नैसर्गिक निष्काळजी_१६.४.२०२०

कोरोना ने आपले पाय पसरायला सुरू केले आहेत. कोरोना ही एक भयानक नैसर्गिक आपत्ती आहे. तिला तोंड फक्त सरकारच देवू शकते. पण दर वेळी सरकारे योग्य ती पावले वेळेवर उचलत नाही असा आपला अनुभव आहे. कारण नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी दोन गोष्टी कराव्या लागतात. पहिले म्हणजे आपत्तीला रोखावे किंवा नियंत्रणात आणावे लागते व दुसरे म्हणजे जन जीवन सुरळीत ठेवावे लागते. ह्या दोन्ही गोष्टी एकदमच कराव्या लागतात. जसे मागे महाराष्ट्राच्या अनेक भागात पुर आला. कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, कोकण पाण्यात बुडून गेले. जवळ जवळ १० जिल्ह्यात पावसाने हैदोस माजवला, त्यात कोल्हापूर आणि सांगलीत सर्वात जास्त बाधित होते. दरवर्षी प्रचंड मनुष्यहानी होते.  गेल्यावर्षी २०४५ लोक मृत्यूमुखी पडले व जवळजवळ १६ लाख घरे बरबाद झाली.  यावर्षी ४९६ लोक १८ जुलै पर्यंत मृत्यूमुखी पडले.

            पुर येणे हे काही भारताला नवीन प्रकार नव्हे.  नैसर्गिक आपत्ती उद्भवणे हे वर्षानुवर्ष चालूच आहे.  त्यात नवीन असे काही नाही.  जवळ जवळ १५% भारतामध्ये पुर येतो.  वर्षाला २००० लोक मृत्यूमुखी पडतात.  ८० लाख हेक्टर पिके उद्ध्वस्त होतात. त्याचबरोबर १८००० कोटी रुपयाचं पिक नुकसान होते.  अशावेळी लोकांना मदत करून त्यांना सुरक्षित ठिकाणी  हलविणे  हे सरकारचे काम आहे. नैसर्गिक आपत्ती ही काही सांगून येत नाही पण अशी आपत्ती कधीही येऊ शकते, ह्याची जाणीव सरकारला आणि समाजाला आली पाहिजे व त्याला तोंड देण्याची तयारी केली पाहिजे. आलेल्या संकटाला नियोजन  न झाल्याने लोकांना अतोनात हाल सोसावे लागले. देशातील सर्व आपत्तीना तोंड देण्याची सर्वात शेवटची शक्ती म्हणजे भारतीय सैन्यदल. सर्व सुलतानी आणि नैसर्गिक संकटाना शेवटी तोंड देण्याचे काम सैन्यच करते, हा विश्वास लोकांना आहे. म्हणूनच सैन्याला बघितल्यास लोकांना विश्वास वाटतो, धीर येतो की आपली सुटका होईल, संरक्षण होईल. सैन्य देखील लोकांची निराशा करत नाही.  दुसर्‍या संघटना जिथे अपयशी होतात तिथे सैन्य यशस्वी का होते? कारण, पहिले म्हणजे सैनिकांची मानसिक प्रवृत्ती संकटाना तोंड देण्याची असते. सैनिकाना दैनंदिन जीवनात अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागते.  सीमेवरील सैनिकांचे जीवन म्हणजेच नैसर्गिक आपत्तीना तोंड देणे.  युद्ध कधीतरी होते.   माझ्या पलटण ६ मराठ्यात सियाचीन मध्ये १९८७ ला माझा मित्र मेजर. अतुल देवय्या १७ जवाना सकट आपल्या चौकीवरून खाली येत होता.  तेव्हा बर्फाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला आणि बर्फाच्या उदरात ते नाहीसे झाले.  कितीही प्रयत्न केला तरी त्यांचे शव मिळाले नाही.  प्रत्येक जवान हा रोजचं निसर्गाशी लढा देत असतो.  त्याचे नैसर्गिक प्रशिक्षण हे होतच असल्यामुळे कुठल्याही परिस्थिती तो आसमानी आणि सुलतानी संकटांना तोंड देऊ शकतो. 

