गौतम बुद्ध हे भारतात जन्मले. त्यांचा प्रभाव जगभर पसरला. गौतम बुद्धांना समकालीन असणारे ग्रीस मधील सॉक्रेटिस यांनी लोकशाहीचा विचार मांडला. आता ते सोपे वाटत असेल, पण त्या काळी लोकांनी स्वत:वर राज्य करायची कल्पनाच अद्भुत होती. दुसरे समकालीन विचारवंत म्हणजे चीन मधले कन्फ्यूशियस या तिघांच्या विचारांमध्ये इतके साम्य आहे की हजारो किलोमीटर एकमेकापासून दूर राहून देखील, त्या काळात वैचारिक प्रगल्भता आणि वैचारिक बदल आणण्यामध्ये ते यशस्वी झाले.त्या अगोदर जगात अनेक देवांची गर्दी होती. देवांमुळे पुजाऱ्यांची जात निर्माण झाली. आज देखील अनेक देशात ईश्वराकडे पोचायचा मार्ग पुजाऱ्यांच्या हस्ते जातो. कुठल्याच धर्मात त्या धर्माने पुजारी नियुक्त केले नाहीत. राजाप्रमाणेच समाज त्यांच्या तालावर नाचायचा. निर्णय धार्मिक आधारावर घेतले जात होते आणि त्यांच्यावर अवलंबून समाज चालायचा. देवांना प्रसन्न करण्यासाठी या सर्व भागांमध्ये बळी देण्यात येत होते. माणसाचे देखील बळी द्यायचे. अलीकडे देखील नरबळी होतात. अंधश्रद्धा हे जगातील मानवाचं सर्वात मोठं क्रूर कर्म आहे.
धर्माच्या आणि सत्तेच्या आधारावर पूर्ण जगात माणसा-माणसामध्ये वर्गीकरण झाले. पुजारी यांची जात झाली. योद्यांची जात झाली. व्यापाऱ्यांची जात झाली आणि सर्वात शेवटी गुलामांची किंवा क्षुद्रांची जात निर्माण झाली. चातुवर्ण काही भारताला फक्त लागू होत नाहीत. जसे अमेरिका निर्माण झाली तेव्हा गोर्या लोकांनी आफ्रिकेतून गुलाम आणले. अत्यंत अमानवी पद्धतीने ह्या गुलामांना किंवा क्षुद्रांना वागवले गेले. आजपर्यंत त्या कृष्णवर्णीय गुलामांची जात आहे. स्वतःला उच्चवर्णीय म्हणणारे मानव दुसऱ्यांच्या छाताडावर पाय ठेवून वर जाण्याचा नेहमी प्रयत्न करत आहेत. कायद्याने जरी असे अमानवी प्रकार नष्ट झाले असतील पण सामाजिकरित्या ते जिवंतच आहेत. अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशांमध्ये जिथे सर्व जगातून वेगवेगळ्या जातीचे, वर्णाचे, धर्माचे लोक आले. एक आदर्श राजवट, म्हणजे लोकशाहीला जन्म देणारा देश निर्माण झाला. हे लोक चंद्रावर गेले, पण १९६० सालापर्यंत कृष्ण वर्णीयांना मतदानाचा अधिकार नव्हता. त्यांना अनेक हॉटेलमध्ये, शाळांमध्ये जाण्याचा अधिकार नव्हता. आज देखील काळ्या लोकांची तेथे हत्या होते. त्यात भारतीय लोक देखील सामील आहेत. आपल्याला गोरे लोक ‘काळे’ म्हणतात. आपल्याला आपल्या देशात परत जायला सांगतात. तेथे वर्ण वर्चस्वाचे युद्ध कमालीचे पेटलेले आहे. ट्रम्प हा गोऱ्या लोकांचा प्रतिनिधी म्हणून पुढे आला आणि कितीही भरकटला तरी त्याला गोऱ्या लोकांनी निवडून आणलं. आता देखील अमेरिकन इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचे मतदान ट्रम्पने घेतले. सुदैवाने जो.बाईडनला थोडी जास्त मते मिळाली, म्हणून तो निवडून आला. पण ट्रम्प गोऱ्या लोकांचा नेता कायमचा झाला आहे.
भारतात देखील अशाच प्रकारचे राजकारण चालू आहे. दलित मुलींवर अमानुष अत्याचार आपण आज बघतो. अल्पसंख्याकांना सुळावर लटकवले जाते. कट्टरवादी लोक याचे समर्थनच करतात, पण या संघर्षातून कुणाचा फायदा होत नाही. हे सत्य कोणी ओळखत नाही. हे सत्य मांडण्याचा प्रयत्न तथागत गौतम बुद्ध, साक्रेटीस आणि कन्फ्यूशियसने केला आहे. अंतिमत: द्वेष आणि मानवता यामधला संघर्ष या तिघा विचारवंतामुळे उभा राहिला. जगामध्ये सर्व मनुष्य जात एक आहे आणि ती सुखी झाली पाहिजे असा अट्टाहास या तिघांनी घेतला. आपल्याला जे दिसत नाही त्यावर विश्वास ठेवू नका. आपल्याला जे कळत नाही त्यावर विश्वास ठेवू नका. पण आपल्या अनुभवातून निर्माण होणार विश्व, आपल्याला दिसणार विश्व ह्याला खरं मानून आपलं कर्तव्य करा.
भगवतगीतेमध्ये कृष्णाने अर्जुनाला सांगितले. “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन|” “आपलं कर्तव्य कर, फळाची अपेक्षा करू नको”. हे एक वास्तववादी तत्व लोक विसरले आणि अंधश्रद्धेच्या आहारी गेले. दुसऱ्या धर्माचा माणुस किंवा दुसऱ्या जातीचा माणूस हा आपला शत्रू आहे, अशाप्रकारची भावना जगामध्ये सगळीकडेच पसरवली गेली आणि त्यामुळे प्रचंड हिंसाचार झाला आहे. अशाच प्रकारे द्वेषावर चालणार्या मानवाला एकसंघ करण्याचा प्रयत्न या तिघांनी केला आणि तथागत गौतम बुद्धाने भारतामध्ये आपल्याला मार्ग दाखवला. तो मार्ग म्हणजे आपले कर्तव्य. माणूस म्हणून तुम्ही जर जन्माला आला आहात तर जे आपल्याला दिसत नाही त्याच्यावर विश्वास न ठेवता आपण आपलं कर्तव्य पार पाडाव व चांगले काम करावे. दुसऱ्यावर प्रेम करण्याचे विचार पहिल्यांदाच समाजामध्ये मानवाच्या मनामध्ये पेरले गेले. आता ते नवीन वाटणार नाहीत किंवा त्याबद्दल काही वैशिष्ट्य आहे असं वाटणार नाही. प्रत्येकाने स्वत:ला प्रश्न विचारावा की आपण आपले कर्तव्य करत आहोत का? आपण चांगले काम करत आहोत का? लोक धार्मिक व जातीच्या भावनेमध्ये आज जगत आहेत आणि त्यामधून चांगले आचार आणि विचार आज दुर्मिळ झाले आहेत, पण मानवतेचा, प्रेमाचा संदेश, कर्तव्य करण्याचा संदेश, आणि कर्तव्य करताना जाती लिंग धर्म भेद बाजूला ठेवा. हा जो संदेश आहे तो बुद्धाच्या काळामध्ये अत्यंत नवीन होता. कारण समाज हा चार वर्गामध्ये किंवा चार वर्णांमध्ये दुभंगला होता आणि सर्व समाजाचे, जातीचे, धर्माचे लोक एक आहेत हा विचार हा अत्यंत क्रांतिकारी होता. त्यामुळे बुद्धाच्या पाठीमागे अनेक लोक जोडले गेले. कारण लोक त्रस्त झाले होते. दु:खी जीवनामध्ये लोकांचे अत्यंत हाल होत होते आणि बुद्धाचा एकतेचा मंत्र व सर्वसमावेशक अशी समाज व्यवस्थेची मांडणी हे नाविन्यपूर्ण असल्यामुळे ती तात्काळ स्वीकारली गेली आणि बुद्धाचा धम्म हा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पसरला, पण ब्राह्मण धर्माला स्पर्धा म्हणून नव्हे. जीवनाचा एक मार्ग म्हणून तो स्वीकारला गेला.
अर्थात बुद्धाच्या धम्माला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्वरूप आले ते एका अत्यंत क्रूर राजामुळे. सगळ्यांनाच माहिती आहे की सम्राट अशोक हा अत्यंत क्रूर राजा होता. तलवारीच्या जोरावर पूर्ण भारत पादाक्रांत केला. पण कलिंगाच्या नरसंहारानंतर सम्राट अशोक अचानक बदलला आणि बुद्धाचा धम्म स्वीकारला. त्यामुळे पूर्ण भारत बुद्धमय झाला व मानवतेच्या मार्गाने चालू लागला. सर्व जनता एक झाली. व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला. उत्पादन वाढले आणि भारताच्या इतिहासामध्ये जे ‘सोने की चिडिया’ म्हणतात किंवा ‘सुवर्णयुग’ म्हणतात, तो काळ सम्राट अशोकाच्या काळात भारतात आला. खऱ्या अर्थाने रामराज्याची व्याख्या तथागत बुद्धांचे तत्त्वज्ञानामुळे व जीवनपद्धतीमुळे आणि सम्राट अशोकाचा त्या धम्माचा स्वीकार केल्यामुळे ह्या भारतामध्ये स्थापित झाली. ह्याच तत्त्वामुळे भारताच्या घटनेच्या मुखपृष्ठावर ‘अशोक चक्र’ आहे. हीच या देशाची दिशा ठरविण्यात आलेली आहे.
गौतम बुद्ध राजघराण्यात जन्माला आले होते. ऐशो-आरामात राहणाऱ्या बुद्धांनी मानव यातना बघितल्या. मानव हा यातनेचा आगर आहे आणि प्रचंड दुःखाच सागर आहे. ह्या दुःखातून मानवाला कसे मुक्त करता येईल? ह्या मानसिक द्वंदातून त्यांनी सर्व संसार सोडून दिला आणि सत्याच्या शोधामध्ये वन वन फिरले. त्यांनी अनेक वर्षे तपश्चर्या केली, पण तपश्चर्येतून त्यांना शोध लागला नाही. शारीरिक यातनातून सुद्धा त्यांना सिद्धी लाभली नाही. पण जेव्हा ते बोध गयाला आले तेव्हा त्यांना साक्षातकार झाला. बुद्धांची परीक्षा घेण्यासाठी पटोपद ब्राह्मणांनी त्यांना आपल्या आश्रमात बोलाविले. पुर्नजन्म, देव, आत्मा यावर अनेक प्रश्न विचारले. बुध्द म्हणाले जे मला दिसत नाही त्यावर मी चर्चा करत नाही. माझे काम तुमचे दुःख दूर करण्याचे आहे. त्यासाठी तुम्ही आणि आम्ही काम करूया. आपल्या कर्मावर विश्वास ठेवल्यास आपण सुखी होऊ शकतो. चांगले कर्म सुख देते. वाईट कर्म दुःख आणि यातना देते. हा निसर्गाचा नियमच आहे. लिंग, जातिभेद सोडून चांगले कर्म कुणीही करू शकते. जाती धर्माचे बंधन चांगल्या कर्मापासून कुणाला रोखू शकत नाही. या विचाराने जाती व्यवस्थेखाली दबलेल्या मानवाला मुक्ती मिळाली.
बुद्धांचे विचार हे मानवाला दृष्ट बुद्धीपासून दूर नेतात. चांगले कर्म हा मंत्र देतात. सर्वच माणसांनी चांगले कर्म केले तर करोना जगात क्रांती होईल. तथागत गौतम बुद्ध, साक्रेटीस आणि कन्फ्यूशियसने वास्तववादाचा विचार जगामध्ये पेरला. मानवाच्या कृतीमुळे झालेले कार्य हेच मानवाच्या जीवनाचे उद्दिष्ट ठरलं. म्हणजे प्रत्येक माणसाने आपला स्वतःवर अवलंबून आयुष्य जगाव. कुणा अद्भुत किंवा दैवी शक्तीच्या जिवावर व आधारावर आपलं जीवन जगू नये. त्यातूनच वास्तववादाची निर्मिती झाली. ही फार मोठी क्रांती होती. स्वतःच्या कर्तुत्वावर माणसाने अवलंबून आपलं जीवन सुखी बनवावे. सर्व मानवांना लागू असणारे तत्त्व या काळात निर्माण झाले. तथागत गौतम बुद्धांनी निर्माण केलेला धम्म विचार ही जीवनपद्धती आहे. मानवाला स्वतःच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवणारी आहे. हे त्यांनी जीवनाचे मोजमाप ठरवले. कर्मामुळे माणूस मोठा होतो हा बुद्धाचा विचार आहे. त्याचा आपण अवलंब करूया आणि आपल्या जीवनामध्ये चांगले कर्म करूया.
लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा. नं. ९९८७७१४९२९