पुन्हा निवडणुकीची धामधूम सुरू. आताची विधानसभा म्हणजे आयाराम गयारामची चंगळ आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचे अमंगळ. हे आजच्या निवडणुकांचे वैशिष्ठय आहे. निवडणूका सरल्यावर लोक अनेक तर्कवितर्क करत बसणार. पण त्याने काहीच फरक पडणार नाही. कुणीतरी जाणार आणि कुणीतरी येणार. कॉग्रेसचेच धोरण भाजप शिवसेना आणखी आक्रमकपणे जनतेवर लादणार. महाराष्ट्रातील २४०५ गर्भ श्रीमंतांचे कल्याण राजकर्ते करत राहणार आणि गरिबांचे जीवन असहय करणार. पाच वर्षात महागाई १००टक्क्यांनी वाढणार. साखर २०० रू. किलो होणार. त्यामुळे कुठलाही पक्ष सत्तेवर आला तरी जनतेच्या जीवनावर काहीच फरक पडत नाही. साप कात टाकतो त्याप्रमाणे व्यवस्था कात टाकेल व साप आणखी वेगाने पुढे जातो. चार प्रस्थापित राजकिय पक्षांशिवाय जनतेकडे दुसरा पर्याय नाही. जाणीवपुर्वक भांडवलशाही व्यवस्थेने राजकारण पैशावर आधारीत करून ठेवले. म्हणजे नवीन राजकिय पर्याय निर्माण होणार नाही. राजकारणात इमानदार माणसाला भांडवलशाही व्यवस्था जगू देत नाही. राजकिय पक्षात त्यांना स्थान नसते. कारण इमानदाऱ, ध्येयवादी माणसे ही पक्षिय नेतृत्वाला आव्हान वाटतात. त्यांना त्यांची चमचेगिरी करणारे चमचे हवे असतात. शेवटी हे प्रस्थापित राजकिय पक्ष माफिया भ्रष्टराजकारणी आणि सरकारी अधिकारी यांचे समांतर सरकार खरी सत्ता चालवते. हे मी म्हणत नाही तर मी आंदोलन करून निर्माण झालेली व्होरा समिती म्हणते. मी ही समिती १०० खासदारांचे सहयांचे निवेदन तयार करून पंतप्रधांनाकडून गठीत करून घेतली होती. या समितीत सर्व गुप्तहेर संघटनांचे प्रमुख होते, अशी समिती पूर्वी कधीही झाली नाही आणि पुढे कधीही होणार नाही. सर्व राजकीय पक्षांनी हा अहवाल कचर्याच्या पेटीत टाकला आहे. कारण खर्या अर्थाने गुन्हेगारी, भ्रष्टाचाराविरोधात कुणालाच काम करायचे नाही. आम आदमी पक्ष अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधातील चळवळीवर उभा राहिला. आता त्यांचे नेते अरविंद केजरीवाल हे स्पष्टपणे म्हणाले की भ्रष्टाचार हा राजकारणाचा मुद्दा नाही. ही आहे राजकीय पक्षाची स्थिती.
वास्तवात देशात लोकशाही नावालाच राहीली आहे. तिला काळया पैशाने विकत घेतले आहे. पैसेवाले सर्व राजकिय पक्षांना व संघटनांना विकत घेतात. तथाकथीत बहुजन संघटना निवडणूकीत दलाली करतात. मग जातीचे नाव सांगत पैसे घेऊन कुठल्या तरी उमेदवाराला आपली मते विकून टाकतात. जातीच्या नावावर बहुजन नेते आपली घरे भरतात. संघटना बांधतात आणि पैसे खातात. ह्याला ते व्यवहाराचे नाव देतात. वैचारीक बैठकीवऱ सिध्दांतावर आधारीत कुठलाच राजकिय पक्ष नाही. अकारण धर्मनिरपेक्षता या सिंध्दांताचा मुद्दा बनवला. ह्या मुद्यावर लोकांना झुंजवत राजकिय पक्ष आपली पोळी भाजत आहेत. गरीबीचे, रोजगाराचे व सांस्कृतिक विकासाचे मुद्दे दूरच राहीले. लोकांना पाणी मिळत नाही़, वीज नाही़, रोजगाराचे साधन उपलब्ध नाही.
बेडकाला जसे विहीरच आपले जग वाटते़ तसेच आपली जात आपले जग बनले आहे. मानव मुक्तीची़ व विकासाची अनेक दालने उघडून सुध्दा आपण डोळे उघडून त्याकडे बघायला तयार नाही. कुठल्या तरी बुरसटलेल्या विचारांनी जन्मताच आपण जखडले जातो आणि इतर विचार आपल्याला परके वाटतात. माझ्या देशबांधवांनो देशाचा आणि आपला विकास हा आर्थिक़, सामाजिक व राजकिय विचारधारेतूनच होऊ शकतो. आजच्या बाजारू राजकारणातून नाही. टि.व्ही.मध्ये दाखविण्यात येणारे प्रमुख राजकिय पक्ष हे भांडवलशाही विचारधारेचा पुरस्कार करतात. म्हणजेच मोठे अतिश्रीमंत भांडवलदार व बहुराष्ट्रीय उद्योग समूह यांच्यावर आर्थिक विकास अवलंबून आहे. अतिश्रीमंत लोक उद्योगात गुंतवणूक करतील़ मोठे कारखाने उभारतील व त्यातून रोजगार निर्मीती होईल असा हा सिध्दांत आहे. यासाठी भांडवलाचे म्हणजेच पैशाचे संकलन या अतिश्रीमंत लोकांच्या व विदेशी उद्योग समूहांच्या हातात केंद्रीत करण्यात आले आहे. ही पध्दत १९९१ पासून भारताच्या राजकारणात आणि अर्थकारणात राबवण्यात आली आहे. पण या पध्दतीत भांडवलदारांचे एकमेव उद्दीष्ट म्हणजे नफा कमावणे. मानव कल्याणाचे उद्दीष्ट त्यांच्यासमोर नसते.
१९९१ च्या आधी भारतात मिश्र अर्थव्यवस्था राबण्यात येत होती. ती भारतीय राज्यघटनेतील तत्वांना अनुसरून चालत होती. सामाजिक, आर्थिक व राजकिय समता ही या व्यवस्थेचा केंद्रबिंदू होती. म्हणूनच रास्त भावाने धान्य मिळत होते. शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा, सिंचन असे अनेक कार्यक्रम सरकारद्वारे राबवण्यात येत होते. त्याउलट आजच्या भांडवलशाही व्यवस्थेत हे सर्व कार्यक्रम खाजगी क्षेत्रातून करण्याचा संकल्प राजकर्त्यांनी मांडला. त्याचीच अंमलबजावणी मोदी अधिक आक्रमकपणे करत आहेत. यात शेतकर्यांच्या, कामगारांच्या व सामान्य माणसाचे मरण आहे. समाजवादी आणि समतेचा पर्याय हा लोकांसमोर उरलाच नाही. सर्व पुरोगामी पक्ष आणि संघटनांचे एकत्रिकरण महाराष्ट्र लोकशाही समितीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न झाला. पण तो तितका यशस्वी होऊ शकला नाही. शिवसेना-भाजप हे काँग्रेसला कधीच पर्याय नव्हता. विचाराला पर्याय विचाराने द्यावा लागतो. तो वैचारीक, समाजवादी – समताधिष्ठीत पर्याय उभा राहीला नाही. आणि म्हणूनच भांडवलशाही पक्ष लुटूपुटूची लढार्इ खेळतात व निवडणूकीद्वारे मोठा बदल झाल्याचे दाखवतात.
बहुजनांच्या नावाखाली शाहू, फुले, आंबेडकरांच्या अर्धवट माहितीवर फोकनाड सिध्दांत मांडले जातात आणि बहुजन नेते दुकान थाटतात. स्वत:च्या ज्ञानाचा टेंबा मिरवतात. संघटनेत कार्यकर्त्यांना गुलाम बनवून टाकतात. निवडणूका आल्या की, हे नेते ठोक भावात शाहू, फुले, आंबेडकरांना विकून टाकतात. ही मंडळी भोंदू आसाराम बापूपेक्षा जास्त घातक आहेत. चळवळीच्या नावाखाली, महापुरूषांच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली भोंदू बाबाप्रमाणे लोकांना भावनिकपणे ब्लॅकमेल करून चळवळच उध्वस्त करून टाकतात. स्वत: भ्रष्टाचारी असल्यामुळे ते भ्रष्टाचार गुन्हेगारी विरूध्द बोलत नाहीत. हिच मंडळी बहुजनांचे सर्वात मोठे शत्रु आहेत.
निवडणूकीत पैशाचा वापर तर अनिवार्यच बनला आहे. एका विधानसभा मतदारसंघात उमेदवार सुमारे तीन कोटी रूपये खर्च करतो. त्यामुळे गर्भश्रीमंत लोकांना प्रस्थापित राजकिय पक्ष उमेदवारी देतात व प्रमाणिक देशभक्तांना बाजुला फेकतात. हा पैसा पुर्ण चोरी आणि लबाडीतून मिळवलेला असतो. त्यामुळे चोर आणि लबाडच आज आमदार खासदार होत असतात. चुकूनच काही हुशार, कर्तबगार, प्रामाणिक व्यक्तींना राजकिय पक्ष निवडणूकीत उतरवतात. भांडवलशाही व्यवस्थेने लोकशाहीला वेश्या करून टाकले आहे. दुसरीकडे राजकिय दलालांचा सुळसुळाट झाला आहे. हे दलाल सर्वच पक्षात वावरतात, अत्यंत गोड बोलतात. या दलालांचा उपयोग मॅचफिक्सींग करण्यासाठी होतो. पक्षापक्षामध्ये समन्वय करणे, एकाला जवळ करून दुसर्याला पाडणे. इलेक्ट्रोनिक वोटींग मशिनमधून मतदान बदलण्यासाठी डॉन लोकांचा उपयोगही हे दलाल करतात. एकंदरीत निवडणूक म्हणजे एक मोठे गौडबंगाल आहे. काहीही करून जिंकणे हा एकच उद्देश आहे. प्रत्येक मतदारसंघात २ ते ४ राजकिय गुंड असतात. ते वेगवेगळया राजकिय पक्षातून उमेदवारी मागत असतात. जिथे उमेदवारी मिळेल तिथे ते उडया टाकतात. आज भाजप-शिवसेनेतील जवळजवळ अर्धेअधिक उमेदवार हे काल काँग्रेस मधील मोठे नेते होते. म्हणूनच ‘न भुतो न भविष्यती’ असे हजारो कार्यकर्ते काँग्रेस- राष्ट्रवादी सोडून सेना-भाजपकडे गेले.
या सर्वावर एकमेव उपाय म्हणजे, विचारधारेवर आधारीत व नितीमत्तेवर आधारीत राजकिय पर्याय निर्माण करणे होय. माझ्या देशबांधवांनो, तुम्हालाच पुढे येऊन हे काम करावे लागणार आहे. जिथे जिथे तुम्ही पुढे याल, तिथे तिथे आम्ही आणि हजारो कार्यकर्ते तुमच्याबरोबर झुंजायला तयार आहोत!
लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत
वेबसाईट: www.sudhirsawant.com
मोबा९९८७७१४९२९.