            म्हणूनच ज्यावेळी भारत सरकार राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती दल (Disaster Management Force) उभे करत असताना मी आग्रहाची मागणी करत होतो की, भारतात वेगवेगळ्या ठिकाणी सैन्यामध्ये प्रादेशिक सेना दल उभे करावे.  जसे महाराष्ट्रात कोल्हापूर, पुणे, देवळाली, नागपूर येथे प्रादेशिक सेना दल आहे आणि कुठल्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी उपलब्ध आहे.  असे महाराष्ट्रात ५ आणखी दल उभे करण्याची मागणी मी गेली अनेक वर्षे करत आहे.  प्रादेशिक सेनेचा फायदा हा असतो की वर्षातील २ महीने सैनिकाना सैन्यात नोकरी करावी लागते.  बाकी १० महीने आपल्या व्यवसायात ते काम करत असतात.  मी १९९१ पर्यंत मुख्य सैन्यात काम केले.  त्यानंतर १९९३ मध्ये खासदार असताना सैन्याने मला प्रादेशिक सेनेत अधिकारी बनवले.  त्यातूनच मी कारगिल युद्धात सुद्धा सहभागी झालो. आता जवळ जवळ सर्वच प्रादेशिक सेना दल काश्मिर मध्ये काम करत आहेत. असे आणखी ५ दल निर्माण झाले पाहिजेत.  म्हणजे नैसर्गिक आपत्ती असो, दहशतवादी हल्ला असो  किंवा पर्यावरणाचे रक्षण व झाडे लागवड असो हे अत्यंत शिस्तीने केले जाईल.  म्हणूनच मी नैसर्गिक आपत्ती दल हे गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत न आणता सैन्यामध्ये आणावे अशी आग्रहाची मागणी केली होती  आणि आज देखील करत आहे.  पण दुर्दैवाने नोकरशाहीने  व राजकीय नेत्यांनी तिला गृह मंत्रालयात घेऊन पोलिस दलासारखे बनवले.  इथे देशाची घोर फसवणूक करण्यात आली आहे.  माजी सैनिकांचा उपयोग या दलातून केला असता तर कोल्हापूर आणि सांगलीमध्ये लोकांचे एवढे हाल झाले नसते. 

            प्रचंड पाऊस हा पुर येण्याला जबाबदार असेल, किंवा कोरोना हा जंतूंचा  हल्ला असेल. भारतीय सैन्य त्यात पण प्रशिक्षित आहे.  Biological warfare हे एक आजचे सत्य आहे. जीव जंतूंचा वापर करून एक देश दुसर्‍या देशावर हल्ला करतो. ह्याला उत्तर देण्याची तयारी पाहिजे  पण तसे होत नाही. अपुरे नियोजन आणि व्यवस्थापन हे लोकांच्या यातनाचे मुख्य कारण आहे.  सरकार मोबदला देण्यावर जास्त खर्च करते.  जीवाणूंचा हल्ला होऊ नये म्हणून कमी खर्च करते.  एबोला , चिकन गुनिया किंवा साधा ताप, फ्लू असे अनेक हल्ले होत आहेत. यंत्रणेला होणारी ही नैसर्गिक आपत्ती अचूकपणे कळली पाहिजे.  कोरोना ची साथ आली तर सरकारने लॉकडाउन केले हे बरोबर आहे कारण परिस्थिती नियंत्रणात आणली पाहिजे. पण दूसरा भाग आहे जनजीवन सुरळीत राहीले पाहिजे त्यासाठी कुठलेही नियोजन केलेले दिसत नाही. लोकांच्या नोकर्‍या तर गेल्या रोजंदारीवर काम करणारा कामगार उध्वस्त झाला. मुंबई सारख्या ठिकाणी झोपडपट्टीत राहणार्‍या गरीब माणसांना एकमेकांपसून अंतर कसे ठेवता येईल. अन्नधान्याचा पुरवठा कसा करता येईल. नियोजन प्रत्येक बाबतीत तयार पाहिजे कारण कोरोना सारखी आपत्ती आली तर  लोकांचे जनजीवन सुरळीत करण्यासाठी सरकारचे आधी नियोजन पाहिजे. पण सरकार हे कधीच करत नाही. मग ऐनवेळी धावाधाव होते. मुंबईत बाहेर जाण्यासाठी जवळ जवळ एक लाख लोक गोळा  झाले.  मुंबई बाहेर लोकांना काढायला कोणतेही नियोजन नाही. रेल्वे स्टेशनवर रेल्वे खात्याचे अधिकारी तपासणीसाठी आरोग्य यंत्रणा बसवू शकते. तिथून लोकांना गावी पाठवू शकतात. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत जाणार आहे. शेतकर्‍यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अन्नधान्य नाही दुसरीकडे शेतकरी आपले पिके शेतातच जाळत आहेत. पावलं उचलून गरिबांच्या यातना नष्ट केल्या पाहिजेत तर हे सरकार मायबाप सरकार ठरेल.

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

 मोबा ९९८७७१४९२९.

Please follow and like us:

Author: Brigadier SS