओळखले.  कारण अफजलखान वधाच्या वेळेस शिवरायांच्या कपाळावर जखम झाली होती, ती जखम शिवाच्या कपाळावर नव्हती, त्याला मारण्यात आले. अशाप्रकारे अनेक लोकांनी स्वराज्यासाठी आपले प्राण दिले.  त्यातल्या बऱ्याच लोकांची आपल्याला माहिती सुद्धा नाही आणि म्हणून हे स्वराज्य टिकले,  इतके वाढले की अटके पार झेंडा फडकण्यापर्यंत हे स्वराज्य वाढले.

शिवरायांनी स्वराज्याचे प्रशासन अति उत्तम पद्धतीने चालविले होते.  त्याने जमीनदारी नष्ट केली व जनतेकडून सरळ कर घेण्यास सुरुवात केली.  म्हणून पाटील, कुलकर्णी, देशपांडे, देशमुख आणि जमीनदारांचे राज्य नष्ट झाले.  महसूल सरळ सरकारला द्यावा लागे म्हणून राजाचा आणि प्रजेचा संबंध अगदी थेट आला. त्यात दुष्काळ  आला तर महसूल माफ होत असे. जमीन कसायला सरकारी मदत मिळत होती. त्यापूर्वी सैन्य उभ्या पिकावरून जाई. शिवरायांनी आदेश दिला, शेतकर्‍यांच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, स्त्रिच्या अंगाला हात लावायचा नाही. अशा सर्व आदेशांमुळे हा राजा आपला आहे, यासाठी मर मिटायला मी तयार आहे, असे जनता म्हणायला लागली. कुणीही कधीही कुठल्याही स्त्रीवर हात घालायचा, बलात्कार करायचा ही गोष्ट शिवरायांना अजिबात मान्य नव्हती. त्यांनी रांझाचा पाटलाचा चौरंग केला. त्याबरोबर सर्व महाराष्ट्राला शिवरायांच्या न्याय प्रणालीवर पूर्ण विश्वास निर्माण झाला.

या सर्व पार्श्वभूमीवर स्वराज्य निर्माण झाले.  एक न्यायाचे राज्य, रयतेचं राज्य म्हणून वावरू लागले.  सर्व जनतेचा विश्वास या राज्यावर निर्माण झाला, म्हणून शिवराय गेल्यानंतर देखील ही परंपरा चालू राहिली.  शिवरायांच्या शेवटच्या दिवसात त्यांना जाणीव झाली कि, स्वराज्य धोक्यात आहे. औरंगजेब लाखोंचे सैन्य घेऊन स्वराज्यावर तुटून पडणार. नेहमीच गनिमी काव्याने आपण लढू शकत नाही. म्हणून त्यांनी नवीन तंत्र निर्माण केले. कर्नाटकवर स्वारी केली.  कुतुबशाह बरोबर मैत्री केली व त्यांची मदत घेऊन ते तामिळनाडू वर चालून गेले.  त्यांनी जिंजी सर केली, बरोबर वेल्लोर सुद्धा जिंकून घेतले.  त्याचबरोबर त्यांनी छोटा छोटा नायकांबरोबर करार केला.  युती केली.  लढण्याची पद्धत त्यांच्याबरोबर निर्माण केली. हा छत्रपती शिवरायांचा सर्वात मोठा विजय आहे.  कारण छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर सुद्धा ही लढाई कायम चालू राहिली. कारण स्वराज्य टिकले पाहिजे म्हणून त्यांनी औरंगजेबसाठी हजार मैलाचे रणांगण तयार केलं आणि रायगड पासून तामिळनाडू पर्यंत छोटे छोटे शिबंदी असणारे गड किल्ले बनवले. वाटेत असलेल्या नायकांना आणि छोट्या छोट्या राजांना आपले मित्र केले व गनिमी काव्याची एक उत्कृष्ट अशी नवीन लढण्याची पद्धत निर्माण केली.  आता डोंगर दर्‍यामध्ये लढण्याची वेळ निघून गेली होती.  आता छोट्या शिबंदी निर्माण केल्या. शिवरायांचं तत्त्व असे होतं की छोट्या शिबंदीचे किल्ले, गडकोट लढवायचे.  पण मुख्य लढाई मैदानात करायची. औरंगजेबाचे सैन्य जेव्हा जवळ यायचे त्यावेळेला संताजी धनाजी सारखे लोक बाहेर येऊन त्या सैन्याला नष्ट करायचे.

औरंगजेब आल्यानंतर सुरूवातीला संभाजी महाराजांनी कडवा संघर्ष केला. मग औरंगजेब, आदिलशाही आणि कुतुबशाही संपवायला निघाला.  त्यांना संपविल्यानंतर तो परत महाराष्ट्रावर चालून आला.  त्याबरोबर संभाजी महाराजांनी पुन्हा जोरदार संघर्ष केला.  पण दुर्दैवाने आपल्याच लोकांच्या कट कारस्थानामुळे त्यांना पकडण्यात आले व औरंगजेबने अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या केली.  अशा क्रूर औरंगजेबाला जर कोणी स्वतःचा राजा म्हटलं तर त्याच्या विरोधात महाराष्ट्र पेटून उठेल.  मग शरद पवार सारख्या लोकांनी त्यांचं कौतुक केलेलं पाहून लोक चिडणारच. शिवाजी महाराजांनी किंवा संभाजी महाराजांनी किंबहुना स्वराज्याचे कोणीच धार्मिक राजकारण केले नाही. मग कुठल्याच तरुणांना हे द्वेषाचे राजकारण करण्याचा कोणताच अधिकार नाही.  संभाजी महाराजानंतर येसुबाईंनी राजाराम महाराजांना छत्रपती केले व जिंजीला पाठवले. १००० मैलाचे रणांगण पेटले.  संताजी धनाजीने मोगल कापून काढण्याचे सत्रच चालविले.  अशाप्रकारे ११ वर्षे लढल्यानंतर राजाराम महाराज पुन्हा महाराष्ट्रात आले.  तिथे ते आजारी पडले व १७०० साली सिंहगडावर मरण पावले.  मग लढाई ताराराणीने चालवली.  २५ वर्षाची विधवा स्त्री घोड्यावर बसून औरंगजेबावर थेट हल्ला करणारी जगातील सर्वश्रेष्ठ महिला योद्धयानी  औरंगजेबाला या महाराष्ट्रातच गाडले. स्वत:ला सर्वश्रेष्ठ समजणार्‍या बादशहाला आपली राजधानी परत दिसलीच नाही.  याप्रमाणे शिवरायांनी स्वत:  गेल्यानंतर सुद्धा औरंगजेबाचा पराभव करण्याची यंत्रणा निर्माण केली होती.  म्हणून शिवराय हे जगातील सर्वश्रेष्ठ योद्धा ठरले आहेत.  अनिष्ट परिस्थितीमध्ये स्वराज्य बनवलं. भयानक क्रूर लोकांबरोबर संघर्ष केला.  त्यांचा पराभव केला. त्यांनी आपल्या सैन्याला तयार केले. मानसिकरित्या  लढण्याची वेळ पडल्यास मरण्याची सुद्धा तयारी निर्माण केली.  असा योद्धा जगात कुणी झाला नाही, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.  शिवरायांनी फक्त युद्धाच्या मैदानावर विजय मिळवला नाही, तर त्यांनी आपल्या जनतेचे हृदय आणि मन जिंकले.

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा. न. ९९८७७१४९२९

Please follow and like us:

Author: Brigadier SS