जवान, किसान, कामगार यांचा वाली कोण ?_६.५.२०२१

गेल्या आठवड्यात देशाचे लक्ष वेधणार्‍या घटना घडल्या.  पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल आणि त्यात अत्यंत नेत्रदीपक संघर्ष प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भारतीय जनता पार्टी व ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस मध्ये झाला.  अत्यंत संघर्षातून तृणमूल काँग्रेसने निर्णायक विजय मिळवला.  तिसर्‍यांदा ममता बॅनर्जी बंगालची मुख्यमंत्री झाली.  त्याचबरोबर दुसरा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी उदयास आली.  या पाठीमागे भाजपने अनेक वर्ष केलेली मेहनत व संघर्ष सुद्धा कारणीभूत आहे.  भाजपने नेहमीप्रमाणे ममताचे अनेक नेते फोडले.  जवळ जवळ सगळे पडले.  ते विसरले होते की, ममतामुळे ते मागच्यावेळी आमदार म्हणून निवडून आले होते. या निवडणुकीमध्ये पूर्वीचे सत्ताधारी पक्ष  काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष यांना एकही जागा मिळवता आली नाही.  अशी केविलवाणी गत या दोन मुख्य पक्षाची झाली.  हे पुढच्या काळाचे संकेत आहेत.

            पूर्ण देश काबीज करायचा भाजपने विडा उचललेला आहे.  हे करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद सर्वांचाच वापर करायला भाजप मागे पुढे बघत नाही.  तसे तर सर्वच पक्ष करतात.  भाजपने अनेक राज्यांमध्ये निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर तेथील आमदारांना फोडून पुन्हा सत्ता मिळवली आहे.  कर्नाटक, मध्यप्रदेश या ठिकाणी पराभव होऊन देखील भाजप विजयी झालेले आहे.  त्यामध्ये कुठलीही तंत्र वापरायला भाजप मागे पुढे बघत नाही.  पण भाजपला फक्त दोष देऊन चालणार नाही, कारण सर्वात जुना काँग्रेस पक्ष आपल्या आमदारांना राखू शकत नाही.  हे सुद्धा तितकेच दुर्दैवी आहे.  मध्यप्रदेश मध्ये माधवराव सिंधिया आमचे एकदम आदरणीय नेते होते.  काँग्रेस पक्षाची ती एक शक्ती होती.  एक चांगला चेहरा होता.  पण त्यांना मर्यादेपेक्षा जास्त वाढू देण्यात आले नाही.  तसेच राजेश पायलेट सुद्धा काँग्रेसचा एक अत्यंत महत्त्वाचा चेहरा होता.  त्यांच्याशी माझा अतिशय जवळचा संबंध होता.  या दोघांच्या मुलांचा सुद्धा माझ्याशी अतिशय जवळचा संबंध राहिलेला आहे.  ज्या वेळेला ज्योतिरादित्य सिंधियाना काँग्रेस सोडून भाजपत जावं लागलं, त्यावेळेला मला अत्यंत दुःख झालं.  मी त्यांचा कोंडमारा अनेक वर्ष बघत होतो.  मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री बनण्याचा खरा मान ज्योतिरादित्य सिंधिया यांचा होता आणि जनतेमध्ये सुद्धा ते लोकप्रिय होते.  पण पक्षाच्या हिताच्या दृष्टिकोनातून लोकाभिमुख चेहरा पुढे आणायचा सोडून काँग्रेसने नेहमीच एका आंतरराष्ट्रीय चौकटीतून पुढे येणारा चेहर्‍याला महत्व दिले आहे.  ज्योतिरादित्य सिंधिया यांना महाराष्ट्रामध्ये प्रभारी करायचं सोडून उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभा इलेक्शनला त्यांना प्रभारी केले.  तिथे त्यांना काहीच अधिकार नव्हते.  तिथे काँग्रेस भुईसपाट होणारच होती. ती झालीच हळूहळू अनेक वर्ष अपमान सहन केल्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपची वाट धरली.  काँग्रेसचे बहुमत असताना सुद्धा त्यांना बहुमत राखता आलं नाही व आज मध्यप्रदेशमध्ये पुन्हा भाजपची सत्ता आली.  राजस्थानमध्ये सुद्धा आमच्या मित्रांचे चिरंजीव सचिन पायलट यांना अनेक वर्ष अपमान सहन करावा लागला आहे.  कधी राजस्थान मधील घडी विस्कळीत होईल हे सांगता येत नाही.  अर्थात तेथील मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे देखिल तितकेच कार्यक्षम आहेत.  पण या दोघांना एकत्र ठेवण्याची गरज होती.  काँग्रेसमध्ये आदरणीय असे ज्येष्ठ नेते उरलेच नाहीत.  ज्यांच्या शब्दाला मान देऊन लोक पक्ष हिताच्या दृष्टीने एकत्र काम करतील, असे कुणीच नाहीत.  सगळ्या चांगल्या  लोकांना या ना त्या कारणामुळे पक्षापसून दूर जावे लागले.

            पश्चिम बंगालमध्ये सुद्धा हेच झालेले आहे.  मी सोनिया गांधींचा सचिव असताना ममता बॅनर्जी यांच्याकडे गेलो होतो.  त्यांना विनंती केली होती, तुम्ही परत काँग्रेसमध्ये या.  त्या म्हणाल्या “सुधीर यह गलती मे कभी भी नही करूंगी | क्योंकी काँग्रेस नॅशनल स्तरपर कम्युनिस्ट को विरोध नही कर सकती| मेरा विरोध कम्युनिस्ट है |”  त्याचे परिणाम असे झाले ममता बॅनर्जी एका वाघिणीसारखी अन्याय अत्याचार विरोधात बंगालमध्ये उभी राहिली आणि दहा वर्षांच्या मेहनतीनंतर स्वतःच्या दमावर तिने बंगालची निवडणूक जिंकली व मुख्यमंत्री झाली.  म्हणून त्यांचे कौतुक करायचे तेवढे थोडे. मी पक्षीय राजकरणातून तिचे कौतुक करत नाही तर एका स्त्रीच्या जबरदस्त इच्छाशक्तीला सलाम करतो. आमचा अल्पकाळात अतिशय जवळचा संबंध असल्यामुळे मी तिचे अभिनंदन करेन.   ती एकटी स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि तिने जगाला दाखवून दिलं, कितीही मोठी शक्ती आपल्या विरोधात उभी राहिली तरी माघार घ्यायची नाही.  “हम लढेंगे|”  हे त्यांचे घोष वाक्य होते.  ममताने एकट्याने जनतेमध्ये घुसून सर्व लोकांना आपलंसं केलं. या लढतीमध्ये काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाचे पतन झाले. ही पण एक दुर्दैवाची गोष्ट आहे. व्यक्ति केंद्रित राजकारणामधून तत्त्वशून्य राजकारण पुढे येत आहे व केवळ सत्तेसाठी राजकारण, ते जनतेसाठी नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

            भाजपने ८०च्या वर जागा जिंकल्या.  ५ वर्षापूर्वी भाजपा जवळ जवळ शून्य होती. पण तिने नव्याने बंगालमध्ये स्वत:साठी  राजकीय जागा निर्माण केली. त्यात डावे पक्ष व काँग्रेस नेस्तनाबूत झाले.  तसेच अनेक राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष पुढे आले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय पक्ष मागे पडत चालले आहेत. भारतीय मतदार इतका हुशार आहे की लोकसभेसाठी तो वेगळे मतदान करतो आणि विधान सभेसाठी वेगळे मतदान करतो.  जसे मागच्या लोकसभेत दिल्लीमध्ये सर्वच जागा भाजपने जिंकल्या, पण वर्षभराने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीने प्रचंड बहुमताने विधानसभेची निवडणूक जिंकली. 

            दुसरीकडे कम्युनिस्ट पक्षाने केरळामध्ये पुन्हा निवडून येऊन एक इतिहास घडवला आहे. आतापर्यंत प्रत्येक निवडणूकीला काँग्रेस आणि डावी आघाडी ही आलटून पालटून निवडून यायचे. पण यावेळी सलग दुसर्‍यांदा कम्युनिस्ट निवडून आले.  तिथे देखील काँग्रेसची ससेहोलपट झाली आहे.  गटबाजीमध्ये विभागलेली काँग्रेस, सरकार विरुद्ध वातावरण असताना सुद्धा जिंकू शकली नाही.  ही गोष्ट सगळीकडे झालेली आहे.  द्रमुकचा विजय तामिळनाडूमध्ये  झाला.  ते अपेक्षित होते.  एक नवीन नेतृत्व तामिळनाडूमध्ये प्रस्थापित झाले आहे.  श्रेष्ठ सिनेसृष्टीतील मोठमोठे लोक, कमल हसन वगैरे नेस्तनाबूत झाले आहेत.  आसाममध्ये सुद्धा भाजपने पुन्हा निवडणूक जिंकली आहे. त्यात  काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले अनेक लोक आहेत. म्हणून काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे.  इथे भाजपने आपली जागा राखली आहे.

            काँग्रेसचे दुर्दैव हेच आहे ही काँग्रेसने कधीही लोकप्रिय नेत्यांना पुढे येऊ दिले नाही.  निष्ठावंत लोकांचा गळा घोटून टाकला आणि प्राधान्य चमच्यांना दिले आहे.  त्याचे दूरगामी परिणाम आपल्याला दिसत आहेत. त्यातून पुन्हा उभे राहण्याची क्षमता सुद्धा दिसत नाही.  महाराष्ट्रात देखील आज अनेक नेते काँग्रेस बाहेर आहेत.  त्यांना परत काँग्रेसमध्ये आणण्याची भूमिका एक सुद्धा नेता घेत नाही. आपल्यावर वरचढ होणारा कोणीच नको आणि म्हणून ओसाडगावचा राजा बनण्यामध्ये काँग्रेस नेते धन्यता मानतात.  पण त्याचा परिणाम काँग्रेस उद्ध्वस्त होईल याकडे कुणीही बघत नाही.

            राजकारणामध्ये एक शक्तीशाली विरोधी पक्ष असण्याची गरज आहे. त्यासाठी काँग्रेसने एक राष्ट्रीय पक्षाची भूमिका घेतली पाहिजे.  काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये लोकाभिमुख तरुण आणि धाडशी कार्यकर्त्यांना पक्षाबाहेरची वाट दाखविण्यात आली आहे आणि चोर, लुटारू, चमच्यांना नेते बनविण्यात आले.  परिणामत: काँग्रेसमध्ये वचक कुणाचा राहिला नाही.  राहुल गांधींना बदनाम करण्यामध्ये काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचा हात आहे.  भाजपला घाबरून अनेक काँग्रेसचे नेते कातडी बचाव धोरण स्विकारताना दिसतात.  त्यामुळे सक्षम विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस उभे राहत नाही.  ती जागा आता स्थानिक पक्षांनी घेतली आहे.  जी झपाट्याने पुढे जात आहे. ममता बॅनर्जी या काँग्रेसच्या धडाडीच्या नेत्या होत्या. त्यांना दूर केले. आंध्राच्या राजशेखर रेड्डीला दूर केले.  नंतर ते मुख्यमंत्री झाले.  आता त्यांचा मुलगा जगनमोहन मुख्यमंत्री आहेत व काँग्रेस नाहीशी झाली आहे. ज्योतिरादित्य सिंधियाला घालवले.  महाराष्ट्रात सुनील देशमुख सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अत्याचार करून काँग्रेसला चाळीसच्या घरात आणले. यात बदल होताना दिसत नाही.  त्याउलट भाजपने जो पण उपयुक्त असेल त्या माणसाला पक्षात घेतले.  साम, दाम, दंड, भेद  ही नीती वापरुन आज एक राष्ट्रीय पक्ष म्हणून प्रत्येक राज्यात घुसत आहेत. त्याच्या चांगल्या वाईट परिणामांबद्दल मला बोलायचे नाही.  वाईट इतकेच आहे की सर्वच पक्ष अंबानी अडाणीची पक्ष झाले.  मग जवान, किसान, कामगार यांना कोण वाली राहिले. या प्रश्नाचे उत्तर भारतीय जनतेला लवकरच द्यावे लागणार आहे. नाहीतर कोविड मध्ये ज्या अनंत यातना लोक भोगत आहेत त्यातून सुटका दिसत नाही.

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा ९९८७७१४९२९.

Please follow and like us:

Author: Brigadier SS