व्यवस्था परिवर्तन – युगांतर_६.८.२०२०

जग झपाट्याने बदलत आहे, करोनामुळे तर मानवात अनेक बदल घडले. आपल्याला वाटते कि जो काही बदल घडतो आहे तो कुणीतरी करतोय. पण तसं नाही.  मानवाच्या उत्क्रांती मध्ये वेगवेगळे टप्पे येऊन गेले आणि काही बदल असे होते की त्यांनी पूर्ण व्यवस्था उलथून टाकली. याचा अर्थ असा नाही की धर्माने काही बदलले. येशू ख्रिस्त याचा जन्म झाला, बुद्धांचा जन्म झाला, मोहम्मद पैगंबरचा जन्म झाला.  धर्माने काही बदल घडला असे नाही सिकंदर नेपोलियन यांनी जग बदलले, पण तसं नाही. मानवाच्या उत्क्रांती मध्ये पहिला टप्पा आपल्याला दिसतो की मानव हा जंगलात रहायचा, शिकार करायचा, टोळ्याने रहायचा, मिळवायचा ते वाटून घ्यायचा. त्यावेळी मानव शिकारी होता आणि जे काय निसर्गात मिळायचं ते गोळा करायचा आणि त्याचा वापर करायचा.

अचानक काय झालं की तो बदलला कधीतरी दहा हजार वर्षापूर्वी एका गुहेत गरोदर स्त्री राहत होती.  तिने काही दाणे जमिनीवर फेकले या दाण्यातून हजारो दाणे निर्माण झाले. अचानक मानवाला दिसले आपण काही पेरल्यावर काही उगवते  आणि कृषी तंत्रज्ञानाचा जन्म झाला. कृषीमुळे मानव एका जागी राहिला. त्यांनी घर बांधलं अशा अनेक घरांची गाव झाली. नवीन संस्कृतीचा जन्म झाला.  त्या गावात कुणीतरी राजा झाला. त्यावेळी निसर्गामध्ये काही अद्भुत प्रकार घडायचे वनवा पेटायचा, धो धो पाऊस यायचा, निसर्गाचा हा खेळ मानवाला उमगत नव्हता.  हे सर्व कसं घडतंय हे कळत नव्हतं. त्यातूनच देव निर्माण झाले म्हणूनच जगात सगळीकडे सूर्यदेव, चंद्रदेव, वायुदेव, अग्निदेव असे देवांची पूजा वेगवेगळ्या पद्धतीने लोक करू लागले. ह्या देवांचे रहस्य सांगायला एक पुजारी नावाचा प्राणी जन्मला,  देऊळ निर्माण झाले. पुढे जाऊन तुम्ही बघाल युरोपमध्ये धर्माचा इतका प्रसार झाला प्रचंड मोठी देवळे, मस्जिद, चर्च बनले. म्हणजे चर्च तुम्ही बघता. मग सगळीकडे देऊळ मस्जिद वेगवेगळ्या प्रकारचे धर्म निर्माण झाले आणि मानवाला त्या धर्मावर आधारित एक जीवनाची पद्धत मिळाली.

राजकारणात राजेशाही निर्माण झाली.  उच्च लोक, राजे, जमीनदार, पाटील रयतेवर राज्य करू लागले. अर्थव्यवस्थाच पूर्ण जमिनीवर आधारित होती आणि म्हणून या काळामध्ये जमीन ही संपत्ती होती. सम्राट अशोकाच्या काळामध्ये भारतामध्ये स्थैर्य आले. एक राष्ट्र घडलं. व्यापारामध्ये भारताचा हिस्सा जवळजवळ ४२ टक्के होता, त्यामुळे कमालीची समृद्धी या देशांमध्ये आली. ही सर्व शेतीवर आधारित होती. पण ही राजवट फार काळ टिकली नाही, कारण देशाच्या सीमा किंवा राज्याचा सीमा या कायम नव्हत्या. मोठ्या राष्ट्रावर नियंत्रण करणे कठीण होते.  म्हणून या राष्ट्रांच्या सीमा बदलत होत्या.  समाजाची वाटणी राज्यकर्ते, शेती करणारी रयत आणि गुलाम. भारतात याची विभागणी जाती व्यवस्थेत झाली. अर्थात ही का झाली यात मी जात नाही त्यात धार्मिक कारण सुद्धा आहेत.  पण मूळ कथा राजाची आहे त्यांना गुलामांची गरज होती.  फुकट काम करणारे लोक म्हणजेच गुलाम आणि दुसरी शेतकरी जात होती. शेती त्याच्या मालकीची नव्हती ती शेती जमीनदाराच्या मालकीची होती. शेतकरी कसायचा आणि जवळजवळ अर्धा वाटा तो  राज्यकर्त्यांना वाटायचा. ही अर्थव्यवस्था होती. एकाच वेळी तो गरीब शेतकरी आपला वाटा वेगवेगळ्या राजांना द्यायचा. तलवारीच्या जोरावर राष्ट्र चालायचे, व्यवस्था चालायची. जंगल राज ऐसा देश.म्हणून सामान्य माणसाची स्थिती अत्यंत वाईट होती.

छत्रपती शिवराय लोक कल्याणकारी राजे चुकून झाले.  वास्तवात लोकांचे पिळवणूक करणारे राजे जास्त आहेत. लोक कष्ट करायचे ते स्वतःसाठी अन्न पिकवायचे. खाण्यासाठी फार कमी उत्पादन करायचे. बाजारपेठा या छोट्या-छोट्या होत्या. व्यापारी पण फार कमी होते. शतकानुशतके खितपत पडलेला मानव मुक्तीसाठी आक्रोश करत होता.  अचानक १६५० मध्ये काहीतरी घडले.  इंग्लंडमध्ये लोकसभा आणि राजांमध्ये संघर्ष पेटला.  जवळ जवळ चार वर्ष यादवी युद्ध झालं. राजाचा अधिकार काय आहे,  ह्या वर पहिल्यांदाच जगात चर्चा झाली.  राजाला पकडण्यात आले, त्याच्यावर खटला चालला आणि १६४९ मध्ये लंडनमध्ये त्याला सुळावर लटकवण्यात आले आणि लोकांचा राजाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला.  मानवी हक्काची कल्पना निर्माण झाली आणि राजा आणि प्रजा कल्पनेत तरी पहिल्यांदाच विभागली गेली.

ह्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज एकोणीस वर्षाचे होते, त्यांनी हा खेळ दुरून बघितलाच आणि त्याचे परिणाम ही बघितले आणि त्या अनुभवातूनच एका नवीन राजवटीची निर्मिती झाली.  कदाचित असे अनेक ठिकाणी झाले असेल, पण शत्रूच्या स्त्रीचा सन्मान करणे ही कल्पना जगामध्ये पहिल्यांदाच दिसली. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असा आदेश पहिल्यांदाच जगामध्ये निर्माण झालेला दिसतो,  नाहीतर राजा हा देवाचा अवतार आहे हे जगामध्ये सगळीकडे मान्य झाले होते.  धर्म जरी अनेक निर्माण झाले पण राजवट ही राजेशाहीची होती. पूर्ण जगामध्ये स्त्री म्हणजे पुरुषांची दासी.  यांना काहीच हक्क नाही ही कल्पना सर्व धर्मांमध्ये होती. पण असे काय झाले ही सगळी व्यवस्था उखडून टाकण्यात आली. अनेक नवीन व्यवस्थाचा जन्म झाला.  मी या नवीन व्यवस्थेला छत्रपती शिवरायांनी सुरुवात केली असे समजतो, त्यातूनच मराठा साम्राज्य निर्माण झाले. पुढे शिवरायांची तत्व किती चालली किती नाही त्याच्यावर मी चर्चा करत नाही,  पण हा बदल घडला. 

जुने राजेशाही व्यवस्थेच्या लाटेवर नवीन औद्योगिक व्यवस्थेची लाट धडकली आणि जग उलथे पालथे झाले. १७१२ ला स्टीम इंजिनची निर्मिती झाली, जसा कृषी संस्कृतीचा जन्म झाला आणि पूर्ण जग बदललं तसाच स्टीम इंजिनचा जन्म झाला आणि जग बदललं. स्वयंचलित यंत्रामुळे फॅक्टरी निर्माण झाली आणि औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांतीत इतका बदल झाला की, शेती करणारा मानव लाखोने शहराकडे धडकला.  मोठमोठी शहरे निर्माण झाली. कोकणातला माणूस हा मुंबईत स्थायिक झाला. कोकणामध्ये फक्त वृद्ध, स्त्रिया व लहान मुले उरली. ही स्थिती पूर्ण जगात झाली. औद्योगिक संस्कृती आणि समाज निर्माण झाला. त्यातूनच राजकारणात प्रंचड बदल झाले, जे फॅक्टरीचे मालक होते ते प्रचंड श्रीमंत झाले, यांच्याकडे राज्यापेक्षा मोठा पैसा आला म्हणून राजाच्या विरोधात हे मालक उभे राहिले.  राजाला कर का द्यायचा? हा प्रश्न निर्माण झाला आणि मानवी हक्काचा मंत्र आणि त्यातूनच लोकशाहीची कल्पना निर्माण झाला. पहिल्यांदाच अमेरिकेमध्ये इंग्लंड विरोधात स्वतंत्र  युद्ध सुरू झालं, याला कारणीभूत अमेरिकेतील उत्तर-पूर्व भागात निर्माण झालेल्या फॅक्टरी, इंग्लंडच्या राजवटीला झुगारून अमेरिकन लोकशाहीचा जन्म झाला.  यावेळी बिल ऑफ राइट्स आणि अमेरिकन घटना बेंजामिन फ्रेंक्लिनने बनवली. त्या काळामध्ये लोकशाहीचा, स्वातंत्र्याचा, मानवी हक्काचा सिद्धांत उभा राहिला.  त्यावर अनेक ठिकाणी जगात क्रांती झाली.  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची घटना लिहिली या सगळ्या घटना घडत आल्या. अमेरिकन क्रांतीनंतर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या तत्त्वावर फ्रान्समध्ये क्रांती झाली, पण ती हिंसक होती.  पूर्ण जमीनदारांचे राजा-राजे यांना पॅरिसच्या रस्त्यावरून ओढत नेऊन शरीर धडापासून वेगळे केले आणि एक नवीन राजवट येऊ घातली. पण ती कशी चालवायची हे माहीत नसल्यामुळे आणि व्यक्ती यावर सिद्धांत उभे राहिल्यामुळे ते अपयशी ठरली, पण त्यातून एक साधारण कुटुंबातला माणूस ‘नेपोलियन’ हा फ्रान्सचा राजा बनला.

नेपोलियन यांने जगावर राज्य करायचा प्रयत्न केला. युरोप पादाक्रांत करत त्याने रशियावर हल्ला चढवला आणि अपयशी झाला.  काही काळाने त्याची राजवट संपुष्टात आली.  औद्योगिक क्रांतीने  समाज बदलून टाकला आणि जून विरुद्ध नवीन याचा लढा सुरू झाला. प्रत्येक बाबतीत मग ते लग्न पद्धती असू द्या, स्त्री-पुरुषाचे संबंध असून द्या, मुलांचे आणि पालकांची संबंध असू द्या, शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे संबंध असू द्या, भांडवलदार, कारखानदार आणि कामगार यांचे संबंध असू द्या, संस्कृती पार बदलून गेली आणि ते का झालं याचा मागोवा आपण घेत आहोत.

स्टीम इंजिनची निर्मिती हा जगातील प्रचंड धमाका होता. एक बॉम्बस्फोट झाला त्यांने जगाला हादरून टाकल. त्याने मानवाच्या संस्कृतीला काढून टाकले आणि एक नवीन संस्कृतीचा उदय झाला. लाखो लोकांच्या जीवन पद्धती बदलल्या. त्या अगोदर  कृषी संस्कृतीमध्ये आपल्याला जगातील लोकसंख्याला दोन गटांमध्ये विभागता येते. एक आदिवासी गट जो शिकारीच राहिला आणि दुसरे पुढारलेले लोक. प्राचीन लोक हे शिकार करायचे, मासेमारी करायचे, निसर्गातले उत्पादन गोळा करायचे. या लोकसंख्येला कृषी क्रांती वगळले. अंदमानमध्ये असे लोक अजूनही आहेत त्यांना रेडिओ सुद्धा माहिती नाही.

दुसरे एक जग निर्माण झाले जिथे-जिथे कृषी प्रस्थापित झाली तिथला मानव हा जमिनीबरोबर जोडला गेला.  त्यातच संस्कृती निर्माण झाली.  भारत, मेक्सिको, ग्रीस, रोम अशा वेगवेगळ्या संस्कृती निर्माण झाल्या. एकमेकाशी लढल्या, अदृष्य झाल्या. काही पुढे गेल्या.  आपल्याला दिसताना या संस्कृती वेगळ्या वाटतात, पण एक अंतर्भूत असे साम्य आहे.  जमीन ही सर्व अर्थव्यवस्थेचा पाया होती.  राहणीमान, संस्कृती, कुटुंब व्यवस्था, राजकारण या सर्वांमध्ये गाव हे मूळ व्यवस्था होती.  जनतेचे वर्गीकरण वेगळ्या जाती-जमातींमध्ये झालं.  काही पुजारी झाले,  काही गुलाम झाले, काही शेतकरी झाले पण या सर्वांमध्ये राज्य करण्याची पद्धत ही हुकूमशाही पद्धत राहीली.  जन्माच्या आधारावर प्रत्येकाचे स्थान निश्चित करण्यात आले, पण सर्व क्षेत्रामध्ये अर्थव्यवस्था मात्र विकेंद्रित होती.  स्वतःच्या गरजा भागवण्या पुरती अर्थव्यवस्था होती. अर्थात त्याला अपवाद होते. ग्रीस आणि रोम मध्ये मोठे उत्पादन करणाऱ्या फॅक्टरी निर्माण झाल्या होत्या.  पण कृषी संस्कृतीमध्ये मानव हा भरडला गेला. उपासमारीने, रोगराईने, उद्धवस्त होत राहिला. तेथून औद्योगिक क्रांतीमध्ये एक नविन विश्व निर्माण झाले. ह्या दुसऱ्या परिवर्तनाच्या लाटेने जग उलथून पालथून टाकले. त्याची चर्चा पुढील भागात करू.

ब्रिगेडियर. सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा नं . ९९८७७१४९२९

Please follow and like us:

Author: Brigadier SS