पाकिस्तानला संपवा (भाग – २)_११.३.२०२१

१९७१ला पाकिस्तानचा प्रचंड पराभव झाल्यानंतर भुत्तो म्हणाले होते की, “आम्ही गवत खाऊ पण अणूअस्त्र वाढवून भारताला नष्ट करू.” ही बदल्याची भाषा अजून देखील कायम आहे.  त्यासाठी पाकिस्तानने प्रथमत: अमेरिकेचा पूर्ण विश्वास कमावलेला आहे. पाकिस्तान हे १९५९ पासून अमेरिकेच्या सिटो करारामध्ये सामील आहेत. सिटो करार हा सुरक्षा करार आहे. म्हणूनच १९६५ आणि १९७१ च्या युद्धात अमेरिकेने उघडपणे पाकिस्तानला मदत केली. आपले पंतप्रधान आणि अमेरिकेच्या अध्यक्षांनी कुठलंही वक्तव्य केलं तरी त्यात अंतर्गत सत्य एकच आहे.  अमेरिका नेहमीच पाकिस्तानला मदत करणार आणि त्या रूपाने भारताला विरोध करणार.  दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तान हा चीन आणि भारताला झुंजवत ठेवून दोघांमध्ये युद्ध घडवायला बघत आहे.  तिसरीकडे अमेरिका सुद्धा भारत-चीन युद्ध व्हावे म्हणून पूर्ण प्रयत्न करत आहे.  कारण जर दोघांचे युद्ध झालं तर अमेरिका प्रचंड ताकदवान बनेल आणि भारत व चीन हे कमकुवत बनतील. 

            चीनने करोना काळामध्ये प्रचंड प्रगती केली आहे. आर्थिक दृष्ट्या चीन २०३० मध्ये अमेरिकेच्या पुढे जाणार आहे आणि म्हणून चीनचा एक-एक पंख कापला पाहिजे हे धोरण अमेरिकेचे आहे.  हे काम तो स्वत: करणार नाही, ते काम भारताने करावं असे अमेरिकेचे धोरण आहे.  अमेरिकन धोरणाला आपण बळी पडणार आहोत का? हे आपल्याला ठरवायचे आहे. म्हणून भारताच्या हिताचे काय आहे?  याचा विचार सर्वांनीच केला पाहिजे.  माझं स्पष्ट मत आहे की पाकिस्तानने भारताला एवढे हैराण केले आहे.  १९९० पासून जवळ जवळ दहा हजार भारतीय सैनिक मारले गेले आहेत.  पाकिस्तानचे धोरण स्पष्ट आहे ‘ब्लीड इंडिया’.  म्हणजे भारतावर छोटे-छोटे घाव करून भारताला रक्त सांडायला लावायचं आणि त्यातून भारताला कमजोर करायचं.  अमेरिकेला आणि चीनला भारताविरोधात वापरायचं यासाठी वाटेल ते करायला पाकिस्तान तयार आहे.  पाकिस्तानने आता चीनला काराकोरम पास मधून एक प्रचंड मोठा रस्ता दिला आहे.  त्या अन्वये पाकिस्तान मधून अरबी समुद्रात चीनला पोहोचता  येते व तेथून आफ्रिका, इराण व मध्य आशिया बरोबर व्यापार करता येतो.  चीन सध्या मोठ्या प्रमाणामध्ये आफ्रिकन देशांना मदत करत आहे व त्यांच्यावर आपला प्रभाव पाडत आहे.  म्हणून पाकिस्तानने चीनला जे पाहिजे होतं ते दिल आहे.  तसेच अमेरिकेला जे पाहिजे आहे हे देत आहे.  सध्या अमेरिकेला अफगाणिस्तानमधून आपले सैन्य मागे घ्यायचे आहे. त्यात पाकिस्तान तालिबानला अमेरिकेबरोबर जोडून देत आहे.  म्हणजे अफगाणिस्तान सरकार व पाकिस्तान यांचा शांती करार करून द्यायचा व अफगाणिस्तानवर अमेरिकेच्या सहाय्याने आपला प्रभाव ठेवायचा. 

