योग आणि भोग_२०.६.२०१९

‘जो योग करेंगा वो जीएगा नहीतो तडप तडप के मरेगा’. जीवन आनंदमय बनवणे म्हणजे काय व कसे? ह्या विषयाबाबत अनेक विद्वानांनी अनेक सिद्धान्त मांडले आहेत. जगी सुखी असा कोण आहे? हा प्रश्न अनेक संतानी अनेक वेळा उपस्थित केला  आहे. मला हे सिद्धान्त काही माहीत नाहीत पण अनुभवातून मी सांगू शकतो की, उत्तम आरोग्य हा आनंदाचा व  सुखाचा पाया आहे. पण हे साध्य कसे करायचे? तर व्यायामाने.  व्यायाम कुठला करायचा? त्यावर अनेकांची अनेक शास्त्र आहेत. कोणी व्यायाम शाळेत जातो, भारी वजन उचलतो. छाती, दंड पिळदार बनवतो. तर कोणी दंड बैठक घालतो. कोणी सकाळी पळतो / चालतो. तर कोणी योग करतो. कोणी पोहतो. कोणी डोंगर चढतो. व्यायामाचे असे अनेक प्रकार आहेत. बहुतेक सर्व शरीर  सुदृढ करण्यावर भर देतात. पण ‘योग’ हे एकमेव शास्त्र आहे की जे मन स्थिर करण्यावर आणि मन सुदृढ बनवण्यावर भर देते. योगला कसलाच खर्च येत नाही. अगदी घर बसल्या योग करता येतो. म्हणून मानवाच्या जीवनासाठी योग हे एक अप्रतिम देणं आहे.

पंतप्रधान मोदीजींनी २१ जून हा ‘जागतिक योग दिन’ जाहिर केला व स्वतः त्याचे नेतृत्व केले. लखनौ येथे हजारो  लोकांसमोर योग करताना त्यांना  सर्वांनी बघितले.  अनेक घोटाळ्यात हा एक विषय मात्र वाखाणण्या जोगा आहे. भारतीय संस्कृतीचा निर्विवाद भाग म्हणजे योग. त्याला जगामध्ये स्विकृती मिळाली, किंबहुना मानवतेला ती भारताची देणं आहे. मोदिने हया  शास्त्राला जगाच्या पटलावर प्रस्थापित केले. २१ जूनला न्यूयॉर्क पासून लंडन पर्यंत तिथून चीन-जपान सर्वांकडे लोक योग करतात. हे  भारतीय परंपरेचे अभूतपूर्व दर्शन होते. गोऱ्या  माणसांच्या शास्त्रावर मात करणारे हे शास्त्र आहे.  हे सिद्ध झाले.  हा विषय योग पर्यंतच मर्यादित नाही. तर एकूण मानवाच्या जीवन शैलीचा व मानवी जीवन आनंदमय करण्याचा विषय आहे. भारताची श्रेष्ठ जीवन पध्दत आणि पाश्चिमात्य उपभोगवादी जीवन पद्धतीचे तुलनात्मक अनुभव आहे. योग प्रमाणेच ‘नैसर्गिक शेती’ ज्याला आपण ‘झिरो बजेट अध्यात्मिक शेती’ म्हणतो किवां आयुर्वेद, गुरुकुल शिक्षा पध्दत असे अनेक पैलुवर विचार केला तर भारतीय पध्दत ही केव्हाही श्रेष्ठ असल्याचे आपल्याला दिसते.

अमेरिकन सेक्स आणि शराबी संस्कृतीचा अमेरिकेने जगात प्रसार करून मानवाची मानसिकता उपभोगवादाकडे खेचली. त्यावर त्यांनी आपली अर्थ व्यवस्था उभारली. स्त्रियांना उघडे नागडे फिरण्याची फॅशन बनवली. मेकअप हा स्री सौंदर्याचा नियम करून करोडो रुपये त्यांच्या उद्योगपतीनी कमावले. लिपस्टिक, पावडर हे तर नैसर्गिक जीवन पद्धतीचा  केव्हा व कसा एक भाग झाला ते आपल्याला कळलेच नाही. शृंगाराचे प्रकार वाढत गेले. सिनेमाने आणखी प्रसार झाला. पडद्यावरील नटीसारखे दिसण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. शरीर व्यायामा अभावी ओबड-धोबड होत चालले. पण तोंडाला रंग फासून काळ्याचे गोरे बनवण्याच्या नादात चेहऱ्यावर सुरकुत्या कधी पडतात आणि सरणावर्ती  देह जाऊन कधी भस्म होतो ते जाणवत नाही.

