युद्ध आणि राजकीय फायदा-२८.३.२०१९

युद्ध हे राजकारणाचा एक भाग आहे असे आव्हान क्लात्स्वीत्झ ह्या थोर मिलिटरी विचारवंताने म्हटले आहे. म्हणूनच निवडणूक आल्यावर युद्ध गर्जना सुरु होतात, की काय? २०१९ च्या निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या तशा भारतात उलथापालथ सुरु झाल्या. देश गजबजू लागला. कोण बनणार चौकीदार? याकडे जगाचे लक्ष  लागून राहिले. कारण भारत ही आज देखील सोने कि चिडिया आहे. तिच्यावर प्रभुत्व ठेवण्यासाठी अमेरिकेने नेहमीच प्रयत्न केले आहेत. २००१ पर्यंत अमेरिकेने उघडपणे भारताला पाकिस्तान करवी दाबण्याचा प्रयत्न केला. १९७१ च्या युद्धात तर सरळ पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला. रशिया आपल्या बाजूने होती म्हणून थेट हल्ला अमेरीकेने केला नाही.
१९८० च्या दशकात तर पूर्ण जगातील दहशतवादी पाकिस्तानमध्ये आणून अफगाणिस्तान आणि अप्रत्यक्षरीत्या भारताविरूध युद्ध पुकारले. ओसामाबीन लादेनला पाकमध्ये अमेरिकेनेच आणले. ९/११ ला ओसामा बिन लादेनने अमेरिकेवर हल्ला केला आणि मगच अमेरिकेने धोरण बदलले. पुलवामाचा हल्ला झाला तरी अमेरिका अजून पूर्ण मदत पाकला करत आहे. म्हणूनच मोदी गरजले, हिंदी सिनेमाचे डायलॉग मारले. एक विमान हल्ला केला आणि मुग गिळून गप्प बसले.
मी कारगिल युद्धात हेच बघितले. पाकने भारतावर आक्रमण केले, तरीही वाजपेयींनी भारतीय सैन्याला किंवा वायुदलाला सीमा पार करू दिली नाही.  सैन्याला आपल्याच मातीत रक्त सांडायला लावले. कुठल्याही युद्धाच्या अंती, सत्ताधारी पक्ष निवडणूक जिंकतो. हे सत्य नाकारता येत नाही. युद्ध ही एक नशाच असते. लोक सगळे विसरतात. गल्लीत बसून भारतमाता कि जय म्हणणे सोपे असते. पण आपल्या घरातल्या माणसाचे शहीद म्हणून घरात बघणे हे कुठल्याही विरपत्नीला जिवंत मरण असते. माझे अनेक साथीदार सीमेवरून कधीच परत आले नाहीत. त्यांच्या कुटुंबाचे अश्रू आजपर्यंत पुसू शकलो नाही. देशाला गरज असते तेंव्हा आमचे जवान कधी मागे राहिले नाहीत. पण त्यांचे प्राण राजकारणासाठी जाऊ नयेत म्हणून आपण पूर्ण खबरदारी घेतली पाहिजे.
कुठल्याही लोकशाहीत युद्ध सुरु करणे आणि ते संपवणे अतिशय कठीण असते. पण  निवडणुकीच्या आधी युद्ध घडवून जिंकण्याची तंत्र पूर्णपणे विकसित आहे. हुकुमशाहीत तर दोन्ही देशात मॅच फिक्सिंग असते. २००० ते ३००० योद्धयांचे मुडदे पाडून युद्ध पार पाडायचे. दोघांनी थोडी जमीन कब्जा करायची, युद्धानंतर ती परत द्यायची. वल्गना करायच्या कि आपण युद्ध जिंकले आणि स्वत:ची पाठ थोपटत निवडणुकीत जायचे. लोकांना आपली दैन्यावस्था विसरायला लावून देशप्रेमाने पछाडून टाकणे हे तंत्र सर्वात मोठ्या प्रमाणात हिटलरने वापरले. मी २ वर्षापूर्वीच ह्याच सदरात लिहीले आहे कि निवडणूक जवळ आल्यावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणार. ती केली गेली. एक हवाई हल्ला केला आणि देशाची भूक भागवली. पुलवामातील ४० शहिदांना आपण विसरलो.
हवाई हल्ला आणि नंतरचा पाक कैदी वैमानिक अभिनंदनचे नाट्यमय भारत वापसीने वातावरण सूडभावनेने पेटले. अमित शहा गरजला कि ३०० आतंकवादी मारले गेले. त्यावर वायुदल प्रमुख म्हणाले कि मृतांची संख्या मोजणे हे आमचे काम नव्हे. हवाई हल्ला झाला त्याबद्दल कोणी शंका घेवू नये. पण ३०० मारले म्हणजे स्वप्नविलास आहे. भाजपचा हा खोटा प्रचार आहे. युद्धाचे श्रेय उपटण्याचा प्रयत्न आहे. पुलवामातील शहिदांच्या कुटुंबियांना मात्र मोदिचे कौतुक नाही. प्रदीप कुमारच्या कुटुंबियांनी हवाई हल्ल्याचे पुरावे मागितले. मैनपुरी उत्तर प्रदेश मध्ये फ्रंटलाईन मासिकाला लोकांनी स्पष्ट विचारले कि हे हल्ले लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी केले आहेत. मोदी आपली आश्वासने  पूर्ण करू शकला नाही म्हणून लुटू-पुटूच्या लढाईने लोकांना आपली खोटी वचणे विसरायला लावायची. शेतकऱ्यांना आणि कामगारांना विसरायला लावायचे. राफेलचे कागद हरवले. त्याचा लाभार्थी मोदींचा प्रिय अनिल अंबानी आज तुरुंगात जाण्याच्या वाटेवर आहे. ५ वर्षात तरुणांना बेकार करून टाकले. सैनिकांना फसवले. आमचा सैनिक ३२–३५ वर्षात निवृत्त होतो मग दरदर नोकरीसाठी भटकतो. अनेक वर्षे नोकरी मिळत नाही. युद्धज्वरामुळे हे सर्व लोक विसरतात.
जगात आपल्याला प्रचंड समर्थन मिळाल्याचा देखावा करण्यात आला. पण झाले उलटेच. न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले की,  भारतीय वायुदलाने कुठे हल्ला केला हे कळलेच नाही. लंडनच्या प्रतिष्ठित जेन इंटेलिजन्स संघटनेने म्हटले की हल्ल्या आधीच दहशतवादी निघून गेले होते. वॉशिंग्टन पोस्ट, गार्डीयन, अलजाझिरा अशा जागतिक प्रमुख सर्वच माध्यमांनी वायुदल हल्ल्याला दुजोरा दिला नाही. उलट पाक बरोबरच्या हवाई चकमकीत आपली २ विमाने नष्ट झाली. तसेही शत्रूच्या हद्दीत काय झाले हे जमिनीवरच कळू शकते. विदेशी पत्रकार हे सर्वात हुकमी माहितीचे केंद्र आहेत. त्यांनी हा हल्ला घडल्याची कुठेच बातमी दिली नाही.
श्रेय घेण्यासाठी मात्र भाजप नेते आघाडीवर आहेत. येदूरप्पा म्हणाले की ह्या हल्ल्यामुळे भाजपला २२ जागा मिळतील.एकंदरीत भाजप दाखवायचा प्रयत्न करते की भारतात तीच एक राष्ट्रप्रेमी पार्टी आहे. वाईट काय आहे की ह्यात राष्ट्रीय सुरक्षा आणखी धोक्यात येते. निवडणुकीने राजकर्त्यांची द्रुष्टी संकुचित झाली आहे. दहशतवादी हल्ल्याना उत्तर म्हणून  हवाई हल्ला करणे हे गरजेचेच होते. पण नंतर राजकीय फायदा झाला म्हणून गप्प बसणे हे धोक्याचे आहे. असे अनेक हल्ले करावे लागतील. तरच पाकला योग्य संदेश मिळेल की भारत हे खपवून घेणार नाही.
सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की पाकचे करायचे काय? २०१४च्या आधी, मोदीने पाकला अनेक धमक्या दिल्या. पण प्रधानमंत्री होताच पाक पंतप्रधान नवाज शरीफला आग्रहाने स्वत:च्या शपथविधीला  बोलावले. पाहिल्या दिवसापासून मोदिसाहेब तुम्ही नांगी टाकली. त्यामुळे तुम्ही कागदी वाघ असल्याचे शत्रूने ओळखले. पुढे जाऊन तुम्ही नवाज शरीफच्या वाढदिवसाला जावून पार्टी केली. इकडे पाक आतंकवादी सैनिकावर हल्ला करत होते. मी तुम्हाला स्पष्ट लिहेल होते कि तुम्हाला दोनच पर्याय आहेत. एक दहशतवाद संपवणे, शांतता प्रस्थापित करणे. पाकबरोबर मैत्री करणे किंवा हल्ला करून पाकला संपवणे. लुटु-पुटूच्या लढाईने तुम्ही लोकांना भडकावले.   पण पाकला फायदाच झाला. कारण पाक सैन्याचे स्थान पाक जनतेत मजबूत झाले. शेवटी पाकचे बिघडले काय? तुमच्या धमकीला पाक भिक घालत नाही. जगाला सुद्धा तुमची काही पडलेली नाही. हिम्मत असेल तर पाकला संपूवन दाखवा. नाहीतरी आजपर्यंत काश्मिरमध्ये १०००० सैनिक मारले गेलेत. आणखी ३००० मारले जातील पण कायमचा रक्तस्राव थांबेल. डरकाळ्या फोडू नका, पाकला नष्ट करा.

लेखक: ब्रिगेडियर सुधीर सावंत
वेबसाइट : www.sudhirsawant.com
मोबा. नं. ९९८७७१४९२९

Please follow and like us:

Author: Brigadier SS