सध्या भारत व अफगाणिस्तान मध्ये निकटचे संबंध आहेत व ते नेहमीच होते. अफगाणिस्तान हा पाकिस्तानचा पहिल्यापासून शत्रू आहे. त्यामुळे पाकिस्तानला युद्धामध्ये खोली नाही. तसेच इराण आणि भारताचे जवळचे संबंध आहेत. यामुळे पाकिस्तान हा भारत, अफगाणिस्तान आणि इराण या देशांच्या मध्ये सापडलेला आहे.  म्हणूनच पाकिस्तान अमेरिकेच्या सहाय्याने अफगाणिस्तानवर आपल्याला सोयीचे तालिबान सरकार फोफावायला बघत आहे.  पाकिस्तान एकमेव देश आहे जो अमेरिकेची आणि चीनची मदत करत आहे व त्या दोघांबरोबर निकटचे संबंध ठेवले आहेत. ही सत्य परिस्थिती सर्वच राजकर्त्यांना माहित आहे.  पण कुठल्याही पक्षाचे सरकार असो आपण हे ओळखून भारताच्या हिताचे धोरण का करत नाही? याचे मला आश्चर्य वाटते.

नुकताच चीन-भारत सीमेवरील तणाव कमी झालेला आहे.  सैन्य मागे घेण्याची भूमिका दोन्ही देशांनी दाखवली आहे.  सर्वात समाधानाची गोष्ट ही आहे की कितीही तणाव वाढला, कितीही संघर्ष वाढला, तरी दोन्ही देशाने बंदुकीचा वापर करायचे टाळले.  त्यात दोन्हीकडील जवान शहीद झालेले आहेत.  पण ते हातापायी करून शहीद झालेले आहेत,  बंदुकीच्या गोळीने नाही.  याचा अर्थ असा दिसतो की दोन्ही देशांना संघर्ष वाढवायचा नाही.  दुसरीकडे चीनने ‘ब्रिक्स’ देशाच्या शिखर परिषदेमध्ये भारताला अध्यक्षपद देऊन मदत करण्याची भूमिका जाहीर केली आहे.  ब्रिक्स करार म्हणजे भारत, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका या देशांनी एकत्र येऊन अमेरिकेची मक्तेदारी मोडून काढणे.  ही पाच देशाची संघटना बनवली आहे.  चीन-भारत संघर्षाच्या काळामध्ये ही कमकुवत झाली होती.  पण सुदैवाने या पाचही देशांनी पुन्हा तिला मजबूत करण्याचा विडा उचलला आहे. हा पाकिस्तानच्या मुखवट्यावर एक जबरदस्त तडाखा आहे.  आपण आशा करूया  याचप्रमाणे भारत अमेरिकेचा लाचार मांडलिक बनण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभा राहील आणि आपल्या हितासाठी काम करेल आणि कुठल्याही देशाच्या हातातील कटपुतली बावले होणार नाही.

