प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चीन संघर्षावर बोलताना म्हटले की, चीनने भारताच्या हद्दीच्या आत कुठेही घुसखोरी केली नाही आणि कुठल्याही चौकीवर ताबा मिळवला नाही. हे ऐकल्यावर आम्ही अचम्बितच झालो. कारण जर चीन ने भारतीय हद्दीत घुसखोरी केली नाही तर २० जवान शहीद कसे झाले? आणि इतके दिवस जो संघर्ष चालू आहे तो कशासाठी. विरोधी पक्षांनी ह्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली नाही तरच नवल. चीन भारत हद्दीत घुसला आहे पण मोदी ते लपवत आहे असा आरोप पण झाला आहे. खर खोटे करणार कोण? पूर्ण भारतभर चीन विरुद्ध वातावरण निर्माण केले गेले आणि प्रधानमंत्री दुसरेच काहीतरी बोलत आहेत. ही आश्चर्याची गोष्ट आहे. कोरोना मुळे सामान्य माणूस अत्यंत त्रासलेला आहे. नोकर्या संपल्या, अन्नधान्य, भाजीपाला मिळेनासा झाला. शेतकर्यांचे व कामगारांचे अतोनात हाल होत आहेत. म्हणून लोक हैराण झाले आहेत, त्यामुळे चीन संघर्ष पेटवायचा आणि लोकांचे मन दुसरीकडे वळवायचे. ही फसवणूक लोकांची केली जात आहे का? असा प्रश्न देखील लोक करू लागले आहेत. हे तंत्र जुनेच आहे. ज्यावेळी लोक प्रक्षोभ वाढू लागतो त्यावेळी लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी लुटुपुटूचे युद्ध केले जाते. लोक मग शत्रू राष्ट्रा विरुद्ध आग ओकतात. मूळ प्रश्न विसरला जातो. जसे पुलवामा कांडात झाले. पुलवामा मध्ये ४० जवानांची हत्या निवडणुकीच्या तोंडावर झाली. पाक विरुद्ध आग ओकली गेली. युद्ध तर झालेच नाही पण कुठेतरी विमानाने बॉम्ब हल्ले केले गेले. १ मेला का ४०० मेले गेले ह्याला काहीच अर्थ नाही. कारण पाकला काहीच फरक पडत नाही. उलट इम्रान खानला पाकिस्तान मध्ये बराच फायदा झाला. शेवटी वाघ वाघ म्हणत उंदीर निघाला. तसेच चीन बद्दल चालले आहे का?
चीन हा भारताचा सर्वात मोठा निर्यातदार आहे. जवळ जवळ ८० अब्ज डॉलर चीनी माल भारतात येतो. कुठल्याही देशापेक्षा माल जास्त का येतो? त्याला कारण म्हणजे भारतीय लोक तो मागवतात. कोणी चीनी माल विकत घ्यायला जबरदस्ती करत नाहीत. पण माल स्वस्त आणि चांगला असतो म्हणून भारतीय नाही तर आज जगातील बहुतेक देश मागवतात. तो महाग करणे भारत सरकारच्या हातात असते. निर्यात कर लावला कि चीनी माल महाग होईल आणि भारतात माल कमी येईल. पण सरकार चीनी मालावर कर का लावत नाही. हे काय कारस्थान आहे. इकडे उगाच लोक चीनी माल तुडवतात, जाळतात व आंदोलन करतात. त्यापेक्षा सरकारने कर वाढवून माल कमी येईल हे बघावं पण सरकार हे करत नाही. म्हणजे कुठेतरी सरकार जनतेला फसवत आहे.
चीनी माल कमी आला तर त्याचा फायदा अमेरिकेला होतो. आपण चीनी माल बंद करून अमेरिकेला फायदा करून द्यायचा आहे का? त्यात भारताचा काय फायदा? अमेरिकेने नेहमी भारताला विरोध करून पाकलाच मदत करून दिली आहे. हत्यारे आणि पैसा अमेरिकेने पाकला प्रचंड पुरवला आहे. १९७१ च्या युद्धात भारताने पाक वर हल्ला केला तेव्हा अमेरिकेने चीनला सांगितले कि बॉर्डर वर चीन सैन्याची जमवाजमव करा. पण चीनने ते मान्य केले नाही. तेव्हा अमेरिकेने भारताविरुद्ध हल्ला करायला सातवा नाविक बेडा पाठवला. तेव्हा सोविएत संघाने अमेरिकेला रोखले होते. तेव्हा पासून ते आतापर्यंत सोविएत संघ/ रशिया हा भारताचा सर्वात जवळचा मित्र आहे. पण १९९१ नंतर भारत सरकार अमेरिकेचे तळवे चाटत आहे. आजदेखील अमेरिकेला पाकची गरज तालिबान बरोबर करार करण्यासाठी आहे. पाकिस्तानची गरज अमेरिकेला भारतापेक्षा जास्त आहे. म्हणून वर वर काही दिसत असले तरी अमेरिका ही पाक बरोबरच राहणार.
