सापनाथ नागनाथा पासून देशाला मुक्त करा
जागतिक इतिहासातील सर्वात क्रांतिकारी परिवर्तन म्हणजे मानवी हक्काचे मुलभूत अधिकारात परिवर्तन. एरवी राजेशाही व धर्मगुरूंच्या सापळ्यात मानव कैद होता. प्रत्यक्षात ही देन इंग्लंडमधील क्रांतीतून निर्माण झाली. ऑलिवर क्रॉमवेलच्या राजाविरुद्ध बंडातून इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाही विरुद्ध राजेशाहीच्या युद्धातून; इंग्लंडचा राजा जेम्स १ ला १६४९ ला भर चौकात फासावर लटकवण्यात आले. त्यानंतर हा संघर्ष अगदी १९४५ च्या महायुद्धाच्या समाप्ती पर्यंत चालला. १९५० ला भारत प्रजासत्ताक झाला आणि भारतात लोकशाही प्रस्थापित झाली. १६४९ पासून राज्य करण्याची लोकशाही ही पर्यायी व्यवस्था म्हणून मानवाने स्विकारली व त्यासाठी जगभर संघर्ष केला. १६४९ ला छत्रपती शिवराय १९ वर्षाचे होते. त्यांनी इंग्लंडच्या यादवी युद्धाचा निश्चितपणे अभ्यास केला असावा. त्याकाळची व्यवस्था म्हणजे जमीनदारी. जमीन मुठभर जमीनदारांच्या मालकीची. त्यात कुळे राब-राब-राबायची आणि उत्पादीत माल जमीनदाराला सुपूर्द करायचे. जमीनदार मानवी हक्कानं पायदळी तुडवून मानवाचे अमानुषपणे शोषण करायचे.
शिवरायांनी ओळखले कि ही व्यवस्था मानवाच्या दु:खाचे मूळ कारण आहे. म्हणून स्वराज्य स्थापनेच्या संघर्षामध्ये त्यांनी दोन महत्वाचे निर्णय घेतले. पहिला म्हणजे रांज्याच्या पाटलाचे हात पाय कलम करून बलात्कार झालेल्या एका सामान्य स्त्रीला न्याय दिला. वरकरणी हा निर्णय सोपा वाटत असेल; पण तत्कालीन व्यवस्थेत जमीनदाराला कुठल्याही स्त्रीचा उपभोग घेण्याचा धार्मिक अधिकारच होता. त्यामुळे शिवरायांचा हा कठोर निर्णय प्रवाहाच्या उलट दिशेने होता. त्यातून मानवी हक्काचा संदेश समाजात स्थापन झाला. सर्व स्त्रियांना स्वाभिमानाने सुरक्षितपणे शिवराज्यात जगता येईल हा हक्क शिवरायांनी प्रस्थापित केला. त्यामुळे प्रत्येक पालकांना खात्री झाली कि शिवराज्यात आपल्या मुली सुरक्षित आहेत. दुसरा निर्णय तर त्याहूनही अधिक क्रांतिकारी होता. शिवरायांनी जमीनदारी नष्ट केली व कसेल त्याला जमीन दिली. त्यातून मानवाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला.
मनुवादात खितपत पडलेल्या समाजाला शिवरायाने जिवंत केले. म्हणूनच शिवरायांसाठी मरमिटायला सर्व नागरिक तत्पर होते. त्यांनी प्रस्थापित केलेले राज्य हेच आधुनिक लोकशाही व्यवस्थेचे आणि भारताच्या घटनेचे सूत्र आहे. बाबासाहेबांनी घटना परिषदेत २५ नोव्हेंबर १९४९ ला म्हटले होते कि आज घटनेच्या स्थापनेमुळे सर्व जनतेला राजकीय स्वातंत्र्य मिळाले आहे. ह्या देशात मुठभर लोकांच्या घरात लक्ष्मी नांदत आहे, पण लाखो लोक दारिद्र्यात खितपत पडलेले आहेत. जो पर्यंत आर्थिक समता मिळणार नाही तो पर्यंत राजकीय स्वातंत्र्य सुद्धा अबाधीत राहणार नाही. लोकशाहीची सांगड आर्थिक समतेशी स्पष्टपणे लावण्यात आली. भारताच्या घटनेत कलम १४, २१ आणि ३८ मध्ये हे मुलभूत अधिकार घालण्यात आले आहे. पण त्या काळात राजे लोक मोठ्या संख्येने संविधान सभेत होते. त्यांची जमीनदारीच नष्ट होणार होती. म्हणून ह्या कलमाना प्रचंड विरोध झाला होता. त्यातून तोडगा काढण्यासाठी मार्गदर्शक तत्व बनवण्यात आली व कलम ३८ हे मार्गदर्शक तत्त्व घालण्यात आले. मुठभर लोकांच्या हातात उत्पादनांच्या साधनाचे केंद्रीकरण होता नये असा सरकारला स्पष्ट आदेश आहे. मार्गदर्शक तत्त्वे स्थापन करतात कि लोकांचे कल्याण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. पण आज कल्याणकारी राज्याची संकल्पना संपली आहे.
कलम २१ प्रमाणे, जगण्याचा अधिकार हा मुलभूत अधिकार आहे असे म्हटले आहे. पुढे जाऊन सर्वोच न्यायलयाने स्पष्ट केली कि जगण्याचा अधिकार म्हणजे फक्त जिवंत राहण्याचा अधिकार नव्हे, तर सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. ह्याचाच अर्थ असा आहे कि जगण्यासाठी पहिला रोजगार लागतो. मग रोजगाराच्या ठिकाणी घर लागते. शिक्षण/आरोग्य सर्वाना मिळाले पाहिजे. पण सरकारने हे विषय बाजूलाच ठेवले आणि श्रीमंतांना अधिक श्रीमंत करण्यात मग्न आहे. अंबानी आज १२००० कोटीच्या बंगल्यात राहतो आणि जनता रस्त्यावर झोपते. हे संविधानाला मान्य नाही. म्हणूनच कि काय भागवत म्हणतात कि संविधानाला बदलले पाहिजे व ते मानवी अधिकार संपवले पाहिजेत. त्यात सापनाथ कॉंग्रेस-राष्ट्रवादी मागे नाही.
१९९१ नंतर मनमोहन सिंघ आणि आता मोदीजींच्या राज्यात ह्या तत्वांना गाडून टाकण्यात आले आहे. श्रीमंत अश्लील श्रीमंत होऊ शकतात हे तत्व व्यवस्थेने स्विकारले आहे. ही भारतासमोरील मुख्य समस्या आहे. राज्य हे घटनेप्रमाणे चालत नाही तर मुठभर आधुनिक सम्राटांच्या आदेशावर चालते. लोकशाही गाडून टाकण्यात आली आहे. प्रत्येक जिल्हयात आधुनिक जमीनदार निर्माण झाले आहेत. ते जनतेचे पूर्ण शोषण करत आहेत. सरकारी/ जनतेच्या संपत्तीचे खाजगीकरण झपाट्याने राबवण्यात येत आहे. नुकताच केंद्र सरकरने निर्णय घेतला कि, ४६३ रेल्वे स्टेशनचे खाजगीकरण करण्यात येणार आहे. ही स्टेशने श्रीमंताच्या घशात कोंबून त्यांना आणखी श्रीमंत करण्याचा मोदींचा मनसुबा आहे. म्हणूनच भागवत घटना बदलत आहेत. त्यात मानवाला चातुवर्णात विभागले जाणार व जाती वर्चस्वाची व्यवस्था निर्माण करणार. हेच त्यांचे हिंदुत्व आहे. हिंदूंचे कल्याण न्हवे तर वर्गीकरण करणे हेच खरे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत अनेक कामाचे खाजगीकरण करण्यात आले आहे. त्यातून सरकारी कर्मचार्यांमध्ये प्रचंड कपात झाली आहे. त्या बदल्यात करारावर खाजगी उद्योगांनी कर्मचारी लावले. गेल्या काही वर्षात ५० लाख सरकारी नोकर्या कमी झाल्या. आरक्षणासाठी लढणार्या लोकांना ह्याचे भानच नाही. नोकर्याच संपल्या तर नोकर्या कुठे लागणार? म्हणून आज आपण खाजगीकरणाच्या विरोधात बंड केले पाहिजे. नाहीतर सर्व बँका, तेल कंपन्या, एस.टी., शाळा सर्व खाजगीकरण होईल आणि तुम्ही कंत्राटी कामगार राहाल.
