श्री आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री धोरणात अमुलाग्र बदल करू इच्छित आहेत हि स्वागतार्ह बाब आहे. कारण आतापर्यंत पर्यटन हा एक विनोद झाला आहे. मी १९९१ ला खासदार झाल्यावर पर्यटनात प्रचंड रस घेतला. कारण माझ्या मतदारसंघात कोकण व मुंबई हे पर्यटनासाठी आणि फलोद्यानासाठी पोषक जिल्हे होते. सिंधुदुर्ग आणि कोकण हे पर्यटन जिल्हे करण्यात आम्ही पहिला प्रयत्न केला. श्री माधवराव शिंदे हे केंद्रीय पर्यटन मंत्री होते त्यांना हा प्रदेश व महाराष्ट्रातील इतर प्रदेश बघण्यासाठी बोलावले. ते आपल्या अधिकाऱ्यासह आले व महाराष्ट्राची पूर्ण पाहणी केली. त्यात त्यांनी ताबोडतोब सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा जाहीर केला व महाराष्ट्रासाठी योजना बनवली. त्यावेळी मुख्यमंत्री सुधाकर नाईक हे आम्हा खासदाराचे शिष्टमंडळ घेवून दिल्लीला केंद्रसरकारकडे अनेक विषयाची मागणी करण्यासाठी गेले. त्यात पर्यटनाची एक योजना बनली. पण दुर्दैवाने पर्यटन वाढलेच नाही.
पर्यटन धोरण हे बाहेरच्या देशातील व आपल्या देशातील श्रीमंत लोकांनी आपल्या राज्यात यावे यासाठी असते. श्रीमंत लोक खर्च करतील त्यातून रोजगार निर्माण होऊन आपल्या भागाचा आर्थिक विकास व्हावा हे उद्दीष्ट पाहिजे. पण त्या दृष्टीने कोणी काम केले नाही. उलट साधारणत: समाज पर्यटन म्हणजे सेक्स आणि शराब असे समीकरण लोकांच्या मनात घर करून आहे. गोवा त्याचे एक जिवंत उदाहरण आहे. गोव्यात कुटुंबाला करण्यासाठी काय आहे? मुख्यत: ड्रग्स, सेक्स आणि शराब विकली जाते. आपण गोव्याचे अनुकरण टाळले पाहिजे. हिप्पी लोक येवून पैसा येत नाही. वर ड्रग्स आणि माफियांचे आगमन होते. गोव्यात रशियन आणि इस्राईल माफिया राज्य करत आहेत. त्याला पूर्ण मदत भारतीय माफिया करते. अशा पर्यटनामुळे कुटुंब पर्यटन नष्ट होते. आपली संस्कृती सुद्धा धोक्यात येते. वर स्वस्त पर्यटनामुळे आर्थिक विकास होत नाही.
श्रीमंत पर्यटक यावे म्हणजे ते खर्च करतील व स्थानिक युवकांचे कलागुण विकसित होईल. सभ्य कौटुंबिक पर्यटक कुठल्याही पर्यटक स्थळात नाविन्य, शुद्ध क्रीडा, कला आणि नैसर्गिक आनंद बघतात. कोकणात आणि महाराष्ट्रात चांगले पर्यटन निर्माण केले तर जगातून लोक येतील. त्यासाठी प्रथम पर्यटकांना समुद्राकाठी, आंबोलीसारख्या ठिकाणी, गड-किल्ले, जंगल अशी अनेक स्थळे आहेत. पण सर्वात प्रथम राहण्यासाठी उत्तम सोय झाली पाहिजे. त्यात स्वच्छता ही प्रथम आहे. जगातील पर्यटकांना महाराष्ट्रात आणि कोकणात जगातील सर्वात मोठे आगमनाचे केंद्र मुंबई आहे. मुंबई हा महाराष्ट्राचा चेहरा आहे. पण पर्यटकांसाठी उदासीन आहे. पर्यटकाचे स्वागत जंगी झाले पाहिजे. सर्वात प्रथम मुंबईत स्वच्छता गृह मुबलक बनली पाहिजेत. मुंबईत बघण्यासारखी निवडक स्थळे आहेत. पण मुंबई करमणुकीसाठी जगात प्रसिद्ध केंद्र आहे. त्यात बॉलीवूड हे आकर्षणाचे स्थान आहे. पण ते बघायला मिळत नाही. म्हणून MTDC नी प्रथम बॉलीवूड सहल निर्माण केली पाहिजे. महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे व युगपुरुष बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक बनवण्याचे ठरवले आहे. हे स्मारक फक्त पुतळ्याचे असू नये तर महाराष्ट्राचे प्रदर्शनीय केंद्र झाले पाहिजेत. परदेशी पर्यटकांना बुद्ध हे आकर्षणाचे मुख्य स्थान आहे. म्हणून बुद्धांच्या दर्शनार्थ व एकंदरीत भारतीय परंपरेचे व इतिहासाचे केंद्र हे स्मारक ठरले पाहिजेत. जेणेकरून गेट वे ऑफ इंडिया हे नाव सार्थक ठरेल.
कोकण हे तर गोवा आणि मुंबईमधील प्रांत आहे. मी सुरुवातीपासून सागरी महामार्ग सुचवत आहे पण त्याला अजून चालना मिळाली नाही. किनारपट्टीवरील प्रत्येक गाव हे पर्यटक गाव बनू शकते. MTDC ने घरात राहण्याचे एक नियम आणि मार्गदर्शक तत्व बनविले पाहीजे. त्यात MTDC ने स्टार दर्जा दिला पाहिजे. साधारणत: ३ स्टार्स खाली कुणाला ही परवानगी देवू नये. हे ३ स्टार्स निवासस्थान बनवण्यासाठी गावकर्यांना सर्व मदत व सहकार्य करावे. किनारपट्टीवरील पर्यटनाबरोबर कृषी पर्यटन हे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी करता येईल. महाराष्ट्र हे देशाचे फळांचे आणि अन्नधान्यांचे केंद्र आहे. कृषी पर्यटनाचे मार्गदर्शक तत्व बनवण्यात यावे. भारत जगात ह्या बाबतीत अग्रेसर असू शकतो. महाराष्ट्र हे जगातील एकमेव राज्य आहे, जिथे १५० कृषि महाविद्यालय आहेत. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यात कृषि विज्ञान केंद्र आहेत. ४ कृषी विद्यापीठे व अण्णा हजारे, पोपटराव पवारांसारखे गाव आहेत. ह्या सर्वांची कृषि पर्यटनात रुपांतर करण्यास मदत घ्यावी.
तिसरी बाब म्हणजे गड-किल्ले, लेणी ही पुर्ण दुर्लक्षित आहेत. सिंधुदुर्ग किल्ला तर छत्रपती शिवरायांनी बांधला, असे अप्रतिम स्थळ अरबी समुद्रात अजून दिमाखाने उभे आहे. पण पुर्ण दुर्लक्षित आहे. शिवरायांच्या अभियांत्रिकी कौशल्याचे ते उत्तम उदाहरण आहे. शिवसेना नावाने आज सरकार आहे, पण गड-किल्ले दुर्लक्षित आहेत. मी मुख्यमंत्र्यांचे एक प्रदर्शन बघितले. त्यात गड किल्ल्यांचे अप्रतिम चित्र बघितले. ते चित्र आता मुख्यमंत्री आणखी सुंदर करून पुन्हा एक प्रदर्शन ठेवू शकतात. त्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा हि जनतेची अपेक्षा आहे. त्यासाठी CSR निधीचा वापर होऊ शकतो. नाहीतर शिवरायांचे किल्ले जमीनदोस्त करण्याचे पापच आपल्याला लागेल.
पर्यटन कुणासाठी ? ह्या प्रश्नाचे माझे उत्तर एकच आहे. स्थानिक लोकांच्या समृद्धीसाठी. टाटा, बिर्ला, अंबानीसाठी नाही. मी १९९३ ला पर्यटक संस्था सुरु करून MTDC तारकर्लीचे पर्यटन केंद्र ताब्यात घेवून विकसित केले. नुकसानीत असणारे केंद्र पहिल्यांदाच फायद्यात आणले. इतर तंबू निवास निर्माण केले. ते चांगले चालले. पण हे काही किनारपट्टीवर राहण्यासाठी पर्याय नाही. मोठे ५ स्टार हॉटेल बांधण्यासाठी सरकारने किनारपट्टीवरील जागा संपादित केली व सर्व जागा ताज, ओबेरॉय, तीम्लोना १९९०च्या आधी देण्यात आली. त्यात शेतकऱ्यांची जमीन घेण्यात आली. पण प्रकल्प उभे केले नाहीत. त्यांना करायचे पण नाहीत. फक्त जमिनीची मालकी दाखवून कर्ज काढायचे असते. त्यांची पर्यटक स्थान बांधण्याची मुदत संपली आहे. ह्या सर्व जागा सरकारने परत घेऊन स्थानिकांना पर्यटक निवास बांधण्यासाठी द्याव्या किंवा लोकांना परत द्याव्यात, ही विनंती आहे.
समुद्रकिनारी निवडक जागा पर्यटन स्थळ म्हणून जाहीर कराव्यात व crz च्या निर्बंधातून उठवावे. तिथे पर्यटन ग्राम निर्माण करावी. स्थानिक ग्रामस्थांनीच आपल्या घरात पर्यटन व्यवस्था निर्माण करावी. त्यासाठी MTDC नी मार्गदर्शन आणि निधी उपलब्ध करून द्यावे. पर्यटकांसाठी अनेक सुविधा निर्माण करता येईल. मालवणचे स्नार्कलिंग व स्कुबा ड्रायव्हिंग फार प्रसिद्ध झाले आहे. त्याला आणि जलक्रीडा, साहसी खेळ मोठ्याप्रमाणात विकसित कराव्यात. तरुण व नेवीतील माजी नाविक हे प्रकल्प चांगले चालवतील. आंबोली येथे जगातील सर्वात चांगला गोल्फ कोर्स होऊ शकतो. महाराष्ट्रातील अनेक नैसर्गिक व पारंपारिक जागा उर्जित कराव्यात व संस्कृतीची प्रगती करावी. अशा अनेक बाबी मी सुचवू शकतो. गरज इच्छाशक्तीची आहे. ती ठाकरे कुटुंबात आहे असे वाटते. तरी सरकारने एक बैठक घेऊन निवडक लोकांना बोलवावे आणि ह्या कोरोनाच्या काळात एक ४ वार्षिक योजना बनवावी. ह्यावरून ह्या सरकारचे योगदान स्पष्टपणे दिसेल.
लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा ९९८७७१४९२९.