भारतीय सेना हिच भारताची शक्ती भाग २

भारताला स्वतंत्र होऊन ७५ वर्ष झाले आहेत. त्याचा आनंद आपण उत्साहाने साजरा करत आहोत. अर्थात हे स्वातंत्र टिकवण्यामध्ये आणि भारताची सार्वभौमत्व राखण्यामध्ये सर्वात मोठा वाटा कोणाचा आहे? असा जर प्रश्न कोणी विचारला तर त्याचे स्पष्ट उत्तर आहे.  हे स्वतंत्र आणि सार्वभौमत्व भारतीय सैन्याने राखले आहे. तेही अनेकांनी बलिदान करून. निव्वळ काश्मीरला स्वतंत्र राखण्यासाठी व भारतामध्ये समाविष्ट करण्यासाठी १९८० च्या दशकानंतर दहा हजार सैनिक मारले गेले आहेत. हे तर काहीच नाही. पण भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशभर बंडखोराशी आणि दहशतवाद्यांशी सैन्याला सातत्याने लढावं लागलं आहे. किंबहुना प्रत्यक्ष युद्धापेक्षा दहशतवाद्यांबरोबर लढा हा घनघोर होता आणि अत्यंत हिंसक झालेला आहे.

दहशतवाद्यांनी माओचा गनिमी कावा म्हणजे छत्रपती शिवरायांचा गनिमी कावा वापरलेला आहे. आता तर गनिमी काव्याचे युद्धतंत्र अत्यंत विकसित झाले आहे व त्याच्यामध्ये शस्त्रास्त्रांच्या आधुनिकीकरणामुळे प्रचंड हिंसा वाढलेली आहे. ह्या हिंसक चळवळीला प्रचंड गती मिळाली ती श्रीलंकेमध्ये. श्रीलंकेतील तामिळ वाघांना प्रशिक्षित करण्याचं काम भारतीय सैन्याकडेच आले होते. मी जेव्हा कमांडो इन्स्ट्रक्टर होतो,  तेव्हा बऱ्यापैकी लोक प्रशिक्षणासाठी भारतात येत होते व आपण देखील त्यांना घातपाताच्या युद्धामध्ये पूर्ण प्रशिक्षित केले.  विशेषत: दहशतवाद्यांच्या हातामध्ये एक नवीन शस्त्र दिले. ते म्हणजे आयईडी (IED). त्याचबरोबर हे आयईडी कमरेला बांधून शत्रूच्या गोटात शिरून स्वतःला बॉम्बसकट उडून लावायचे. त्यात अनेकांची कत्तल करायची. हे तंत्र प्रचंड प्रमाणात वाढले. श्रीलंकेत जेव्हा भारतीय सैन्य शांतता प्रस्थापित करण्यासाठी गेले होते, त्यावेळेला आपण बरोबर बँड बाजा घेऊन गेलो होतो. लढण्यासाठी आपण अजिबात तयार नव्हतो. त्यावेळी तमिळ वाघांनी आत्मसमर्पण करायला नाकारले. म्हणून भारतीय सैन्याला शस्त्र हातात घ्यावी लागली व त्या धुमाकूळीमध्ये जाफना आणि ट्रिंकोमलीच्या भागात तामिळ वाघाने कडवा प्रतिकार केला. त्या भारतीय सैन्याची प्रचंड हानी झाली.  त्याचबरोबर दहशतवाद्यांकडे आत्मघाती पथकाचे एक नवीन तंत्र मिळाले. पुढे जाऊन सर्व दूर या आत्मघातकी पथकांचा वापर सुरू झाला. त्याला अलकायदा, लष्कर-ए- तोयबा, जैस-ए- मोहम्मद अशा जागतिक पातळीवरच्या संघटना आणि भारता विरोधात लढणाऱ्या अनेक संघटनांनी आयइडीचे हत्याराचा वापर सुरू केला. त्यामुळे दहशतवादा विरोधात लढण्याचे काम हे अत्यंत कठीण झाले. 

तरी देखील भारतीय सैन्याने मिझोराम असो, नागालँड असो, त्रिपुरा असो, मनिपुर असो किंवा आसाम असो. येथील बंडखोरी अत्यंत कष्टाने मोडून लोकांना आपलेसे केलेले आहे. त्यात भारतीय सैन्याचे सर्वात आक्रमक तत्व वापरण्यात आले. दहशतवादा विरोधात लढण्याचे काम आणि भारतीय सैन्याचे तत्व म्हणजे एकच. आमचे ज्येष्ठ वरिष्ठ सैनिक नेहमी सांगायचे की दहशतवाद बंदुकीच्या गोळीने संपविणे शक्य नाही, तर हृदय आणि मन जिंकून दहशतवादा विरोधात लढा लढावा लागतो.  हे तत्त्व  पाळण्यासाठी भारतीय सैन्याला प्रचंड संयम पाळावा लागला आहे. दहशतवादाच्या लढाईमध्ये मशीनगनचा वापर फार कमी प्रमाणात करावा लागायचा.  त्याचे कारण दहशतवादी हा समुद्रातला एक मासा असतो, तो लोकांच्या सागरामध्ये पोहत असतो. म्हणून जर मशीनगन वापरली तर दहशतवाद्याबरोबरच अनेक निरपराध लोक सुद्धा मारले जातात. बहुतेक संघर्षात एक एकेच गोळीच मारावी लागायची.

अशाच एका कठीण ऑपरेशनमध्ये अनंतनाग भागामध्ये आम्ही हल्ला केला होता. त्यावेळेला तीन दहशतवादी एका घरामध्ये लपले होते व अंदाजे १५ लोक त्या घरात होते. त्यात म्हातारे – कोतारे, बायका – मुलं सगळे होते. म्हणून हल्ला करणं कठीण होतं.  कारण निरपराध लोक मारले गेले असते.  म्हणून त्याकाळी आम्ही त्या घराला वेढा दिला, आम्ही शस्त्र वापरत नव्हतो.  चार-पाच सैनिकांना आम्ही स्नायपर म्हणून नेमले होते. स्नायपर विशिष्ट बंदूकधारी लोक असतात, ते दबा धरून बसतात आणि सावज दिसल्याबरोबर त्याला उडवतात.  स्नायपर हे खिडक्यांवर नेम धरून बसले होते.  चार-पाच तास तसंच बसल्यानंतर एका खिडकीतून एका दहशतवाद्याने आपले डोके काढले. त्याचे डोकेच उडविण्यात आले. अशाच प्रकारे आणखी सात-आठ तासाने दुसऱ्याचे शरीर दिसले. त्यावेळी त्यालाही मारण्यात आले. मग बऱ्याच वेळाने बायका मुलं त्या घरातनं बाहेर पडले व त्यांना सुखरूप करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. नंतर आम्ही हल्ला केला त्यात अत्यंत खतरनाक दहशतवादी आम्ही पकडला.  हे जवळजवळ बारा-पंधरा तास नाटक का करावा लागलं? त्याचं कारण एकच होतं की, निरपराध लोकांना इजा होऊ नये अशाप्रकारचे संयम अनेक ठिकाणी भारतीय सैन्याला पाळावे लागले आणि त्यातूनच लोकांची हृदय आणि मन जिंकण्यामध्ये आमचे सैन्य यशस्वी झाले. 

एक गोष्ट स्पष्ट होते की भारतीय सैन्याचा इतिहास रक्तरंजित नाही. उलट सैन्यामुळे रक्तपात कमी झालेला आहे. ज्याच्या हातात बंदूक असते जो निरपराध लोकांची हत्या करणारा असतो त्याला हेरून मारणे व सामान्य माणसांना सुरक्षित ठेवणे हे भारतीय सैनिकाचे प्रथम कर्तव्य असते. सिनेमात दाखवल्याप्रमाणे मशीनगनच्या गोळ्यांचा वर्षाव करणे हे सैनिकांचे काम नव्हे.  सैनिक हा अशाप्रकारे वागतो की लोक सैनिकांच्या म्हणजे भारताच्या बाजूने व्हावी.  त्यासाठी हल्ला केल्यानंतर त्या गावामध्ये पाणीपुरवठा करणे, शाळा चालविणे, क्रीडामध्ये लोकांना प्रशिक्षित करणे, तसेच आरोग्य सेवा देणे अशी अनेक सेवा भावी कामे सैन्य करते. त्यातूनच लोक आपलेसे होतात. 

मी इंटलेजीयंसमध्ये असताना माझा संबंध इक्वान टेररिस्ट गटाबरोबर आला. १९८७ साली निवडणुकांमध्ये प्रचंड अत्याचार झाला आणि सरकारी गटाने बोगस मतदान केले.  त्यामुळे मुस्लिम तरुणांना त्या निवडणुकीमध्ये भाग घेता आला नाही आणि बोगस मतदानामुळे या सर्वांचा पराभव झाला. तेथून संताप उसळला व अनेक तरुण माणसं दहशतवादी गट बनवून पाकिस्तानमध्ये गेले. दहशतवाद मोठ्या प्रमाणात सुरू झाला. पाकिस्तानने या तरुणांना प्रशिक्षित केले, हत्यार दिली व आयइडीचा वापर सुद्धा शिकवला. तेथून प्रचंड दहशतवाद सुरू झाला. मी त्यावेळी काश्मिरमध्येच होतो.  हे सर्व मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले आहे. पुढे जाऊन पाकिस्तानमध्ये या तरुणांवर अन्याय होऊ लागला. त्यांना वाहब्बी इस्लाम स्विकारायचे आदेश देण्यात आले. पण हे काश्मिरी तरुण सुफी पंथाचे होते. त्यामुळे ओसामा-बिन-लादेनच्या कट्टरवादी वाहब्बी इस्लामकडे त्यांनी पाठ फिरवली. त्या काळात सर्वांनी लक्षात ठेवावे की पाकिस्तानमध्ये जगातल्या दहशतवादी येऊन अफगाणीस्तान विरोधात जिहाद पुकारला होता. सोवियत संघाच्या सैन्याला परत पाठवण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने सर्व दहशतवादी जमा केले.  आणि जो प्रचंड पैसा सौदी अरेबिया आणि अमेरिकेकडून आला तो त्यांनी भारताविरोधात सुद्धा दहशतवादी टोळ्या उभे करायला वापरला. वाहब्बी इस्लामला विरोध करणारे व लष्कर-ए-तोयबाला विरोध करणारा एक ग्रुप निर्माण झाला. पण पाकिस्तानला कट्टरवादी लोकांना मोठं करायचं होतं, म्हणून त्यांनी इक्वान ग्रुपच्या लोकांना मारायला सुरू केलं. आणि हळूहळू इक्वान ग्रुपचे लोक पाकिस्तानच्या विरोधात उभे राहिले आणि मग मी जेव्हा खासदार झालो त्यावेळेला त्या गटांचा माझ्याशी संबंध मोठ्या प्रमाणात आला.  शंकरराव चव्हाण गृहमंत्री असल्यामुळे मला त्यांना मदत करता आली व १९९५ साली अडीच हजार दहशतवादी लोकांनी काश्मिरमध्ये आत्मसमर्पण केले. या सर्वांना हत्यार देऊन शहरांमध्ये ठेवण्यात आले.

त्यामुळेच १९९५-९६ ची निवडणूक अत्यंत यशस्वी झाली. पण त्याचवेळी त्यांच्यावर प्रचंड हल्ले सुरू झाले व अनेक लोक मारले गेले. त्यातील एक कुक्कापेरे हे आमदार म्हणून १९९५ ला निवडून आले, त्यांचा पण खून झाला. मी कारगिल युद्धात सहभागी होण्यासाठी पुन्हा काश्मीरमध्ये १९९९ साली दाखल झालो.  त्यावेळी हे सर्व मला भेटले आणि म्हणाले  साहेब आमची परिस्थिती अत्यंत बिकट आहे, आम्हाला वाचवा. म्हणून मी त्यावेळी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडे त्यांना घेऊन गेलो व त्यांना विनंती केली की या सर्व आत्मसमर्पित दहशतवाद्यांना प्रचंड धोका आहे आणि म्हणून त्यांना सैन्यात घेण्यात यावं. अशाप्रकारची मागणी ऐकून सरकारला आश्चर्यकारक वाटले.  पण जॉर्ज फर्नांडिस यांनी ही मागणी लावून धरली आणि शेवटी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडे बैठक झाली.  त्याच्यामध्ये मी स्पष्ट सांगितलं यांना घेतल्यास  काश्मिरमध्ये सैन्याला प्रचंड फायदा होईल व गुप्तहेर खात्याच्या माहितीप्रमाणे या सर्वांचा उपयोग करून घेण्यात येईल.  दहशतवादांच्या सर्व लपून राहण्याच्या जागा, मार्ग उघडकीस येतील. दुसर्‍या प्रश्नाला मी उत्तर दिल की, यांच्यापैकी सगळे प्रामाणिक राहतील.  भारताविरोधात एखाद-दूसरा गद्दार ठरू शकतो. वाजपेयी यांना प्रामाणिकपणे काश्मिरमध्ये शांती आणायची होती आणि म्हणून त्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर २००३ पासून सरेंडर दहशतवादांच्या बटालियन बनायला सुरू झाले.  अनेक तरुणांना काश्मिरमधल्या सैन्यात घेण्यात आले व एक एक हजारच्या आठ पलटणी बनवण्यात आल्या. एकंदरीत आठ हजार सैन्य निर्माण करण्यात आलं. आज ज्याला होमॅ अँड हर्थ बटालियन’ (Home and Hearth) म्हणतात.  त्यांनी इतकं चांगलं काम केलं की २०१० पर्यंत काश्मिरमधून दहशतवादाचा पूर्ण बिमोड करण्यात आला होता. मी ज्यावेळी शेवटी सैन्यातून बाहेर आलो, तेव्हा काश्मिरमध्ये दहशतवाद २०१३ला संपला होता. दहशतवादाना गाव बंदी होती आणि अशाप्रकारे भारतीय सैन्याच्या कौशल्याने शत्रूला मित्र करून दहशतवाद संपून टाकला. पण नंतर तो २०१६ ला पुन्हा सुरू झाला. त्याबद्दल वेगळ्या लेखांमध्ये लिहू. सांगण्याचा उद्दिष्ट एवढेच आहे की भारतीय सैन्य शत्रूला आपलासा करण्यामध्ये पूर्ण यशस्वी होते आणि म्हणूनच लोकाचं हृदय आणि मन जिंकल्यामुळे भारतीय सैन्य हे दहशतवाद संपवणारे जगातील एकमेव असे सैन्य आहे.  त्याचा योग्य सन्मान होताना दिसत नाही.

मला या प्रसंगी एवढेच सांगायचं आहे की, सैन्यदलाचे प्रथम काम राष्ट्राच्या शत्रूबरोबर लढणे हे आहेच. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं काम मला वाटते ते म्हणजे अंतर्गत शत्रू, दहशतवाद, बंडखोरी विरुद्ध लढण्याची आहे. ही लढाई जास्त जोखमीची असते. कारण शत्रू कोण आणि मित्र कोण हे कळायला वेळ लागतो.  व त्यात राजकीय पक्षांची भूमिका अशी असते की द्वेष भावना वाढवायची आणि जातीय धार्मिक संघर्ष तेवत ठेवायचा आणि त्याच्यावर आपली राजकीय पोळी भाजायची.  हे भारताचे सर्वात मोठे दुर्दैव आहे आणि अमृत वर्षांमध्ये आपण सर्वांनी निर्धार केला पाहिजे की जे राजकीय पक्ष धर्म आणि जातीचे राजकारण करतात, त्यांना भारतातून तडीपार केले पाहिजे व जे समाजाला जोडण्याचं काम करतात त्यांना आपण मोठे केले पाहिजे.

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS