शत्रू मशिनगणने समोरून तुमच्यावर जोरदार गोळीबार करत आहे आणि तुम्ही आपल्या रायफलला संगिणी लावून ‘बोल, छत्रपती शिवाजी महाराज की जय’ ही युद्ध गर्जना करून शत्रूवर तुटून पडत आहात. आजूबाजूला साथीदार मशिनगणच्या गोळ्या छातीवर घेत शहीद होत आहेत. तरीही तुम्ही शत्रूवर चाल करून जाता हे धाडस ही प्रेरणा कुठून येते. याची इतर लोकांना कल्पना सुद्धा करता येत नाही. सैनिक लढतात ते स्वाभिमानासाठी, देशासाठी आणि साथीदारांसाठी. आज भारतीय सीमेवर २० जवान शहीद झाले आणि आजही हजारो सैनिक भारताच्या सीमा राखत आहेत. केवळ नोकरीसाठी नव्हे तर आत्मसन्मानासाठी. जर सीमेवर लढणार्या सैनिकाला आपल्या मुलाबाळांची काळजी भेडसावत असेल तर तो लढणार कसा? हीच भीती एकता कपूरच्या वेब सिरीजने सैनिकांच्या मनामध्ये निर्माण केली. एकता कपूरने मोठ्या शिताफीने वेब सिरिज बनवली, त्यात तिने सैनिकांच्या पत्नीचे अश्लील चित्र वसवले. सीमेवर दूर सैनिक आहे आणि त्याची पत्नी व्यभिचारात गुंग आहे. चित्रीकरणाची परिसीमा म्हणजे एका सैनिक पत्नीला मेजरचे शर्ट घातलेले दाखवले आणि व्यभिचारात ते फाडून टाकण्यात आले. त्याच्या खांद्यावर अशोक चक्र होता. अशाप्रकारचे चित्रीकरण म्हणजे देशद्रोह नाहीतर काय? देशातल्या अनेक सैनिकांनी यावर तक्रार केली. मला जवळ जवळ १०० सैनिकांचे फोन आले.
मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे गेलो. मी तक्रार मांडली. त्यांनी सहानुभूतीपूर्वक चौकशी केली. नंतर मुंबई पोलिस आयुक्ताला भेटण्यास आम्हाला सांगण्यात आले. माजी सैनिक महासंघाच्या पदाधिकारी सकट मी मुंबई पोलिस आयुक्ताला भेटलो त्यांना सर्व प्रकार कथन केला. त्यांनी सहज प्रतिक्रिया दिली की, अशाप्रकारचे चित्रीकरण पोलिसांबद्दल सुद्धा होते. पोलिसांना बलात्कारी व भ्रष्ट दाखविले जाते. तरीही आम्ही विरोध करत नाही. त्यांची प्रतिक्रिया ऐकुन मला आश्चर्य वाटले. मी म्हटले की तुम्ही हे स्विकारले आहे पण आम्ही नाही. कारण सैनिक आपल्या पत्नीपासून दूर राहतात. भारताच्या सीमेवर राहतात. त्यांच्या मनावर किती गंभीर परिणाम होईल याचा विचार केला पाहीजे. सैन्यामध्ये सैनिकाचे मनोबल उच्च पातळीवर ठेवण्याचा सदैव प्रयत्न होतो. सैनिकाला सर्वात प्रिय आपले कुटुंब असते. म्हणून सैन्यात नवरा-बायकोचे संबंध चांगले ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न होतो. वरिष्ठ अधिकारी याच्यावर जातीने लक्ष घालतात. सैनिकांशी चर्चा करतात. त्यांना सल्ला देतात. नवरा-बायको सुखी तर सैनिक सुखी. व मागचा विचार न करता सैनिक शत्रूवर तुटून पडतो. पण हीच लग्न संस्था भ्रष्ट करून टाकली, व्यभिचारी करून टाकली तर सैनिक हतबल होतील आणि चीन बरोबर लढायला कमकुवत होतील. म्हणूनच अशाप्रकारची अश्लिल वेब सिरिज कुणीही काढू नये आणि जे काढतील ते पूर्ण सैन्य दलाला बदनाम करतील हा सारासार देशद्रोह आहे. म्हणून आम्ही मागणी केली की सैन्याला बदनाम केल्याबद्दल एकता कपूरला अटक झाली पाहिजे. त्याचबरोबर पुढे अशी वेब सिरिज निघू नये याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. वेब सिरिज हे सेन्सॉर बोर्ड खाली येत नाही. म्हणून निर्माते वाटेल ते चित्रीकरण प्रदर्शित करीत आहेत. सिरिजच्या नावाखाली घाणेरड्या सेक्स आणि शराबचा प्रसार करत आहेत. अलिकडे हे फारच वाढले आहे.
इंटरनेटचा उपयोग या अनेक चांगल्या गोष्टीसाठी होऊ शकतो. पण अलिकडे अश्लिल चित्रपट दाखवण्यावर जोर आहे. सिरियल आणि चित्रपटावर सेन्सॉर बोर्ड आहे, पण वेब सिरिजवर नाही. म्हणून सरकारने ताबडतोब यावर कायदा करून वेब सिरिजला सेन्सॉर बोर्डच्या अखत्यारीत आणले पाहिजे, अशी आमची स्पष्ट मागणी आहे व ही मागणी आम्ही राज्यपालकडे देखील करत आहोत. सैन्यदलाने अनेक बाबतीत आपले पावित्र्य अबाधित राखले आहे. त्यात सर्वात महत्त्वाचा संबंध हा सैनिकमधील संबंध असतो. सैनिक एकमेकांसाठी लढायला आणि मरायला तयार असतात. म्हणून एकता कपूर सारख्या वेब सिरिज या अत्यंत गलिच्छ आणि सैनिक संस्कृतीच्या विरोधात आहेत. हे थांबवले नाही तर भारतीय सैन्यावर दूरगामी परिणाम होतील. समाजातील सर्व स्तरावर याचा विचार झाला पाहिजे आणि सैनिकांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम करणारे कुठलेही कृत्य घडता नये याची जाणीवपूर्वक काळजी घेतली पाहिजे.
एकता कपूरच्या वेब सिरिज विरुद्ध सैनिकांचा आक्रोश चालू असतानाच ८ जुनला जातेगाव जि. अहमदनगर येथे मनोज आवटी ह्या नुकत्याच निवृत्त झालेल्या सैनिकाचा अत्यंत क्रूरपणे खून झाला. ८ ऑक्टोबरला शुल्लक करणावरून मनोज आवटीवर हल्ला झाला. जखमी अवस्थेत मनोज आवटी यांना अहमदनगरला उपचारांसाठी नेण्यात आले, त्याचबरोबर दुसर्या दिवशी पोलिस ठाण्यामध्ये सकाळी १० वाजता तक्रार देण्यासाठी आवटीचे कुटुंबिय गेले, पण पोलिस स्टेशनने त्यांची तक्रार नोंद करून घेतली नाही. उलट मारेकर्यांना पोलिसांनी त्यांच्या घरातील महिलेचा विनयभंगाची तक्रार करण्यास सांगितले. त्याप्रमाणे मारेकरी जो सराईत गुंड आहे त्याच्या घरातील महिलेने विनय भंगाची तक्रार केली व ती पोलिसांनी लगेच स्विकारली. तेथील स्थानिक आमदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार दुसर्या दिवशी रात्री १० वाजता पोलिसांनी मारहाणीची तक्रार नोंद केली. दुर्देवाने दुसर्या दिवशी मनोज आवटी यांचे प्राण गेले. कुटुंबियांनी मनोज आवटीचे शव घेऊन पोलिस स्टेशनमध्ये जावे लागले. मगच ११ तारीखला रात्री खुनाचा आरोप करण्यात आला. एका माजी सैनीकाच्या क्रूर हत्येला न्याय देण्याचे काम पोलिसांनी टाळले. निश्चितपणे भ्रष्टाचार झाला असणार. ही तक्रार आम्ही गृहमत्र्यांकडे केली. गृहमंत्र्यांनी आमचे जिल्हा पोलिस अधिक्षकासोबत बोलणे करून दिले. त्यानंतर २० जूनला हजारो माजी सैनिक जातेगावला एकत्रित झाले आणि मारेकर्यांना कडक शासन करण्याचा निर्धार सैनिकांनी घेतला. अण्णा हजारेंनी देखील सैनिक महासंघाला आशीर्वाद देताना सैनिकांना एकसंघ राहण्याचा सल्ला दिला व मारेकर्यांना शासन करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावा असा सल्ला दिला. त्यानंतर आम्ही जिल्हा पोलिस अधिक्षकांना भेटलो पण भेट काही समाधानकारक झालेली नाही. पोलिस दल मारेकर्यांचे संरक्षण करत असल्याचे सैनिकांना वाटले. म्हणून आम्ही परत गृहमंत्र्याकडे व विरोधी पक्ष नेते दरेकर यांच्याकडे न्यायाची मागणी केली.
