अखेर जोतिरादत्त शिंदियानी काँग्रेस पक्षाला राम राम ठोकला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाले. ही गोष्ट कधीतरी होणारच होती. त्याचे मुख्य कारण म्हणजे काँग्रेसमध्ये निष्ठावंत, कर्तुत्ववान लोकांना लाथ मारली जाते, अपमानित केले जाते आणि पक्ष सोडण्यासाठी भाग पाडले जाते. जोतिरादत्त शिंदियाचे तसेच झाले. जोतिरादत्त शिंदिया व त्यांचे वडील माधवराव शिंदिया हे शिंदिया घराण्यातील मुख्य प्रतिनिधी काँग्रेसशी निष्ठावंत राहिले. त्या अगोदर माधवराव शिंदियाच्या मातोश्री ह्या भाजपच्या राष्ट्रीय नेत्या होत्या. इंदिरा गांधींनी राजे-राजवाड्यांचे मानधन रद्द केले व त्यांचे सर्व अधिकार काढून घेतले. म्हणून भारतातील बहुतेक राजे राजवाडे हे काँग्रेसच्या विरोधात उभे राहिले. त्यात विजयाराजे शिंदीया आणि त्यांच्या कन्या भाजपामध्ये गेल्या. त्याला काहीजण अपवाद ठरले. त्यातील प्रमुख म्हणजे माधवराव शिंदिया. माधवराव शिंदिया गेल्यानंतर त्यांची जागा जोतिरादत्त शिंदीयांनी अत्यंत धाडसाने त्यांचा वारसा चालवला. अनेकदा लोकसभेला निवडून आले. मंत्री झाले तरी त्यांना दाबूनच ठेवण्यात आले. माधवराव शिंदिया पासून जोतिरादत्त शिंदिया पर्यंत मी हेच बघितले. माधवराव शिंदिया हे राजीव गांधींचे मित्र समजले जायचे. मी सैन्यात असताना त्यांची मैत्री जवळून बघितली आहे. तीच परंपरा राजीव गांधींच्या हत्येनंतर माधवराव शिंदियानी चालवली. १९९१ ला नरसिंह राव प्रधानमंत्री झाले. त्यांचा मंत्रिमंडळात माधवराव शिंदिया हे पर्यटन मंत्री होते. त्यावेळी त्यांनी मला बरोबर घेऊन भारतातील प्रमुख पर्यटन स्थळांना भेट दिली होती. मी नविन खासदार होतो. त्यावेळी त्यांनी मला प्रचंड आधार दिला. यामुळे त्यांच्या घराण्याशी माझी जवळीक वाढतच गेली. ती आतापर्यंत जोतिरादत्त शिंदिया सोबत आहे.
नरसिंहरावच्या काळामध्ये सोनिया गांधींना आधार देणारे माधवराव शिंदिया हे प्रमुख होते. बाबरी मश्छिद पाडल्यानंतर काँग्रेसमध्ये नरसिंह राव आणि सोनिया गांधीमध्ये तणाव वाढला. दोन गट पडले. त्यावेळेस माधवराव शिंदीया आणि आम्ही ठामपणे सोनिया गांधीच्या बाजूने उभे राहिलो. त्या काळातच तरुण जोतिरादत्त शिंदियाबरोबर आमचा संबंध वाढला. पुढे नरसिंह रावना अध्यक्ष पदावरून काढण्यासाठी काँग्रेसमध्ये आम्ही तरुण खासदारांनी बंड उभे केले. त्यात माधवरावनी आम्हाला उत्तम साथ दिली. पुढे जाऊन सोनिया गांधींना काँग्रेसमध्ये अध्यक्ष करण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केला. त्यात देखील माधवराव शिंदीया सोनिया गांधी सोबत ठामपणे उभे राहिले. १९९८ साली सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या त्यावेळी माधवराव शिंदिया महासचिव झाले आणि मी सोनिया गांधींचे कार्यालय सांभाळणारा सचिव झालो.
देशात संपलेली काँग्रेस ही पुन्हा जिवंत झाली. त्यावेळी मी माधवराव शिंदियाबरोबर राजस्थानच्या निवडणुकीचा प्रभारी झालो. ६ महीने अथक प्रयत्न केल्यानंतर सर्व राज्यात ११९८ साली आम्ही निवडणुका जिंकल्या व काँग्रेसला उभारी आली. या काळात माधवराव शिंदिया व जोत्तिरादत्त शिंदीयाबरोबर आमचे संबंध आणखी दृढ झाले. याच काळात महाराष्ट्रात शरद पवार यांचे सोनिया गांधी विरोधात हालचाली वाढत होत्या. त्यावेळी महाराष्ट्रचा अध्यक्ष बनविण्याचा विषय आला मी सोनिया गांधी आणि माधवरावांना विनंती केली की प्रतापराव भोसले यांना अध्यक्ष करण्यात यावे, कारण शरद पवार हे पार्टी तोडू शकतात. म्हणून पार्टीला एकसंघ ठेवण्यासाठी निष्ठावंत असा अध्यक्ष झाला पाहिजे. सुरूवातीला माधवराव शिंदिया हे अनुकूल नव्हते, पण त्यांना समजावण्यात आम्हाला यश आले. राजेश पायलट सुद्धा महाराष्ट्राचे निरीक्षक होते ते देखिल अनुकूल नव्हते. पण माझ्या व्यक्तीगत संबंधामुळे शेवटी त्यांनी मान्य केले व प्रतापराव भोसले महाराष्ट्रचे अध्यक्ष झाले. त्यावेळी महाराष्ट्रात काँग्रेसला वाचवण्यात हा निर्णय फार महत्त्वाचा ठरला.
१९९८ ला शरद पवारानी पार्टी तोडली आणि सोनिया गांधी या विदेशी नागरिक आहेत असा आरोप केला. त्यावेळेला माधवराव शिंदिया हे पक्षाचे महासचिव म्हणून महाराष्ट्राचे प्रभारी होते. त्या नात्याने त्यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी होती. मी सोनिया गांधीचा सचिव होतो. या नात्याने आम्ही पक्ष सावरण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचा मोठा भाग महाराष्ट्रात सोनिया गांधीबरोबर राहिला. महाराष्ट्राच्या ज्या निष्ठावंतांनी पक्ष सावरला, त्यांना पक्षातून कुठल्या ना कुठल्या कारणाने बाहेर काढण्यात आले. जसे नारायण राणेला पक्षात घेऊन आम्हाला दूर करण्यात आले. आता पक्ष सोनिया गांधीच्या विरोधकांच्या ताब्यात आहे. ज्यांनी कुठलीही निवडणूक कधीही जिंकली नाही ते लोक आज पक्षाचे मालक झाले आहेत. हे लोक प्रचंड भ्रष्ट आहेत. तिकीट देण्यामध्ये, मंत्रीपद लादण्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होतो. जोतिरादत्त शिंदियाच्या पक्ष सोडण्यामध्ये हे प्रमुख कारण आहे.
११९८ ला सोनिया गांधी अध्यक्षा झाल्या त्यावेळी नरसिंह रावांच्या सगळ्या निष्ठवंतांना सर्व कार्यकारणीपासून दूर ठेवण्यात आले होते. पण अचानक या सर्वांना परत यामध्ये घुसवण्यात आले. त्यात आनंद शर्मा, अंबिका सोनी, प्रणव मुखर्जी असे अनेक सोनिया विरोधक पक्षाचे मालक झाले. त्यावेळी त्याचे कारण मला कळले नाही पण पुढे जाऊन एवढेच कळले की महाकाय खाजगी कंपन्यांचे हस्तक पक्षामध्ये मोठे पदाधिकारी झाले आणि सुरुवातीच्या काळात सोनिया गांधींना अध्यक्ष बनविण्यापासून पक्ष मजबूत करण्यापर्यंत आम्ही पाया खालचे दगड राबत होतो, ते दूर झाले. १९९९ च्या विधान सभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला आम्ही विजय मिळवून दिला. पण राष्ट्रवादीबरोबर आघाडी करावी लागली. या परिस्थितीमुळे निष्ठावंत पक्षाला अडचणीचे झाले, हळूहळू अरबांचा उंट तंबूत घुसला आणि मालकालाच चोर म्हणू लागला. ही प्रक्रिया पूर्ण भारतात चालू होती. दलाल, बडवे, पदाधिकारी झाले आणि निष्ठावान, कर्तुत्ववान कार्यकर्ते गुलाम समजले गेले. जसे कोकणात नारायण राणेना काँग्रेसमध्ये घेण्यात आले आणि पक्षाचे सर्व अधिकार त्यांना देण्यात आले. त्यांच्या पैशापुढे आमची निष्ठा अडचणीची ठरली. मी तर आमदारकीचा राजीनामा देऊन पक्ष सोडला.
