सुख आणि समृद्धी

सुख आणि समृद्धी

राजकारण कशासाठी? सुख आणि समृद्धीसाठी. कुठेही चर्चा ऐकली तरी लोक म्हणतात दिसतात, राजकारण आम्हाला नको ते घाणेरडे आहे. बरोबर आहे, राजकारण घाणेरडे होते आणि घाणेरडे राहणार आहे. कारण ते एक युध्द आहे. राजकारण म्हटले कि व्यक्ती व समूह येतात. भारतात त्या व्यक्तीचा आणि समूहाचा स्वार्थ नेहमीच प्रथम स्थानी राहणार आहे. पण राजकारणावर सर्व आधारित असते. एक मोठा गैरसमज आहे कि, सामाजिक काम केल्याने आपल्याला सर्व काही साध्य करता येते. सामाजिक काम हे राजकीय समाजाचा अविभाज्य भाग आहे. राजकारण व सामाजिकरण ही गाडीच्या दोन चाकासारखे असतात. ते एकत्र चालले पाहिजे. नाहीतर गाडी दिशाहीन पद्धतीने काम करेल. ही आजची परिस्थिती आहे. कारण आज समाजकारणावर राजकारणाचा पुर्ण प्रभाव आहे. गाडीतील राजकारणाचे चाक वेगाने फिरत आहे व समाजकारणाचे चाक हळू फिरत आहे. या अवस्थेमळे प्रचंड हानी होत आहेत.

मानवाच्या जडण घडणीमध्ये संतानी, तत्त्वज्ञानी बराच प्रभाव पाडला आहे. पण जोपर्यंत बुद्धांच्या तत्वज्ञानाला सम्राट अशोकाची साथ मिळाली नाही, तोपर्यंत एक आदर्श राष्ट्र घडले नाही. तसेच संत तुकारामांच्या संत वाणीला छत्रपती शिवरायांनी प्रत्यक्ष महाराष्ट्रात उतरवले नाही तोपर्यंत आदर्श शिवराज्य घडवू शकले नाही. तसेच महात्मा फुलेच्या क्रांतिकारक कामाची थोड्या प्रमाणात का होईना छत्रपती शाहू महाराजांनी अंमलबजावणी केली. तोपर्यंत समतेचा सिंद्धांत लोकांच्या ध्यानी मनी सुद्धा नव्हते. तसेच अनेक सामाजिक कार्यकर्त्याकडून फुले, शाहू, आंबेडकर हे तत्वज्ञान भारताच्या घटनेमध्ये उतरले नाही. कायदेशीर दृष्ट्या मूर्त स्वरुपात एका सामाजिक विचारसरणीला राजकीय दिशा मिळाली. आज भारताची राजकीय दिशा संविधानामुळे स्पष्ट आहे.

उद्दिष्टात राज्यघटना म्हणते कि आपण असा देश बनवायचा आहे जिथे समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुत्त्व प्रस्थापित होईल. म्हणजेच भारत सुखी आणि समृद्ध होईल. ह्यातून एक बाब स्पष्ट होते या देशातील शेवटचा माणूस जोपर्यंत सुखी आणि समृद्ध होत नाही तोपर्यंत हा देश संपन्न होऊ शकत नाही. देशाचे उद्दिष्ट स्पष्ट आहे व ते समाजकारणातून उभे राहिले. आता ह्याची अंमलबजावणी करण्यासाठी घटनेतच तरतूद केली आहे. ते  म्हणजे राष्ट्राचे तीन अवयव आहेत. पहिले  म्हणजे सरकार म्हणजेच मंत्रिमंडळ आणि प्रशासक, दुसरे आहे संसद आणि विधिमंडळ व तिसरे आहे न्यायपालिका  ह्या तिन्ही अवयवांचे काम सुनिश्चित करण्यात आले आहे  व कामाची विभागणी स्पष्ट आहे.

देशाचे उद्दिष्ट समता, बंधुत्व, न्याय व स्वातंत्र्य हे साध्य करण्यासाठी ही व्यवस्था  देशामध्ये बनविण्यात आली आहे. ती पूर्णपणे भ्रष्ट आहे आणि विकलांग आहे. हे अवयव बहुराष्ट्र कंपनी आणि त्यांच्या दलालाने ताब्यात घेतले आहेत. जशी इस्ट इंडिया कंपनी व्यापाराच्या नावाने देशात घुसली आणि हळूहळू तेथील राजवटीवर कब्जा करत गेली. जनतेला फोडून तोडून विभक्त करण्यात आले कपटाने देश ताब्यात घेतला. ह्या प्रक्रियेला जवळजवळ २०० वर्षे लागली व त्यातून मुक्त व्हायला भारताला १५० वर्षे लागली. तरीही ह्या १५० वर्षात देशातील विचारधारेवर आणि समाजावर कायमचे दूरगामी परिणाम झाले. उदा. इंग्लिश भाषेचे सार्वत्रीकरण. मी राजकीय विश्वात पाहिलं जो इंग्लिश चांगल बोलू शकतो तोच नेता बनतो. पाश्चात्य संस्कृतीचा, वेशभूषेचा व ज्ञानाचा प्रभाव इतका जबरदस्त आहे कि, पूर्ण व्यवस्थेवर तिचा पूर्ण प्रभाव आहे.  जसे सैन्य दलात अधिकाऱ्यांच्या विश्वात राहणीमान चालचलन हे पूर्ण पाश्चात्य आहे. ह्यातूनच भौतिक दृष्ट्या भारतीय नेतृत्त्व न्यायाधीश, अधिकारी, आमदार, खासदार मानसिक दृष्ट्या पाश्चात्य संस्कृतीचे गुलाम आहेत. गोऱ्या लोकांना श्रेष्ठ मानण्याची परंपरा खोलवर रुजलेली आहे. तिच्या विरुद्ध लढण्याचा प्रयत्न इंदिरा गांधी, राजीव गांधीच्या काळात झाला. म्हणूनच ह्या दोघांची हत्या झाली. ह्या दोघांनी गोऱ्या म्हणजेच अमेरिकन दडपणाच्या विरोधात भारताला उभे केले. पण त्यांची हत्या करण्यात आली. ह्यातील खरे गुन्हेगार शोधून काढण्याचा प्रयत्न कोणीच केला नाही.

१९९१ नंतर मात्र भारतीय नेतृत्व पूर्णपणे गोऱ्यांच्या आहारी गेले. जागतिक बँक, आंतराष्ट्रीय नाणेनिधी ह्या अमेरिकेच्या मालकीच्या संस्था आहेत. त्यांच्या आदेशावर भारताची अर्थनिधी उभारण्यात येऊ लागली. म्हणूनच शेतकऱ्यांना दुर्लक्ष करून कारखानदारांना मोठे करण्यात आले. भारताची संस्कृती पूर्णपणे औद्योगिकरणावर  आधारलेली आहे. त्यामुळे पूर्ण जगात औद्योगिकरणावर आधारित राजकारण आणि समाजकारण सुरु झाले. साहजिकच ह्या राजकारणात उद्योगपतींचा प्रभाव वाढत गेला आणि समतेचा विचार हळूहळू कालबाह्य ठरू लागला.

समतेच्या राजकारणाला १९९१ ला खाजगीकरण, उदारीकरण व  जागतिकीकरण (खाउजा) कॉंग्रेसने राबविले आणि सर्व पक्ष भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी हे आजपर्यंत राबवित आहेत. ह्याचा दर्शनी परिणाम हा शेतकऱ्यांच्या आत्महत्येतून होतो. नुकतेच मोदी सरकारने जागतिक, आर्थिक मंचावर जाहीर केले कि गोऱ्या उद्योगपतीसाठी आम्ही लाल गालीचा अंथरला आहे. म्हणजेच कामगार कायदे, जमीन मार्केटचे कायदे नष्ट करून ह्या १०० इस्ट इंडिया कंपनीला निर्विवादपणे भारताची जमीन, पाणी, वीज देण्यात येणार. येथील रोजगार नष्ट होणार आणि नवीन रोजगार निर्माण होणार नाही व भारतातील नैसर्गिक साधनाचा विंध्वस करणार. अर्थात भारत पूर्णपणे परावलंबी होत चालला  आहे व घटनेतील उद्दिष्टे कुठेतरी लुप्त झाली आहेत. भारत पाश्चात्य अर्थव्यवस्थेचा, संस्कृतीचा आणि राजकीय व्यवस्थेचा  गुलाम झालेला आहे. २६ जानेवारीला परेड बघताना माझ्या मनामध्ये आनंदापेक्षा अस्वस्थता  होती कि आपण भारतीय सामर्थ्यांच दर्शन करतोय कि हतबलतेतून निर्माण होणारे प्रदर्शन बघतोय.

ह्या देशामध्ये धर्मा पाटील सारखे शेतकरी-कामगार अशा अवस्थेला येतात कि त्यांना आपली प्राण देऊन आत्महत्या करावी लागते. ह्या देशातील ९० टक्के कष्टकरी समाज तडफडत असताना प्रजासत्ताक दिनाचा सोहळा बघताना आपल्याला काय वाटावे. समता, बंधुत्व, न्याय, स्वातंत्र्य ही  देशाची उद्दिष्टये अदृश्य झाली. कारण मुख्यत: प्रश्न निर्माण होतो कि, हा देश सार्वभौमत्व गमावून बसला. कसला आला सोहळा आणि कसली आली संपन्नता. जर देशात ९० टक्के लोक अश्रू ढाळतात तर कुठे आले सुख आणि कुठे आहे समृध्दी. ह्या देशात आयुष्यभर सीमेवर लढणारा सैनिक तारुण्यातच रिटायर होतो आणि नोकरीसाठी दारोदारी भटकतो. तर कुठे आहे आपला स्वाभिमान आणि राष्ट्रभक्ती. माझ्या देश बांधवानो समाजकारणावर मात करून राजकारणाने लोकांना दु:खाच्या खाईत लोटले आहे. तर आपले कर्तव्य काय आहे हे ठरवा आणि देशाला मुक्त करण्यासाठी पुढे या.

  लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाइट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS