ड्रग्सचा आतंकवाद (भाग -१) _14.10.2021

श्री.समीर वानखेडे हे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख आहेत. त्यांनी या विभागाचे प्रमुख पद घेतल्यानंतर ड्रग्स विरोधी एक जबरदस्त मोहीम काढली आहे. त्यात अनेकांचे धाबे दणाणले आहेत.  शाहरुख खानचा मुलगा आणि ११ जणांना नुकतीच अटक झाली आहे. त्याबरोबर एक गदारोळ माजला आहे. समीर वानखडे विरोधात काही राजकीय नेते उतरले आहेत. ही खेदाची बाब आहे. जे अधिकारी प्रामाणिकपणे काम करतात आणि गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करतात. त्या अधिकाऱ्यांविरोधात राजकीय नेते, सिनेतारक, मोठमोठे उद्योगपती उभे राहतात व अधिकाऱ्यांना ना उमेद करून त्यांना बदनाम करतात.
ड्रग्स ही समाजाला लागलेली कीड आहे जी लांबच्या पल्ल्यात देशाला नष्ट करू शकते. चांगल्या घरातील मुले ड्रग्समुळे व्यसनाधीन झाली आहेत. जिथे प्रमोद महाजन यांचा मुलगा ड्रग्सच्या कचाट्यात सापडला होता. त्यामुळे प्रमोद महाजन सकट अटलबिहारी वाजपेयींना सुद्धा फार त्रास झाला. ड्रग्स हा गुन्हेगारांचा व दहशतवाद्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. संजय दत्त प्रकरणात मुंबई ब्लास्टच्या वेळी हे स्पष्ट झालं की प्रचंड प्रमाणात हत्यार व बॉम्ब सामुग्री मुंबईमध्ये आली. त्यात संजय दत्तने सुद्धा हत्यारे घेतली, पुरवली. पण दुर्दैवाने नेत्यांची व जनतेची सहानभूती मिळवण्यात संजय दत यशस्वी झाला. मोठा गुंडा असून देखील पुढाऱ्यांच्या मदतीमुळे तो सुटला. सलमान खान प्रकरणात सुद्धा गुन्हेगार असून देखील सलमान खान निर्दोष सुटला. अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या रॉयचं नाव पनामा पेपरमध्ये आलं की त्यांनी परदेशात खोट्या कंपन्या करून प्रचंड काळा पैसा जमवला आहे. ही बाब पंतप्रधानांपासून सर्वांनाच माहित आहे. पण या जवळ जवळ १७००  पैसेवाल्या गुन्हेगारांवर काही कारवाई झाली नाही. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण खितपत पडले आहे. केंद्र सरकार गप्प आहे.
कोणी व्यक्ती एका सिनेस्टारचा मुलगा आहे, म्हणून त्याला सोडावं. ही बाब लाजिरवाणी आहे. कायदा सर्वांसाठी एक आहे. आज अफगाणिस्तान मधून प्रचंड प्रमाणात ड्रग्स पाकिस्तान मार्गे भारतात येतात. नुकतेच अडाणीच्या बंदरांमध्ये ३००० किलो हीरोइन म्हणजे १०००० कोटी रुपयाची हीरोइन पकडण्यात आली होती. त्यावर काय कारवाई झाली हे अजून माहीत नाही. या ड्रग्समुळे पंजाबची तरुण पिढी नष्ट झाली आहे. आता पूर्ण  भारत आणि आसपासच्या प्रांतामध्ये प्रचंड प्रमाणात ड्रग्स येत आहेत. हा राष्ट्रीय सुरक्षेला सर्वात मोठा धोका आहे. १९९२ ला मी अशीच एक खासदाराची समिती केली व मुंबईमध्ये चौकशी करण्यासाठी आलो होतो. त्यावेळेला ड्रग्स विभागांमध्ये आजचे पोलीस महासंचालक  संजय पांडे व हेमंत करकरे होते. त्यावेळी, राजकीय पुढारी ह्या ड्रग्स तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांना पूर्ण मदत करताना दिसत होते. त्यातून दाऊद इब्राहिम सारखे लोक गर्भ श्रीमंत झाले. सुधाकर नाईक मुख्यमंत्री असताना या टोळ्यांविरुद्ध जबरदस्त मोहीम उघडण्यात आली. त्यात आम्ही खासदार असल्यामुळे अधिकाऱ्यांना धीर दिला व त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहिलो. सर्व सुरक्षा यंत्रणांनी मिळून मुंबईतून गुन्हेगारी खणून काढली. नेत्यांची पळापळ झाली. दोन अमादारां सकट अनेक नगरसेवकांना माफियाचे हस्तक म्हणून तुरुंगात डांबण्यात आले. अनेक मंत्र्यांचे फोन दुबईला टॅप करण्यात आले व त्यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. तेव्हा बाबरी मशीद दंगल घडवून देशामध्ये हिंदू-मुस्लिम द्वेष पेटवून लोकांचे आणि सरकारचे लक्ष वळवण्यात मध्ये यश मिळवले व गुन्हेगारी विरुद्ध माफिया विरुद्ध पोलिसांनी जी प्रचंड कार्य केलं ते दडपून टाकले. मग आता हिंदू-मुस्लिम मध्ये द्वेष भावना निर्माण करून राजकीय पक्ष आपली पोळी भाजत आहेत आणि गुन्हेगार मात्र मोकाट सुटलेले आहेत.
तेव्हापासून आज पर्यंत आम्ही या ड्रग्स विरोधी लढा देण्याचा प्रयत्न केला आहे. पण राजकीय नेत्यांकडून ह्या ड्रग्स माफियाला मदत मिळते. ड्रग्स विक्रेत्यांचा डॉन दाऊद इब्राहिम आहे, असे अमेरिका आणि युनोने जाहीर केले आहे. हे आतंकवादी सुद्धा आहेत असे सुद्धा जाहीर झाले आहे. अंबानी बरोबरची श्रीमंती दाऊद इब्राहिमची आहे आणि हे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतातील ड्रग्स साम्राज्यावर राज्य करत आहेत. या मंडळीं विरुद्ध काही कारवाई होताना दिसत नाही. राज्य आणि केंद्र सरकार हतबल दिसतात. पण अशा परिस्थितीत समीर वानखेडे सारखे शूर अधिकारी ह्या भयानक व्यापारा विरोधात लढा करतात. आपला प्राण धोक्यात घालतात. त्याला भक्कम पाठिंबा देण्याच्या ऐवजी राज्यकर्ते त्यांचे खच्चीकरण करत आहेत. ही आत्ताची बाब नाही. हे संकट आधी अमेरिकेवर आले. दक्षिण अमेरिकेहून कोलंबिया आणि मेक्सिको देश असे आहेत, तिथे कोका निर्माण होतो. त्यातून कोकैन निर्माण होऊन अमेरिकेत आणि युरोपमध्ये विक्री केली जाते. तेथील पाब्लो एस्कोबार सारखे  डॉन जगात १० श्रीमंत लोकात आले. त्यांनी आपले सैन्य निर्माण केले. सरकार त्यांच्यासमोर नमले. अनेक वर्ष त्यांनी देशावर राज्य केले. सरकार नावालाच होते.
भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान, मॅनमार, बँकॉक हे सर्व देश या कचाट्यात सापडले आहेत. भारत २ उत्पादक भागाच्या मध्ये आहे. पश्चिमेकडे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इराण या भागाला ‘गोल्डन क्रिसेंट’ म्हणतात. आज जगातील ९९% हीरोइन इथे उत्पादीत होते. या भागावर पाकिस्तानच्या आय.एस.आयच्या मदतीने दाऊद इब्राहिमचे राज्य आहे. अफगाणिस्तान हा उत्पादक देश आहे. हजारो टोळ्या उत्पादन करतात व आपल्या भागाचे संरक्षण करण्यासाठी सैन्य उभे करतात. त्यातूनच अशा अनेक लढाया झाल्या, जेणेकरून अफगाणिस्तानमध्ये स्थिरता कधीच आली नाही. स्थिरता फक्त तालिबानच्या राज्यात आली आणि ती एकमेव संघटना आहे ज्यांनी ड्रग्सवर बंदी घातली. त्यामुळे शेतकरी त्यांच्या विरोधात गेले होते आणि म्हणून जेव्हा अमेरिकेने हल्ला केला तेव्हा तालिबान कोलमडले. पण आता पुन्हा तालिबानने ड्रग्सचा उद्योग सुरू केला. त्यातून प्रचंड पैसा कमावला. हत्यारे गोळा केली आणि अमेरिकेचा पराभव केला. आता तालिबानचे सरकार आल्यानंतर हे ड्रग्सचा व्यापार/ तस्करी सुरू ठेवतात का? बंदी आणतात.. हे आपल्याला बघायचे आहे. 
