१९१७ ला रशियामध्ये ऑक्टोबर क्रांती झाली आणि जग दुभंगले. सुरुवातीला वैचारिक दुफळी पडली. एकीकडे युरोप आणि अमेरिकेमध्ये भांडवलशाही विचारसरणीची पकड होती. तर रशिया आणि जगातील अनेक देशात समाजवादी विचारसरणीने पकड घेतली. समाजवादी विचारसरणी ही मानवी हक्काचा पुरस्कार करते. आर्थिक विषमता नष्ट करणे, सामाजिक समता राबविणे आणि उत्पादनाची साधने लोकांच्या ताब्यात असणे हा मुलभूत मंत्र जगामध्ये फोफावत गेला. त्यामधून जगातील अनेक देशामध्ये क्रांती झाली. दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि एशियन देशामध्ये अनेक देश समाजवादाकडे झुकले. युरोप आणि अमेरिकेला हे एक भयानक संकट वाटले. अडाणी, अंबानी सारखे भांडवलदार निर्माणच होणार नाहीत अशी संकल्पना समाजवादामध्ये होती. उलट भांडवलशाहीमध्ये सरकारला अर्थकारणातून दूर ठेवणे हे तत्त्वज्ञान होते. सर्व अर्थव्यवस्था सरकारच्या ताब्यात असणार होती. कारण लोककल्याणकारी राज्यांचा संकल्प होतों.
तेथूनच दुसरे महायुद्ध झाले. त्यावेळी हिटलर विरोधात रशिया, इंग्लंड व अमेरिका एकत्र आले. दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्ध सुरु झाले. त्यात जगातील देशांनी अमेरिका किंवा रशिया बरोबर जाण्याचे ठरविले. पण भारताने गट निरपेक्ष देशाची एक फळी बनविली. तरी या गट निरपेक्ष देशांनी अर्थव्यवस्था मात्र समाजवादी राबविली. या विरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेने एक भयानक डाव रचला आणि प्रत्येक देश आपल्या बाजूने करण्यासाठी त्या देशामध्ये लोकांना तोडून एक बाजू आपल्याबरोबर फोडण्याचा डाव रचला. धार्मिक कट्टरवाद निर्माण करून त्या देशामध्ये अनागोंदी व अराजकता निर्माण करून प्रत्येक देशामध्ये दहशतवाद व यादवी युद्ध निर्माण केले.
द्वेष भावना हे अमेरिकेचे शस्त्र होते, आज देखील आहे. हिंदू-मुस्लिम यादवी निर्माण करण्याचा अमेरिकेने नेहमीच प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर प्रांतिक विवाद निर्माण केले. भारतामध्ये अनेक राज्यांनी बंड केले आणि त्यांना परत भारतामध्ये समाविष्ट करण्यासाठी भारतीय सैन्याला अनेक वर्ष संघर्ष करावा लागला. आज देखील नागालँड, मिझोराम, त्रिपुरा, आसाममध्ये बंड चालू आहे. १९८० च्या दशकामध्ये अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीने पंजाब पेटवला. तब्बल १० वर्षे झुंज दिल्यानंतर पंजाब परत शांत झाला. आता काश्मिर मध्ये दहशतवादाला घुसवून अमेरिकेने स्वतंत्र काश्मिर बनविण्याचा आपला मनसुबा चालूच ठेवला आहे. श्रीलंकेमध्ये तामिळ वाघांना आपणच प्रोत्साहन दिले. मग अमेरिकेने त्यांना भारताविरुद्ध पलटवल. शीतयुद्धामध्ये केवळ पाकिस्तान अमेरिकेबरोबर राहिला आणि तेव्हा पासून पाकिस्तान हा अमेरिकेचा कट्टर समर्थक राहिलेला आहे. एकंदरीत अमेरिकेने भारताविरुद्ध कायम हत्यार उपसले आहे. १९७१ च्या युद्धामध्ये सुद्धा अमेरिकेने पाकिस्तानला पूर्ण मदत केली. या शीतयुद्धातील खेळामुळे भारताला प्रचंड किंमत मोजावी लागली आहे.
रशियाचा युक्रेन मधील हल्ला हा त्याच अमेरिकन धोरणाचा परिणाम आहे. एरवी युक्रेन हा रशियाचाच एक भाग होता. १९९१ ला सोवियत संघाचे विभाजन झाल्यामुळे युक्रेन स्वतंत्र झाला. तरीही युक्रेन आणि रशियाचे संबंध अतिशय चांगले होते. २०१६ ला अमेरिका युक्रिनी लोकांमध्ये आणि रशियन लोकांमध्ये फुट पाडण्यामध्ये यशस्वी झाली आणि हिंदू मुस्लिम प्रमाणे जातीय संघर्ष सुरु झाला. त्यातल्या त्यात पश्चिम युरोप आणि अमेरिका यांनी आपले सुरक्षा गटबंधन NATO वाढविण्यास सुरुवात केली. तर अनेक राष्ट्र जे रशियापासून विभक्त झाले होते त्यांना NATO मध्ये सामील करण्याचा सपाटा लावला. युक्रेन देखील त्यापैकी एक देश आहे. यामुळे रशियाला धोका वाढला. त्याचाच परिणाम म्हणजे रशियाचा हल्ला. पुर्व युक्रेन भाग हा रशियन जातीचा आहे. त्या लोकांना रशिया मध्ये सामील व्हायचे आहे. धार्मिक आणि जातीय कट्टरवादाचा हाच परिणाम असतो. आता अमेरिका रशियाविरुद्ध मोर्चे बांधणी करत आहे.
भारताने आज संयमाची भूमिका दाखविली आहे. अमेरिकेसमोर लोटांगण घातले नाही. कारण रशिया हा आपला अनेक वर्षाचा मित्र आहे. १९७१ च्या युद्धापासून आजतागायत भारताला प्रचंड मदत केली आहे. आज देखील जवळजवळ आपली ६०% हत्यारे रशियाकडून येतात आणि ती स्वस्त असतात. म्हणून अमेरिकेने रशियावर बंधन लादल्यानंतर भारताने रशियन तेल घ्यायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे चीनदेखील रशियाच्या बाजूने उभा राहिला आहे. भारत, रशिया व चीन एकत्र आले तर कुठल्याही राष्ट्राला आव्हान देऊ शकतात. मी जेव्हा चीनच्या राष्ट्रपतींना भेटलो तेव्हा त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते कि भारत आणि चीन मध्ये जगातील ६०% लोकसंख्या आहे. त्यामुळे दोन्ही देशाचे संबंध पूर्ण जगाला महत्त्वाचे आहेत. १९६२चे युद्ध विनाकारण झालेले आहे. चर्चेतून मार्ग काढता आला असता, पण भारताच्या गुप्तहेर संघटना या अमेरिकन धार्जिण्य होत्या. त्यांनी खोट्या माहितीचा प्रसार करून दोन्ही देशामध्ये युद्ध घडवून आणले व अनेक वर्ष विनाकारण शत्रुत्वाचे संबंध प्रस्तापित झाले. त्यामुळे दोन्ही देशाचे प्रचंड नुकसान झाले आहे व पाकिस्तानचा सर्वात जास्त फायदा झाला आहे. अमेरिका आणि चीन दोन्ही शत्रू असून देखील दोघेही पाकिस्तानला मदत करतात. हे दुर्भाग्य आहे. त्यात छेद करून पाकिस्तान आणि चीनला तोडले पाहिजे. हे सहज शक्य आहे. पण भारताच्या राज्यकर्त्यांनी भारताचे खरे हित ओळखून चीन बरोबर मैत्री करण्याची पावले उचलली नाहीत.
इकडे युक्रेनमध्ये रशियाने सात दिशेने हल्ला केला आहे आणि रशियन सैन्य हळूहळू पुढे जात आहे. त्यांना शक्यतो मानवहानी टाळायची आहे. म्हणून शहरांवर थेट हल्ला करत नाहीत. तर प्रचंड गोळीबार करून युक्रेनची सैनिक स्थळे बरबाद करत आहेत. रशिया घाईत दिसत नाही. तरीही मानसिक स्थरावर युद्ध जिंकण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता युद्धाचा शेवट आपल्याला दिसत आहे आणि रशियन सैन्य हे सर्व बाजूने घुसले आहे व मुख्य शहरांवर गराडा घालून थांबले आहे. मानवहानी झाल्याचा प्रचार होत आहे. पण प्रत्यक्षात काही दिसत नाही. युक्रेनवर कब्जा करण्याचा रशियाचा डाव लवकरच यशस्वी होईल. तिकडे अमेरिका पुन्हा युक्रेनमध्ये ढवळाढवळ करत आहे. २४ मार्चला BruSsel मध्ये शिखर संमेलन आहे. त्या दिवशी NATO आपले धोरण जाहीर करणार आहे. रशियाच्या डावाला कसा काटशह द्यायचा हे ठरवणार आहेत. आतापर्यंत त्यांनी या युद्धात भाग घेतला नाही. जर NATO ने युद्धात प्रत्यक्ष भाग घेतला तर तिसरे महायुद्ध निश्चित आहे. हे टाळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. नाहीपेक्षा जागतिक विध्वंस निश्चित आहे. त्यात अणुअस्त्राचा वापर होऊ शकतो.
परिस्थिती अतिशय बिघडत चाललेली आहे. त्यात भारताला फार संयमाने भूमिका घ्यावी लागणार. भारताने कदापी रशियाची बाजू सोडू नये व शांततेने हे प्रकरण मिटवता येईल का? हे पाहिले पाहिजे. अंतिमत: कुठलेही युद्ध झाल्यावर जगातील हत्यारे विक्रेत्यांचे श्रीमंती वाढत जाते आणि सामान्य माणसाला मात्र यातना भोगाव्या लागतात. म्हणूनच जगात युद्ध पेटविली जातात. खऱ्या अर्थाने ही लढाई साम्यवाद आणि भांडवलशाहीमध्ये संघर्षाचे एक पर्व आहे. वेगाने बदलत्या जगामध्ये पूर्ण जगावर प्रभुत्व ठेवण्याचा अमेरिकेचा डाव उद्ध्वस्त केला पाहिजे आणि जगातील सर्व राष्ट्रांनी मानवतेच्या कल्याणकारी दृष्टीकोनातून पुढची भूमिका निभावली पाहिजे.
लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा. न. ९९८७७१४९२९