माझा राजकीय प्रवास सैन्यातून दलदलीत (भाग २)

माझा राजकीय प्रवास पूर्ण व्हायचा आहे. कारण राजकारणी लोक कधीच निवृत्त होत नाहीत, ते काळाच्या आड आपोआप लुप्त होतात. मरायला टेकलेला माणूस सत्तेत आला की टवटवीत होतो. जसे मी नरसिंह राव बघितले. एरवी राजकारण सोडलेला माणूस राजीव गांधीच्या हत्येनंतर पंतप्रधान झाला.  भारताच्या इतिहासातील हे एक गूढ आहे.  राजीव गांधींचे मारेकरी जरी लिट्टे (तामिळवाघ) असले, तरी त्यांना सुपारी कुणी दिली? ह्याचा शहानिशा कधीच झाला नाही.  चौकशी झाली त्या चौकशीला मी सतत जात असे पण नरसिंह रावने ती चौकशी दाबून टाकली. मी तर त्यावेळेस स्पष्ट म्हटले होते की, राजीव गांधींचे मारेकरीही नरसिंह राव मंत्रिमंडळात काम करत आहेत.  म्हणूनच सत्य हे कथा कांदंबर्‍यापेक्षा ही अद्भुत असते.  ह्या एका कारणावरून काँग्रेस पक्ष फुटला होता.  २००४ ला काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर मी राजीव गांधींच्या खर्‍या मारेकर्‍यांना बाहेर काढा, ही मागणी सातत्याने करत होतो.  पण नरसिंह राव प्रमाणेच मनमोहन सिंघनेही ही बाब दाबून टाकली.  इंदिरा गांधी, राजीव गांधी ह्यांना मारण्यात परदेशी शक्तीचा मुख्य हात होता.  त्यांचा राजीव गांधीच्या हत्येमुळे प्रचंड फायदा झाला.  कारण इंदिरा गांधी, राजीव गांधींच धोरण उलटून खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण अर्थात अमेरिकन भांडवलशाही ह्या देशात आली.

मी अचानक राजकारणात गुप्तहेर खात्यातून आलो, खासदार झालो.  दिल्लीला आलो, देशात सर्वात पहिला निकाल माझा लागला, मी मधू दंडवतेना पाडले म्हणून मला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.  १९५२ नंतर राजापूर मतदार संघातून काँग्रेस कधीच निवडून आली नव्हती.  त्यात मी नवखा उमेदवार होतो, मी उमेदवार कसा झालो? हा एक राजकीय अभ्यासाचा विषय आहे. मला राजीव गांधींच्या मित्राने खासदार प्रतापराव भोसलेकडे जाण्यास सांगितले, मला  तिकीट देण्याविषयी पक्षस्तरावर पुढाकार खासदार प्रतापराव भोंसलेनी घेतला. मला निवडणुकीत उभे करायचे ठरले. पण सैन्याचा राजीनामा देण्याचा मोठा प्रश्न होता. अर्ज करायची शेवटची तारीख २६ एप्रिल १९९१ होती.  १४ एप्रिलला राजीनाम्याचा निर्णय झाला. एवढ्या लवकर मला सैन्याने सोडणे शक्य नव्हते.  राजीव गांधींनी ही कामगिरी फोतेदारना दिली.  ते मला रात्री १ वाजता बिहारचे उद्योगपती खासदार महेंद्र सिंगकडे घेऊन गेले.  त्यांनी मला संरक्षण राज्यमंत्री दिग्विजय सिंगकडे नेले.  तो पर्यंत रात्रीचे २ वाजले होते.  त्यांनी राजीनामा मंजूर करून देण्याचे मान्य केले.  दुसरे दिवशी सकाळी मी माझा राजीनामा माझें वरिष्ठ कर्नल मल्होत्राना दिला. १६ एप्रिलला २ दिवसात तो मंजूर होऊन आला. सारे सैन्यदल अवाक झाले की २ दिवसात राजीनामा कसा मिळाला?

असो, तेथून राजकीय चक्र फिरू लागले.मला ही बातमी गुप्त ठेवायला सांगितली होती. मी चुकून ती कलमाडीना सांगितली आणि सगळे आभाळ फाटले.  शरद पवारांनी कोकणातले सर्व नेते दिल्लीत उतरवले.  मी दंडवतेचा हस्तक आहे असा प्रचार जोरात केला.  शेवटी  शरद पवारांच्या गटातील साळवे साहेबांच्या घरी पवार साहेबांसोबत बैठक ठरली. १९८९ च्या लोकसभा निकडणुकीनंतर, शरद पवारांसोबत माझी बैठक झाली होती, त्यात पवारसाहेबांनी मला पुढच्या निवडणुकीत म्हणजे १९९४ च्या निवडणुकीत  उभे राहण्याबद्दल पूर्ण मार्गदर्शन केले होते.   पुढील निवडणुकीत मी उभे रहायचे  जवळजवळ ठरले होते.  अविश्वास दाखवायचे मला काहीच कारण नव्हते.  माझे वडील ३ वेळा शेकापचे आमदार होते.  १९८० ला शरद पवार काँग्रेसमध्ये गेले. पण माझे वडील गेले नाहीत.  उलट V.P.Singh यांनी त्यांना जनता दलाचे तिकीट दिले.  त्याला दंडवतेंचाच विरोध होता. म्हणून अनेक जनता दलच्या लोकांनी माझ्या वडिलांविरुद्ध काम करून नारायण राणेना मदत केली, तसेच काँग्रेसच्या एका गटाने देखील नारायण राणेना मदत केली.  नारायण राणे शिवसेनेचे उमेदवार ह्यांना दोन्हीकडून मदत मिळाली.  थोडक्या मतांनी माझे वडील पराभूत झाले.  १९८९ च्या निवडणुकीत शिवसेनेने दंडवतेना मदत केली होती हे सुद्धा एक कारण होतेच. १९८९ हे निर्णायक वर्ष ठरले. एरवी शब्दांचा भडिमार करून लढणारे कोकणी माणूस मुंबईची पार्सल आल्यावर तलवारींने आणि चॉपरने लढू लागला.  त्यामुळे आमचे अत्यंत लोकप्रिय नेता श्रीधर नाईकांची हत्या झाली.  ते ही केवळ निवडणुकीत विरोध केल्यामुळे.

ह्या पार्श्वभूमीवर शरद पवारांबरोबर बैठक झाली.  पवार साहेबांनी विचारले तुझ्याकडे पैसे किती आहेत? मी म्हटले मी सैनिक आहे.  माझ्याकडे पैसे कुठून असणार.  मग निवडणुकीत कसा उभा राहतो.  त्यावर मी म्हटले, तुम्हीच तर मला संगितले होते.  ते म्हणाले, हो मी सैनीकाचे काम करायला सांगितले होते, तुमच्या उमेदवारीबाबत गहन विचार करावा लागेल.   त्या दिवसापासून पवारसाहेब माझे तिकीट कापण्यासाठी जंगजंग पछाडले.  ते प्रकरण उमेदवार निवड समितीमध्ये गेले.  पवार साहेबांनी प्रचंड विरोध केला.  त्यांच्या ह्या पावित्र्याकडे बघून मला एन.डी.पाटीलांची आठवण झाली.  ह्या घटनेच्या आधी माझ्या सैनिकी निवासस्थानात एन.डी.पाटील आणि माईना मी जेवायला बोलावले होते.  त्यावेळी त्यांनी मला स्पष्ट बजावले होते की, जोपर्यंत राजीव गांधी तुम्हाला स्वत: सांगत नाहीत, तोपर्यंत तू कुणावरही विश्वास ठेऊ नकोस.  राजीव गांधी प्रचंड विरोध पाहता डळमळीत होऊ लागले.  त्यावेळेस कै. शंकरराव चव्हाण त्यांच्याकडे गेले व त्यांना सांगितले की, एका तरुण मुलाला तुम्ही सैन्यातून राजीनामा द्यायला सांगितला, तुमच्या शब्दावर विश्वास ठेऊन त्याने राजीनामा दिला आहे.  आजपर्यंत राजापूर मतदार संघातून काँग्रेस मधून कुणीच निवडून आले नाही.  तर त्याला पडण्यासाठी तरी तिकीट द्या.  राजीव गांधींनी मला लगेच बोलावलं.  ते म्हणाले की तू निवडून येशील अस मला वाटत नाही.  मग पडल्यावर काय करणार?  मी म्हटले की मी वकिली करेन, काहीही करेन तुमच्या बरोबर निष्ठेने राहीन.  माझ तिकीट जाहीर करण्यात आले व मी राजापूर मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी उतरलो.

गोव्याच्या विमानतळावरून मी सिंधुदुर्गाच्या दिशेने गेलो तर महाराष्ट्राच्या सीमेवर तरुणांचा प्रचंड मोठा जमाव दिसला, त्यांनी माझे अति उत्साहाने स्वागत केले ही सारी श्रीधर नाईकची फौज होती.  कारण ते युवा काँग्रेसचे अध्यक्ष होते.  पुढे सावंतवाडीला आलो, तेव्हा मी माझे पहिले राजकीय भाषण दिले.  त्यात मी जातीयवादी शक्तींना उखडून काढण्याची शपथ घेतली.  ती बाब प्रचंड प्रसिद्ध झाली व पहिल्यांदाच राजापूर मतदार संघाचा तरुण पेटून उठला  आणि मी काहीही नकरता प्रचंड प्रमाणात तरुण काँग्रेसमध्ये आले.  माझ्या निवडणुकीबाबत काँग्रेसपक्षाची बैठक झाली.  त्यात अनेक जेष्ठ नेते होते.  सर्वांनी विचारले किती पैसे आहेत? तोपर्यंत माझ्याकडे ३०००० रुपये जमा झाले होते.  सर्व जेष्ठ काँग्रेस नेत्यांनी म्हटले की पैसे नाहीत तर कशी काय निवडणूक लढवणार? मी म्हटले मला माहीत नाही. मी राजकारणात नविन आहे.  आपण लोकांकडून गोळा करू.  सर्व हसले.  काँग्रेस सत्ताधारी पक्ष असताना लोकांकडून पैसे गोळा करायची कल्पनाच अस्वस्थ वाटली.  माझ्याकडे प्रचारासाठी गाडी सुध्दा नव्हती.  पण एका दिवसामध्ये श्रीधर नाईकने गाडी तयार केली.  त्या गाडीत स्पिकर लावले आणि जिथे लोक दिसतील तेथे गाडी थांबवून माझा परिचय द्यायचा आणि मत मागायचो, बरोबर पैसे पण मागायचो.  लोकांनी कमाल केली ५ – १० रुपये गोळा होऊ लागले आणि त्या निवडणुकीत लोकांनी जवळजवळ ७ लाख रुपये दिले.  पक्षाने ५ लाख रुपये दिले आणि १२ लाख रुपयात मी लोकसभेमध्ये निवडून आलो.  समोर भारताचे अर्थमंत्री प्रा.मधु दंडवते एक आदरणीय व्यक्तिमत्व होत, त्याचबरोबर वामनराव महाडिक हे शिवसेनेचे पहिले आमदार आणि जेष्ठ नेते, यात मी नवखा सैनिक निवडून कसा आलो, याची चर्चा अनेकदा आज देखील होते.  पण मला लोकांनी स्विकारले आणि मोठे केले त्याच्याबरोबर मी नेहमीच प्रामाणिक राहिलो.  देश आणि जनतेसाठी मी माझ्यापरीने प्रचंड संघर्ष केला आहे व करत राहणार आहे.  शेवटी जी जनता तुमच्या पाठीशी उभी राहते तिला न्याय मिळवून देणे हे माझं कर्त्यव्य आहे.

 

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाइट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

Please follow and like us:

Author: Brigadier SS