दुसरीकडे अमेरिका आणि चीन एकमेकांच्या विरोधात दिसत आहेत. पण पाक बाबतीत ते एकत्र आहेत. येवढेच नव्हे तर अनेक अमेरिकन भांडवलदार चीनला मदत करतात. म्हणून अमेरिका चीनला सांभाळून घेतात. चीनने अमेरिकन धारजिन धोरण राबवण्यासाठी अमेरिका भारताला वापरत आहे. भारत चीनला एकमेका विरुद्ध पेटवायचा आणि चीन वर दबाव आणून आपला फायदा करण्याचा अमेरिकेचा डाव दिसतो. ह्या सर्व आंतरराष्ट्रीय राजकारणाचा भारत शिकार झाला आहे. दुर्दैवाने भारताच्या राजकर्त्यांनी ह्याला योग्य वेळी योग्य कृती न केल्यामुळे भारत एकटा पडत आहे. नेपाळ सारखे हिंदू राष्ट्र देखील भारताला विरोध करत आहे. भारतात अमेरिकेचे अनेक दलाल आहेत. जे अमेरिकेचे काम करत आहेत. सध्या तर पुष्कळ सरकारातील कर्मचारी, राजकीय नेते आणि भांडवलदार अमेरिकेचे काम करतात. पण अमेरिके विरुद्ध कुठलीच बातमी येत नाही. कारण बरीचशी प्रसार माध्यम ही अमेरिकेच्या दबावाखाली आहेत.
अमेरिका नेहमीच भारत विरोधी राहिला आहे. १९५५ पासून अमेरिका भारताला चीन विरुद्ध उभे करायचा प्रयत्न करत आहे. त्यावेळी, मुलिक Intelligence bureau चे प्रमुख होते. हे पंडित नेहरूंचे सुरक्षा सल्लागार होते. हिंदी चीनी भाई भाईचे वातावरण त्याकाळी निर्माण झाले. म्हणूनच अमेरिकेने मुलीक यांना वापरून भारत – चीन मध्ये मुलीक द्वारा संघर्ष पेटवला. राजकीय अपरिपक्वतेमुळे नेहरूंनी भारतीय सैन्याची कुठलीही तयारी नसताना युद्धात लोटले. आमचे अनेक सैनिक मारले गेले अनेक कैदी झाले. चीनने आमचा बराच भाग कब्जा केला. ह्या विध्वंसाचे प्रमुख शिल्पकार मात्र नामानिराळे राहिले. युद्धात यश मिळाल्यावर चीनने आपले सैन्य मागे घेतले. ह्यावरून स्पष्ट झाले की, चीनला पुढे जाऊन भारताशी मैत्री करायची आहे.
पाक LOC वर कायम तणाव राहिला आहे. गोळीबार, दहशतवाद मोठ्या प्रमाणात आहे. पण चीन बद्दल तसे काही झाले नाही. १९६२ नंतर सर्वात मोठी प्राणहानी झाली त्यात २० जवान शहीद झाले. १९७५ नंतर कधीच कोणाचे प्राण गेले नाहीत किंवा गोळीबार हि झाला नाही. आता देखील अत्यंत तणावाच्या परिस्थितीत बंदुकींचा वापर झाला नाही. दोन्ही देशांनी अत्यंत सयंम अनेक वर्ष दाखवला आहे. पण आता हि परिस्थिती बदलली आहे. आता बाहेरील शक्ती चीन भारत संघर्ष पेटवत आहेत व आपण त्याला बळी पडत आहोत. आताच्या संघर्षा नंतर दोन्ही देशात चर्चा झाली व दोन्ही सैन्याने मागे जायचे ठरले. सरसेनापती नरवणे यांनी पण जाहीर केले की, आपण चर्चेतून मार्ग काढू. त्यामुळे शांतता पुन्हा येईल असे वाटले. ह्या सीमेवर कधीच गोळीबार न झाल्यामुळे कधी असे काही होईल हे कुणालाच वाटले नाही. पण झाले उलटेच.
सीमावाद सोडला तर भारत चीन कुठलाच वाद नाही. चीन भारत युद्ध म्हणजे दोन्ही देशांचे अगणित नुकसान आणि गोर्या माणसांचा फायदा. हिच अमेरिकन चाल आपण ओळखली पाहिजे. मिडीयामध्ये लोक डरकाळ्या फोडू लागले. चीनला धडा शिकवण्याची भाषा करू लागले. पाकिस्तानला नष्ट करण्याचे धोरण सोडून चीनला अंगावर घेण्याची काय गरज आहे? दक्षिण चीनी सागरात भारताचे काय काम आहे? तर आता अमेरिका-जपान-भारत एकत्र चीनविरुद्ध महाकाय सैनिकी नाविक सराव करत आहेत. त्यामुळे चीन आपल्याविरुद्ध पाकला आणखी मदत करत आहे. सीमेवर भानगडी निर्माण करत आहे. ह्याचा सर्वात जास्त फायदा पाकला होत आहे. भारताने आपले हित बघावे. ज्या अमेरिकेने सातत्याने भारताला विकलांग करण्याचा प्रयत्न केला त्या अमेरिकेसाठी चीनला अंगावर घेण्याचे काय कारण आहे? फक्त वृतपत्र आणि टि.व्ही वर गर्जून युद्ध जिंकता येत नाही. त्याला रक्त द्यावे लागते. चीन आणि भारत युद्ध म्हणजे दोन्ही राष्ट्रांच प्रचंड नुकसान आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रांनी ज्या सयंमाने आतापर्यंत वागले तसेच वागले पाहिजे. चीनला भारताची प्रचंड गरज आहे आणि भारतालाही चीन विरुद्ध भांडण काढून काही फायदा नाही. भारताने आपल राष्ट्र हित जपून पाकचा खंदा समर्थक अमेरिका आणि चीन मध्ये समान दूरी ठेवून आपला फायदा करून घ्यावा. यातच शहाणपणा आहे.
लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा ९९८७७१४९२९.