राष्ट्रीय सुरक्षेला सर्वात मोठा धोका_३.६.२०२१

११ सप्टेंबर २००१ ला अमेरिकेवर चार विमानांनी हल्ला केला.  न्यूयार्क मधील दोन सर्वात उंच इमारती ज्यांना ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ म्हणतात, त्या जमीनदोस्त झाल्या. तिसऱ्या विमानाने अमेरिकन सैन्याचे मुख्यालय वॉशिंगटन मधल्या पेंटागॉनवर हल्ला केला.  चौथे विमान अमेरिकन राष्ट्रपतीच्या घरावर हल्ला करणार होते, पण ह्या विमानातील प्रवाशांनी जबरदस्त संघर्ष दहशतवाद्यांवर केला आणि ते विमान वाटेतच जमीनदोस्त झाले.  अशाप्रकारचा हल्ला अमेरिकेवर कधीच झाला नव्हता. ही चार ही विमाने एका बॉम्ब सारखी वापरण्यात आली.  विमानातील पेट्रोलमुळे दहशतवाद्यांनी ताब्यात घेतलेलीही विमाने जेव्हा इमारतीवर धडकली तेव्हा आगीचा प्रचंड भडका उडाला. या इमारती जाळून खाक झाल्या आणि त्यातील जवळजवळ ३००० लोक मारले गेले. हा हल्ला ओसामा-बिन-लादेनने केला असे जाहीर झाले.  त्याविरोधात तत्कालीन राष्ट्रपती जॉर्ज बुशने अफगाणिस्तानवर हल्ला करायचे ठरवले.  त्यावेळेला तालिबानची राजवट अफगाणीस्तानवर होती.  ओसामा बिन लादेन त्यांच्या आश्रयाखाली राहत होता.  अमेरिका आणि त्यांचे सहयोगी देशांनी एक जबरदस्त हल्ला अफगाणिस्तान वर केला आणि तालिबानला पळता भुई थोडी झाली.

अफगाणिस्तानमधील जनतेने सुद्धा तालिबान विरोधात अमेरिकन सैन्याला मदत केली.  ह्यालाच ‘वॉर ऑन टेरर’ म्हणतात.  तालिबानने ड्रग्सवर बंदी घातली होती व बहुसंख्य शेतकरी व त्यांचे गुन्हेगार मालक  प्रचंड पैसा कमविण्यासाठी ड्रग्सवर अवलंबून होते.  ड्रग्सच्या डॉननी अमेरिकन सैन्याचे स्वागत केले. नंतर अमेरिकन सैन्याने पूर्ण अफगाणिस्तान वर कब्जा केला व ड्रग्सच्या उत्पादनाला चालना दिली.  हळूहळू तालिबानने देखील आपले धोरण बदलले व त्यांच्या कब्जात असलेल्या भागात ड्रग्सचे उत्पादन सुरू केले, आज बहुतेक अफगाणिस्तानचा प्रदेश तालिबानच्या कब्जात आहे. रशियाप्रमाणेच अमेरिकेचा दारुन पराभव झालेला आहे.  आता ११ सप्टेंबर, २०२१ ला येथून अमेरिका  पळ काढणार आहेत.  अफगाणिस्तान मधील अमेरिकन कब्जाचा परिणाम ड्रग्सच्या प्रचंड उत्पादनात झाला.  आज जवळ जवळ ९०% हेरोईन जगाला अफगाणिस्तान पुरवत आहे. लंडनमध्ये १ किलो हेरोईन ७ लाख रुपयाला विकले जाते.  ड्रग्सपासून प्रचंड पैसा निर्माण होतो. तो पैसा तालिबान आणि दहशतवादी गट आपली शक्ती वाढविण्यासाठी वापरत आहेत.

