मोदींचे बाबासाहेब प्रेम – फोकनाड 3

मोदींचे बाबासाहेब प्रेम – फोकनाड ३

“बाबासाहेबांनी  आधुनिक भारताचा पाया रोवला. सामाजिक, आर्थिक व वैज्ञानिक दृष्टीकोन  दिला. समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न केला. बदलाची भावना सोडून समता, बंधुत्व रुजवण्याचा प्रयत्न केला.” असे मोदी म्हणतात. हा २०१७ च्या  शतकातील सर्वात मोठा विनोद आहे. अर्थात गोबेल्सच्या कार्य पद्धतीप्रमाणे एक गोष्ट शंभरदा म्हटली तर खोट्याचे सत्यात रुपांतर होते. मोदी या रणनीतीचे गाडे अभ्यासक आहेत. आता बाबासाहेबांच्या नावाने मोठे केंद्र दिल्लीत बनवण्यात येत आहे. याला समरसता म्हणतात. आपल्या शत्रूना आधी विरोध करायचा असतो, तरी तो मोठा झाला तर त्याला बरोबर घ्यायचे असते, नंतर आपलाच असल्याचे भासवायचे असते. जसे सरदार पटेलनी  RSS वर बंदी घातली. आता हेच लोक सरदार आपले असण्याचे भासवत आहेत.

ब्राह्मणांनी कुठलाही गुन्हा केला तर त्याला मृत्युदंड दिला जाऊ नये हा मनुस्मृतीचा कायदा आहे. ज्यावेळी अफझल खानचा शिवरायांनी कोथळा काढला; त्यावेळी अफझल खानचे वकिल कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्यांनी महाराजावर हल्ला केला. तू ब्राह्मण आहेस म्हणून कोण मुलाहिजा करतो म्हणत शिवरायांनी त्याचे मुंडके उडवले. या बाबीमुळे शिवरायांना  प्रचंड विरोध झाला. पुजाऱ्यांनी ठरवले कि शिवराय शुद्र आहेत म्हणून त्यांचा राज्याभिषेक होऊ शकत नाही. शिवरायांनी मग गागाभटाला काशीहून आणून राज्याभिषेक केला.  शिवरायांचा पूर्ण खोटा इतिहास सांगून मुसलमानांना टार्गेट करतात. हे विसरतात कि, सरदारांनी आणि पुजाऱ्यांनीच  शिवरायांना विरोध केला होता. दुसरीकडे १८ पगड जातींनी, शोषित समाजानी, हजारो मुसलमानांनी शिवरायांची भक्ती केली. संभाजी महाराजानी तर भिंतीत चिरून ब्रम्हहत्या अनेकदा केली, म्हणून त्यांना बदनाम करण्यात आले आणि आता म्हणतात कि धर्मराज संभाजी. ‘जो आवडे सर्वाना, तोची आवडे देवाला’ या तत्वावर शिवरायांनी, संभाजी महाराजांनी, बाबासाहेबानी कृतीतून आपले स्थान निर्माण केले. म्हणूनच लाखो लोक त्यांना अभिवादन करतात. आजदेखील भारतीय सैन्याची परंपरा हिच आहे. हजारो मुस्लिम सैनिक भारतासाठी लढत आहेत. मी स्वत: ८००० मुस्लिम सैनिकांचे सैन्य काश्मिरमध्ये निर्माण केले. काश्मिरातील दहशतवाद आम्ही २००३ पासुन २०१० पर्यंत संपवून टाकला. पण भाजपने मुफ्ती बरोबर भागीदारी करून काश्मिरला पुन्हा पेटवले. कारण अमेरीकेसकट, भाजप/कॉंग्रेसला दहशतवाद पाहिजे. तरच धार्मिक द्वेष भावना भडकावता येते आणि खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण (खाउजा) धोरण राबवता येते.

ईस्ट इंडिया कंपनी  व्यापार करण्यासाठी भारतात आली. त्यांचाशी लढणाऱ्या टिपू सुलतान विरोधात त्यांनी हैदराबादचे  निजाम आणि पेशव्यांना उभे केले. नंतर टिपू, निजाम आणि पेशव्यांना इंग्रजांनी नष्ट केले. त्याचप्रमाणे आज, सापनाथ कॉंग्रेसचा FDI आणि नागनाथ भाजपचा मेक इन इंडिया असे व्यापारी हत्यार तयार केले आणि मॉन्सेन्टो सारख्या महाकाय बहुराष्ट्रीय उद्योग समूहांना भारत विकण्याचा धंदा जोमाने सुरु केला. भांडवलशाही तत्वज्ञानाला समतेचा मुखवटा परिधान करण्यासाठी RSS ने बाबासाहेबांचा गौरव सुरु केला.  बाबासाहेबांचे कौतुक करतील, स्मारक पुतळे बांधतील व बाबासाहेबांचे विचार गाडून टाकतील. मोदीच म्हणतात, “सरकारचा धंदा म्हणजे धंदा करणे नव्हे.” म्हणजे सर्व सरकारी उद्योगाचे खाजगीकरण करा. आता हे लोक १३०० शाळा बंद करत आहेत. दुसरीकडे, बाबासाहेब सांगतात मोठ्या उद्योगाचे राष्ट्रीयीकरण करा. मग तुम्ही बाबासाहेबांचे नाव का घेता? सापनाथ कॉंग्रेसवाले त्यांचा दुसरा भाग आहेत. सर्वात जास्त बाबासाहेबांशी दगाबाजी मनमोहन सिंघने केली. १९९१ ला खाउजा  धोरण आणून बाबासाहेबांचा विचार नष्ट करण्याची सुरुवात केली.

१९९१ ला मी कॉंग्रेसचा खासदार झालो. राजीव गांधीना मारण्यात आले. कारण ते अमेरिकेचे कट्टर विरोधक होते आणि तंत्रज्ञानात भारताला स्वावलंबी बनवण्याचा विडा त्यांनी उचलला होता. नरसिंहराव/ मनमोहन सिंघ यांनी खाउजा धोरण आणले. त्याला मीच काय पण ७५% कॉंग्रेस खासदारांनी विरोध केला. म्हणून बाबरी मस्जिद नरसिंहरावनी पाडली. हिंदू-मुस्लिम नरसंहार केला. जनतेचे लक्ष धार्मिक युद्धाकडे वळवले आणि भारताला अमेरिकन गुलामगिरीकडे वळवले. सर्व अमेरिकेच्या आदेशाप्रमाणे काम सुरु केले. भारताचे सार्वभौमत्व संपवून टाकले. RSS चा शत्रू मुसलमान कधीच नाही. मुसलमानाला टार्गेट केले कि जातीमध्ये विभागलेला  हिंदू एकसंघ होतो आणि हिंदू निर्माण झाल्यावर त्याचा प्रमुख ब्राह्मण होतो. हा केवळ वर्ण वर्चस्वाचा खेळ आहे. मनुस्मृती जाळण्याचे काम बाबासाहेबांनी केले. त्याच  RSS चा  नेता मोदीसाहेब अचानक बाबासाहेबांचा शिष्य कसा होतो?

एकीकडे हिंदुत्व म्हणायचे आणि दुसरीकडे बाबासाहेबांवर स्तुती सुमने गायची. हिंदू शेतकरी आणि कामगारांना आत्महत्या करायला भाग पाडायचे. बाबासाहेबांची प्रेरणा घेवून मोदीने गाय बैलाचे राजकारण सुरु केले का? एका सैनिकाच्या वडीलांचा खून केला. हेच बाबासाहेबांचे तत्वज्ञान आहे का? बाबासाहेबांनी मोठ्या उद्योगांचे राष्ट्रीयकरण करायला सांगितले. इकडे मोदीसाहेब तुम्ही म्हणता खाजगीकरण करा. सरळ सरळ बाबासाहेबाच्या विचाराना तुम्ही विरोध करता. अर्थात हे कॉंग्रेसचे अर्थकारण तुम्ही आणखी जोमाने लागू करत आहात.  बाबासाहेबांचे नाव घ्यायचे आणि अंबानी-अडाणीला प्रचंड श्रीमंत बनवायचे. हा धंदा सुरु आहे आणि हे सापनाथ आणि नागनाथ हिंदुत्वाच्या नावावर अमेरिकन पुंजीवादी अजेंडा अंमलात आणत आहेत. BT कापसाचे उदाहरण घ्या. शरद पवारनी BT कापसाचा प्रसार केला. आता किड लागली. मॉन्सेन्टोने हमी दिली होती कि BT कापसामुळे किड लागणार नाही. देशभर किड लागली. मग मॉन्सेन्टोच्या मालकाला तुरुंगात टाकायला नको का ? त्यांना लाथ मारून हाकलून दिले पाहिजे. जसे ट्रम्प म्हणतो अमेरिका पहिला. मोदिसाहेब तुम्ही कधी म्हणणार भारत पहिला? हाच तुमचा राष्ट्रवाद आहे का?

बाबासाहेबांनी OBC ना आरक्षण द्या असा ठराव केला. त्यावेळी OBC मध्ये मराठा समाज सुद्धा होता. बाबासाहेबांनी मराठ्यांसाठी  आरक्षण मागितले. पण आता हे लोक OBC, SC, मराठा ह्यांच्यामध्ये फुट पाडून राज्य करत आहेत. समाजाला एकसंघ करण्याचे, जातीचा अंत करण्याच्या बाबासाहेबांच्या उदिष्ठासाठी मोदिसाहेब, राहुल गांधी आणि शरद पवार कुठपर्यंत आपण काम करत आहात? कॉंग्रेस  हिंदूंची  भिती दाखवून मुसलमानांची व अनुसूचित जातींची वोट बँक बनवते व राज्य करते. भाजप मुसलमानांची भिती दाखवून हिंदुची मत घेते. शेवटी दोघे मिळून मॉन्सेन्टो, कोकाकोला, अंबानी-अदानीला अतिश्रीमंत करतात. नवीन ईस्ट इंडिया कंपनीला देश विकून टाकतात. कामगारांना कंत्राटी कामगार बनवतात. खाजगीकरण करून सरकारी नोकऱ्या संपवतात. म्हणजे अप्रत्यक्षरीत्या आरक्षण संपवतात. संरक्षण व्यवस्थेचे जागतिकीकरण करून भारतातील सुरक्षा व्यवस्थेला विकलांग करतात. सुरक्षेवर आत्म निर्भयता उध्वस्त करतात. अमेरिकन कंपन्या आपली हत्यारे बनवणार, तसेच पाकची पण तेच बनवणार. युद्धाच्या मैदानात ती नाकाम करणार. कारगिल युद्धात वाजपेयी सरकारने सैन्याला सीमा पार करु दिली नाही. आपल्या सैन्याला समोरून हल्ला करायला लावले, त्या लढाईत माझे साथीदार मारले गेले. अमेरिकेच्या आदेशावर भारत सरकार काम करत आहे. मोदी, नवाज शरीफला मिठ्या मारतात. पाठीमागे अडाणी हसत असतो. मोदिसाहेब तुम्ही बोलता तसे कधीच वागत नाहीत. हेच तुमचे बाबासाहेबांचे प्रेम? फोकनाड थांबवा आणि बाबासाहेबांचे विचार कृतीतून दाखवा. जाती धर्माचे फोकनाड बंद करा. रोटी कपडा मकानचे राजकारण करा.

 

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाइट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

Please follow and like us:

Author: Brigadier SS