युद्ध १९७१_17.12.2020

१६ डिसेंबर हा भारताचा विजय दिवस. १९७१ ला भारत-पाक युद्ध झाले. त्यात भारताला अप्रतिम विजय मिळाला. या युद्धाला ‘बांग्लादेश मुक्ती लढा’ म्हणतात. पूर्व पाकिस्तान नष्ट झाला व बांग्लादेशचा जन्म झाला. ह्या विजयामुळे काही सिद्धांत नष्ट झाले व काही प्रस्थापित झाले. पहिला म्हणजे, इंग्रजांनी निर्माण केलेला सिद्धांत.  हिंदू मुस्लिम हे दोन राष्ट्र आहेत जे कधीही एकत्र नांदू शकत नाहीत. त्यासाठी भारताची फाळणी करावीच लागेल. ह्या भूमिकेवर भारताचे दोन तुकडे होऊन पाकिस्तान निर्माण झाला. भारतातून अनेक मुस्लिम पाकिस्तान मध्ये गेले. त्यांना मुहाजिर म्हणून पाकमध्ये संबोधले जाते. त्यांना पाकमध्ये खालच्या दर्जाचे मुस्लिम म्हटले जाते. पाकमध्ये पंजाबी मुस्लिम स्वतःला श्रेष्ठ समजतात. म्हणून पाक बनला तरी पाकमध्ये पठाण, बलुची, सिंधी आणि मुहाजिर यांचा पंजाबी लोकांवर कायम द्वेष आहे. धर्म त्यांना एकसंघ करण्यात यशस्वी होऊ शकला नाही. आज देखील पाकिस्तानचे चार तुकडे होऊ शकतात. १९७१ च्या युद्धात बांग्लादेशच्या सर्व मुस्लिम समाजाने भारताकडून मदत घेतली.  व स्वतंत्र बांग्लादेश निर्माण झाला.  धर्म हा पश्चिम आणि पूर्व पाकिस्तान एकत्र करू शकला नाही. म्हणून धर्मावर आधारित राष्ट्र बनते हा सिद्धांत नष्ट झाला. माझी कायम भूमिका राहिली आहे. गेल्या ३० वर्षात १०,०००  सैनिक काश्मिरमध्ये मारले गेले आहेत. असा नरसंहार किती काळ सहन करणार? त्या पेक्षा एकदाचे निर्णायक युद्ध लढावे लागेल व पाकिस्तानचे ४ तुकडे करावे लागतील. हे अनेक वर्ष मी मांडत आलो. कारगिलच्या वेळी नामी संधी चालून आली होती. पण सरकारने कच खाली. अशा अनेक संधी भारताला मिळाल्या पण अमेरिकन दबावामुळे कोणी काहीच केले नाही.

अमेरीका हा कायमचा पाक प्रेमी राहिला आहे. आता देखील अमेरिकेला अफगाणिस्तानातून पळ काढायचा आहे. त्यासाठी तालिबानला समजावण्याचे काम पाकवर आले आहे. म्हणून अमेरिका पाकला कधीच दुखवणार नाही. पण मनमोहन सिंह १९९१ ला राजकरणात आल्यापासून अमेरिकेचे तळवे चाटण्याचे काम चालू आहे. अमेरीकेनेच पाकला पुढे करून भारतात दहशतवाद १९८० च्या दशकात निर्माण केला. ओसामा-बिन-लादेनला त्यानीच निर्माण केले. मग पाकच्या मदतीने त्याला मारले.  कारगिल युद्धात पाकला मदत केली आणि भारतावर LOC पार करायची नाही असा निर्बंध आणला. वाजपेयी सरकारने ह्या दबावाखाली सैन्याला सीमा पार न करण्याचा आदेश दिला.  पुढे मनमोहन सिंह सरकारने १० वर्ष अमेरिकेचे समर्थन केले. त्यात मोठा आंतरराष्ट्रीय करार देखील केला. लेमोवा करारात अमेरिकेला भारताची जमीन वापरायला परवानगी देण्यात आली आहे. अमेरिका आपले सैन्य भारतात उतरू शकतात. इथून दुसऱ्या देशावर हल्ला करू शकतात. आता मोदी सरकार देखील तेच करत आहे. त्यामुळेच चीनने भारताविरुद्ध कारवाई सुरू केली. अमेरिका भारताला चीन विरुद्ध भडकवत राहिली आहे. सुरुवातीला मोदी सरकारने अमेरिकेला  जास्त भीक घातली नाही. पंतप्रधान मोदीने चीनच्या राष्ट्रपतींना गुजरातला व नंतर चेन्नईला आमंत्रित केले व प्रचंड स्वागत केले. चीनने भारतात व्यापार मोठ्या प्रमाणात साधला. जवळ जवळ ८० अब्ज डॉलर झाला. तो वाढतच राहणार कारण चीनचा जास्त मालं भारत मान्यमार सीमेवरील मोर्ये ह्या गावातून होतो. तिथे म्यानमारला २० किलो माल डोक्यावरून आणायला परवानगी आहे. हा अधिकृत माल आहे. म्हणून भारतात त्याला कुणीच थांबवू शकत नाही.

१९७१ च्या लढाईमध्ये १० लाख बांग्लादेशीय आश्रित भारतात आले.  जवळ जवळ २ लाख स्त्रियांवर बलात्कार पाकिस्तान सैन्याने केले. लाखो लोकांची कत्तल केली.  कारण आजच्या बांग्लादेशमध्ये शेख मुलीबर रहेमान यांनी बंड केले. कारण १९७१ च्या पाकमध्ये झालेल्या निवडणुकीत मुलीबर रहेमान पंतप्रधान म्हणून निवडून आले होते.  पण सैन्यदल त्यांना पंतप्रधान करायला तयार नव्हते.  राजनैतिक वातावरण अत्यंत गढूळ झाले व भारत-पाकिस्तान युद्ध होणार हे स्पष्ट झाले.  इंदिरा गांधीनी जगामध्ये अनेक देशात जाऊन तेथील परिस्थितीची कल्पना दिली.  अमेरिकन राष्ट्रपती निक्सनने त्यांना उलट धमकी दिली की पाकिस्तान वर हल्ला केला तर अमेरिका पाकिस्तानच्या मदतीला धावून जाईल आणि युद्ध काळात तसेच झाले.  अमेरिकेचा सातवा वेढा बांग्लादेशकडे वेगाने जाऊ लागला.  पण भारतीय नाविक दलाने बांग्लादेशच्या तटावर आपले नियंत्रण केले होते.  त्यात रशियाच्या पाणबुड्या आपल्या मदतीला धावून आल्या, म्हणून अमेरिकाचा सातवा वेढा अडकला.  अशाप्रकारे अमेरिकेने भारताला कायम त्रास दिला आहे.

अलिकडच्या काळामध्ये भारताने चीन आणि अमेरिका यांच्याबरोबर समान संबंध ठेवले होते. पण ट्रम्पचे चीन बरोबर काहीतरी बिघडले व चीनी मालावर त्यांनी बंदी घातली व भारताने तसेच करावे, असा जोरदार दबाव भारतावर टाकला.  अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशानी सैनिकी आघाडी बनवण्याची संकल्पना मांडली आणि ऑक्टोबरमध्ये या चारही देशाच्या दिल्ली आणि टोकियोला बैठका पण झाल्या.  पण जपान आणि ऑस्ट्रेलिया सावध आहे.  अजून तो करार होऊ दिला नाही.  या दरम्यानच म्हणून चीनने डोक्लाम पासून घालवन पर्यन्त वेगवेगळ्या कारवाया सुरू केल्या.  परिणामत: भारताला प्रतिकार करावा लागला. त्या परिस्थितीत भारताला निर्णय घ्यावा लागला की आपण अमेरिकेबरोबर राहायचं की चीन बरोबर की तटस्थ रहायचं.  चीन विरुद्ध भारताने अमेरिकेला कितीही मदत केली तरीही अमेरिका पाकिस्तानलाच मदत करणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.  म्हणून दोन्ही देशाबरोबर समान अंतर ठेवणे हे भारताच्या हिताचे आहे.  चीन हा शेजारचा देश आहे व शक्तीशाली देखील आहे.  त्याच्यासोबत संबंध सुधारण्यासाठी राजीव गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रचंड प्रयत्न केले आहेत.  ते सरकारने पुढे चालवले पाहिजेत.  इथे कुणालाही रस्त्यावर जाऊन घोषणा करायला सोप्या असतात, पण सैन्याला लढाव लागत.  चीन भारत युद्ध झाल तर दोघांचे प्रचंड नुकसान होणार आहे.  आणि अमेरिकेचा प्रचंड फायदा होणार आहे.  कोविड काळामध्ये चीनने प्रचंड आर्थिक प्रगती केली आहे. तर अमेरिका ढासळत चालला आहे.  म्हणून आपण कुणाबरोबर दुश्मनी घेण्याचे टाळले पाहिजे आणि आधी पाकिस्तानला संपवले पाहिजे.  १९७१ च्या युद्धातून आपल्याला हाच अनुभव आला आहे.  कारण चीन जर पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला असता तर आपल्याला एवढा मोठा विजय शक्य झाला नसता, हा दूसरा सिद्धांत आहे.

एप्रिल १९७१ ला इंदिरा गांधीनी सेनादल प्रमुख माणिक शहाला पाकिस्तानवर हल्ला करायचा संदेश दिला. पण जनरल माणिक शहाने स्पष्टपणे नाकारले.  कारण पावसाळ्याच्या तोंडावर हल्ला करणे हे बरोबर नव्हते.  नदया-नाल्याचा बांग्लादेश पाऊस पडल्यावर चिखल होऊन जातो.  त्यात रणगाडे पुढे जाऊ शकणार नव्हते. “मला पूर्ण तयारी करू द्या, मग आपण हल्ला करू आणि तुम्हाला निश्चित विजय मिळवून देऊ.” असे माणिक शहा म्हणाले.  माणिक शहाचे वक्तव्याचा फायदा इंदिरा गांधींनाच झाला.  कारण त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी सातत्याने दबाव येत होता.  त्यांनी राजीनामा स्विकारला तर नाहीच पण तुमच्या वेळ्पत्रकाप्रमाणे कारवाई करा, अशी पूर्ण सूट माणिक शहाना दिली.  ३ डिसेंबरला बांग्लादेश मध्ये चारही बाजूने भारताचा हल्ला सुरू झाला.  इंदिरा गांधींनी सैन्यदलाला स्पष्ट उद्दीष्ट दिले की ढाकावर लवकरात लवकर कब्जा करा. हा तिसरा सिद्धांत आहे की युद्धामध्ये उद्दीष्ट स्पष्ट असलं पाहिजे. म्हणूनच ढाक्यावर सैन्य लवकरात लवकर पोहचले.  मध्ये येणार्‍या अडथळ्यांना व विरोधाला बाजूला टाकत भारतीय सैन्य प्रचंड गतीने ढाक्यावर पोहचले.  वायुदलाने पाकचे वायुदल नष्ट केले आणि नाविक दलाने बांग्लादेशचे बंदर व किनारा वाहतुकीसाठी बंद करून टाकला.  हा चौथा सिद्धांत आहे.  सेना, वायु व नाविक दल यांनी अत्यंत एकजुटीने युद्धात भाग घेतला व बांग्लादेश निर्माण केला.  १६ डिसेंबरला पाकिस्तानचे जनरल नियाबी यांनी भारतीय जनरल अरोरा यांच्या समोर शरणागती पत्करली.  भारताचा मोठा विजय झाला.  पाक सेनेचे ९९,००० सैनिक कैदी झाले.  भारताच्या इतिहासामध्ये कधीही एवढा मोठा विजय झाला नव्हता.  या विजयामुळे भारतीय सैन्याचे मनोबल आणि आत्मविश्वास एवढा वाढला आहे की जगातील कुठल्याही शक्तीचे आव्हान आपण पेलू शकतो.  “पर जोश मे होश नही खोना चाहीए|”

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा ९९८७७१४९२९.

Please follow and like us:

Author: Brigadier SS