पुढे जाऊन अमेरिकेने पाकिस्तानमध्ये दडलेला ओसामा-बिन-लादेनला यमसदनाला पाठवले. गेली २० वर्ष अफगाणिस्तानमध्ये यादवी युद्ध सुरू आहे.  अमेरिकेने बसवलेली राजवट यशस्वी झाली नाही व अमेरिका तेथून पळून जात आहे.  पण ते कठीण आहे.  या अगोदर १९७९ साली अफगाणिस्तान सरकारने  मदत करण्यासाठी रशियन सैन्य अफगाणिस्तान मध्ये मागवले होते.  रशिया किंवा तेव्हाचा सोवियत संघाने प्रचंड सैन्य अफगाणिस्तान मध्ये घुसवले.  याला विरोध करण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानमध्ये जगातील सर्व दहशतवादी गटांना बोलावले व अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीने जिहाद पुकारला.  ओसामा-बिन-लादेन लष्कर-ए-तोयबाचे प्रमुख हफिज सय्यद आणि अनेक दहशतवादी गट निर्माण झाले.  त्यातील काही गट हे भारताविरुद्ध निर्माण करण्यात आले.  अमेरिकेने पाकिस्तानला भारताविरोधात दहशतवादी हल्ले करायला पूर्ण मदत केली आहे.  कारण अमेरिकेला पाकिस्तान सोवियत संघ किंवा रशिया विरोधात मदत करत होता. आज देखील तालिबानला आपल्या ताब्यात ठेवण्याचे काम अमेरिकेने पाकिस्तानला दिलेले आहे.  प्रचंड यादवी युद्ध झाले आणि रशियन सैन्याला माघार घ्यावी लागली. या पार्श्वभूमीवर अनेक टोळ्या यादवी युद्धात सामील झाल्या.  अफगाणिस्तानमध्ये प्रचंड हिंसाचार झाला.  महिलांवर उघड बलात्कार, खून, मारामारी, दरोडे सुरू झाले.  त्यात अनेक लोकांनी अफूची शेती करायला सुरुवात केली.  याचा फायदा पाकिस्तानने घेतला आणि अफगाणिस्तानमध्ये प्रचंड अफू निर्माण होऊन त्याची विक्री पाकिस्तानने सुरू केली.

दाऊद इब्राहिमला मोठा करून पूर्ण जगात अफगाणिस्तानचे ड्रग्स पुरवण्यात आले आहेत.  याचे सर्वात मोठे व्यापाराचे केंद्र मुंबई झाले आहे.  अफगाणिस्तान मधून पाकिस्तान मध्ये ड्रग्स येतात.  पाकिस्तान मधून काश्मिर, पंजाब, राजस्थानच्या वाटेने भारतात येतात.  पूर्वी हे ड्रग्स युरोपला पाठवण्यासाठी येत होते.  पण आता सर्वात जास्त सेवन पंजाबमध्ये होते आणि त्याच्यानंतर नंबर महाराष्ट्राचा येत आहे.  तरुण पिढी भ्रष्ट आणि नष्ट होत आहे.  या ड्रग्स मधून प्रचंड पैसा गुन्हेगारांना मिळाला व त्यांनी भारताच्या राजकारणावर सुद्धा ताबा घेतलेला आहे.  असे मी म्हणत नाही तर सर्व गुप्तहेर संघटनाची प्रमुख असलेली’व्होरा कमिटी’ म्हणते.  भारतामध्ये भ्रष्ट राज्यकर्ते, माफिया आणि भ्रष्ट नोकरशाहीचे समांतर सरकार राज्य करत आहे.

अफूमुळे आतंकवाद वाढतो, आतंकवादामुळे गुन्हेगारी वाढते.  हे दुष्टचक्र भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला सर्वात मोठा धोका आहे.  हा धोका माफिया, दहशतवादी आणि ड्रग्सचा तस्करी करणार्‍या संघटित गुन्हेगारांपासून आहे. लंडनला ड्रग्स विकल्यानंतर ते पैसे हवालाच्या माध्यमातून भारतात येतात. ‘हवाला’ हे काळापैसा पूर्ण जगात फिरविण्याच एक तंत्र आहे. लंडनमध्ये एका भारतीय व्यापर्‍याकडे ड्रग्स मधून मिळालेले पैसे देण्यात येतात. तो व्यापारी मुंबई किंवा गुजरातमध्ये आपल्या नातेवाईकाला सांगतो की त्याला लंडनमध्ये इतके पैसे मिळाले आहेत ते मुंबईमध्ये अमुक-अमुक व्यक्तिला देण्यात यावेत. अशाप्रकारे प्रचंड काळापैसा भारतात येत आहे. दुसरीकडे हा पैसा लंडनच्या बँकेमध्ये वेगवेगळ्या खात्यावर ठेवला जातो. तेथून मॉरिशियसमध्ये येतो.  मॉरिशियसमध्ये १५००० खोट्या कंपन्या आहेत, त्या कंपनीच्या खात्यात हा पैसा जमा होतो. मग तिथून पैसा भारतीय कंपन्यांमध्ये पोहोचवला जातो.  अशाप्रकारे गुन्हेगारी, भ्रष्टाचारातून निर्माण झालेला आणि ड्रग्स मधून निर्माण झालेला पैसा पांढरा होतो. त्या भारतातील कंपनीमध्ये या गुन्हेगारी पैश्यामुळे प्रचंड फायदा होतो.  हा फायदा कुठलेही कर न भरता मॉरिशियसमध्ये पैसा ठेवला जातो.  भारतात कर भरले जात नाहीत व मॉरीशियसमध्ये तर करच नाही.  म्हणून या जगातील असंख्य कंपन्या ह्या फ्रॉड करत आहेत. त्यामुळे भारतामध्ये चांगली हॉस्पिटल सरकारला बनवता येत नाहीत.

भारतात येणारा परदेशी पैश्यापैकी ४३% पैसा हा मॉरिशियस मधून येतो. २४%टक्के पैसा सिंगापूरमध्ये येतो.  हा कुठला पैसा आहे हे सर्वांनी ओळखावे. हा गुंडांचा, माफियाचा आणि चोरांचा पैसा आहे.  हा भ्रष्टाचारा मधून निर्माण झालेल्या प्रचंड पैसा आहे.  यालाच मोदी साहेबांनी म्हटलं होतं की हा पैसा मी भारतात परत आणणार.  जवळ जवळ ९०लाख कोटी रुपये परदेशात भारताचे आहेत, असे पंतप्रधान मोदीनी म्हटले होते. त्यानंतर अनेक भानगडी झाल्या आहेत.  विजय मल्ल्या, चोक्षी – ज्याने पंजाब नॅशनल बँक बुडविली, ललित मोदी, हर्षद मेहता असे अनेक कांड झालेले आहेत. श्रीमंत लोक, चोर, लुटारू प्रचंड पैसा लुटत आहेत.  परदेशी खोट्या कंपन्यामध्ये, बँकामध्ये हा पैसा सर्रास जात आहे.  नुकतेच जगातील सर्व पत्रकारांनी ही जागतिक भानगड पनामा पेपर्स आणि पॅराडाईस पेपर्समधून उघडकीस आणली. यात अमिताभ बच्चन, ऐश्वर्या रॉय सकट अनेक राजकीय नेते, उद्योगपती आणि माफियाची नावे आली आहेत. २०१६ पासून हे प्रकरण चालू आहे. परंतु, कुणावरही कारवाई झाली नाही.  हे सर्व प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे.  पण सरकार तर्फे हालचाल नाही.  जर पंतप्रधान मोदींना खरोखर हा पैसा भारतात आणायचा असेल तर या सगळ्या १५०० लोकांवर ताबडतोब कारवाई करण्यात यावी. पनामा पेपर्स आणि पॅराडाईस पेपर्सने चोरी उघडकीस आणल्यामुळे इंग्लंडच्या पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला.  पाकिस्तान पंतप्रधान नवाज शरीफ तुरुंगात गेले. असे अनेक लोकांवर जगभर कारवाई झाली आहे. पण भारतात एकावरही नाही.

सुशांत सिंग याने आत्महत्या केल्यावर त्याची मैत्रीण रिया यांनी बॉलीवुडमध्ये असणारी ड्रग्सची पकड उघडकीस आली.  नॅर्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) चे महाराष्ट्राचे प्रमुख समीर वानखेडे यांनी अनेकांना पकडले आणि तुरुंगात डांबले.  त्यांच्यावर हल्ले पण झाले. पण ते अजून डगमगले नाहीत. मी नुकतेच महाराष्ट्र पोलिसचे महासंचालक संजय पांडे यांना भेटलो व विनंती केली की, गुन्हेगारीचे सर्वात मोठे काम ड्रग्स आहे.  तरी सगळ्या गुप्तहेर संघटनाना एकत्र आणावे, त्याचे कृतिदल बनवावे व महाराष्ट्राला ड्रग्स आणि गुन्हेगारीपासून मुक्त करावे. कारण हा सर्वात मोठा राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे. मी गुप्तहेर संघटनेत काम केल्यापासुन मला हेच दिसते की, भारतातील प्रमुख गुप्तहेर संघटना जसे RAW, IB, CBI, NCB, Income Tax, ED, Military Intelligence (MI) व इतर अनेक संघटनाना एकत्र आणणे आवश्यक आहे. कारण सद्या ते एकमेकांविरोधात काम करतात व देशाच्या शत्रूबरोबर संघटितपणे लढत नाहीत.  ही सर्वात मोठी भारतीय सुरक्षा यंत्रणेची कमी आहे. दुर्दैवाने अनेक वर्षे ही बाब चर्चेत येऊन सुद्धा निर्णय झालेला नाही.  कारण ड्रग्स पासूनच जो पैसा निर्माण होतो त्यातून दहशतवाद पुढे येतो.  ड्रग्सचा व्यापार करणारे संघटित गुन्हेगार दहशतवादाला पूर्ण शक्ती देतात. त्यात पाकिस्तान ISI पुर्णपणे गुंतलेला आहे.  याचा पाकिस्तानलाही प्रचंड त्रास होत आहे. म्हणून सरकारने सर्व गोष्टी बाजूला ठेवून या सर्व संघटनाना एकत्र आणून ड्रग्स विरोधात एक निर्णायक लढा उभा केला पाहिजे.

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

Please follow and like us:

Author: Brigadier SS