अनेक लोक हळूहळू पक्षातून दूर झाले. जसे आमदार सुनिल देशमुख, भास्करराव खतगावकर, पुढे जाऊन पक्षाचा ह्रास होत गेला. पण कुणीही पक्ष वाचवण्यासाठी प्रयत्न केला नाही. यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत जे निवडून आले ते स्वत:च्या ताकतीवर निवडून आले. जंग जंग पछाडले अट्टाहास धरला हे सर्व नेतृत्वाला माहीत होते, तरी कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. मी काँग्रेसला सुचविले होते जोतिरदत्त शिंदिया यांना महाराष्ट्राचे प्रभारी बनवा. हे माहीत असून देखील त्या लोकांनी खडगेला पाठविले आणि महाराष्ट्र काँग्रेसची वाट लावली. जोतिरदत्त शिंदियांना उत्तर प्रदेशमध्ये पाठविले. जिथे काँग्रेसपक्ष निवडून येण्याची सुतराम शक्यता नव्हती. जोतिरदत्त शिंदियांना नेता म्हणून वाढविण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाने नेहमीच विरोध केला. कारण काँग्रेसमध्ये लोकप्रिय माणसाला दाबून ठेवण्यात येते आणि चमच्यांना नेते बनविण्यात येते. तसे पहिले तर हे सर्वच पक्षात आहे. कुठल्याही पक्षाला कर्तुत्ववान, विचारवंत, निष्ठावान, लोकांची गरज नाही. भाजपमध्ये सुद्धा आज अर्धे नेते काँग्रेसचे पुढारी आहेत. अनेक निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांची कत्तल घडविण्यात आली आणि आयाराम गयारामना नेते बनविण्यात आले. जशी काँग्रेसची वाट लागली तशी भाजपची वाट लागण्याची प्रक्रिया सुरू आहे. आज नारायण राणे गेल्यानंतर कोकणामध्ये काँग्रेसच शिल्लक राहिली नाही आणि अशा अनेक भागामध्ये एके काळचा प्रमुख पक्ष अदृश्य झाला आहे.
भारतीय लोकशाहीला हा प्रचंड मोठा धोका निर्माण झाला आहे. ज्याच्याकडे पैसा आहे तोच नेता बनत गेला. नीतीमता मानणारे भ्रष्टाचाराला विरोध करणारे लोक राजकरणात कालबाह्य होत चालले आहेत. त्यामुळे सर्व कारभार श्रीमंत भांडवलदारांच्या हातात गेला आहे. भांडवलदारांचे शत्रू, आमच्या सारखे खाऊजा धोरणाला विरोध करणारे लोक राजकारणातून लुप्त होत आहेत. राजकीय पक्षांना शूर धाडसी योद्धे नकोत तर हुजरे पाहिजेत. भारत देशाचे नेतृत्व आज हुजर्यांच्या हातात आहे, ज्यांना फक्त मुजरा करणे माहीत आहे. लोकांच्या प्रश्नासंबंधी आस्था असणारे लोक संपले आहेत. म्हणूनच शेतकरी, कामगार आणि सैनिकांच्या प्रश्नावर कुठलीही ठोस भूमिका घेतली जात नाही. पण अंबानी अडाणीचा आदेश तात्काळ मान्य केला जातो. ही विसंगती भारत विरोधातील प्रचंड षड्यंत्राचा भाग आहे. ‘स्वतंत्र विचाराचे नेतृत्व संपवून टाका आणि राज्य करा’ ही नवीन आंतरराष्ट्रीय राजकारणातील चाल आहे. हे वेळीच थांबले नाही तर भारत परिकीय शक्तीचा गुलाम होण्यास वेळ लागणार नाही. याचा विचार राष्ट्रभक्तांनी करावा आणि चमच्या चपट्याचे राजकारण वेळीच बंद करावे.
लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा ९९८७७१४९२९.