आता पुढे काय होते ते बघूच.. पण मुख्यत: निष्कर्ष हाच निघतो की सैनिकांचे संरक्षण आणि स्वाभिमान राखण्यामध्ये सरकार आणि समाज कमी पडत आहे. दुसरीकडे पंतप्रधान घोषणा करतात की आम्ही सैनिकांचा सन्मान करू. मला त्यांना हेच विचारायचे आहे की या देशामध्ये सन्मान तर दूरच राहिला, पण संरक्षण देखील सरकार करू शकत नाही. ही आम्ही रास्त चिंता प्रकट करत आहोत. समाजाने आणि सैनिकांनी आपल्या स्वाभिमानासाठी लढले पाहिजे . सैनिकांचा जर पावलापावलावर अपमान होत असेल तर ते सैनिकांनी अजिबात स्विकारता नये आणि सैनिकांची जबरदस्त ताकद आपल्या लोकांच्या संरक्षणासाठी आणि सन्मानासाठी वापरली पाहिजे.
करमणुकीच्या नावाखाली इंटरनेटचा वापर करून अश्लिल चाळे प्रदर्शित करण्यासाठी स्पर्धा लागली आहे. त्यात पुरुषांची मानसिकता उत्तेजित करून व्यभिचाराकडे आणि बलात्कारकडे वळवली जात आहे. त्यातून भारताच्या अनमोल सांस्कृतिक परंपरेला नष्ट करून पाश्चात अमेरिकन सेक्स आणि शराबची संस्कृती भारताच्या अंतरंगाचा ताबा घेत आहे. अमेरिकन अर्थव्यवस्था भारतात लागू करत असताना अमेरिकन संस्कृती सुद्धा आपल्या मनाचा ताबा घेत आहे. त्यावर कुणाचेच लक्ष नाही. ही सर्वात भयानक घटना आहे. अमेरिकेने १९५६ साली ठरवले होते की, बंदुकीच्या जोरावर जग जिंकता येत नाही पण लोकांची मन काबिज करा, त्याला मानसिक गुलाम करून टाका व राज्य करा. अमेरिकेने सातत्याने पाकिस्तानला आधार दिला आहे. तरीही भारतीय लोक किंवा राजकीय पक्ष अमेरिकेविरुद्ध बोलण्याचे धाडस करू शकत नाहीत आणि चीनला धोपटण्याचे काम सुरू आहे. पण सरकार चीनी मालावर बंदी घालत नाही. मोदीने तर स्पष्ट जाहीर केले की चीनने कुठेच घुसखोरी केली नाही मग आमचे २० लोक कसे मारले गेले? याचे स्पष्टीकरण मोदी देत नाहीत. एकंदरीत या सर्व विषयांवर गांभीर्याने भारतात चर्चा झाली पाहिजे व भारतविरोधातील कारस्थानाला उघडे पाडले पाहिजे. कुणाचे गुलाम बनून जगण्यापेक्षा लढता लढता मेलेले बरे असते. हाच निर्धार भारतील राजकीय पक्षांनी प्रकट केला पाहिजे. नाहीतर भारताचा सांस्कृतिक ढाचा उखडला जाईल व देश दिशाहीन पद्धतीने गटांगळ्या खात राहील.
लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा ९९८७७१४९२९.