लोकशाही तर श्रीमंताची बटिक झाली आहे. पैसे फेका निवडून या अन प्रचंड पैसे कमवा हे राजकीय पक्षांचे एकमेव उद्दीष्ट झाले आहे. म्हणूनच शेतकऱ्यांचे कल्याण करण्यापेक्ष श्रीमंतांसाठी बुलेट ट्रेन, १ लाख कोटी पेक्षा जास्त पैसा खर्च करून बनवण्यात येत आहे. कर्जमाफीला यांच्याकडे पैसा नाही. एकीकडे कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडी म्हणजे सापनाथ आणि भाजप सेना म्हणजे नागनाथ. अशा सापळ्यात लोक अडकलेले आहेत. शरद पवार यांनी २००६ ला स्वामिनाथन आयोग जाहीर केला, पण अंमलबजावणी कधीच केली नाही आणि आता कुठल्या तोंडाने स्वामिनाथन आयोग लागू करा म्हणत आहेत? नागनाथानीही २०१४ च्या निवडणुकीत स्वामिनाथन आयोग लागू करण्याचे वचन दिले होते. तर अमित शाह निर्लज्जपणे म्हणतात कि तो तर चुनावी जुमला होता. तुमच्या जुमल्यात लाखो कुटूंब बरबाद झाली. असंख्य स्त्रियांवर पाशवी बलात्कार तुमच्या पैश्याच्या संस्कृतीतून झाले. मोदीसाहेब, राहुलजी, पवारसाहेब ह्या गरीबांचा वाली कोण?
भ्रष्टाचार, दहशतवाद फोफावला आहे. मोदीजी फक्त घोषणा आणि भाषणे देत जगभर फिरत आहेत. बहुतेक ते जगाच्या प्रवासात इतके रमले कि भारतातील गावात काय चालले हे बघायला त्यांना वेळ नाही. तिथे पाकने अनेक सर्जिकल हल्ले केले. आमचे जवळ जवळ ८००० सैनिक मारले गेले. तरी मूग गिळून गप्प आहेत. हिम्मत असेल तर पाकला जगाच्या नकाशावरून नष्ट करा. येथिल गरीब मुसलमानावर नामर्दासारखे हल्ले काय करता. वेगवेगळ्या मार्गांनी लोकांना चांगले जीवन देण्याचे सोडा, त्यांना द्वेषभावनेत गुरफटून आपला अघोरी अजेंडा संघ परिवार राबवत आहेत. त्याला सापनाथ कॉंग्रेस गुप्तपणे पाठिंबा देत आहेत. राष्ट्रवादी तर सरकारला उघड पाठींबा देत आहेत. हे सर्व एकच आहेत. सापनाथ नागनाथापासून देश मुक्त झाल्याशिवाय देश प्रगती करू शकत नाही. काय करायचे हे लोकांनाच ठरवावे लागेल. पुन्हा शिवराय जन्म घेण्याची वाट पाहू नका. तुम्हीच शिवराय बना. मानव मुक्तीसाठी, संविधानाच्या प्रत्येक पैलूची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी ह्या दुष्टांच्या विरुद्ध प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा आघाडी निर्माण करा. सापनाथ नागनाथ विरहित भारत बनवा. हाच भारत वाचावण्याचा महामार्ग आहे.
लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा. नं. ९९८७७१४९२९