मोदी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे अभिनंदन! हे अभिनंदन केवळ औपचारीक आहे. या बरोबर आनंद नाही, पण भीती आहे. भीती ह्याचीच कि ह्या देशाचे भवितव्य काय? आणखी किती शेतकरी, कामगार आत्महत्या करणार, आणखी किती गरीब कुटुंबं उद्ध्वस्त होणार. तिकडे मोठ मोठे कारखाने बनणार, ते रोबोट चालवणार. नोकर्या नष्ट होणार, बेकरांचे तांडे वाढल जाणार. त्याबरोबर गर्द, नशा वाढत जाणार, गुन्हेगारी वाढणार, बलात्कार वाढणार, मोदींच्या भव्य विजयात मी भारताचे हे भविष्य बघतो आणि म्हणून आनंद नाही. मागील लेखात मी fascism म्हणजे काय हे लिहिले होते. fascism म्हणजे लोकशाहीचा मुखवटा असलेली हुकुमशाही राजवट. ही राजवट श्रीमंतांसाठी काम करते. कारखानदार, भांडवलदार, माफिया ह्यांची राजवट. लोकशाहीचे नाटक खेळत त्या आड हुकुमशाही राजवट चालवली जाते.
देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशाचे नशीब चांगले म्हणून भारताचे संविधान बनविण्यात आले. त्यामध्ये भारतीय नागरिकाला मूलभूत अधिकार देण्यात आले. ते मूलभूत अधिकार सरकारला बदलता येत नाहीत. म्हणून सरकारला त्या मर्यादेत राहून काम करावे लागते. पण आता सरकार चालवणार्या भांडवलदारांना ती मर्यादा नष्ट करायची आहे. जंगल तोडून त्या उदरातले खनिज हडप करायचे आहे. CRZ वाढवून समुद्र किनार्यावर मोठमोठे महाल बनवायचे आहेत. हे संविधान त्यांच्या आड येते. म्हणून त्यांना संविधान गाढायचे आहे. मोदींचा भव्य विजय हा हळूहळू संविधान नष्ट करण्याचे संकेत देत आहे. म्हणून मला दु:ख होत आहे.
संविधानाने दिलेले सर्व अधिकार बेमालूमपणे गोठविले जातात मोदीचे पुन्हा निवडून येणे ही भारताच्या संविधानाची मृत्युघंटा आहे. यापुढे कामगारांना कुठलेही अधिकार राहणार नाहीत. मालकांना कुणालाही नेमण्याचे आणि काढण्याचे अधिकार राहतील. सुट्टी, आरोग्य सेवा, प्रोविडेंट फंड हे सर्व अधिकार हळूहळू नष्ट होतील. स्वातंत्र्यानंतर १९९१ पर्यंत कामगारांचे अधिकार पूर्णपणे प्रस्थापित झाले होते. मनमोहन सिंघला जागतिक बँकने भारतात पाठवले व भारताचा विकासाचा पाया उखडून काढला. विकासाच्या कल्पना बर्याच लोकांच्या वेगळ्या असतात. ‘प्रगती म्हणजे पैसा किंवा संपत्तीची निर्मिती’ असा पाश्चिमात्य सिद्धांत आहे, पण तो भारतीय सिद्धांत नव्हे ‘साधी राहणी उच्च विचारसरणी’ हा आपल्या सांस्कृतिक इतिहासचा कणा आहे, पण दुर्दैवाने १९९१ पासून हे मुलतत्व मिटवण्यात आले व पूर्णपणे अमेरिकन भांडवलशाहीच्या अधीन मनमोहन सिंघनंतर मोदीने भारताला नेले. हिंदुत्वाचे नाव घेणार्या लोकांनी भारताची सांस्कृतिक कणा गाडून टाकला व पैसा पैसा पैसाच्या पाठी राज्यसत्तेचे सुकाणू फिरले. गेल्या २९ वर्षाचा इतिहास याचा साक्षीदार आहे. आर्थिक विकास हा मानवाच्या प्रगतिचे एकमेव उद्दीष्ट नव्हे, कधी कधी मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिकविकास रोखावा लागतो. म्हणूनच जंगलाखालील जमिनीच्या हव्यासापोटी आपण जंगल नष्ट करत नाही, तर जंगलची राखण करतो. ही भारताची संस्कृती आहे. पर्यावरणाचे संतुलन राखणे हे मानव जातीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. नाहीतर दुष्काळात मानव भाजून निघतो. मनमोहन मोदींच्या अर्थकारणात या भारतीय संस्कृतीचा समावेश नाही.
यालाच आपण fascism म्हणतो. राजसत्ता जरी राजकीय पुढार्यांच्या हातात दिसली तरी त्याचे सुकाणू मात्र कारखानदारांच्या / उद्योगपतींच्या हातात असते. हे भारतीय राजकर्त्यांचे सत्य आहे, दुर्दैवाने कॉंग्रेस असो का बाजपा असो ह्या बाबतीत एकच आहेत, त्यांच्यात फरक पाहणे म्हणजे मूर्खपणाचे आहे. ह्याचाच प्रत्यय आपल्याला ह्या इलेक्शनमध्ये दिसून आला. ‘मोदी नको चौकीदार चोर आहे’ तर तुम्ही कोण आहात? हा प्रश्न जनतेने विचारलेला दिसतो. त्यामुळे मोदीना आणि भाजापला दोष देताना शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या समोर पर्याय नव्हता. एकीकडे भाजप हा उद्योगपती आणि श्रीमंत धार्जिण्या पक्ष दिसत असताना दुसरीकडे कॉंग्रेस वेगळी आहे का? असे वाटण्याचे काहीच कारण नव्हते, यामुळे लोकांनी जे आहे ते आणखी ५ वर्ष चालवण्याचा निर्णय घेतला. आश्चर्य म्हणजे या निवडणुकीत भाजपला २०१४ पेक्षा १०% जास्त मते मिळाली आणि त्यांनी आपली पकड मजबूत केली. बंगाल मध्ये जेथे १ ही जागा नव्हती तेथे १४ जागा मिळाल्या.
मोदीने पूर्ण इलेक्शन व्यक्ती केंद्रित करण्याचा प्रयत्न केला जणू काय ही निवडणूक राष्ट्रपतीची निवडणूक आहे जिथे एका माणसाला राष्ट्र प्रमुख म्हणून निवडायचा आहे. मोदींच्या प्रयत्नाला पूर्ण पुष्टी राहुल गांधी आणि सर्व महागठबांधवांच्या नेत्यांनी दिली. ह्या सर्वांनी शेतकर्यांच्या, कामगारांच्या भावितव्यावर न बोलता फक्त ‘मोदी हटाव, देश बचाव’ ही बाब लोकांसमोर ठेवली. अर्थात नकारात्मक राजकारण करण्यास काही बंदी नाही, पण त्याला एक मर्यादा असते तुम्ही सकारात्मक काय करणार आहात हे सुद्धा लोकांना दिसले पाहिजे. दुर्दैवाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा आवाज केवळ ‘मोदी हटाव’ इतपत संकुचित राहिला. परिणामतः निवडणूक मोदीवर व्यक्ती केंद्रित झाली आणि परिणाम आपल्या समोर आहे. कॉंग्रेसने सगळ्यांना भाजपा विरोधात एकत्रित करण्याचे नाटक केले. पण उत्तरप्रदेश मध्ये ज.पा., ब.स.पा. विरोधात लढले . बंगालमध्ये ममता विरोधात, दिल्लीमध्ये केजरीवाल विरोधात, ओरिसात बिजू जनता दल विरोधात, महाराष्ट्रात देखिल तसेच, कॉंग्रेसचे नेते घमेंडीत होते. त्याची अद्दल त्यांना घडली.
सलग दुसर्यांदा एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळताना आपण बघतोय. मोदीच्या नेतृत्वाखाली भाजपच कॉंग्रेशीकरण होताना स्पष्ट दिसतंय आज महाराष्ट्रात भाजपचे प्रमुख नेते हे पुर्वाश्रमीचे कॉंग्रेस नेतेच आहेत. भाजपच्या नेत्यांना सत्तेसाठी वाटेल ते करण्याची प्रवृत्ती दाखवली आता विखे पाटील कोल्हापुरातील मंडलिक, सांगलीतील संजय काका पाटील, जय दत्ता क्षीरसागर नांदेडचे, भास्कर राव खदगावकर अशी अनेक नावे तुम्हाला दिसतील जे पूर्वाश्रमीचे कॉंग्रेस नेते होते. ह्यांची जिल्हयातील राजकारणावर पकड होती आता त्यांनी पक्ष बदलला म्हणून त्यांच्यात्त बदल झाला का? ह्याचाच अर्थ असा कि रंगलेल्या तोंडाचा मुका घेण्यासाठी सर्व तत्पर आहेत, पण पराभवाचे वाटेकरी कुणी होत नाही. निष्ठा, देशप्रेम, लोककल्याण हे शब्द केवळ शब्दकोशात चमकतात पण प्रत्यक्षात सत्य विदारक आहे. ह्या देशात देशासाठी काम करणारे लोक कुठे हरवले हे ह्या गदारोळात समजेनासे झाले. लोकांना आता दुर्बीण घेऊन ते लोक शोधून काढावे लागतील. त्यांना शक्ति द्यावी लागेल आणि २०२४ ची तयारी करावी लागेल. शहिदांच्या रक्तावर उभा राहिलेला हा भारत देश अडाणी अंबानीच्या आणि त्यांच्या बोलवत्या धन्याच्या हातात आम्ही देऊ शकत नाही. ही जाणीव आजच्या तरुण मध्ये जागृत झाली पाहिजे. मोदींच्या विजयाच्या अंध:कारात हाच मार्ग असेल, कारण रात्रीच्या अंधारात उद्याचा उष:काल लपलेला असतो. लढेंगे… जितेंगे …
लेखक: ब्रिगेडियर सुधीर सावंत
वेबसाइट : www.sudhirsawant.
मोबा. नं. ९९८७७१४९२९