डोनाल्ड ट्रम्प आला आणि गेला मोदींनी त्याचे न भूतो न भविष्यतो असे स्वागत केले. ट्रम्प वल्गना करतात की तो सांगेल ते मोदी ऐकतात. हे काही नवीन नाही. सर्वच पक्षांनी आता अमेरिकेची री ओढणे सुरु केले आहे. अमेरिका स्वत:ला जगाची शेहेनशाह मानते. तसा तो वागतो. जसे इराण बद्दल झाले. मोठ्या मुश्कीलिनी १९९० साला नंतर इराणला पाकिस्तान पासून तोडण्यात भारत यशस्वी झाला. युद्धात पाकिस्तानला खोली इराण मुळे मिळत होती. मी गुप्तहेर खात्यात काम करत असताना आम्हाला जाणीव झाली की कधीतरी अशी वेळ येईल जेंव्हा पाकिस्तान विरुद्ध भारताला एक निर्णायक युद्ध करावे लागेल. त्यात पाकिस्तानचा अंत करावाच लागेल. मग तो कसाही असो. शांततेने पूर्वी प्रमाणे भारत पाकिस्तान एक होऊन नांदू लागतील. किंवा पाकिस्तानचे चार तुकडे होतील आणि भारताचे प्रत्येक तुकड्याबरोबर मैत्रीचे नाते असेल. अमेरिकेचा अगदी उलट समज आणि भूमिका आहे.
अमेरिका म्हणते की अखंड आणि मजबूत पाकिस्तान हा अमेरिकेच्या हिताचा आहे. ट्रम्प ने भारतात येवून हेच म्हटले. त्यालाच प्रसार माध्यमांनी दाबून टाकले. अमेरिकेला पाकिस्तानचा उपयोग अफगाणिस्तानवर नियंत्रण ठेवण्यासाठी करायचा आहे. इराणला विरोध करण्यासाठी करायचा आहे. आणि रशियन समर्थक राष्ट्रांविरुद्ध करायचा आहे. शेवटचे म्हणजे काश्मीरला स्वतंत्र करून काश्मीरवर ताबा मिळवायचा आहे. जेणेकरून चीन आणि रशियाच्या विरोधातील सर्व अस्त्र वापरता येतील. त्याचबरोबर भारताला दाबता येईल. ही अनेक वर्षाची अमेरिकन भूमिका सत्ताधार्यांना माहित आहे. प्रत्येक युद्धात अन दहशतवादी हल्ल्यात, अमेरिकेने पाकिस्तांचीच बाजू घेतली आहे. शीत युद्धात पाकिस्तान अधिकृतरीत्या अमेरिकेचा आघाडीचा देश होता. त्याउलट भारत अमेरिकेविरुद्ध रशिया बरोबर होता. पण आपण १९९१ नंतर अमेरिकेचे पायच चाटत आहोत. आपण बघतोच आहोत की, गेल्या अनेक वर्षात अमेरिकन उद्योग भारतात रुजले आणि भारताच्या सामाजिक/आर्थिक विश्वात समरस झाले. कारण १९९१ ला रशिया विरोधातील शीत युद्ध अमेरिकेने जिंकले आणि पूर्ण जगावर राज्य करू लागले. त्यासाठी इंग्रजांसारखी भारतावर कब्जा करायची अमेरिकेला गरज भासत नाही. पण भारतातील सत्ताधीश यांना ताब्यात ठेवले तर हे अनधिकृत गुलाम, गोर्या माणसांची सेवाच करतील.
तसा अमेरिकेचा इतिहास कोलंबस नंतर सुरु झाला. ह्याचाच अर्थ युरोप ,चीन, भारत, इजिप्त सारखी अमेरिकेची संस्कृती किंवा इतिहास काही प्राचीन नाही. हा नवीन देश आहे. म्हणूनच की काय अमेरिकेत कधी कुणी राजा नव्हता. कोणी सरदार नव्हता. अमेरिका हा पहिला देश आहे जेथे जगातील पहिली लोकशाही रुजली. व आजपर्यंत तिचा प्रसार झाला. जगातील अनेक भागातून लोक अमेरिकेत आले आणि स्थायिक झाले . म्हणून अमेरिका हा जगातील सर्व जाती, जमाती, रंग, भाषांचा समूह आहे. आज ४५ लाख भारतीय लोक अमेरिकेचे मतदार आहेत. भारतीयांनी प्रचंड यश मिळवले. पण ते कट्टरवादी ट्रम्पवादी लोकांच्या डोळ्यात सलत आहे. जसे भाजप हिंदुत्वाचा प्रसार करतो आणि लोकांना मूर्ख बनवतो. तसाच ट्रम्प गोरे लोकांचे समर्थन करतो आणि काळ्या लोकांचा द्वेष करतो.
अमेरिकेत जास्त युरोपच्या लोकांनी स्थलांतर केले. त्यामुळे युरोपियन संस्कृती आणि धर्म तेथे रुजू झाले. यूरोपियन राष्ट्रांनी त्यांना फक्त वसाहत म्हणून गणला. अमेरिकेची एक वेगळी विचारधारा निर्माण होत असताना त्यांनी दुर्लक्ष केले. समुद्रामार्गे आपले वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न विफल होता. जमिनीवर सुद्धा अमेरिका एक महाकाय राष्ट्र उभे राहत होते व तिच्यावर नियंत्रण ठेवणे अशक्य होते. दक्षिण अमेरिकेतील लोक शेतकरी होते आणि ते गुलामावर अवलंबून होते उत्तर अमेरिकेत लोक उद्योगावर अवलंबून होते. म्हणून ह्या दोन प्रवाहाचा मोठा संघर्ष निर्माण होत होता. १७७३ साली पहिले बंड झाले. अमेरिकन लोकांनी बोस्टन येथे चहा च्या खोक्यांनी लादलेल्या ३ बोटीतला चहा समुद्रात फेकला. ह्यालाच अमेरिकन इतिहासात् “बोस्टन टी पार्टी” म्हणतात. १७७५ ला अमेरिकेचा स्वतंत्र लढा सुरु झाला. त्याचवेळी मराठ्यांनी जर भारतात लढा केला असता तर इंग्रजांना उखडून काढता आले असते. टिपू सुलतानचे युद्ध सुरूच होते. फक्त मराठ्यांनी त्याला साथ दिली असती तर इंग्रज येथे राहू शकले नसते. कारण अमेरिकन युद्धामुळे इंग्रज कमजोर झाले होते. १७८३ साली अनेक पराभवानंतर, पॅरीस येथे शांती करार झाला व अमेरिका स्वतंत्र झाली. १७८८ साली अमेरिकेचे संविधान बनले. जगात असे संविधान पहिल्यांदाच बनले. त्यातूनच भारताच्या संविधनाचे अनेक पैलू उभे राहिले. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अमेरिका आपल्या स्वतंत्र युद्धात यशस्वी झाली. पण भारतात मराठ्यांचा राष्ट्रव्यापी प्रभाव असताना सुद्धा आपण यशस्वी झालो नाही. उलट फोडा आणि राज्य करा ह्या इग्रजांच्या धोरणाला आपण बळी पडलो आणि पूर्ण गुलाम १८१८ ला झालो.
अमेरिका इतकी मोठी आहे की तिला एकसंघ ठेवणे कठीणच होते. गुलामगिरीच्या प्रश्नावर उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत संघर्ष वाढत गेला. अमेरिकेत यादवी युद्ध १८६१ पासून १८६५ पर्यंत झाले. अमेरिकन राष्ट्रपती अब्राहम लिंकनच्या नेतृत्वाखाली, उत्तर अमेरिका विजयी झाली आणि अमेरिका कायमची बदलली. लिंकन यांचे सर्वात मोठे कर्तुत्व अमेरिकेला एकसंघ ठेवणे आहे. पहिले लोकशाही राष्ट्र जिवंत राहिले. लोकशाही तत्व पूर्णपणे रुजले. अमेरिकेतील राज्यांना प्रचंड स्वातंत्र्य आहे. खंडप्राय देशाचा विस्तार हा रेल्वे आणि बोटी मुळे झाला. अमेरिका पसरत पश्चिम तटापर्यंत वाढली आणि प्रचंड मोठ्या देशाची बांधणी झाली. सोन्या पासून, खनिज व तेला पर्यंत संपूर्ण देश झपाट्याने आर्थिक ताकद बनत गेला. दुसरे महायुद्ध हिटलर विरुद्ध सुरु झाले त्यावेळी इंग्लंड हे मुख्य राष्ट्र होते. पण खरेतर अमेरिकन आर्थिक शक्ती मुळे आणि रशियाच्या महाकाय शक्ती मुळे हिटलर नेस्तनाबूत झाला. इंग्लंडची शक्ती अमेरिकेच्या हातात गेली तेव्हापासून गोर्या यूरोपियन समुदायचे नेतृत्व अमेरिकेने केले व १९९१ ला रशियाचा पाडाव करून अमेरिकन सत्ता जगावर लागू झाली.
ह्या दरम्यान गरीब राष्ट्रावर आपली पूर्ण सत्ता लागू करण्यामध्ये अमेरिका यशस्वी झाली. आता बहुतेक सर्व राष्ट्र अमेरिकेच्या हुकुमतीला मानतात त्याला कारण अमेरिकेची अमर्याद मिलिटरी आणि आर्थिक शक्ती. अमेरिकेने जागतिक बँक स्थापन करून सर्व राष्ट्रांना गुलाम केले. जे अमेरिकेपासुन वेगळे राहतात किंवा विरोध करतात त्यांच्यावर अमेरिका बंधन लावते. जसे इराणला अमेरिकेने शत्रू मानले. कारण अमेरिकेचे चमचे सौदी अरब आणि पाकिस्तान सुन्नी इस्लामिक राष्ट्र त्यांना विरोध करतात. इराण हे शिया राष्ट्रांचे नेतृत्व करते. त्यांनी अनुअस्त्र बनवण्याच्या पवित्र्यात अमेरिकेला विरोध केला. मग ओबामानी शांती करार केला व इराण ने अनुअस्त्र न बनवण्याचा निर्णय घेतला. पण ट्रम्प राष्ट्रपती झाल्यावर हा करार मोडून टाकला व इराण वर आर्थिक निर्बंध लावले. भारताला इराण कडून पाहिजे तेवढे स्वस्त तेल मिळत होते. पण अमेरिकेच्या दबावाखाली येवून आपण आपले राष्ट्र हित विसरलो. अमेरिकेच्या आदेशावरून आपण पण इराण तेलावर बंदी घातली. त्यात आपले प्रचंड नुकसान झाले. त्यात इराणने पाकिस्तान विरुद्ध भारताला मदत करावी ही भूमिका ठिसुळ होते. पाकिस्तानचे चार तुकडे करण्यात आपला खरा साथी इराण असणार आहे. केवळ अमेरिकेसाठी मोदिसाहेब तुम्ही इराणला आपला शत्रू करत आहात त्यात कुठली राष्ट्रभक्ती आली. त्यात आपल्या जनतेचे तुम्ही किती नुकसान करत आहात ह्याचा विचार करावा.
भारत अनेक वर्ष आणि आता, अमेरिकेकडून ३ अब्ज डॉलरची शस्त्रे घेत आहे. ही शस्त्रे नेहमीच महागडी राहिली आहेत. आपल्याला अमेरिकेने नेहमी कनिष्ठ तंत्रज्ञानाची हत्यारे दिली आहेत. उच्च तंत्रज्ञान विकसित करण्याला आणि परदेशी राष्ट्राकडून हत्यार विकत घ्यायला अमेरिका विरोध करते. जसे आपण रशियाकडून एस – 400 क्षेपणास्त्र घेत आहोत त्याला अमेरिकेने विरोध केला आहे. तसेच ट्रम्पचा हेतू भारताची अडवणूक करण्याचा होता. अमेरिकन वस्तू मोठ्या प्रमाणात भारतात येवू देण्याबद्दल आहे. त्यात शेतमाल मोठ्या प्रमाणात आहे. अमेरिकेतील कांदा, तांदूळ, गहू, सफरचंद भारतात येऊ दिली पाहिजेत आणि त्यांच्यावर आयात कर भारताने लावू नये हा अमेरिकेचा मुख्य हेतू आहे. अमेरिकेचा माल भारतीय निर्बंधापासून मुक्त करण्यासाठी मोदींवर ट्रम्प ने जोरदार दबाव आणला आहे. त्यात मोदिनी भारताची मान ट्रंपच्या हातात कितपत दिली आहे हे अजून कळायचे आहे. पण भारताच्या सार्वभौमत्वाला अमेरिकेने ट्रम्प द्वारे खरे आवाहन दिले आहे. त्यात आपली भूमिका काय राहते ह्यावर भारताचे भविष्य अवलंबून आहे.
लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा ९९८७७१४९२९.