शिवरायांच्या पठडी मध्ये निर्माण झालेली माणसं शेवटपर्यंत शिवरायांच्या विचाराशी प्रामाणिक राहिली. विशेषत: संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर स्वराज्यावर अवकळा पसरली. मोठ-मोठे शिलेदार स्वराज्य सोडून औरंगजेबाचा छावणीमध्ये दाखल झाले. पण काही लोक शिवरायांच्या विचारांशी प्रामाणिक राहिले. त्यातील महत्त्वाचे लोक म्हणजे रामचंद्र पंत अमात्य, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, शंकरजी नारायण, खंडो बल्लाळ. हे शिवरायांच्या विचारांशी प्रामाणिक राहिले व स्वराज्याला सावरले. त्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे ती म्हणजे संताजी घोरपडे. त्यांचे साथीदार धनाजी जाधव. या दोघांनीही राजाराम महाराज छत्रपती असताना महाराष्ट्रापासून तामिळनाडु पर्यंत संघर्ष करून स्वराज्य सांभाळले . वेगवेगळ्या ठिकाणी धुमाकूळ घातला. शिवाजी महाराजांचा गनिमी काव्याचा वापर करुन मोगलांना सळो की पळो करुन सोडले व स्वराज्याचा डोलारा सांभाळला.औरंगजेबच्या सैन्यामध्ये दहशत निर्माण केली आणि शेवटपर्यंत औरंगजेबाशी निकराने झुंज दिली आहे. नंतर ताराराणीने औरंगजेबाला महाराष्ट्रात गाढले. ह्यालाच मराठ्यांचे स्वतंत्र युद्ध म्हणतात. आपल्याला छत्रपती शिवरायांच्या बाबतीत बरीचशी माहिती आहे, पण दुर्दैवाने नंतरचा इतिहास हा खास संभाजी महाराज, राजाराम महाराज व ताराराणीला इतिहासाच्या एका कोनाड्यात टाकले. संभाजी महाराजांना तर एकाच वेळी मोगल, आदिलशहा, इंग्रज, सिद्धी आणि गोव्याच्या पोर्तुगीजांशी युद्ध करावे लागले.
त्यातील संताजी बद्दल मी लिहीत आहे. शिवरायांच्या सैन्यामध्ये ते भरती झाले आणि शिवरायांच्या सैन्याच्या शिस्तीमध्ये ते योद्धा म्हणून चमकू लागले. जालन्याच्या युद्धामध्ये अति उत्साहाने शिवरायांनी माघार घ्यायला सांगितले असताना देखील ते लढत राहिले. त्यामुळे सैन्याची प्रचंड हानी झाली. त्यामुळे शिवराय संतापले व त्यांनी संताजींची भेट नाकारली. संताजीचा स्वभावाच मुळातच आक्रमक होता आणि त्यामुळे ते अनेकदा अडचणीत देखील आलेले आहेत. संभाजी महाराजांच्या सैन्यामध्ये एक पराक्रमी योद्धा म्हुणून ते पुढे येऊ लागले. संताजीचे वडील मालोजी घोरपडे हे शिवरायांचे निष्ठावंत सरदार होते. पुढे जाऊन ते संभाजी महाराजांचे सरसेनापती झाले.
अशा परिस्थितीत संगमेश्वर येथे अचानक संभाजी महाराजांना पकडण्यासाठी मुकरब्ब खान यांनी हल्ला केला. त्यावेळी मालोजी घोरपडेनी निकराची झुंज दिली व त्यात ते मारले गेले. संताजी-धनाजी महाराजांपासून वेगळे झाले. मुकरब्ब खानने संभाजी महाराजांना पकडून रातोरात औरंगजेबाकडे नेले. संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येची जखम मराठ्यांच्या हृदयात सलत राहिली व संताजी घोरपडेंनी त्याचा बदला घेण्याचा निर्धार केला. संभाजी महाराज गेल्यानंतर औरंगजेबने रायगडाला वेढा दिला. आणीबाणीची परिस्थिती आली, त्यावेळी राजाराम महाराजांचा राज्यभिषेक करून येसूबाईनी राजाराम महाराजांना जिंजीकडे धाडले.
जिंजी एक अभेद्य किल्ला तमिळनाडू मध्ये आहे. याठिकाणी मला इतिहासाचे पुनर्विलोकन करावे लागेल. ज्यावेळेला शिवरायांनी महाराष्ट्रात स्वराज्याचा लढा सुरू केला, त्याला त्यांचे पिता शहाजी महाराजांचा पूर्ण पाठींबा होता. किंबहुना स्वराज्याचा संकल्प हा शहाजी महाराज आणि जिजामातेचा होता. तो एक वेगळाच इतिहास आहे. आदिलशहाने म्हणूनच शहाजी राजांना महाराष्ट्रापासून लांब बेंगलोर येथे हलवले. परिणामत: दक्षिणेमध्ये शहाजी महाराजांनी आपली पकड घट्ट केली व अनेक राजे राजवाड्यांना आणि नायकांना आपलेसे केले. त्यात संकलेमध्ये जिंजीचा किल्ला आपलासा करण्याचा प्रयत्न केला. पुढे जाऊन राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी दक्षिण द्विग्विजय केला व दक्षिणेत आपला जम बसविला. जिंजीचा किल्ला देखील आपलासा केला. छत्रपती शिवाजी महाराजांची ही दूरदृष्टी आता असामान्यच आहे. त्यांना माहीत होते की औरंगजेब मोठ्या संख्येने महाराष्ट्रात येणार त्यावेळी त्यांना तोंड देण्यासाठी आपले साम्राज्य मोठे पाहिजे आणि लाखोचे औरंगजेबांचे सैन्य तमिळनाडू पर्यंत खेचून जागोजागी त्याला नामोहरण करायचे. याच महा योजनेचा फायदा पुढे जाऊन मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये संभाजी महाराजांपासून ताराराणी पर्यंत सर्वांना झाला.
म्हणूनच संभाजी राजांची क्रूर हत्या झाल्यानंतर येसुबाईंनी राजाराम महाराजांना जिंजीकडे पाठविले. पण जिंजीला पोहचणे सोपे नव्हते. औरंगजेबचे सैन्य सदैव त्यांच्या पाठीमागे होते. त्यात रायगडवर औरंगजेबाचा कब्जा झाला व येसूबाई आणि संभाजी पुत्र शाहू महाराज हे औरंगजेबच्या कैदेत गेले. म्हणून १६९० चा काळ हा स्वराजाच्या अस्तित्वाचा काळ होता. जर का राजाराम महाराज औरंगजेबच्या तावडीत सापडले असते तर स्वराज्य संपले असते. या काळात संताजी, धनाजी आणि त्यांच्या साथीदार मावळ्यांचा शौर्य आणि निर्धार स्वराज्याच्या कामी आला. त्यावेळेस जिंजीच्या वाटेवर राणी चेन्नमा हिने राजाराम महाराजांना आश्रय दिला. त्यावेळी संतापून औरंगजेबने राणी चेन्नमाचे राज्य नष्ट करण्याचा आदेश दिला. औरंगजेबाच्या हल्ल्याला राणी चेन्नमाने प्रतिउत्तर दिले आणि घनघोर लढाई झाली. त्यात संताजी घोरपडेनी औरंगजेबच्या सैन्यावर हल्ला केला आणि चेन्नमाचे सैन्य आणि संताजीच्या सैन्याच्या मध्ये औरंगजेबचे सैन्य भरडल गेल. त्यामुळे औरंगजेबच्या सैन्याचा प्रचंड पराभव झाला. या युद्धाच्या अगोदर संताजीने औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला केला होता. औरंगजेबच्या नशिबाने तो तिथे सापडला नव्हता. संताजीने त्याच्या तंबूचे खांबच कापून आणले. त्यामुळे संताजीच्या शौर्याचा गवगवा पूर्ण स्वराज्यात झाला होता आणि त्याच्या बरोबर लढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मावळे जमा झाले. व बेंदनूरच्या राणी चेन्नमाच्या लढाईने तर संताजी – धंनाजींची किर्ती पूर्ण देशात पसरली.
अशाप्रकारे नवीन प्रकारचे युद्ध मराठ्यांनी सुरू केले. किल्ल्यात बसून लढण्याच्या ऐवजी प्रत्येक किल्ल्यात महाराष्ट्रापासून जिंजीपर्यंत सैन्य ठेवण्यात आले आणि त्या किल्ल्यांच्या बाहेर अत्यंत जलदगतीने धावणारे सैन्य निर्माण करण्यात आले. सुरूवातीला मावळे मोठ्या संख्येने एकत्र होत होते आणि अनेक ठिकाणी मोघलांच्या छोट्या छोट्या टोळींना नष्ट करत होते व परत जलदगतीने सुरक्षित ठिकाणी जात होते. अशाच प्रकारे संताजीने बदला घेण्याची शपथ घेतली होती, त्या संभाजी महाराजांचा मारेकरी मुकरब्ब खान याच्यावरही कोल्हापूर येथे हल्ला केला. आणि मग मुकरब्ब खान आणि त्याच्या मुलाच्या समोर पळून जाण्याचे नाटक केले. आणि मुख्य सैन्य होते तिथपर्यंत पळून गेले मुकरब्ब खान आणि त्यांच्या सैन्याने पाठलाग केला. मग संताजीने उलटून जोरदार हल्ला केला. त्या युद्धामध्ये मुकरब्ब खान जखमी झाला. पण त्यानंतर तो कुठेही दिसला नाही. म्हणून मुकरब्ब खानला मारून संताजीने आपली शपथ पूर्ण केली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संताजी-धनाजींनी युद्ध क्षेत्र महाराष्ट्रातून कर्नाटकात हलवले व महाराष्ट्रापासून जिंजीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या योजनेतले प्रचंड असे युद्ध क्षेत्र निर्माण झाले. त्यात औरंगजेबचा सर्वात बलाढ्य सरदार कासिमखान हा गाफिल असताना त्याचा तळ उद्ध्वस्त केला. पण जेव्हा कासिमखानचे सैन्य संताजीवर चालून आले त्यावेळेला मोघली सैन्यावर तीन ठिकाणी हल्ला करून प्रचंड कत्तल केली. मोगली सैन्य चित्रदूर्गाच्या दोडगेरी किल्ल्यामध्ये आश्रयासाठी घुसले व अन्न-पाण्याविना तडफडू लागले. कासिमखान सुद्धा मारला गेला. असा उत्तुंग विजय संताजीने मिळविला.
संताजीचा खून ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी शोकांतिका आहे. अशा कर्तबगार सेनापतीमध्ये आणि राजाराम महाराजांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि त्यामुळे युद्ध देखील झाले. त्यात संताजीने राजाराम महाराज आणि धनाजी जाधवचा पराभव केला. पण दुसर्या दिवशी हात बांधून राजाराम महाराजांसमोर उभे राहिले आणि माफी मागितली. या मतभेदाची कारणे काय आहेत? हे समजने कठीण आहे. पण हळूहळू संताजीचे सैन्य कमी होत गेले आणि असहाय्य परिस्थितीत ते सातारा येथील महादेवाच्या डोंगरामध्ये गेले, तिथे नागोजी मानेने संताजीचा शिरच्छेद केला व संताजीचे शिर बादशहा औरंगजेबकडे पाठविले. अशा एका शूर सेनांनीचा शेवट झाला. पण संताजी-धनाजीमुळे निष्ठेची परीक्षा झाली. तो महाराष्ट्र अबादीत राहिला. या शूर सेनांनीला माझा सेल्युट.
लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा ९९८७७१४९२९.