उपभोगवादाचा सरळ परिणाम म्हणजे आयुष्य जगण्याविना मरणे हेच आहे.  शोबाजीत खऱ्या आणि वास्तव आयुष्याला आपण मुकतो व मृगजळापाठी पळत सुटतो. त्यातूनच मानसिक संतुलन नष्ट होते. निराशा, क्रोध,  फ्रस्टेशन निर्माण झाली. जीवन असह्य झाले. रासायनिक शेतीमुळे शरीरात विष वाढले. माणसाला तारुण्यातच मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब आणि नपूसंकता सारखे रोग प्रचलित झाले.  सुखासीन जीवनपद्धतीमुळे शरीर कमकुवत झाले. किती जरी पैसा कमवला तरी त्याचा आनंद घ्यायला शरीर समर्थ नाही. म्हणून दुःख वाढले.  ह्या मानसिक स्थितीला बदलून शांत, आनंदी, तृप्त मानसिकता घडवायला योग मार्ग हा हुकुमी मार्ग आहे. प्राणायाम, ध्यान हा चिरतारुण्याचा महामार्ग आहे. पण लोक हा मार्ग टाळतात. कारण मन अस्थिर असते. १ मिनिट देखील शांत राहू देत नाहीत, तर ध्यान करणे हे मोठे कठीण काम वाटते. आळशीपणा माणसाला व्यायामापासून दुर ठेवतो व अकाली म्हातारपणाला सामोरे जावे लागते. अनेक लोक ३० वर्षाचे असून त्यांचे शरीर मात्र ५० वर्षाचे असते. त्याला जोडून मरगळलेपणा हा आधुनिक मानवाचा स्थायीभाव झाला आहे.  मोदिसाहेब हे जगातील पाहिले प्रधानमंत्री असतील ज्याने योग आणि व्यायामाला एक गती दिली. म्हणून त्यांचे अभिनंदन.

नेतृत्वाचे काम फक्त सरकार चालवणे नसून नागरिकांना प्रोत्साहित करणे आहे. त्यात योग आणि स्वच्छता अभियान मोडते. मोदींच्या राजकारणाच्या भागाला आम्ही विरोध करतो पण त्यांच्या ह्या अभियानाला पाठींबा देतो. कारण आज राजकारणी लोक पदावर जरी गेले तरी त्यांचा आवाज जन माणसात सुना असतो. शिवरायांच्या आवाजाला महाराष्ट्राची जनता प्रतिसाद द्यायची कारण त्यांचे नेतृत्व निर्विवाद होते. आपल्या राजासाठी लोक मर मिटायला तयार होते. आज असे नेतृत्व देशात नाही. ज्याच्या आवाजावर देश उभा राहील. हे देशाचे दुर्दैव आहे. लोकांचे वैयक्तिक आचार हे देशाच्या प्रगतीला फार महत्वाचे आहेत. पण खाऊन भिंतीवर थुंकू नका म्हटल्यावर स्वयंस्फुर्तिनी सर्वांनी पालन केले पाहिजे. कायद्याच्या बडग्याखाली पालन करणे व स्वयंस्फुर्तिनी पालन करणे ह्यात फरक आहे. हुंड्याविरुद्ध कायदा झाला, पण हुंडा चालूच आहे. म्हणूनच सामाजिक रूढी,परंपरा, सवयीचे सार्वजनिक हितासाठी सर्वांनी पालन केले पाहिजे. ते घडवणारा नेता आज नाही. पण मोदीने छोट्या पण सोप्या गोष्टी हातात घेतल्या आहेत. असेच आपल्या बाकी नेत्यांनी करावे ही अपेक्षा.

आनंदी जीवन जगण्यासाठी आपले शरीर आणि मन सुदृढ पाहिजे हे आपण पाहिले. शरीर सुदृढ करण्यासाठी पहिले म्हणजे स्टॅमिना, दुसरे शक्ती आणि तिसरे चपळता आवश्यक आहे. हे  सगळे योगामधून होणार नाही.  तरी योग हे उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. याला जोडून ५ कि.मी. तीव्र गतीने चालणे,  वजन उचलणे,  दंड बैठक घालणे जर केले तर शरीर आणि मन शक्तिशाली राहील. तेथून मग जीवनात आनंद निर्माण होईल. कारण माणसाचा आत्मविश्वास वाढतो.  पत्नीशी, मुलांशी, मित्रांशी संबंध चांगले होतात. कामाच्या ठिकाणी निर्णयक्षमता वाढते. सहकारी तुमच्या संतुलित वागण्यामुळे चांगली साथ देतात, परिणामतः तुमच्या कार्यात यश येते.

लेखक :  ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा. नं.   ९९८७७१४९२९

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS