भारताचा शत्रू कोण.. १५ जून २०१७

भारताचा शत्रू कोण हे अचूकपणे ठरल्याशिवाय आपण आपले सरंक्षण कसे करू शकतो. १९९१ पर्यंत या बाबतीत भारतामध्ये कुठलाच गोंधळ नव्हता. अमेरिका, पाकिस्तान आणि सौदी अरेबिया हे त्रिकुट भारताविरुद्ध उघडपणे उभे होते. सौदी अरेबियाच्या पैशावर अमेरिकेने पाकिस्तानमध्ये दहशतवादी टोळ्यांचा एक समूह निर्माण केला. उघडपणे हे रशियाच्या विरोधात उभे असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. पण त्याचबरोबर भारतात काश्मीर, पंजाब, श्रीलंका, आसाममध्ये यादवी पेटविण्यात आली. १९९१ ला भारताला सोने विकावे लागले व त्याआड अमेरिकेने भारतावर आपले वर्चस्व निर्माण केले. मनमोहन सिंग यांनी अमेरिकन धार्जीण धोरण अंमलात आणले व तेव्हापासून आजपर्यंत अमेरिकेच्या छत्रछायेखाली देश भरकटत चालला आहे.

ट्रम्पच्या विजयामुळे आज अमेरिकन धोरण स्पष्टपणे उघड झाले आहे. ट्रम्पने ‘अमेरिका फस्ट’ हा नारा त्यांच्या निवडणूक काळात जाहीर केला होता. ही मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ सारखीच घोषणा होती. पॅरीसमध्ये झालेल्या पर्यावरण करारातून ट्रम्पने अमेरिकेला बाहेर काढले. तेव्हा त्याने चीन व भारताला दोष दिला व भारत अमेरिकेच्या जीवावर स्वतःचा विकास करतो असा आरोप केला. सर्वात महत्त्वाचे भारतीयांना रोजगार देणाऱ्या आयटी क्षेत्रातून भारतीय लोकांना काढून टाकण्याचा सपाटाच सुरु केला. अनेक भारतीयांचे अमेरिकेत गोऱ्या कट्टरवादयांनी खुन पाडले. ‘तुम्ही तुमच्या देशात परत जा.’ हा नारा अमेरिकेत प्रचलित झाला आहे. अमेरिकेत काम करणाऱ्या आय.टी. कंपन्यांना जबरदस्ती करण्यात येत आहे की, अमेरिकेत काम करायचे असेल तर अमेरिकन लोकांनाच नोकरी दिली पाहिजे. आता इन्फोसिस सारख्या कंपन्या देखील भारतीय लोकांऐवजी अमेरिकेतील नागरिकांना नोकरीवर घेत आहेत. त्यामुळे भारतात काम करून अमेरिकेला निर्यात करणाऱ्या कंपन्यामधून असंख्य लोकांना काढून टाकण्यात आले आहे.

मूळ मुद्दा हा रोजगाराचा आहे. आपल्या देशातील लोकांना रोजगार मिळविण्यासाठी दुसऱ्या देशातील धंदे बंद पाडणे हे गोऱ्या लोकांचे तंत्र ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीपासून सुरूच आहे. परदेशातील नागरिकांना अमेरिकेत येण्यापासून पायबंद घालण्यासाठी ट्रम्पने १८ एप्रिलला घोषणा केली की, ‘बाय अमेरिकन – हायर अमेरिकन’ हा नारा दिला. म्हणजे अमेरिकन वस्तूच विकत घ्या आणि अमेरिकन लोकांनाच रोजगार द्या. या तत्त्वाखाली जागतिक व्यापार पुढे चालविण्याचे अमेरिकेचे धोरण आज स्पष्ट झाले आहे. मग भारताने सुद्धा नारा दिला पाहिजे की, ‘बाय इंडियन आणि हायर इंडियन’. हे करायला मोदीजींची तयारी आहे का? तिकडे ट्रम्प तर परदेशातून (भारतातून) काहीच विकत घ्यायचे नाही असे जाहीर करतो पण दुसरीकडे अमेरिकन माल भारतावर व इतर देशांवर थोपावितो.

नुकताच ट्रम्पने सौदी अरेबिया, ईस्त्रायल आणि युरोपचा दौरा केला. दौऱ्याचा पहिलाच देश सौदी अरेबिया, येथे पन्नास सुन्नी मुस्लिम नेत्यांना संबोधित केले. यात प्रामुख्याने पाकिस्तानचे प्रधानमंत्री नवाज शरीफ यांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले. निवडणूक प्रचारात ट्रम्पने जाहीर केले होते की, अमेरिकेत मुसलमानांना येण्यापासून बंदी घालण्यात येईल. आता त्याने १८० डिग्री घुमजाव करून जाहीर केले की, वेगवेगळ्या धर्मामध्ये काहीच युद्ध नाही आणि दहशतवादामध्ये मारले जाणारे ९५% लोक मुसलमानच आहेत. असे करून ३० लाख कोटी रुपयांचे व्यापार आणि सरंक्षण करार सौदी अरेबिया बरोबर केले. सौदी अरेबियाच्या आग्रहापोटी त्याने जाहीर केले की, इराण हा दहशतवादाचा जनक आहे. इराण हे दहशतवादी राष्ट्र आहे असे म्हणत असताना ते विसरले की, इराणमध्ये ५ कोटी लोकांनी तेथील राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मुक्तपणे मतदान केले होते. इराणचे राष्ट्रपती रोहानी म्हणाले की, ट्रम्प सौदी अरेबिया या देशात गेले पण त्यांना हे लक्षात आले नाही की सौदी अरेबियामध्ये निवडणूक काय हे कुणालाच माहित नाही.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा सौदी अरेबिया, पाकिस्तान, इस्त्राइल आणि अमेरिका हे एकत्र आले. याच सौदी अरेबियाने सिरीयाविरुद्ध आयसिसला लढण्याची भाषा करते. ह्या सर्वांचा मूळ मुद्दा आर्थिक आहे. जितकी यादवी युद्ध होतील तितकी अमेरिकेची हत्यारे विकली जातील. आपल्या कारस्थानापासून जगाला मूर्ख बनविण्यासाठी जगभर जातीधर्माचा उपयोग करून यादवी युद्ध आणि दहशतवाद निर्माण केला आहे. त्यात या लोकांनी इराणला खलनायक बनविले. इराण हा भारताचा अतिशय जवळचा मित्र आहे. कारण इराण हा पाकिस्तान आणि सौदी अरेबियाला आपला शत्रू मानतो. सौदी अरेबिया आपलाच इस्लाम ज्याला वाहब्बी इस्लाम म्हणतात जगभर पसरविण्याचा प्रयत्न करीत आहे. आयासिस आणि अलकायदा या वाहब्बी संघटना आहेत. आता पाकिस्तान देखील पाकिस्तानमध्ये आणि भारतात वाहब्बी इस्लामचा प्रसार करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. भारतातील बहुतेक मुस्लिम गट हे वाहब्बी इस्लामला विरोध करतात. जसे काश्मिरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांना विरोध बहुतेक काश्मिरी लोक करतात त्याचे कारण काश्मिरी लोक जास्त करून सुफी आहेत.

अशाप्रकारे अमेरिका प्रत्येक देशातील प्रमुख गटाला सत्तेवर आणते, त्यांना हुकुमशहा बनवते आणि सामान्य माणसाला चिरडून टाकते. इजिप्तच्या क्रांतीनंतर अमेरिकेने अब्दुल फता – सीसी याला इजिप्तचा राष्ट्रपती केला. त्याचबरोबर आखाती देशांमध्ये राजेशाही प्रबळ केली. हे सगळे मिळून मुस्लिम ब्रदरहूड या विरोधी संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर करून चिरडून टाकण्याचे काम करीत आहेत.

एकंदरीत आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिकेने अनेक मुखवटे निर्माण केले आहेत. पण ब्रिटीश काळापासून ‘तोडा, फोडा आणि राज्य करा’ हे तंत्र आता बरेच विकसित झाले आहे. एकविसाव्या शतकातले अमेरिकेचे शक्तीकेंद्र हे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रमुख अधिकारी आहेत. ते प्रत्येक देशात राजकीय नेत्यांना विकत घेतात. भांडवलदारांना, उद्योगपतींना आपले बटीक बनवतात, त्या बदल्यात स्वस्त दरात कर्ज पुरवतात, तंत्रज्ञान देतात, भारतीय उच्चभ्रू वर्गाला आपल्या अंकित करतात, मिडियाला ताब्यात घेतात, असे करून प्रत्येक देशाच्या शक्तीस्थानावर आपली माणसे पेरतात.

ही नवीन गुलामगिरी आहे. जेणेकरून गुलामांना गुलामीची जाणीवच होत नाही आणि सामान्य माणूस भरडला जातो. हे सर्व जर आपण ओळखले नाही तर शत्रूचा प्रतिकार करणे शक्य होणार नाही. गोऱ्या लोकांच्या पाश्चात्य संस्कृतीला आपली सर्व मोठी माणसे शरण गेली आहेत. हे ओळखून भारताचे भारतीयकरण जर आपण नाही केले तर आपला देश शिडविरहित जहाजाप्रमाणे दिशाहीन होईल. बॅक टू रुट्स म्हणजे खोलवर रुजलेल्या भारतीय संस्कृतीकडे आपण वळले पाहिजे. जीवनमूल्ये जोपासली पाहिजेत. अत्यंत वेगाने आणि आक्रमकपणे देशाला गिळंकृत करणाऱ्या प्रवाहांना थोपविले पाहिजे. हे आपल्या समोरील खरे आव्हान आहे. शेतकरी, शेतमजूर, कामगार ह्या खेळात नग्न झाले. बेकारीचे काळे सावट भारतावर आले आहे. जगातील सर्वश्रेष्ठ सत्ता बनू पाहणारी आजची अमेरिका जग बुडाले तरी चालेल पण आपण श्रेष्ठ राहिले पाहिजे. लाखो मुले दहशतवादाखाली किंकाळत आहेत. मानवी मूल्यांचे खून पडत आले म्हणूनच अमेरिका म्हणत आहे. – अमेरिका फस्ट.

Please follow and like us:

Author: admin