अफगाणिस्तान मधील ड्रग्स पाकिस्तान मध्ये येते. तेथे हीरोइन बनते आणि भारतात येते. काश्मिर आणि पंजाबचा उपयोग करून हे ड्रग्स भारतात पसरले. या ड्रग्स तस्करीमुळे या दोन राज्यामध्ये आतंकवाद फोफावला आहे. पंजाबमध्ये आतंकवादाविरुद्ध मोहीम घेताना आधी ड्रग्स विरोधात मोहीम घेण्यात आली. म्हणून तिथला आतंकवाद संपविता आला. अलिकडच्या काळामध्ये गुजरात आणि राजस्थानचा मोठा वापर होत आहे. त्यामुळे भारताचा पूर्ण पश्चिम किनारा आणि सीमा यातून ड्रग्स मोठ्या प्रमाणात भारतात येत आहे. त्याचे संरक्षण करण्यासाठी दहशतवादयांचा उपयोग होतो.  मी अनेक दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करायला लावले. अनेकांना सैन्यात घेतले. या सर्वांशी वार्तालाप केल्यानंतर माझ्या लक्षात आले की दहशतवाद मुळात हीरोइनच्या तस्करीसाठी आहे. त्यात आता या भागांमध्ये रासायनिक MDMA सारखे ड्रग्स निर्माण झालेले आहेत. त्यामुळे आज जगात पैसा मिळवण्याचे सर्वात मोठे साधन सोने चांदी नसून ड्रग्स आहे. १ किलो हीरोइनला साधारणत: ५ कोटी रुपये बाजारात लागतात. त्यामुळे कल्पना करा की जे पण ड्रग्समध्ये आहेत, ते जगातील सर्वात श्रीमंत लोक आहेत.
दक्षिण अमेरिकेतील उदाहरण आपल्यासमोर ठेवल्यानंतर एक लक्षात येईल की पैशाच्या जोरावर सेना उभी करण्यात येते आणि अधिकृत राज्य सरकारवर माफीया असा गुंडांचा ताबा असतो. अनेक राष्ट्र जगामध्ये असे आहेत कि येथे ड्रग्सच्या पैशावर चालतात. जागतिक पातळीवर ८० च्या दशकामध्ये ही जाणीव व्हायला लागली. तेव्हा १९८८ साली व्हिएन्ना येथे आंतरराष्ट्रीय शिखर परिषद झाली. त्यात जागतिक पातळीवर ड्रग्स विरुद्ध लढा देण्याचा निर्धार काही देशांनी व्यक्त केला. प्रत्येक देशाने अनेक कायदे बनवायचे होते. एन. सी. बी. सारखे राष्ट्रीय पातळीवर सुरक्षा दल उभे करायचे होते. सुरूवातीला अनेक देशांमध्ये काहीच कारवाई करण्यात आली नाही. भारतात देखील एन.सी.पी. उभे करण्यात आले. पण ‘मनी लॉन्ड्रिंग’ कायदा जो करायचा होता तो करण्यात आला नाही. मी तो कायदा करायचा प्रयत्न लोकसभेत केला, पण तो झाला नाही. पुढे जाऊन १० वर्षानंतर ‘मनी लॉन्ड्रिंग’ कायदा झाला. ‘मनी लॉन्ड्रिंग’ म्हणजे काळया पैशाचे पांढरे पैसे करण्याची प्रक्रिया. गुन्हेगारांना, दहशतवाद्यांना त्यांच्या अनैतिक पैश्यापासून तोडले तर गुन्हेगारी आणि दहशतवाद नष्ट होईल. त्यामुळे पैश्यावर हल्ला केला पाहिजे. हे काम म्हणावे तितके सोपे नाही. कारण प्रचंड पैसा कुणालाही विकत घेऊ शकतो. ही आजची स्थिती आहे. हे बदलायचे असेल तर समीर वानखडे सारख्या अधिकाऱ्यांना शक्ती द्या.
लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा. न. ९९८७७१४९२९

Please follow and like us:

Author: Brigadier SS