            अंतिमत: मी एका निर्णयावर पोहचलो आहे की, पाकिस्तानचे कितीही लाड तुम्ही केले, कितीही विनवण्या केल्या तरी पाकिस्तान बदलणार नाही.  गेल्या सत्तर वर्षात भारताचे प्रचंड नुकसान जर कुणी केल असेल तर ते अमेरिकेच्या आदेशावरून पाकिस्तानने केले आहे. म्हणून पाकिस्तानशी चर्चा करण्यामध्ये काही अर्थ उरला नाही, असं माझं स्पष्ट मत आहे.  दहा हजार भारतीय सैनिक मारले गेले.  याचा बदला तर घ्यायलाच पाहिजे, पण जसे आपण पाकिस्तानचे दोन तुकडे केले, तसे आता पाकिस्तानचे चार तुकडे करायची वेळ आली आहे. पाकिस्तानचे सर्व भाग हे पाकिस्तानच्या पंजाबी राजकर्त्यांच्या विरोधात आहेत.  म्हणून या सर्व भागांना भारताने मदत केली पाहिजे.  जसे बलुचिस्तानमधील ‘बलुचिस्तान नॅशनल आर्मी’, खैबर खिंडकडील अफगाण क्षेत्र, हे सर्व राज्ये पाकिस्तान विरोधात उभी राहिली आहेत.  हा हिंदू मुस्लिम संघर्षाचा प्रश्न नाही.  हिंदू आणि मुसलमान हे दोन राष्ट्र आहेत आणि ते कधीही एकत्र राहू शकत नाही.  म्हणून पाकिस्तान बनला पाहिजे असे धोरण पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी घेतले म्हणून पाकिस्तान निर्माण झाला.  पण पूर्वेच्या पाकिस्तानमध्ये बंड झाले व बांग्लादेश निर्माण झाला.  यावरून स्पष्ट दिसते की जात आणि धर्म हे राष्ट्र बनवायला पुरेसे नसतात.  हे भारतातील हिंदुत्ववादी संघटनांनी सुद्धा लक्षात ठेवावे.  तसेच पाकिस्तानमध्ये बहुसंख्य मुसलमान असले तरी त्याचे चार तुकडे होऊ पाहत आहेत.  दुसरीकडे आपले मित्र राष्ट्र इराण, अफगाणिस्तान, बांग्लादेश ही मुस्लिम राष्ट्र आहेत. त्यांच्याबरोबर आपले संबंध आणखी दृढ केले पाहिजेत. आंतरराष्ट्रीय संबंध हे जाती धर्मावर बनत नाहीत, तर व्यवहारावर बनतात.

            म्हणून आता पूलवामा, बालाकोट सारखे सर्जिकल स्ट्राइक सारखे लुटूपुटूच्या लढाई बंद करा आणि एकदाचा काय तो पाकिस्तानचा निकाल लावा.  त्याचे चार तुकडे करा हेच धोरण भारताचे असले पाहिजे.  ही मागणी मी १९९१ पासून करत आहे.  पण भारताचे राजकर्ते हे धाडस करायला बघत नाहीत.  कारगिल युद्धामध्ये तर पाकिस्तानने आपल्या भूभागाचा लचका तोडला.  त्यावेळी मी त्या युद्धामध्ये सामील होतो.  सैन्य विनवणी करत होते की,  सैन्याला आदेश द्या,  सीमा पार करून एकदाच काय ते पाकिस्तानला नष्ट करा.  पण दुर्दैवाने त्यावेळी आपल्या राजकारण्यांनी पुढाकार घेतला नाही.  ज्यावेळेला मुंबईवर २००८ मध्ये हल्ला झाला, त्यावेळेस देखील मी हीच भूमिका घेतली होती.  जर पाकिस्तान आपले दहशतवादी मुंबईमध्ये पाठवत असतील तर पाकिस्तानला जगण्याचा काही अधिकार नाही आणि त्याच्यावर एकदाचा हल्ला केला पाहिजे.  त्या काळात सैन्याची जमवाजमव झाली, भारताच्या सीमेवर सैन्य उभे ठाकले.  हल्ला करायचं नाटक झालं, पण हल्ला करण्यात आला नाही.  पुलवामा घडला तेव्हा कुठेतरी बालाकोट मध्ये बॉम्ब हल्ला केला आणि सुड उगवल्याचे भासवलं गेल आणि आपण समाधान मानून घेतलं.  हे लक्षात ठेवलं पाहिजे की कुठल्याही देशाला पाच पंचवीस लोकांना बळी देऊन काही नुकसान होत नाही.  आमचे पाच मारले तर आम्ही त्यांचे ५ मारून काही फरक पडत नाही.  त्या देशाला धडा शिकवला पाहिजे आणि धडा शिकवण्याचा पाकिस्तानला एकच मार्ग आहे.  पाकिस्तानला निर्णायक लढाईमध्ये पराभव करा त्याचे चार तुकडे करा आणि एकदाचा काय तो पाकिस्तान प्रश्न संपवून  टाका.

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाईट :  www.sudhirsawant.com

मोबा ९९८७७१४९२९.

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS