सरकारी कारस्थान_१९.१२.२०१९

कुठल्याही देशाचे उद्दिष्ट लोक कल्याण असले पाहिजे. लोकांना चांगल्या प्रकारचे जीवन देण्यासाठी जाती-धर्माचा संघर्ष नष्ट केला पाहिजे. एकीकडे धर्म आणि दुसरीकडे विकास राहून राहून हा प्रश्न देशाच्या जनतेला भेडसावत आहे. १९९१ ला नविन आर्थिक धोरण मनमोहन सिंगने लागू केले. खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण (खाऊजा) धोरणाला प्रचंड विरोध झाला. भारताची जनता हे धोरण स्विकारायला तयार नव्हती. अल्पसंख्याक कॉग्रेस सरकारला कॉग्रेसच्या खासदारांचा विरोध परवडणारा नव्हता. परिणामत: या धोरणाच्या विरोधाला संपुष्टात आणण्यासाठी लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवावे लागणार होते. बाबरी मच्छिद, रामजन्म भूमी हे माकडांच्या हातामध्ये आयते कोलीत मिळाले. यात षडयंत्राचा भाग म्हणून सत्ताधार्‍यांनी हिंदुत्वाच्या नावावर बाबरी मच्छिद पाडली आणि देशामध्ये आग लागली. खाऊजा धोरणाचा विरोध संपुष्टात आला आणि हिंदू-मुस्लिम संघर्ष हा देशाचा मूळ अजेंडा झाला. तेव्हापासून आजपर्यंत ही कहाणी सुरू आहे. सत्ताधीश मग तो कुणीही असो, हिंदू मुस्लिम संघर्ष तेवत ठेवत आहे आणि त्यापाठीमागे आपले अपयश लपवत आहेत.
गेल्या २५ वर्षात या देशामध्ये असंख्य घटना घडल्या. त्यामुळे वातावरण दूषित होत गेले. १९९३ चा मुंबईवरील भयानक हल्ला झाला तेव्हापासून नोव्हेंबर २००८ मधील अमानुष हल्ला हा जागतिय पातळीवर प्रसिद्ध झाला. ठराविक कालांतराने असे हल्ले होत गेले. त्यामध्ये कारगिल युद्ध सुद्धा एक मोठी घटना आहे. २०१४ ला मोदी सरकार सत्तेवर आले. त्या निवडणुकीमध्ये असंख्य आश्वासने भाजप सरकारने दिली. हे सर्वांना माहीतच आहे. पण संपलेला दहशतवाद पुन्हा जोमाने सुरू झाला. ९० च्या दशकामध्ये आम्ही अनेक दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करायला लावले. भारतीय सैन्याचे मुख्य तत्त्व आहे की “दहशतवादाला बंदुकीच्या गोळीने संपवता येत नाही, तर लोकांचे हृदय आणि मन जिंकून दहशतवाद संपवता येतो.” म्हणून आत्मसमर्पण केलेल्या दहशतवाद्यांना अत्यंत चांगली वागणूक देण्यात आली. पण आतंकवादी गटाने त्यांची कत्तल करायला सुरू केली. त्यांचा मुख्य नेता कुकापेरे हा १९९५ ला आमदार म्हणून निवडून आला. त्याला मारण्यात आले. त्यामुळे आत्मसमर्पित दहशतवाद्यांचे जीवन धोक्यात आले. म्हणून आम्ही कारगिल युद्धानंतर प्रचंड संघर्ष करून सरकारला या लोकांना आणि तरुण मुस्लिम युवकांना सैन्यात घ्यायला भाग पाडले. २००३ पासून २००६ पर्यंत ८००० काश्मिरी युवकांचे आणि दहशतवाद्यांचे सैन्य बनवले. मग भारतीय सैन्याने त्यांचा वापर करून सदभावनांचा एक नविन कार्यक्रम काश्मिरमध्ये सुरू केला. गावागावामध्ये शाळा बांधल्या, पाणी दिले, गावात विकासाची कामे केली. त्यामुळे सैन्य आणि ग्रामस्थांमध्ये अत्यंत चांगले संबंध प्रस्थापित झाले. दहशतवाद्यांना गावबंदी करण्यात आले. त्यामुळे २०१४ पर्यंत काश्मिरचा दहशतवाद संपुष्टात आला. हे भारतीय सैन्याचे अलौकिक काम झाले.
तेवढ्यात सरकार बदलले. काश्मिरमध्ये भाजप आणि मुफ्ती महम्मद सय्यदचे संयुक्त सरकार स्थापन झाले व राष्ट्रभक्तांना त्रास व्हायला लागला आणि दहशतवादी गटांना अप्रत्यक्ष मदत देण्यात येऊ लागली. आत्मसमर्पित दहशतवादी सैनिकांची कत्तल सुरू झाली. त्यात औरंगजेब, वनी अशा सैनिकांना मारण्यात आले. भारतासाठी लढणार्‍या सैनिकांना इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यात अनेक घटना घडल्या. दुसरीकडे गाय – बैलांचे राजकारण निर्माण करण्यात आले. निरपराध लोकांना गुंडांनी सुळावर लटकविले. त्यांच्या विरुद्ध कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. ‘मुह मे राम बगल में छुरी’ ही सरकारची नीती स्पष्ट झाली आहे. बोलायचे एक आणि करायचे दुसरे. गाय बैलांच्या नावाने एकीकडे लोकांना सुळावर चढवायचे आणि दुसरीकडे त्याचा निषेध करायचा. त्यापाठी लोकांचे लक्ष धार्मिक कट्टरवाद आणि जातीयवाद यावर लक्ष केंद्रीत ठेवायचे आणि ‘रोटी-कपडा-मकान’ हे विषय दाबून टाकायचे. सरकारचे प्रत्येक क्षेत्रामधील अपयश वाढत गेले. नोटबंदी, मेक-इन-इंडिया, बेरोजगारी वाढणे, शेतकर्‍यांचा आक्रोश, उद्योगधंद्यात मंदी येणे हे प्रश्न सरकार हाताळू शकत नव्हते. खाऊजा धोरणामुळे श्रीमंत प्रचंड श्रीमंत होत गेले. अंबानी, अडाणी गब्बर झाले आणि शेतकरी मरू लागले. गरीब गरीब होत गेले. ही सर्व पाप लपविण्यासाठी निवडणुकीच्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्यात आली. पुलावामामध्ये ४० जवानांची कत्तल झाली.
पुलावामामध्ये आपले जवान मारले गेले याची जबाबदारी कुणावर पडते. माझ्या हिशोबाने ही जबाबदारी वरिष्ठ अधिकारी आणि सरकारची आहे. अर्थात ही हत्या केलेल्या दहशतवादी गटाची तर आहेच पण ते तर आतंकवादीच आहेत, ते असे करणारच. त्यांच्यापासून आपली सुरक्षा करणे हे सरकारचे काम आहे. म्हणून ४० जवानांची हत्या होणे याची प्राथमिक जबाबदारी सरकारचीच आहे. पण ही जबाबदारी न स्विकारता पाकिस्तानच्या घोड्याला झोडपत रहायचं आणि आपली जबाबदारी झटकायची. हे तर नेहमीच होत चालेल आहे. पण वाईट असे की धार्मिक द्वेष भावना भडकवत राहणे व त्यामागे आपले विकास कामात झालेले अपयश लपवायचे असते. शेतकर्‍यांची कर्जमाफी तर बाजूलाच राहिली पण कर्जमाफी केली … केली … म्हणून ओरडत रहायचे. अशाप्रकारे लोकांच्या डोळ्यामध्ये धुळ फेकून निवडणुकीत जिंकून सरकार बनवण्याचे काम भाजपने केले. लोकांच्या भावना भडकविण्यासाठी बालाकोटवर हवाई हल्ला केला. त्यात एक आतंकवादी मारला गेला की ३०० आतंकवादी मारले गेले हे कुणालाच कळले नाही. हवाई हल्ला करून कोणती मर्दानगी दाखवली हे आम्हाला कळलेच नाही. उलट पाकिस्तानला प्रचंड फायदा झाला. अमेरिका, सौदी अरेबिया आणि चीनकडून पाकला मोठी आर्थिक मदत मिळाली आणि आधुनिक हत्यारे मिळाली. त्यामुळे बालाकोटच्या हल्ल्याचे काय उद्दीष्ट होते हा प्रश्न इतिहास तुम्हाला विचारणारच आहे. पाकिस्तानवर हल्ला करायची हिम्मत तर तुमची झालीच नाही. लुटुपुटूची लढाई करून आपल्या अपयशावर पांघरून टाकून लोकांचे लक्ष वळवून या देशाचा काय फायदा झाला हे भारत सरकारला सांगावेच लागेल.
एकंदरीत वेळोवेळी धार्मिक द्वेषभावना भडकवत राहण्याचे काम त्या देशामध्ये नित्यनियमाप्रमाणे करण्यात येत आहे. दहशतवाद, गाईचे राजकारण तर आहेच. आता नुकतेच कलम ३७० चे राजकारण करण्यात आले. काश्मिरमधील कलम ३७० काढून कोणता तीर मारला हे मला तरी कळले नाही. कलम ३७० हे कधीच मेलेले होते. नावाला जिवंत ठेवले होते. काश्मिरमध्ये सुरक्षा राखण्यासाठी अनेक कायदे करण्यात आले आहेत. सैन्याला कुठल्याही कायद्याचे बंधन नाही. हे म्हणाले की, काश्मिरमध्ये बाहेरच्या लोकांना जमीन घेता येत नाही आणि उद्योग करता येत नाही. तर मी आता यांना चॅलेंज करतो की पुढच्या निवडणूकीपर्यंत एक तरी उद्योग काढून दाखवावा. काश्मिरच्या बाहेरील लोकांनी जमीन विकत घ्यावी व तिथे राहून दाखवावे. एवढेच का मुंबईच्या भेंडीबाजारमध्ये दाऊदच्या परवानगी शिवाय कुणीही जमीन घेऊन दाखवावी. मला एवढेच म्हणायचे आहे की पूर्ण सुरक्षा असल्याशिवाय कुणी जमीन घेऊ शकत नाही किंवा उद्योग ही काढू शकत नाहीत. याचे भान सरकारला नाही असे नाही. लोकांच्या डोळ्यात धुळ फेकण्यासाठी वाटेल ते करायची भूमिका ही देशाला कायम घातक राहणार आहे. हे संपले नाही तोपर्यंत नागरिकत्वाचा कायदा आणला आणि देश पेटून उठला. पुढची ५ वर्षे सुद्धा हे असेच काहीतरी करत राहणार.
माझ्या देशबांधवानो आजची परिस्थिती भयानक आहे. नोकर्‍या संपत चालल्या आहेत. शेतकरी देशोधडीला लागला आणि सरकारकडे त्याचे काहीच उत्तर दिसत नाही. कामगारांचे कंत्राटीकरण करून त्यांना गरिबीच्या खाईमध्ये ढकलून देण्यात आले आहे. महागाई तर प्रचंड वाढत चालली आहे, पण विकास दर कमी होत चालला आहे. आर्थिकमंदी प्रचंड वाढली आहे. या सर्वातील आपले अपयश लपविण्यासाठी नगण्य विषयांना मुख्य विषय बनवला जात आहे व तुमच्या डोळ्यामध्ये धुळ फेकली जात आहे. या अशा राजकारणाला विरोध करणे हे आपले काम आहे. आपली एकजूट सर्व जाती आणि जमातीमध्ये समभाव ही भारताची खरी ताकद आहे. तिला जोपासण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आणि सत्ताधार्‍यांचे द्रुष्ट कारस्थान हाणून पाडले पाहिजे.
लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
                                 मोबा ९९८७७१४९२९.

Please follow and like us:

Author: Brigadier SS