साम दाम दंड भेद

कर्नाटक हे सुसंस्कृत राज्य म्हणून ओळखले जाते. साधारणत: कायद्याला धरून तेथील नागरिक व राजकारणी लोक वावरत असत, पण आता सर्व बदलले आहे. साम दाम दंड भेद हे राजकारणाचे मुख्य तंत्र झाले आहे. नितीमत्ता राजकारणापासून दूर गेली आहे आणि तिची जागा विकृती आणि धोकादडीने घेतली आहे. तेथेच येदुराप्पा मुख्यमंत्री झाले. अनेक दिवस भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात राहिले. परत बाहेर आले. कर्नाटक जनता पक्ष बनवला अचानक पक्षांनी त्यांना परत घेतले त्यांचा सन्मान केला. ते २०१४ ला खासदार झाले व आता मुख्यमंत्री झाले. हेच, साम दाम दंड भेदचे उत्तम उदाहरण आहे. कर्नाटक निवडणुकीत सर्व निर्बंध नैतिकता अदृश झाली. पैसा, गुंड आणि सत्तेच्या स्पर्धेत प्रचाराने खालची पातळी गाठली. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत पक्षांनी आपले चरित्रहीन स्वरुपाचे चित्रण लोकांसमोर येऊ दिले. त्यात मोदिने सिद्धरामयावर भ्रष्टाचाराचे आरोप कुठलाही पुरावा नसताना किंवा आरोप नसताना केले. त्यात त्यांचे राजकीय असूयेचे विकृत प्रदर्शन झाले. त्याचबरोबर, त्यांचे अनेक उमेदवार तुरुंगात जावून आलेले असताना दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे म्हणजे एक विनोदच आहे. पण हसत कोणीच नाही.

स्वत: नवनिर्वाचित मुख्यमंत्री तुरुंगाची हवा खाऊन आल्याचे ते विसरले आणि आता त्यांनाच मुख्यमंत्री बनवून भाजप भ्रष्टाचाराचे उघड समर्थन करत आहे. राजकारणात वाटेल ते शस्त्र वापरायचे व फक्त सत्ता आणि संपत्ती मिळवायची हा एकमेव उद्देश राजकारणात प्रचलित झाला  आहे. युद्धात, राजकारणात व  प्रेमात सर्व काही माफ आहे असे म्हणतात व आपल्या कृत्याचे समर्थन करतात. प्रचलित राजकारण त्यापासून दूर नाही.  बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते जिथे भ्रष्टाचार असतो तेथे लोकशाही नांदू शकत नाही. त्याचे कारण भ्रष्टाचारामुळे भ्रष्ट लोकांच्या हातात अगणित संपत्तीचे केंद्रीकरण होते.  या संपत्तीचा उपयोग मते विकत घेण्यासाठी केला जातो.  तसेच मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना विकत घेण्यास वापरला जातो.  प्रचंड निवडणूक यंत्रणा उभारली जाते.  गाडी-घोडा, जेवण-खाण, मटण-दारू याचा सर्रास वापर केला जातो.  त्याचबरोबर स्थानिक गुंड राजकीय पक्षांचे हस्तक बनतात.  मतदारांना भयभीत करून टाकतात.  हे गुंड विरोधकांना मतदान करण्यापासून परावृत करतात.  त्याचबरोबर दुर्गम भागात सरकारी यंत्रणेवर व लोकांवर दबाव आणून आपल्या विभागाला मतदान करायला भाग पाडतात.  सत्ताधारी पक्षाला सरकारी यंत्रणाचा दुरुपयोग करायला मुक्त संधी असते.  त्यामुळे आजच्या राजकारणात सामान्य माणूस राजकीय प्रक्रियेतून हद्दपार झाला आहे.

त्यातच अमित शहा, मोदीसारखे साम दाम दंड भेदवाले लोक राजकारणात मोठे होत गेले.  ज्यांचा राजकारणाशी काहीच संबध नाही असे एयरर्पोर्टे कार्यकर्त्यांची ही  जमात गेल्या २५ वर्षात प्रचंड वाढली.  त्यांचे एअरपोर्ट हजर राहणे, वरिष्ठ नेत्याचे स्वागत करणे, त्याला पंचतारांकित हॉटेल मध्ये उतरवणे.  त्यांना जे लागेल ते बाईबाटली सकट पुरवणे अशा मार्गाने पुढे जात जात विधान परिषदेत आमदार बनणे किंवा राज्यसभेत खासदार बनणे.  म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटेल कि पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलून हे एयरर्पोर्टे आमदार कसे झाले?  वरिष्ठ नेत्याशी सलगी असल्याने एयरर्पोर्टे हळूहळू घनपोटे बनतात.  वरिष्ठ नेत्याला बिल्डर, उद्योगपती, गुंड यांची भेट करून देतात. पुढे जाऊन कामे मार्गी लावतात.  त्यामुळे वरिष्ठ नेत्याचा आणखी विश्वास संपादन करतात.  व घनपोटेतील मंत्री पण बनतात.  हळूहळू हे लोक सर्व पक्षांच्या नेत्यांबरोबर सलगी साधतात व अदृश्य अघोरी सर्व पक्षीय मॅच फिक्सिंगची व्यवस्था निर्माण करतात.

गेल्या २५ वर्षात भारताच्या राजकारणातील हा बदल मी स्वतः बघितलेला आहे.  १९९१ला मी पहिल्यांदा लोकसभेला उभा राहिलो.  निवडणुकीसाठी अवघे ३७००० रुपये माझ्याकडे होते.  या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी आपल्या किश्यातून पैसे खर्च करून मला निवडून आणलं.  त्याच दरम्यान भारतामध्ये खाजगीकरण जागतिकीकरण याची प्रथा आली व भारत बदलला.  युती शासनाच्या काळामध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरु झाला.  मंत्री आमदारांकडून पैसे खायला लागले.  सर्व क्षेत्रात सत्तेवारीच राजकारण सुरु झालं.  कुठलेही सार्वजनिक काम करायला २०  ते २५ टक्के पैसा हा अधिकारी आणि मंत्र्यांमध्ये वाटून दिला जाई.  त्यानंतर कॉंग्रेसचे सरकार असो कि भाजप सेनेचे सरकार असो पैसे खाणे एवढेच राजकारणाचे मुख्य उद्दिष्ट झाले.  राजकारणात ही प्रक्रिया सुरू असताना प्रत्येक पक्षामध्ये प्रामाणिक आणि कर्तृत्ववान कार्यकर्त्यांची ससेहोलपट सुरु झाली.  राजकीय पक्षामध्ये चमच्यांची गरज वाढत गेली.  आणि मोठमोठ्या पदावर चमच्यांची नियुक्ती होऊ लागली.  एयरर्पोर्टे आणि घनपोटे गुंड आमदार, खासदार आणि मंत्री बनू लागले.   त्यामुळे नैतिकता ही हळूहळू लुप्त होत गेली.  आणि साम दाम दंड भेद निर्लज्जपणे वापरले जाऊ लागले.  राजकारणातून पैसा आणि पैश्यातून राजकारण अशी राजकीय व्यवस्था बनली.  त्यातून नवीन संस्थानिक बनत गेले.  आज संस्थानिकांची तिसरी पिढी राज्य करत आहे.  प्रत्येक पक्षाचे प्रत्येक जिल्ह्यात सुभेदार बनले आहेत.  घराणेशाही प्रबळ झाली आहे.  प्रत्येक पक्ष आज एखाद्या घराण्याच्या मालकीचा पक्ष झाला आहे.  या घराण्यांना वैभवाची गरज आहे, कर्तृत्ववान लोकांची नाही.  त्यामुळे आजचे आमदार-खासदार हे हात वर करणारे लोक आहेत.  ते आपल्या जनतेचे प्रश्न मांडण्याऐवजी नेत्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात मग्न आहेत.

कर्नाटकात येदुराप्पा मुख्यमंत्री करताना सर्व नियम धाब्यावर बसवून अल्प मतात असणाऱ्या भाजपला सरकार बनविण्याच आमंत्रण राज्यपालांनी दिले.  राज्यपाल हा गुजरातचा आहे.  मोदिजींच्या विश्वासातील आहे.  कॉंगेस आणि जनता दल (एफ) ने ११६ आमदारांचे सही शिक्क्यानुसार मंत्रिमंडळ बनविण्याची यादी दिली.   पण १०४  आमदार असलेल्या भाजपला मंत्रिमंडळ स्थापन करण्याचे निमंत्रण राज्यपालांनी दिले.   लोकशाहीचा खून पाडला.  बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवस दिले.  या १५ दिवसात काय होणार हे सर्वांनाच माहीत आहे.  आमदार विकत घेण्याचा घोडेबाजार सुरु झाला व या ना त्या मार्गाने सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.  सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालाच्या निर्णयास हस्तक्षेप करण्याला नकार दिला व येदुराप्पाला मुख्यमंत्री बनविण्याचा मार्ग सुकर केला.  या प्रक्रियेमध्ये जनतेचा निर्णय धाब्यावर बसविण्यात आला. त्यामुळे लोकशाहीचे तत्त्व गाडून टाकण्यात आले.

अशी आपल्या देशाची परिस्थिती आहे.  EVM पद्धतीवर अनेक लोकांचा आक्षेप आहे.  युरोप आणि अमेरिकेत देखील  EVM पद्धत रद्दबातल  ठरविण्यात आलेली आहे.  EVM चा सर्वात मोठा धोका हा मतदान केंद्रात पडणारी मत जगजाहीर होतात.  त्यामुळे पैशाचा आणि गुंडाचा वापर परीणामक ठरतो.  मतदान केंद्रावर पैसे दिले जातात आणि मतदान मिळाले नाही तर धमकी दिली जाते आणि म्हणून त्या त्या मतदान केंद्रावर लोकांना त्या पक्षाला मतदान करावेच लागते.  त्यामुळे गुप्त मतदानाचे तत्त्व नष्ट झाले.  मी पाहिल्यावेलेला जेव्हा निवडून आलो होतो.  त्यावेळी सर्व मतदान पत्रिका निथळून टाकण्यात येत होत्या व मग मतदान मोजणी करण्यात येत होती.  त्यामुळे कुठल्या केंद्रावर किती मतदान कुणाला पडले हे उघड होत नव्हते.   आज ह्या पद्धतीच्या मतदानासाठी जोरदार मागणी केली पाहिजे.  आज ह्या दिवसात लोकशाही नाही.  पण लोकशाहीचा मुखवटा धारण केलेली हुकुमशाही आहे.  त्यालाच ‘fascism’ म्हणतात.  हे बदलले पाहिजे व पुन्हा लोकशाही स्थापन करण्यासाठी जनतेने उठाव केला पाहिजे.  यातच आपले भविष्य आहे.

 

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाइट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS