बुद्ध सर्वांचा … १० मे २०१७

धर्म म्हणजे मानवी जीवनाचा एक मोठा भाग झाला आहे. धर्माचा  सामाजिक उपयोग समाजाला सुसंस्कृत बनवण्यासाठी होत असतो. म्हणजेच मानवाच्या जीवनातील नीतीनियम. साधी राहणी उच्च विचार सरणी, अहिंसा, परोपकार, सभ्यता, वैचारिक पावित्र्य अशा अनेक संकलपणा धर्मातून निर्माण झाल्या. पण भारतात अनेक प्रवाह निर्माण झाले. त्यामुळे एकसूत्रीपणा नाही. धर्माची व्याख्या रितीरिवाजात सीमित राहिली. कर्मकांडात गुंतून गेली. प्रेम भावना निर्माण करण्याऐवजी द्वेष भावनाच पेटून राहिली. खून मारामारी करायची. लुटारू बनायचे मग साईबाबाला किंवा तिरुपतीला जायचे आणि पैसे टाकायचे. पाप मुक्त होऊन पुन्हा लूटमार करायला मोकळे. ह्यामुळे, चोरी, लबाडी, खून मारामारी वाढतच गेली. पैसा फेकला की देव देखील वश होतो. मग सात्विकतेची किंवा प्रामाणिकपणाची गरज नाही, असा समाज रूढ झाला. त्यामुळे धर्माचे वास्तव हे मानवाचे चरित्र संपन्नतेत नाही. तर रूढी परंपरेत आहे. म्हणून सत्यनारायणाची पूजा घाला, वेगवेगळ्या तीर्थ क्षेत्राला भेटी द्या, उपासतापास करा, ह्याला धार्मिकता समजली जावू लागली. धर्म म्हणजे मानवी आचरण, हे सत्य अंधुक झाले.  ह्याला पहिल्यांदा क्रांतीकारक रित्या परिवर्तन करण्याचे काम तथागत गौतम बुद्धांनी केले.

गौतम बुद्ध यांच्या तत्वज्ञानाचा, विचारांचा प्रभाव भारत भूमीवर आणि जगावर इतका प्रचंड पडला की, पूर्ण सामाजिक-राजकीय जीवन बदलून गेले. सम्राट अशोकाने तर तलवारीच्या जोरावर एकसंघ केलेल्या भारताला बुद्धमय करून टाकले. एवढेच नव्हे तर अनेक देशांत आपल्या मुलांसह अनेक प्रचारकांना पाठवून त्याने बुद्धांच्या विचाराचा प्रसार केला. बुद्ध आणि धम्म या ग्रंथरूपी अनमोल रत्नाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी तथागत गौतम बुद्धांचा धम्म हा भारताचे सामाजिक, आर्थिक व राष्ट्रीय जीवन कसे प्रगत करू शकेल? यावर प्रकाश टाकला आहे. त्याअर्थी हा ग्रंथ समस्त मानवजातीसाठी आहे.

धर्म आणि धम्म यामध्ये फार मोठा फरक आहे. कृषि संस्कृतीमध्ये वादळ वारा, वीज, पाऊस या नैसर्गिक आपत्तीची कारणे लोकांना कळत नव्हती. या सर्व चमत्काराना उलगडून दाखवणाऱ्यांना वेगवेगळी स्पष्टीकरणे देण्यात आली. त्याला  धर्माचे नाव देण्यात आले. जगाच्या पाठीवर अशी कोणती तरी महान शक्ती आहे, जिणे जगाची निर्मिती केली. या विश्वासाला धर्म म्हणता येईल. त्या कल्याणकारी शक्तीला प्रसन्न किंवा खुश करण्यासाठी पूजापाठ व हानिकारक असलेल्या सैतानी शक्तीला संतुष्ट करण्यासाठी कर्मकांड, यज्ञविधी या सर्व प्रकियेला धर्माचे स्वरूप आले.

तथागत गौतम बुद्धांचा धम्म हा धर्मापेक्षा वेगळा आहे. धम्म म्हणजे सदाचरण, म्हणजेच माणसातील व्यवहार. माणसाने माणसावर प्रेम करावे, नीतीवर आधारित व्यवहार करावा. धम्म हा सामाजिक जीवनात केंद्रभूत आहे, तसे पाहिल्यास राजसत्ता किवा शासन चालविण्याचा वेगळा मार्ग म्हणजे धम्म आहे. कारण धम्म वास्तवावर आधारित आहे. तर धर्म अद्भुतावर अवलंबून आहे. तथागतांनी धम्मामध्ये करुणेला म्हणजेच प्रेमाला महत्व दिले. याचाच अर्थ करुणेशिवाय समाज जगू शकत नाही किंवा त्याची प्रगती होऊ शकत नाही. धम्माचा दुसरा भाग म्हणजे प्रज्ञा अर्थात निर्मलबुद्धी. अंधश्रद्धेला, वेड्या समजुतींना नष्ट करण्यासाठी बुद्धीला धम्मात महत्व देण्यात आले आहे. करूणा आणि प्रज्ञा म्हणजेच तथागताचा धम्म.

धर्माचा विषय म्हणजे देव, आत्मा, पूजाअर्चा, कर्मकांड, यज्ञविधी असा अर्थ लावण्यात आला आहे. धम्मात हे शक्य नाही. कारण धम्म हा केवळ सदाचार, प्रेम आणि प्रज्ञेवर आधारित आहे. नीती म्हणजेच धम्म आणि धम्म म्हणजेच नीती. माणसाने माणसावर प्रेम करायला देवाची आज्ञा लागत नाही. माणूस स्वतःहून ते करू शकतो. कामावरून परत आल्यानंतर बाप बायकोचा राग काढण्यासाठी मुलाच्या कानफाटात मारू शकतो किंवा चांगलेही वागू शकतो. हे त्या व्यक्तीच्या हातात आहे देवाच्या नाही. तसेच मुख्यमंत्री पैसे खाऊन बिल्डरच्या घशात सरकारी जमीन घालू शकतो किवा गोरगरीब भटक्यांसाठी घरकुले बांधू शकतो. हे त्या मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे देवाच्या नाही.

म्हणून माणसे सदाचारी होणे हे मानवी सुखासाठी अत्यंत महत्वाचे आहे. ह्यालाच धम्म म्हणतात. पण आपले राज्यकर्ते जनतेला लुबाडतात, सत्यसाईबाबा आणि अनेक महाराजांच्या पाया पडतात. या बुवांच्या माध्यमातून ते स्वर्गात देखील जागा हडप करण्याचा प्रयत्न करतात. खासदार, आमदार, मंत्री बनण्यासाठी त्या महाराजांना शरण जातात. १९९३ ला मी खासदार असताना नरसिंह राव यांचा उजवा हात असलेले एक केंद्रीय मंत्री माझ्या घरी आले व म्हणाले, तुम्हाला मंत्री बनवण्याचे ठरले आहे तरी चंद्रास्वामिना भेटून घ्या. मी गेलो नाही म्हणून मी मंत्री झालो नाही. असे अनेक महाराज, भांडवलदार, माफिया, क्रिकेटपटू, राज्यकर्ते यांचे गुरु बनतात. राष्ट्राचे आणि जनतेचे काम बाजूलाच राहते. धार्मिक कर्मकांडाचा हा भयानक परिणाम मानवी शोषण व्यवस्थेचे मूळ आहे.  धर्म आणि धम्म यामधील इतर भेद तथागत गौतम बुद्ध आणि पोठ्ठपद ब्राह्मणातील एका संवादात व्यक्त झाले आहेत. त्यावेळी पोठ्ठपदनी गौतम बुद्धांना विचारले की, पुनर्जन्म आत्मा परमात्मा यावर बुद्धांचे काय मत आहे. गौतम बुद्ध म्हणाले, या विषयीची चिकित्सा करण्याची धम्माला गरज वाटत नाही, कारण जे बुद्धीला दिसते आणि पटते, जे व्यवहारिक आहे त्यावरच धम्माचे संस्कार आहेत. तथागत पुढे म्हणतात की, ज्या प्रश्नांच्या उत्तरातून काही लाभ नाही. तो सदाचरणाच्या कोणत्याही घटकाला उपकारक नाहीत. त्यापासून अनासक्ती, राग-द्वेषापासून मुक्ती, शांती, सत्यदान किंवा निर्वाण साधत नाही. म्हणुनच मी त्यावर मत व्यक्त केलेले नाही. मी दुःख म्हणजे काय? दुःखांचे कारण काय? आणि दुःखाचा निरोध कसा साधता येईल? हे स्पष्ट केले आहे. कारण त्यापासून मानवाला लाभ आहे. तो धम्माचा विषय आहे. यावरून आपण सरळ निष्कर्ष काढू शकतो की, देव, पुनर्जन्म, भूतप्रेत या भानगडीत न पडता आपण जर सदाचारावर, नितीमत्तेवर, दैनदिन व्यवहार जीवनशैली घडवली तर मानवी जीवन कितीतरी सुखकर होऊ शकते.

तथागत गौतम बुद्धांच्या चळवळीचा परिपाक भारतीय घटनेच्या निर्मितीमध्ये झाला. १९५० ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर किवा इतर कुणीही बुद्ध धम्म स्विकारला नव्हता. घटनेच्या कलम १७ अन्वये चातुरवर्णाच्या सामाजिक बंधनाच्या कलंकातून भारताला मुक्त करण्यात आले. पण व्यवहारात समाज रूढी परंपराना चिकटूनच राहिला. सरकारी यंत्रणा संदिग्ध धोरण राबवित होती. घटनेतून निर्माण झालेला कायदा व व्यवहार यात प्रचंड विसंगती होती आणि आज देखील आहे. आर्थिक बाबतीत तर विषमता हाच व्यवहारातील सामाजिक नियम झाला आहे. डॉ. बाबासाहेबांनी हीच खंत आपल्या घटना परिषदेच्या शेवटच्या भाषणात व्यक्त केली होती. तथागत गौतम बुद्धांना कोणी देवाचे रूप देते, तर कोणी क्रांतिकारी परिवर्तनवादी नायकाचे रूप देते. मुळात ह्या विवादात पडण्याची गरज नाही. नितीमत्तेवर सदाचारावर आधारित जीवनशैली म्हणजेच धर्म. तथागत गौतम बुद्धांच्या विचारांना कोणीच अमान्य करू शकत नाही.

सम्राट अशोकासारखा देशाला एकसंघ करणारा योध्दा तलवार खाली ठेवून धम्म स्विकारतो आणि रयतेचे राष्ट्र बनवतो. हा चमत्कार कसा होऊ शकतो? मी कमांडो कोर्स करताना २१ वर्षाचा होतो. त्यावेळी मी अत्यंत धाडशी आणि दहशदावाद्यांप्रती द्वेषभावनेने पछाडलेला  होतो. पण त्या द्वेषभावनेच्या जागी मानवतेचा चेहरा हळूहळू उमलू लागला. दहशतवादी आपला शत्रू नाही तर तो आपलाच बांधव आहे ही जाणीव दृढ होऊ लागली. मानवतावादी व्यवहाराने अनेक खुखार दहशतवाद्यांचे मनपरिवर्तन करून मी त्यांना देशाच्या कार्यात आणू शकलो. बंदुकीच्या गोळ्यांनी जे असाध्य होते ते सदाचारातून, सद् भावनेतून साध्य केले. आज ८००० काश्मिरी युवकांना भारतीय सैन्यात आणण्याचे काम माझ्या हातून घडले, ते तलवारीच्या जोरावर नव्हे तर मानवतावादी विचारांमुळे !

तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक किंवा छ. शिवराय हे काही वंचित शोषित समाजात जन्मलेले नव्हते. पण सर्व सुखाचा त्याग करून मानवमुक्तीचा लढा देणारे ते थोर पुरुष होते. बुद्ध तर शेतकरीच होते. हातात नांगर धरणारा राजा म्हणजे तथागत गौतम बुद्ध. धनुर्विद्येत प्राविण्य संपादन करणारा हा राजा. एक वर्षाच्या बालकाचा त्याग करून संन्यास घेणारा महात्मा म्हणजेच तथागत. म्हणून आपल्याच जातीतला माणूस आपले कल्याण करू शकतो हा अहंकार लोकांनी सोडला पाहिजे. जातीचा वापर करून व्यक्तिगत स्वार्थ  साधणारेच जास्त असतात. थोर माणसे हि सर्वांचीच असतात. ती संकुचित विचार कधीच करत नाही. तथागत गौतम बुद्धांना केवळ एका समूहाचे नाव देणे म्हणजे त्यांच्यावर घोर अन्याय आहे. तथागत गौतम बुद्धांचा धम्म हा कुठल्या एका विशिष्ठ समाजाचा उद्धार करण्याचा मार्ग नव्हे, तर मानवतेला मिळालेले वरदान आहे. आज प्रत्येक रुपयाच्या नोटेवर, तिरंग्यातील चक्रावर किवा सरकारी पत्रावर सम्राट अशोकाचा स्तंभ आहे. कारण तीच भारताची ओळख आहे. घटनाकारांनी जाणीवपूर्वक ती घातली. म्हणून बुद्ध कुणाचा? हा विचार करण्याची गरज नाही, कारण बुद्ध सर्वांचाच आहे.

Please follow and like us:

Author: admin