जेव्हा सैनिक शत्रूवर हल्ला करण्यास सिद्ध होतो. सैन्य शत्रूच्या खंदकापासून २०० मीटर वर पोहचते. सैनिक रायफलवर संगीन चढवतो आणि मृत्यूच्या अग्नीकुंडात उडी मारतो, तेंव्हा तो एकटाच असतो. समोरून येणाऱ्या मशिनगणच्या गोळ्या अंगावर झेलत तो शत्रूवर तुटून पडतो. तेंव्हा गरजतो “बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय”. मृत्यूच्या दाढेत उतरताना असे काय त्या जयघोषात आहे कि त्याला भितीमुक्त करते, प्रेरित करते. देशासाठी मर मिटायला तयार करते. “जय शिवाजी!” म्हणताच माणूस पवित्र होतो. देशासाठी, समाजासाठी कटिबध्द होतो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय दिले? तर आदर्श दिला. जगण्याचा मार्ग दाखवला. ते ही भाषणातून नव्हे तर कृतीतून. शिवराय स्वतः पुढे असायचे. आपल्या सैनिकापेक्षा मोठा धोका पत्करायचे. अफजल खानला सामोरे जाताना मृत्यू स्पष्ट दिसत होता, पण आपल्या बुद्धी कौशल्याने त्यांनी असा सापळा रचला की अफजल खानला तर ठार केलच, पण त्याच्या सैन्याचाही फडशा पाडला. शाहीस्तेखानला पळवून लावले, त्याच्या मनोबलावर हल्ला करून. नाहीतर शाहीस्तेखानचे सैन्य अबादित होते. पण शिवरायांच्या हल्ल्याने तो इतका गर्भगळीत झाला की तो दिल्लीला पळून गेला. त्याप्रमाणेच मिर्झा राजे जयसिंगच्या हल्ल्यात शिवरायांनी २ पावले मागे घेतली. शत्रुची शक्ती ओळखून त्यांनी तह केला. वेळ मारून नेली व पुन्हा सर्व शक्तिनिशी उभे राहिले. पराभवाला विजयात परिवर्तित करण्याला असामान्य गुणवत्ता लागते. शिवरायात ती होती. एका उत्कृष्ट सेनापतीला युद्धशास्त्राप्रमाणे शत्रुची पूर्ण माहिती असावी लागते व आपल्या शक्तीचा खरा अंदाज असावा लागतो. केवळ शौर्य विजय मिळवून देत नाही. राजपुतांकडे शौर्य भरून होते. पण युद्धशास्त्र नव्हते. जगातील अनेक योद्ध्यांशी तुलना करताना स्पष्ट होते की, शिवरायांनी प्रत्येक वेळी वेगवेगळे युद्धशास्त्र वापरले. त्यांच्या युद्धनितीला सर नाही. शत्रूला समजुच शकले नाही की शिवराय काय करतील. गतिमान युद्धाचे ते जनक होते. ठिकठिकाणी मजबूत गड चौक्या बनविले. तिथे घोडदळठेवले. शत्रू असताना, अचानक आपल्या तळातून मराठे बाहेर पडायचे आणि शत्रूवर हल्ला करून परत सुरक्षित ठिकाणी लपायचे. हे तंत्र शिवरायांनी आणि नंतर औरंगजेबाला नामोहरम करताना मराठ्यांनी अत्यंत परिणामकारक पद्धतीने वापरले.
आग्र्याहून सुटका झाल्यावर शिवरायांनी ताडले की, औरंगजेब महाराष्ट्रात उतरणार. आपल्याला महाराष्ट्रात मुकाबला करता येणार नाही. म्हणून स्वराज्याला खोली (Depth) देण्यासाठी त्यांनी दक्षिण स्वारी केली. थेट तामिळनाडुपर्यंत मजबूत चौक्या बांधल्या. घोडदलाला मुक्त छोट्या टोळ्यात ठेवले. औरंगजेबसाठी सापळा तयार केला. औरंगजेबचे मोठे सैन्य त्यांनी खाली खेचायचे नियोजन केले आणि शत्रूला विस्कळीत करून छोट्या छोट्या तुकडीत फोडून घेरायचे. घोडदळ अचानक हल्ला करायचे. ह्या तंत्राचा उपयोग संभाजी राजे, राजाराम राजे आणि ताराराणीने केला. औरंगजेबास संभाजी महाराजांनी जेरीस आणले. कुठेच यश मिळू दिले नाही. पण स्वार्थी, घातकी स्वकियानी संभाजी महाराजांचा घात केला. संभाजी महाराजांना अत्यंत क्रूरपणे मारले. अशी यातना जगातील कुठल्याही राजांनी भोगली नसेल. पण देशासाठी जो त्यांनी त्याग केला त्यातूनच क्रांतीची योद्धे निर्माण झाले. मराठे सूड घेण्यासाठी पेटून उठले. उभा महाराष्ट्र जिवंत झाला. राजाराम महाराजांनी आपली राजधानी जिंजीला नेली, औरंगजेबाचे सैन्य विखुरले गेले. मावळ्यांनी त्वेषाने जागोजागी मोगल कापले. मोगली सेनेचे मनोबल तुटले. ताराराणीने सुद्धा तेवढ्याच गतीने हल्ले चालू ठेवले. अखेर औरंगजेबाला आपला देह महाराष्ट्रातच ठेवावा लागला.
२७ वर्ष मावळे लढले, ते शिवरायांच्या युद्धशास्त्राने. शिवरायांनी आपल्या कुटुंबाला आणि सैन्याला असे तयार केले की मावळ्यांनी बलाढ्य औरंगजेबाला विकलांग केले. त्यानंतर मराठा राज्य पूर्ण देशात राज्य करू लागले. खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र झाला. म्हणूनच भारताचा पहिला स्वतंत्र लढा हा मराठ्यांचा २७ वर्ष औरंगजेबाविरुद्धचा लढा आहे. त्याच लढ्याने भारतीयांच्या मनात स्वातंत्र्यासाठी लढण्याची ऊर्मी निर्माण केली. परकीय आक्रमणे झुगारून स्वतःचे स्वातंत्र्य आबादीत ठेवण्याची ऊर्जा निर्माण केली.
शिवरायांचे राज्य म्हणजे केवळ युद्ध नव्हे तर आजच्या राज्यकर्त्यांना एक आदर्श आहे. शिवरायांनी आपल्याला शिकवले की राज्य हे लोकांच्या कल्याणासाठी आहे. राजसत्ता भोगण्यासाठी नव्हे. लोकांना आनंदी आणि संपन्न करण्यासाठी आहे. स्वतः अब्जोपती होण्यासाठी नव्हे. शिवरायांनी सर्व जहागिरी, वतने खालसा केली व सर्व रयतेला सन्मान दिला. समतेच्या राज्याची संकल्पना रोवली. आज १०६ अब्जोपतींच्या ताब्यात भारताच्या अर्थसंकल्पापेक्षा जास्त संपत्ती दिली आहे. मोदी व ठाकरे साहेबांनी हे लक्षात ठेवावे. रयतेचे राज्य म्हणजे संविधांनाचेराज्य आहे. शिवरायांनी सर्वांच्या हितासाठी कायदे म्हणजेच संविधान बनवले. समता, न्याय आणि बंधुत्व त्याचा आत्मा होता. तेच संविधान भारतीय संविधानात आहे.
शिवरायांनी सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी पुरुष आणि महिलांसाठी स्वराज्य बनवले. त्यांनी स्त्रियांसाठी सगळ्यात पहिल्यांदा स्थान निर्माण केले. स्त्रियांना योद्धा बनवले, म्हणूनच २५ वर्षाची विधवा सून घोड्यावर बसून थेट औरंगजेबावर हल्ला करू शकली. त्या मर्दानी ताराराणीचे इतिहासातून मनूवाद्यांनी मिटवून टाकली. कारण मनुवादामध्ये स्त्रीयांचे काम हे चूल आणि मूल एवढेच आहे. म्हणूनच १९९१ मी लोकसभेत मागणी केली की भारतामध्ये अशी स्त्री योद्धा झाली , मग आज स्त्रियांना सैन्यात जागा का नाही? या माझ्या मागणीला सर्वांनी पाठिंबा दिला व १९९२ पासून स्त्रिया सैन्यात येऊ लागल्या. पण सैन्यांनी स्त्रियांना त्यांची योग्य जागा मिळू दिले नाही. मी मागणी केली होती की स्त्रियांना जवान देखील बनवा, फक्त अधिकारी नको. पण सैन्य दलाने ते मान्य केले नाही व आज सरकार सुप्रीम कोर्टात मांडते की स्त्रियांना नेतृत्व (Command) करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले नाही. मी पहिले आहे की हे मुद्दाम करण्यात आले आले. जर स्त्रियांची १०० जवानांची तुकडी बनविण्यात आली, तिचे नेतृत्व स्त्री अधिकार्यांना दिले तर आपोआप नेतृत्वाचे प्रशिक्षण मिळेल व स्त्रिया Command करू शकतील. सरकारच्या विरोधात जाऊन सर्वोच्च न्यायालयाने स्त्रियांना कायम नोकरीत ठेवण्याचे आदेश दिले. या बद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार. माझा विश्वास आहे की स्त्रिया लढू शकतात, त्या नेतृत्व करू शकतात त्यासाठी मनुवादात अडकलेली वैचारिक वाईथक पुरूषांना सोडावी लागेल व शिवरायांसारखेच स्त्रीला तिची योग्य जागा मिळवून द्यावी लागेल. शिवरायांनी आपल्याला तेच उद्दीष्ट दिले आहे. जर शिवरायांचे खरे मावळे असाल तर ते राज्य निर्माण करा मगच “शिवाजी महाराज की जय” म्हणा.
लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा ९९८७७१४९२९.