सैन्यामधील नोकरीला नुकती सुरुवात झाली तेव्हा सिक्किम मध्ये चीन सीमेवर नोकरी करण्याची संधी मिळाली. सिक्कीमच्या अनेक गावात फिरताना मला त्यांची निसर्गाविषय प्रेमाची प्रचिती आली. कुर्हाड बंधी, जल संवर्धन, मृद संवर्धन, हिमालयाच्या प्रचंड डोंगरात ग्राम पाणी पुरवठा योजना. ह्या सर्व योजना सरकारी नव्हत्या, पण लोकांची ती जीवन पद्धती होती. शेती ही हिमालयाच्या डोंगराळ प्रदेशात उतारावर होती. अनेक ठिकाणी सामुहिक शेती केली जायची. निसर्गाचा आणि शेतीचा संबंध नैसर्गिक होता. म्हणून अल्पभूधारक असून उत्पन्न बर्यापैकी होते. म्हणूनच की काय २००३ ला मुख्यमंत्री कॅम्लिंगने एक क्रांतिकारक निर्णय घेतला. सिक्कीमला भारतातील पहिले ऑरगॅंनिक किंवा सेंद्रिय राज्य जाहीर करण्यात आले. सिक्कीम मध्ये १६ सप्टेंबर २००३ ला राज्य सेंद्रिय बोर्ड निर्माण करण्यात आले व सेंद्रिय शेतीचे पूर्ण धोरण आखण्यात आले. त्यात २००४ पासून रासायनिक खत आणि किटकनाशकावर बंदी घालण्यात आली. पुढे जाऊन रासायनिक खत आणि कीटकनाशक वापरण्यास गुन्हा जाहीर ठरविण्यात आला. शालेय शिक्षणात सेंद्रिय शेती एक विषय म्हणून सुरू करण्यात आला. तसेच कृषि खात्याने धडक प्रशिक्षण कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी सुरू केला. ह्या सर्वांचा मोठा परिणाम आरोग्यावर झाला. कॅन्सर,मधुमेह, हृदयविकार हे रोग कमी झाले. लोकांच्या आरोग्यात नेत्रदीपक सुधारणा झाली. त्याच बरोबर जमिनीत प्रचंड सुधारणा झाली. २०१६ ला १,९०,००० एकर शेतीमध्ये, ८,००,००० टनाचे उत्पादन झाले. एका छोट्या राज्याने हे धोरण राबिवले त्याचे चांगले परिणाम त्या राज्याला मिळाले. शेतीबरोबर पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळाली.
सेंद्रिय शेतीच्या पुढे जाण्याची गरज लोकांना भासू लागली आहे. कारण अनेक ठिकाणी सेंद्रिय शेतीमध्ये महागडे खत, कीटकनाशक वापरावे लागतात. रासायनिक शेतीवर मोन्संटो सारख्या ५ महाकाय बहुराष्ट्रीय कंपन्या जगावर राज्य करत आहेत. त्याचे दलाल आज लोकांना रासायनिक शेतीवर बांधून टाकत आहेत. रासायनिक शेतीचे वाईट परिणाम बघून सुद्धा हे लोक रासायनिक खत आणि कीटकनाशकाचा प्रसार करत आहेत. यवतमाळ मध्ये ८०० शेतकरी कीटकनाशकामुळे दगावून सुद्धा कुणावरच सरकारने कारवाई केली नाही. ह्यावरून स्पष्ट दिसते कि फडणवीस सरकर ह्या घातकी कंपन्यांना पाठीशी घालत आहे. BT कापसाचा घोटाळा समोर आलाच आहे. आपली बियाणच नष्ट करून मोन्संटो वर शेतकऱ्याला अवलंबून रहावे लागत आहे. तरी पाळेकर गुरुजींनी Bt cotton चे बियाणे देखील वापरून नैसर्गिक शेती द्वारा उत्पादन यशस्वी करून दाखविले आहे.
सेंद्रिय शेतीचा पुढचा टप्पा नैसर्गिक शेती आहे. पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी हे शास्त्र विकसित केले आहे. माझे कृषि विद्यान केंद्र व कृषि महाविद्यालय गेली ३ वर्ष ह्यावर प्रयोग करत आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ही शेती केली जात आहे. सर्वात मोठा फायदा हा आहे कि कीटकनाशक आणि रासायनिक खत नसल्यामुळे शेतीचा खर्च प्रचंड प्रमाणात कमी होतो. पाणी ७०% कमी लागते. हे २ फायदे बघितले तर शेतीची मुख्य समस्या नष्ट होते. तिसरा फायदा म्हणजे कि विषमुक्त अन्न तयार होते. डॉक्टरचे बिल नाहीसे होते. शेतकर्याला कर्जबाजारी करणारे प्रमुख कारण हे आरोग्यावरील प्रचंड खर्च. तो नष्ट झाला कि शेतकरी सुखी. समाजव्यवस्थेत क्रांतिकारी सुधारणा होईल. शेती जर फायद्याची करायची असेल तर ‘नैसर्गिक शेती’ हा एकमेव मार्ग मला दिसतो. तसेच रासायनिक शेतीमुळे जमिनीचा कस नष्ट झाला आहे. जमिनीतील नैसर्गिक जिवाणू रासायनिक खतामुळे संपला आहे. त्यामुळे नैसर्गिक शेती ही जमिनीला पुन्हा जिवंत करते.
नैसर्गिक शेती मधील खत आणि कीटकनाशके शेतातच बनवायचे असते. देशी गाईचे १० किलो ताजे शेण व १० लिटर गोमूत्र, १ किलो काळा गूळ, १ किलो बेसन आणि १ मूठ बांधावरची माती हे २०० लिटर पाण्यामध्ये मिळवून ढवळल तर १ एकरसाठी जीवामृत वापरता येते. असे २० एकर साठी १ देशी गाय लागते. १५ दिवसातून एकदा जीवमृताचा वापर करावा. त्याचबरोबर घनजीवामृत ६ महिन्यासाठी बनवून ठेवता येते. शेण व जीवामृताच्या मिश्रणातून निर्माण होते. जमिनीचे आच्छादन हे अत्यंत आवश्यक आहे. जमिनीचा पिकामधील उरलेला भाग आच्छादनासाठी उत्तम. या आच्छादनावर पडलेले दवाचे थेंब पाण्यामध्ये परावर्तीत होऊन शेताला मिळतात. हवेमध्येच पाण्याचा समुद्र आहे. त्याचाच उपयोग हवेतील पाणी खेचून जमिनीत रुजवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. मिश्रपिक हे आणखी एक महत्त्वाचे तत्त्व नैसर्गिक शेतीमध्ये आहे. जसे मी आंब्याच्या बागेत केळी लावली आहेत, त्याबरोबर शेवगा, सुपारी, पालक, कुळीथ, मेथी आणि कलिंगड हे एकाच जमिनीत लावले आहे. यावर्षी आंब्याचे पीक आले नाही पण इतर अनेक पिके मिळाली. वर खत आणि कीटकनाशकाचा खर्च नाही. याला सहजीवन करणारी पिके म्हणतात. जसे पाणी लागणारी पिके एकत्र लावायची. आवळ्याच्या बागेत आम्ही सीताफळ, रामफळ याची झाडे लावली आहेत. पाणी कमी लागते. सर्वात वर सूर्याची पूर्ण उष्णता स्विकारणारी झाडे लावाली पाहिजेत. त्याच्या खाली ऊन सावली लागणारी झाडे व सर्वात खाली सावलीत होणारी झाडे लावली पाहिजेत. हे शास्त्र जंगलावर आधारित आहे. जंगलात कुणी पाणी ही देत नाही किंवा खत कीटकनाशकाचा वापर करत नाहीत. तरी नैसर्गिक संतुलन असल्यामुळे जंगल दुष्काळात देखिल मरत नाही.
गावातील प्रत्येक नागरिकाचे जीवन आनंदी आणि सर्व संपन्न बनविणे हे आपले मुख्य ध्येय आहे. गावातच रोजगार निर्माण करणे, गावाचे आरोग्य सुधारणे, गावातील कला व क्रीडांचा विकास करणे व चांगल्या संस्कृती रुजविणे अशा प्रकारचे उपक्रम हाती घेण्यात आले पाहिजेत. विषमुक्त अन्न तयार करण्यासाठी नैसर्गिक शेती हा उपक्रम पूर्ण भारतात हाती घेण्यात आला पाहिजे. जमिनीची उत्पादकता वाढविण्याबरोबरच शेतकरी, शेतमजूर व भूमिहिनांसाठी उदरनिर्वाहाची साधने तयार करणेसाठी वेगवेगळ्या उपाय योजनांची तरतूद केली पाहिजे. ग्रामीण अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे तंत्र भारतात विकसित झाल्याशिवाय भारत प्रगत होणार नाही. नुकतेच युनोच्या अहवालात या जगातील १० लाख जीवजंतु नष्ट होणार आहेत असे नमूद करण्यात आले. औद्योगिक क्रांतीने जग उद्ध्वस्त करून टाकले आहे. जीव, जंगल आणि जमीन प्रचंड धोक्यात आली आहे. निसर्गाचे संतुलन बिघडले आहे. भारतात त्याचा सर्वात विपरीत परिणाम ग्रामीण भागत झाला आहे. अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. परंतु रोजगाराच्या बाबतीत कृषी क्षेत्रावर ७०% लोक अवलंबून आहेत. याचा निष्कर्ष असा निघतो कि रोजगार निर्मिती ही कृषी क्षेत्रात अडकलेल्या लोकांसाठी झाली पाहिजे. गावामध्ये संपत्ती आणि संपन्नता आली पाहिजे. तंत्रज्ञान आणि विज्ञान संपत्ती निर्मितीचा पाया आहे. गावामध्ये पैसा आणि संपत्ती कशामुळे निर्माण होईल व गावाच्या नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन कसे होईल यावर पूर्ण नियोजन होणे गरजेचे आहे. परंतु राजकीय पक्षानी शेती हा विषय आपल्या अजेंड्यातून काढून टाकला आहे. फुकटचे मगरीचे अश्रु ढाळून स्वत:ची आणि देशाची फसवणूक करण्यात सर्वच मग्न आहेत. पुढील लोकसभेला याच विषयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी संघर्ष झाला पाहिजे.
लेखक: ब्रिगेडियर सुधीर सावंत
वेबसाइट : www.sudhirsawant.com
मोबा. नं. ९९८७७१४९२९