मन आणि हृदय जिंका_२३.९.२०२१

जगामध्ये दहशतवाद का वाढला? हा प्रश्न सर्वांनी समजून घेतला पाहिजे. भविष्यामध्ये दहशतवादापासून धोका आणखी वाढणार आहे. आपल्या जवळची व्यक्ती कामासाठी बाहेर गेलेली असताना, ती परत येणार की नाही याची शाश्वती नाही.  गोरगरिब जनतेला एक चांगल्या प्रकारचे जीवन देण्याचे वचन देऊन देश बनतात. पण त्यात देश दुसरेच काहीतरी करतो, त्यातून भ्रष्टाचार गुन्हेगारी वाढते आणि कुणावर तरी दगड मारावा अशी इच्छा लोकांमध्ये प्रकट होते.  याचाच अर्थ समाजाची दिशा ही हिंसाचारकडे वळते. कोणी आंदोलन करतात, कोणी मोर्चे काढतात, कोणी हत्यार घेऊन बंड करतात. जसजशी समाजात, देशात आणि जगात आर्थिक विषमता वाढत जाते तसतसे समाजामध्ये बंड करणारे लोक निर्माण होतात आणि बऱ्याच ठिकाणी त्याचा परिणाम दहशतवाद निर्माण होण्यात होतो.

हिंसाचाराकडे वळणारी सुप्त भावना अनेक प्रकारे प्रकट होते. जसे अमेरिकेत अनेक घटना घडल्या, जिथे विद्यार्थी बंदूक घेऊन शाळेत घुसले आणि आपल्याच मित्रांना मारून टाकले, कोणी विमानात बॉम्ब घेऊन गेले आणि विमानच उद्ध्वस्त केले. त्यात सर्वात खतरनाक म्हणजे आत्मघाती पथक.  त्याचा पहिल्यांदा वापर तामिळ वाघांनी केला. भारतीय सैन्यावर आधी हल्ला झाला.  मग हळू हळू आत्मघाती पथक वाढत गेली.  अलकायदा सारख्या अनेक संघटना निर्माण झाल्या. ज्यांनी युवक निर्माण केले.  जे मर मिटायला तयार होते. एका तामिळ वाघाच्या स्त्रीने स्वतःला बॉम्ब बांधून घेऊन राजीव गांधी यांच्या पाया पडायला गेली आणि स्वतःला उडवले. त्याबरोबर राजीव गांधी आणि अनेक त्यांच्या सहकाऱ्यांचे तुकडेतुकडे झाले. तोच प्रकार जगभर अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे.  पंतप्रधान म्हणतात की ‘हम शक्तीसे पेश आयेंगे | ’ पण ज्याला मरायचं आहे, त्याच्यावर कुठली शक्ती तुम्ही करणार आहात? म्हणून असे विनोद बाजूला ठेवून दहशतवादाचे मूळ उखडून काढल्याशिवाय पुढच्या काळामध्ये कोणीही सुरक्षित आहे असे मला वाटत नाही. २००८ मध्ये कसाब सकट १० दहशतवादी मुंबईत घुसले आणि ३ दिवस मुंबई बंद करून टाकली. त्यांना मारण्यासाठी मानेसरहून एनएसजी कमांडो बोलवावे लागले. पोलीस मुंबईत असताना सुद्धा तुम्ही या १० लोकांना कंट्रोल करू शकला नाही. मग विचार करा भारतात हजार दहशतवादी निर्माण झाले आणि कसाब सारखे प्रशिक्षित केले तर काय होऊ शकते.

अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमध्ये अपयशी का झाले? त्याची अनेक कारणे आहेत. अफगाणिस्तानच्या लोकांना अमेरिकन लोक नको होते आणि हळूहळू मदत करायला आलेले अमेरिकन सैन्य अत्याचारी बनत गेले. लोकांपासून दूर गेले, लोक तिरस्कार करू लागले आणि म्हणून जरी अनेक लोक तालिबानच्या विरोधात होते,  तरीही अमेरिकन सैन्याचा द्वेष निर्माण झाला. २००१ ला न्यूयॉर्कमधील ट्विन टॉवर उद्ध्वस्त केल्यानंतर दहशतवादाविरोधात जगामध्ये लहर पसरली आणि अमेरिकेने जेव्हा अफगाणिस्तानवर हल्ला केला तेव्हा अफगाणिस्तानच्या लोकांनी स्वागत सुद्धा केले. जगाने सुद्धा स्वागत केले.  अमेरिकेच्या शत्रूंनी सुद्धा अमेरिकेला पाठिंबा दिला.  इतका भयानक पक्ष प्रक्षोभ जगात निर्माण झाला आणि थोड्याच काळात अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानवर कब्जा केला. पण कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानवर ताबा ठेवणे हा दुसरा विषय निर्माण झाला. अमेरिकेने ओढून काढून अफगाणिस्तानच्या लोकांना हमीद करझाई यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनवायला लावले व अफगाणिस्तानमध्ये ते सरकार चांगलं चालावे म्हणून प्रचंड पैसा सुद्धा दिला. मग पैसे खाण्याचे सत्र सुरू झाले. अमेरिकेने अनेक कॉन्ट्रॅक्टर अफगाणिस्तानमध्ये पाठवले आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरच्या सहाय्याने अफगाणिस्तानची बांधणी करायचा प्रयत्न सुद्धा झाला. अनेक सुरक्षा कंपन्या सुद्धा अफगाणिस्तानमध्ये गेल्या.  मला वाटतं हजारो कोटी रुपये खर्च करून ७०% पैसे खाल्ले गेले.  त्यामुळे जनता बेजार झाली.  अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये सरकार बनवलं त्याच्या विरोधात प्रचंड प्रक्षोभ निर्माण व्हायला लागला आणि लोक हळूहळू तालिबानकडे जायला लागले. 

दुसरा विषय म्हणजे आम्ही सैन्यात दहशतवादाविरोधात आयुष्यभर लढलो. त्यावेळेला भारतीय सैन्याने तत्व सर्वांमध्ये बिंबवलं की “तुम्ही दहशतवादाविरोधात बंदुकीच्या गोळीने लढू शकत नाही,  लोकांचे हृदय आणि मन जिंकून तुम्ही दहशतवाद संपवू शकता.” जगामध्ये भारतीय सैन्य असे एकमेव सैन्य आहे, ज्याने अनेक भागांमध्ये भारतापासून दूर जाणारी दहशतवादी चळवळ संपवली.  जसे नागालँड, मिझोराम, मणिपूर, पंजाब, आसाम, काश्मिर आपण पाहत आहोत. पण हृदय आणि मन जिंकून आपण दहशतवाद संपवलेला आहे.  भारतीय सैन्याला कमालीचे यश आले आहे.  नाहीतर भारताचे तुकडे तुकडे कधीच झाले असते. काश्मिरमधला दहशतवाद सुद्धा २०१० पर्यंत संपला होता.  तो परत का सुरू झाला याच्यात मी जात नाही. काश्मिरमध्ये दहशतवादी चळवळ ही कधीच धर्मावर आधारित नव्हती आणि पाकिस्तानला बहुतेक लोकांचा कधीच पाठिंबा नव्हता. पण राजकीय चुका जेव्हा होतात, तेव्हा एखादी ठिणगी सुद्धा दहशतवाद पसरू शकते आणि तसेच झाले.  २०१६ पासून येथे हिंदू-मुस्लिम संघर्ष वाढला  आणि त्याचे परिणाम आपण पाहतोय.  राक्षसी ताकदीच्या आधारावर दहशतवाद संपत नाही.  भारतीय सैन्याने दाखवून दिलेले आहे कि, लोकांचे मन आणि हृदय जिंकण्यासाठी, भारतीय सैन्य हल्ला करते त्या त्या वेळेला सामान्य नागरिकाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करते. बरोबर डॉक्टर असतो, तो लगेच सर्व गावकऱ्यांना औषधपाणी करतो. भारतीय सैन्याने अनेक प्रकल्प काश्मिरमध्ये राबवले आहेत. पाण्याचे प्रकल्प असतील, घरबांधणी असेल, शाळा चालवण्याचे विषय असतील.  म्हणूनच काश्मिरमध्ये अनेक लोक भारतीय सैन्याबरोबर आहेत. खोटा प्रचार करून लोक विसरतात. १९४८च्या युद्धामध्ये जेव्हा पाकिस्तानी घुसखोर काश्मिरमध्ये घुसले.  त्यावेळी तिथल्या लोकांनीच भारतीय सैन्याला मदत करून त्यांना पिटाळले.  शेख अब्दुल्ला आणि त्यांची सर्व लोक भारतीय सैन्याबरोबर होते. १९६५च्या युद्धात देखील पाकिस्तानी घुसखोर घुसल्यानंतर काश्मिरचे सर्व लोक भारतीय सैन्याबरोबर उभे राहिले आणि त्यांना हुसकावून लावले.  नम्र विनंती करायची आहे कि दहशतवाद मोडून काढण्यासाठी लोकांची मन जिंका आणि दहशतवाद संपवा.

