मीच रणरागिणी

मीच रणरागिणी

“फडणवीस तुझ्या मुलीवर, बायकोवर, बहिणीवर कोपर्डी सारखा जुलूम झाला असता तर तुम्हाला कस वाटल असत”. गरजल्या त्या २० मुली आणि हादरली ती मुंबई. ५७ मोर्चे निघाले मुंबईमध्ये.  ५८ वा मूक मोर्चा निघतो तेव्हा मुंबई बंद होते. सरकार विरोधातील भावनेचा उद्रेक होतो. २० मुलींनी मुंबई गाजवली. मराठा क्रांती मोर्चाबद्दल कुणाचे काही मत असो, पण २० मुलींनी ताराराणीच्या आवेशात मंबई हादरून टाकली. कुठल्याही पोक्त राजकीय नेत्याला लाजवेल अशा पद्धतीने त्या मुलींनी सरकारची लक्तरे गेट वे ऑफ इंडियावर लटकावली. अत्याचाराचा असंतोष भडकला. कुणाला वाटेल की, मुलींनी फक्त मराठा समजावरच जोर दिला. पण तसे नसून एकंदरीत महाराष्ट्रातील आर्थिक, सामाजिक आणि राजकीय वास्तवतेला त्यांनी आव्हान उपस्थित केले.

मुख्यमंत्र्यांवरील रोक-ठोक हल्ल्याच्या पाठीमागे महाराष्ट्रातल्या सर्व मुलींच्या, मातांच्या वेदना प्रकट होत होत्या. फक्त कोपर्डीतल्या  नराधमाना फाशी द्या एवढाच आशय नसून; समाजातील कुठल्याही जातीच्या महिलांवर अशा प्रकारचा प्रसंग येऊ नये. सर्व महिलांना महाराष्ट्रात मुक्त व निर्भयपणे वावरता यावे. टिंगल-टवाळीपासून ही तुमची मुलगी मुक्त नाही असे मुख्य मंत्र्यांपासून सर्वाना मुलीनी सुनावले.   तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहात म्हणून स्त्रियांचे संरक्षण करणे हे तुमच प्रथम काम आहे ते काम तुम्ही करू शकत नाहीत. पोलीस जसा यवतमाळसारख्या ठिकाणी जिल्हा पोलिस अधिक्षक गुंडाविरोधात तक्रार करण्याऱ्या मुलींनाच धमकावतो.  ते गुंड भाजपचे असल्यामुळे तूम्ही गुंडांना संरक्षण देता. म्हणून फडणवीससाहेब तुम्ही मुख्यमंत्री व्हायला लायक नाही. हीच सर्वात संतापाची बाब आहे, पण दोष फक्त फडणवीसांवर टाकून चालणार नाही.  ते तर आता मुख्यमंत्री आहेत पण कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते हेच जास्त गुन्हेगार आहेत. गुन्हेगारी आणि तिही संघटीत गुन्हेगारी यामुळेच गुन्हेगारी मानसिकता वाढली. ह्यांचे अनेक कार्यकर्ते गुन्हेगार आहेत. गुंडाविरुद्ध मोहीम घेणारे सुधाकर नाईक यांच्यावर आजच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हल्ला केला.  मुंबईत दंगल घडवून सुधाकर नाईक यांना काढून टाकले आणि गुंडाराज स्थापन केले. याचा मी प्रमुख साक्षीदार आहे. भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी हा तुमचा पेशा, तुम्ही कुठल्या तोंडाने सरकारला दोष देताय, तुम्ही गुन्हेगारीचा पाया रोवला. चारित्र्य संपन्न राजकीय लोकांच्या थडग्यांवर गुन्हेगारांना कवटाळून तुम्ही राज्य केले.  आता तुमचीच परंपरा भाजप-शिवसेना चालवते तर तुम्ही कुठल्या तोंडाने त्यांना विरोध करताय?

शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांची केविलवाणी स्थिती आहे. रांजाच्या पाटलाचे हाथ शिवरायांनी कलम केले, जर का जिजाऊच्या नातीच्या वाटेला जाल तर तलवारी झळकतील, असा इशारा मुलीने दिला आणि हेच झाले पाहिजे. आजच्या मुली जिजाऊ, ताराराणी झाल्या पाहिजेत आणि प्रथमतः महाराष्ट्रातील नराधमानचा चौरंग केला पाहिजे, हा निर्धार मुलीने व्यक्त केला. यासाठी प्रत्येक तालुक्यात ताराराणी टास्क फोर्स निर्माण करण्याचा वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद (vbvp) ने ६ ऑगस्टला यवतमाळ येथे जाहीर केले. तसेच ज्या महिलांना निर्भयपणे आणि सन्मानाने जगावे असे वाटते, त्यांनी प्रत्येक तालुक्यात ताराराणी टास्क फोर्स निर्माण करावी. सरकार षंड आहे ते काहीच करणार नाही. फक्त कायद्यावर बोट ठेवणार आणि आमच्या  लेकी सुना रडत राहणार. पोलिस समाजाला मुर्ख बनवत आहेत.  कारण आत्म संरक्षण या घटनात्मक कायद्याखाली कुणीही स्वत:ची आणि दुसऱ्याची सुरक्षा करू शकतो. वेळ पडल्यास असे करत असताना गुन्हेगाराला मारू शकतो. मग पोलीस कारवाई का करत नाहीत. असे करणे हे घटनेप्रमाणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे व प्रत्येकाला अधिकार देखील आहे. त्यामुळे कुणाचीही वाट न बघता महिला सुरक्षेचा सामुहिक संकल्प घेऊन आपण आपली सुरक्षा करू.

शिवरायांनी जमीनदारी नष्ट करून शेतकऱ्यांना जमीन दिली त्याच महाराष्ट्रात लोकशाहीच्या पडद्या आड अनेक नवीन जमीनदार झाले. शेतकऱ्यांच्या जमिनी देखील हडप केल्या.  त्यांना शेतमजूर केले. कृषी शिक्षण आणि संशोधन विकृत करून खत आणि कीटकनाशकांच्या उद्योगांना मालामाल केले. जास्त खत वापरा. कीटकनाशक वापरा. अनेक होर्मोणल रसायने वापर. याने शेती करणे महाग झाले. कर्ज भरमसाट घ्यावे लागले. त्याला तेवढे उत्पन्न नाही. मग आत्महत्येशिवाय पर्याय नाही. म्हणून शेती स्वस्त केली पाहिजे. त्यासाठी रासायनिक खत आणि कीटकनाशकांवर बहिष्कार घाला. पाळेकर गुरुजींचे शास्त्र वापरा. मोर्चात अनेक आत्महत्या केलेल्या लोकांची मुले आली होती. आमची चूक काय असे म्हणतात. शरद पवारसाहेब, उत्तर द्या. तुम्ही तर मोदिसाहेबांचे भागीदारच आहात. उत्तर कुणीच देणार नाहीत.  शेतीसाठी सावकार/बँकाकडून उचलेले कर्ज आमच्या वडलांना फेडता आले नाही. बाबाने गळ्यात फास घालून घेतला अन आयुष्य संपवले. आता मागे राहिलेल्या आम्हा शेतकऱ्यांच्या मुलांना तरी सरकार न्याय मिळून देणार आहे? ‘नाही’ असा आवाज मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्याच्या मुलांनी केला.  ४ ते ११ वर्षाची आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुले सहभागी झाली होती. मराठा समाजात जन्म घेतला म्हणून गुन्हा केला काय? असा थेट सवालच या मुलांनी केला. सांगितले वडील शेती करत होते, जमीन कसत होते पण जमीन तितकीशी कसदार नव्हती आणि पावसाने ही दडी मारली. आशिषच्या वडिलांना पोरांची खापाशीला गेलेली पोट दिसत होती. सावकार रोज पैशासाठी तगादा  लावत होता. अखेर हताश होऊन त्यांनी आयुष्य संपवले. आशिष सारख्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी त्यांच्या व्यथा सांगितल्या. त्रिंबकेश्वर येथिल आधार निधी आश्रमात ही मुले राहत आहेत. पुरुष गेला की काय हाल होतात आणि मागे राहिलेल्या मुलांचे भविष्य अंधकारमय होते. हे जाणण्याची तसद्दी सरकार घेत नाही. शेतकऱ्यांच्या मुलांना आर्थिक मदत देण्याची जबाबदारी कुणाची? असा सवाल विदर्भातून आलेल्या समृद्धी पाटील या मुलीने केला.

