नुकतेच केंद्र सरकारने मुख्य पिकांना दिडपट हमीभाव देण्याचा निर्णय घेतल्याचा दावा केला. परंतु पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. यामध्ये पिकांचा सर्वसमावेशक उत्पादन खर्च धरलेला नाही. सर्वसमावेशक खर्च म्हणजे सर्व निविष्ठा, शेतकरी व त्याच्या कुटुंबाच्या श्रमाचे मुल्य यासोबत जमिनीचे भाडे, यंत्रसामग्री व इतर भांडवली गोष्टींवरील व्याज. निवडणुकीच्या वेळी त्यांनी सर्वसमावेशक खर्च धरुन हमीभाव देण्याची घोषणा केली ती हवेतच विरली व त्या आश्वासनाला सरकारने हरताळ फासला आहे.
यवतमाळ येथे ४० शेतकरी फवारणी करताना मारले गेले अशी प्रचंड शोकांतिका होऊन सुद्धा महाराष्ट्र हादरला नाही. नेहमीप्रमाणे नेते मगरीचे अश्रू ढाळत फिरले. पण शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेवर कायमस्वरूपी उपाय काढण्यास कोणी पुढे आले नाही. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी काय केले पाहिजे? हे कुणी बोलत नाही. काही साधे विषय आहेत. जसे, खतावर अनुदान देण्यासाठी भारत सरकार रु.८०००० कोटी खत कंपन्यांना देत आहे. ते रद्द केले पाहिजे. तोच पैसा शेतकऱ्यांच्या सरळ बँक खात्यात टाकला पाहिजे. रासायनिक खतावर बहिष्कार,रासायनिक किटकनाशकांवर बहिष्कार केल्यास शेतकर्यांचा उत्पादन खर्च ७०% कमी होतो. त्यामुळे शेतकऱ्याला कर्ज घ्यावे लागत नाही. पिकाचे चांगले वाईट काही झाले तरी नुकसान फार होत नाही. वाशीम जिल्हयातील जामदार गावात मी शेतकर्यांना रासायनिक खत आणि कीटकनाशक बंद करायला सांगितले व नैसर्गिक शेती करायला सांगितली. शेतकर्यांनी बंद केली. पण नैसर्गिक शेती सुद्धा केली नाही. दुर्दैवाने पाऊसच नव्हता. म्हणून पिक निट आले नाही. नुकसान झाले, पण फार कमी झाले. म्हणून झळ पोहोचली नाही.
ह्या बाबींची विस्तृत चर्चा मुंबईत झाली. पद्मश्री सुभाष पाळेकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली,पद्मभुषण विजय भाटकरजीनी चर्चा सत्राचे उद्घाघाटन केले. शेती तज्ञ श्री. रमेश ठाकरेनी “शेती काल, आज आणि उद्या” ह्या विषयावर विस्तृत मांडणी केली. त्याच विषयावर पुस्तकाचे अनावरण झाले. एकंदरीत पुढील वाटचाल निश्चित करण्यात आली. सर्वात मोठा मुद्दा विषमुक्त अन्नाच्या उत्पादनावर भर देण्यात आला. रसायनिक खते आणि किटकनाशकांचे समूळ उच्चाटन भारताच्या शेतीमधून करणे हे प्रथम लक्ष ठेवण्यात आले. महाराष्ट्रातील जवळजवळ ३०००० शेतकऱ्यांनी नैसर्गिकरीत्या शेती यशस्वी केल्याचे निदर्शनात आले. अनेक शेतकऱ्यांनी आपले अनुभव कथन केले. नैसर्गिक शेतीचे उत्पादनाचा भाव शेतकरी ठरवतो आणि दाम दुप्पट किंमत मिळते. ह्या सर्व यशाची गाठ वेबसाईट वर घालण्यात येत आहेत. शुन्य खर्च नैसर्गिक शेती (ZBNF) ह्या सिद्धांतावर विश्वास ठेवणे कठीण आहे. म्हणून प्रत्यक्ष बघणे हाच मार्ग आहे, असे ठरले. शाश्वत शेती हा एकमेव मार्ग भविष्यातील शेतीसाठी विकसित करणे हेच ZBNF चे उद्दिष्ट आहे.
ZBNF चे शास्त्र हे जंगलावर आधारित आहे. जंगलात कुणी खत घालत नाही. कुणी पाणी देत नाही. पण जंगल वाढतच राहते. तसेच शेतीत सुद्धा खत घालण्याची गरज नाही. १ एकरासाठी २०० लिटर पाण्यात १० किलो देशी गायीचे शेण, ५ लिटर गोमुत्र, १ किलो काळा गुळ आणि १ किलो बेसन, मुठभर माती याचे मिश्रण करायचे २ दिवस सावलीत ठेवणे. ७ दिवसाच्या आत वापरणे. असे जीवामृत बनते. ते १५ दिवसातून एकदा फवारणी किंवा इतर सिंचनाच्या पद्धतीनी शेतात वापरायचे. आम्ही सिंधुदुर्गात १० एकरमध्ये ७ प्रकारचे भात केले. तसेच आवळ्याच्या, आंबा काजूच्या बागेत जीवामृत वापरले. आंतरपिक म्हणून, डाळीची लागवड करून आच्छादन केले. तसेच ४ स्तरावर लागवड केली. बागेत, सुपारी, दालचिन, काळी मिरी, हळद, मिरची, शेंगा, शेवगा अशी आंतरपिके लावली. ह्याला प्रचंड यश आले. १ एकर मध्ये ४ लाख रु कमावण्याचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे. भातामध्ये उत्पादन २५% वाढले आणि उत्तम प्रतीचे भात आले. ह्यावर्षी आम्ही बासमती तांदूळ पण करत आहोत. तसेच नैसर्गिक किटकनाशके फारच परिणामकारक झाली. हे शेतातच बनवले. ब्रह्मास्त्र, निमास्त्र आणि आंबट ताकासारखे किटकनाशक ZBNF मध्ये वापरले जातात. आंबा, काजू, भाजीपाला अगदी उत्तम प्रकारे कमी खर्चात उत्पादीत होतो. एकंदरीत रासायनिक शेती बंद आणि निसर्ग शेती सुरु ही चळवळ उभारली जात आहे. पाळेकर गुरुजींची शिबीरे पूर्ण देशात होत आहेत. पंत विद्यापीठ पासून ICAR, आंध्र प्रदेश, ह्यांनी हे शास्त्र स्विकारले आहे. तरी महाराष्ट्रात विद्यापीठे ह्या शास्त्रावर संशोधन करत नाहीत.
दुसरा मुद्दा, शेती मालाला योग्य किंमत मिळणे. ह्यासाठी आम्ही शेतकऱ्यांचा मित्र असे गट शहरात उभे करत आहोत. ह्या गटांना आम्ही शेतकरी गटांना जोडून देत आहोत. म्हणजे शेतकरी आपल्या गटांना थेट माल पुरवतील, असा ठराव झाला. पहिला गट मुंबई येथे शिवाजी मंदिर येथे २३ नोव्हेंबर पासून सुरु होत आहे. तसेच शेतकऱ्यांनी आपले गट बनवावेत. अशाप्रकारे स्थिर किंमतीवर शेतकरी बाजार पेठ चालवेल. साधारणत: शेतकरी सांगेल तो दर देण्यात येईल.
माझी सर्व शेतकरी संघटनाना विनंती आहे कि न पाहता विरोध करू नका. ज्यांना प्रत्यक्ष बघायचे असेल त्यांनी ZBNF शेती बघण्यास यावे. ह्या विषयात लोक चळवळ उभी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. राजकीय चळवळ नाही. कारण सत्ताधारी व विरोधी पक्ष, संघटना केवळ राजकारण करतात. जसे कर्ज माफी ही. कर्जमाफी करून तुम्ही शेतकऱ्याला कर्जमुक्त कराल. पण परत शेतकरी उभा कसा राहील? ह्याचा विचार होत नाही. कर्जमुक्त झाला म्हणजे पुढील मरण टाळता येत नाही. तर शेतकऱ्याला शेती फायदेशीर करण्यासाठी काय लागेल ते कुणीच बोलत नाही. पक्ष आणि संघटना लोकांना मूर्ख बनवून आपली संघटना मोठी करायला बघत आहेत. हरित क्रांतीसाठी स्वामिनाथनना इंदिरा गांधीने पूर्ण मोकळीक दिली. अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी रासायनिक शेती आली. त्याकाळची ती गरज होती. पण आज आपण फक्त ZBNF शेती यशस्वीरीत्या करू शकतो. अशाचप्रकारची शेती आम्ही लहानपणी केली होती. तेव्हा कोणी आत्महत्या केलेली मी बघितली नाही.
पण ह्याला विरोध करणार्यांना खत कारखाने, बियाणाचे कारखाने, मोन्सेनटो मदत करत आहेत. काही दलाल आहेत,तर काही अज्ञानापोटी करत आहेत. स्वामिनाथन यांना मी सिंधुदुर्गात बोलावले होते. त्यांनी देखील रासायनिक शेती पासून नैसर्गिक शेतीकडे वळण्यास सांगितले. विजय भाटकर यांनी उन्नत भारत मिशन मध्ये ZBNF चाच पुरस्कार केला आहे. आता त्यांच्या नेतृत्वाखाली आपण प्रत्येक गाव स्वावलंबी बनवण्याचा निर्धार केला आहे. जागतिक बँक ही अमेरिकेच्या मालकीची आहे. अमेरिकन कंपन्यांना भारताला लुटने सोपे झाले म्हणून जागतिक बँक खुश झाली. अमेरिकन कंपन्यांना भारतात धंदा करणे सोपे झाले म्हणून सरकार खुश, श्रीमंत खुश. पण फवारणी करून शेतकरी मरतात त्यात भारताचा क्रम कुठे लागतो? हे सरकारने आणि राजकीय पक्षांनी जरूर बघावे. उघाच टेंभा मिरवू नये. सामान्य माणसाचा विकास होत नाही. शेतकरी मरत आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर मोठ मोठी सरकारी खाती गब्ब्बर होत आहेत. ते बंद करा. शेतकर्यालाच त्याच्या हिंमतीवर शेती करू द्या. पण शेतकर्यांना देखील एक सूचना करत आहोत तुम्ही शाश्वत शेती करा, संघटीत व्हा, ग्राहकांना संगठीत करून शेतकरी मित्र करा. थेट आपल्याच शहरातील बांधवाना विक्री करा. विषमुक्त अन्न निर्माण करा. लोकांना कॅन्सर, मधुमेह, हृदयविकार, रक्तदाबाची भेट तुम्ही उत्पादित केलेल्या मालावर देवू नका. पुढची पिढी शाश्वत बनवा.
लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत
वेबसाइट : www.sudhirsawant.com
मोबा. नं. ९९८७७१४९२९