अमेरिकन सैन्याचे चुकले आहे की, सुरुवातीला लोकांनी त्यांचे स्वागत केले, पण हळूहळू अमेरिकन सैन्याचा अत्याचार सुरु झाला, ते कुणालाही मारू लागले, सामान्य लोकांना तुरुंगात डांबून प्रचंड अत्याचार केले. गावचे गाव उद्ध्वस्त केले आणि म्हणून अमेरिकन सैन्याच्या अत्याचार व मुळात उपजत असलेली प्रत्येक माणसातली राष्ट्रभक्ती व अमेरिकेने लादलेल्या सरकारचा भ्रष्टाचार यामुळे लोक तालिबानकडे परत गेले आणि अमेरिकेसारखा जगातील सर्वात ताकदवान देशाच्या सैन्याला पळता भुई थोडी झाली. अत्यंत लाजिरवाण्या परिस्थितीत अमेरिकेला पलायन करावे लागले.  सर्वांनी लक्षात ठेवावे की रशियासुद्धा अफगाणिस्तान वर ताबा ठेवू शकले नाही.  १० वर्ष तिथे राहिल्यानंतर त्यांनी पलायन केले.  अमेरिका २० वर्ष तिथे ताबा ठेवल्यानंतर त्यांना पलायन कराव लागलं आणि म्हणून लोकांची जी राष्ट्रभक्ती असते, तिला कमी समजू नका.  जेव्हा लोक पेटून उठतात तेव्हा भल्याभल्यांना पलायन करावे लागते.  यातून एकच सिद्ध झालेले आहे की बंदुकीच्या जोरावर तुम्ही कुणावरही ताबा ठेवू शकत नाही.  बंदूक हे एक माध्यम असतं त्याचा वापर करावा लागतो.  शेवटी जर प्रश्न सोडवायचा असेल तर लोकांना जिंकावे लागते.

अमेरिकन पलायनाचे तिसरे कारण मोठे आहे. २००३ ला अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर अमेरिकन सरकार आणखी धाडसी बनले.  ईराककडे नजर वळवली आणि खोटा प्रचार करून ईराककडे अणु हत्यार आहेत आणि ईराक अल-कायदाचा पार्टनर आहे. असे लोकांना पूर्णपणे फसवून विचित्र पाऊल उचलले.  अफगाणिस्तानवर पूर्ण ताबा व्हायच्या आधीच अफगानिस्तानचे सैन्य त्यांनी ईराककडे वळवले आणि म्हणून अमेरिकेला अफगाणिस्तानवर पूर्ण ताबा मिळवता आला नाही आणि हळूहळू तालिबान पुन्हा उभे राहू लागले व ११ जिल्ह्यावर कब्जा करू लागले.  कारण हल्ला करून कब्जा करणे सोपे असते.  पण टिकवणे कठीण असते, त्यासाठी लोकांच्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण कराव्या लागतात. प्रचंड पैसा खर्च करून देखील लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्याच नाहीत. उलट लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया अमेरिकेविरुद्ध सुरू झाल्या आणि शेवटी लोकांनी तालिबानला आपल्या डोक्यावर उचलून नेले व  अफगाणिस्तानला मुक्त केलं.

दहशतवाद संपवण्यामध्ये सर्वात मोठा पराक्रम गृहमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांचा आहे. मला माहिती आहे कि ज्यांना हिंदू-मुस्लिम राजकारण करायचे आहे, त्यांना हे कधीच पटणार नाही. पण शंकरराव चव्हाण गृहमंत्री झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम पंजाब आणि आसाम शांत केले. पाकिस्तान जोरात भारतामध्ये दहशतवाद घडवण्यासाठी सर्व काही करत होता. काश्मिरमधील २५०० दहशतवाद्यांना हत्यार खाली ठेवण्यास लावली. नंतर आम्ही जॉर्ज फर्नांडिस आणि अटल बिहारी वाजपेयी यांना विनंती करून ह्या दहशतवाद्यांना आणि काश्मिरी युवकांना ‘होम अँड हर्थ’ फलटणी निर्माण केल्या.  ८००० काश्मिरी दहशतवादी आणि युवक यांना घेऊन ८ फलटणी बनवल्या आणि २०१० पर्यंत दहशतवाद संपून टाकला.  त्यातील अनेक लोकांना अशोक चक्र व कीर्ती चक्र असे पराक्रमाचे बहुमान मिळाले आहेत.  हे भारतीय सैन्याच्या कर्तव्याचे एक प्रचंड मोठे उदाहरण आहे. आपले १०००० सैनिक दहशतवाद्यांशी लढताना मारले गेले आहेत. म्हणून मी या देशद्रोह्यांना सांगू इच्छितो,  खरी समस्या आर्थिक विषमता आहे.  खरी समस्या रोजगार आहे. या नजरेआड करून तुमची डोकी भडकवली जात आहेत. त्यांना बाजूला करा आणि भारताच्या विकासासाठी काम करा, एवढीच माझी इच्छा.

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा. न. ९९८७७१४९२९

Please follow and like us:

Author: Brigadier SS