राजकीय पक्ष जे अंबानी आणि अडाणीचे गुलाम आहेत ते फक्त कारखानदारांनाच मालामाल करत आहेत व शेतकऱ्याला भिकेकंगाल करत आहेत. हा शेतकऱ्याचा आक्रोश प्रत्येक मुलीच्या गर्जनेतून प्रकट होत होता. म्हणूनच त्या गरजल्या. आमदार खासादारानो तुम्ही काय करत आहात? तुमच्या गाड्या बंगले कुणाच्या पैश्यावर उभारले. ते काहीच करणार नाहीत. कारण हे गुलाम आहेत पक्षांच्या मालकांचे. राजकीय पक्षांना बाजुला काढल्यामुळे मोर्चे यशस्वी झाले. तरी काहीं नेत्यांचे चमचे; त्यांच्या नेत्यांना मोर्चात आणण्यासाठी फार आग्रही होते. हे मोर्चात घुसलेले चमचेच मोर्चाचा घात करत आहेत.   मोर्चाचे खरे आयोजक बाजुलाच पडले. अनेक चमचे घुसले. सरकारची चमचेगिरी करू पाहत होते. तेथून आमदारकी किंवा सरकारी तुकडा  मिळवण्याची मारामारी मला दिसली. ह्या दलालाना गाडले पाहजे.

मुलीनी मांडलेले अनेक विषय हे सर्व समाजाचेच आहेत. आरक्षण हा विषय मात्र मराठा समाजाला महत्वाचा वाटतो. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले असते तर आरक्षणाची मागणी वाढली नसती. पण ग्रामीण अर्थव्यवस्था  कॉंग्रेस/ भाजप/ राष्ट्रवादी/ शिवसेना ह्या पक्षांनी उद्ध्वस्त केली. कारण सर्व नेते शहरी आहेत. त्यांना ग्रामीण भारताशी काही घेणे देणे नाही. त्यामुळे शिक्षणात आणि नोकरीत आरक्षणाची मागणी वाढली. ती दिली पाहिजे. कारण ३०% मराठा समाजाला आता आरक्षण मिळत आहे पण इतरांना नाही.  ते इतरांना त्रास देवून नाही. आता मोदी काही करू शकतात मग आरक्षण का नाही. ते ही केंद्र शासनात मिळाले पाहिजे. कॉंग्रेस राष्ट्रवादी सरकारने १५ वर्ष सत्तेवर राहून आरक्षण दिले नाही. निवडणूक जिंकण्यासाठी. विधानसभेत कायदा न करता आरक्षण जाहीर केले. म्हणूनच लोकांनी त्यांना पाडले. मुली पुढे  बोलल्या “आम्ही दुसऱ्यांना आरक्षण मिळवून दिले. मग इतर समाजाने सुध्दा आम्हाला पाठींबा दिला पाहिजे. समता प्रस्थापित झाली पाहिजे.” हीच त्यांची मागणी होती. सर्व समाजात गर्भ श्रीमंत लोक आहेत. ती मराठा समाजात देखील आहेत. त्यांना न देता शेतकऱ्यांना दिलीच पाहिजे अशी मागणी प्रकट केली.

एक निश्चित आहे मुलीने अत्यंत संयमाने मांडणी केली.  अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर बंद झाला पाहिजे अशी मागणी केली.  कायदा रद्द करावा असे कुणीच बोलले नाही. म्हणून सामाजिक तणाव कुणी निर्माण करू नये. हा प्रश्न चर्चेने सर्व समाजाने एकत्र बसून सोडवला पाहिजे.  अशा महामोर्चातून शांततेचा आणि सामाजिक ऐक्याचाच संदेश मुलीनी दिला.  म्हणून पुढील संघर्षात सर्व समाजानी एकसंघपणे आपल्या मागण्या मांडल्या पाहिजेत. सामाजिक ऐक्य हे राष्ट्रीय सुरक्षेला सर्वात महत्वाचे आहे. म्हणून सर्व समाजाने एकत्र येणे ही काळाची गरज आहे. चमचे, दलाल हे नेतृत्वाच्या शर्यतीत असतात. त्यांना या मोर्चातून तडीपार केले पाहिजे. काहीं लोक हार्दिक पटेल बनायला बघत आहेत. त्यांना ठेचा. राजकीय पक्ष फोडा आणि राज्य करा ही भुमिका घेत आहेत. त्यांना सुध्दा बाजूला करा आणि सामाजिक समतोल निर्माण करून व्यवस्थेला गुढग्यावर आणा. त्यातच आपले भविष्य आहे.

लेखक :  ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा. नं.   ९९८७७१४९२९

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS