सैन्याला पाचारण करा_२१.०५.२०२०

महाराष्ट्रात ४०००० करोनाबाधित रुग्ण झाले व हा आकडा झपाट्याने वाढत चालला आहे.  निष्काळजीपणा आणि गलथाणपणामुळे अमेरिकेत जवळ जवळ १ लाख लोक मरण पावले. युरोपच्या पुढारलेल्या देशामध्ये हजारो लोक मरण पावले.  स्पेनमध्ये ३५०००, फ्रान्स ३००००, इंग्लंडमध्ये २८०००, इटलीमध्ये ३२००० जगामध्ये ४५ लाख लोकांना करोना व्हायरसची लागण झाली आहे.  कुठल्याही संसर्गमय जंतूचा प्रसार मानवी संपर्कामुळे होतो.  जोपर्यंत करोनाची लस निर्माण होणार नाही, तोपर्यंत करोना झालेल्या लोकांचा संपर्क तोडला पाहिजे.  पण तसे होत नाही.  त्याला अनेक कारणे आहेत.  सगळ्यात पहिले कारण म्हणजे गरीबी.  गरिबांचे राहण्याचे ठिकाण विशेषत: शहरामध्ये अगदी लहान घरे असतात व गलिच्छ असतात.  एका खोलीमध्ये ५ – १० लोक राहतात.  एकाला जरी करोना झाला, तरी सर्वांना होतो.  त्याचबरोबर शेजार्‍यापाजार्‍यांनाही होतो.  ७० वर्ष स्वातंत्र्यानंतरही सरकार लोकांना घरे देऊ शकले नाही.  हा सर्व पक्षांनी जाणीवपूर्वक केलेला सर्वात मोठा गुन्हा आहे.  खाजगीकरणाच्या नावाखाली वेगवेगळ्या मार्गानी आपली घटनात्मक जबाबदारी टाळून सर्व सरकारांनी लोकांना घरे जाणीवपूर्वक दिली नाहीत.   सरकारच्या ताब्यात असलेल्या जमीन कवडीमोल भावात विकासकांना दिल्या. लोकांना रहायला आणि जगायला चांगले वातावरण नसल्यामुळे करोनाचा प्रसार वेगाने होत आहे. 

            करोनाचा हल्ला ही राष्ट्रीय आपत्ती आहे.  तर तिला त्याप्रमाणे हाताळले पाहिजे.  सरकारने सर्व शक्तिनिशी  करोनाला विरोध केला पाहिजे.  पण तसे होताना दिसत नाही.  आतापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारने सैन्याची मदत घेणे आवश्यक होते. ती का घेतली नाही ते आमच्या समजण्यापलीकडे आहे.  सैन्याची मदत केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नाही ते तर आपोआप होईलच. पण आजच्या काळामध्ये सैन्याची मदत ४ गोष्टींसाठी अत्यावश्यक आहे. पहिली म्हणजे आरोग्यसेवा. महाराष्ट्रात सैन्याची देशातली सर्वात मोठी हॉस्पिटल आहेत.  मुंबईला ‘आश्विनी’ हे navy चे सर्वात सर्वात मोठ हॉस्पिटल आहे, पुण्याचे ‘कमांड’ हॉस्पिटल हे सैन्याचे देशातील सर्वात मोठे हॉस्पिटल आहे.  तसेच देवळाली, अहमदनगर, औरंगाबाद, नागपूर येथे मोठे सैनिकी हॉस्पिटल आहेत. त्याशिवाय सैन्यदल ४ तासात कुठेही असे १०० बेडचे हॉस्पिटल उभे करू शकते.  सैन्याकडे अत्यंत कुशल नर्स, डॉक्टर विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत.  अशी आरोग्यसेवा कुठल्याच शासन विभागाकडे उपलब्ध नाही.  मग याचा उपयोग केंद्र आणि राज्य सरकार का करत नाही?  याचे मला आश्चर्य वाटते.

            दुसरी बाब सैन्यदल हे धारावी सारख्या मोठ्या बाधित क्षेत्रात उत्कृष्ट काम करू शकते.  सर्वात प्रथम लोकांना सुविधा पुरविल्या पाहिजेत व जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला पाहिजे.  आता सरकारने प्रयत्न करून सुद्धा लोकांना जीवनावश्यक वस्तु मिळत नाहीत आणि जिथे धान्य व जीवनावश्यक वस्तु वितरित केल्या जातात, तेथे लोकांची प्रचंड गर्दी होते.  त्यामुळे social distancing चे नियम पाळले जात नाहीत.  सरकारी यंत्रणा याची अंमलबजावणी करू शकत नाही.  त्यामुळे सैन्याची मदत घेऊन social distancing ची अंमलबजावणी केली पाहिजे. सैन्य हे शिस्त लावून ते करून घेईल.  अशाच स्थितीत सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे बाधित क्षेत्रापासुन इतर क्षेत्राला वेगळे ठेवणे आहे. सरकारी यंत्रणेने याच्या उलट केले.  जिथे करोनाबाधित क्षेत्र नव्हते तेथे करोना रुग्णांना पाठवले.  जसे मुंबईतून अनेक लोक गावाकडे गेले. जाताना सोबत करोनाची भेट घेऊन गेले.  त्यामुळे करोनाचा प्रसार आणखी वाढला. दाटीवाटीच्या आणि गर्दीच्या क्षेत्रात राहणार्‍या लोकांना हलवले पाहिजे.  शाळा, कॉलेज, मैदान जिथे रहायला जागा मिळेल, तेथे लोकांना हलवले पाहिजे आणि करोनाबाधित क्षेत्रांचे विलगीकरण केले पाहिजे.  जे सैन्याच्या मदतीशिवाय शक्य होणार नाही.  हे काम पावसाळ्याच्या आधी पूर्ण केले पाहिजे.  तसेच जास्तीत जास्त लोकांना आपआपल्या गावी पाठविले पाहिजे होते.  पण पाठवताना वैद्यकीय चाचणी पूर्ण करून पाठविले पाहिजे.  नाहीतर आता करोनाबाधित रुग्णांना गावाकडे पाठविण्यात आले आहे. त्यामुळे जेथे नव्हता तेथे करोना घुसला आहे. 

            सैन्यदल एकमेव असे दल आहे जे करोनाबाधित क्षेत्रामध्ये काम करू शकते.  कारण सैन्यदल Chemical /रासायनिक, Biological/जैविक आणि Nuclear weapon /अणुवस्त्राच्या हल्ल्यात मुक्तपणे काम करू शकते. कारण सैन्यदल प्रशिक्षित असते व अशा परिस्थितीत काम करण्यासाठी त्यांच्याजवळ साधनसामुग्री सुद्धा विपुल असते.  म्हणून करोनाबाधित क्षेत्रामध्ये सैन्यदल स्वत:चे संरक्षण करून इतरांचे संरक्षण करू शकते.  अशी उपाय योजना कुठल्याही केंद्रीय किंवा राज्याच्या दलामध्ये नाही.  म्हणून आताच्या परिस्थितीत सैन्यदल हे सर्व बाजूंनी काम करण्यास योग्य आहे.  यासाठी कुठूनही बाहेरून सैन्य आणण्याची गरज नाही.  महाराष्ट्रात सर्व ठिकाणी गरजेपेक्षा जास्त सैन्य दल आहे.

            सैन्यदल हे स्वावलंबी असते.  गाड्या-घोड्या, माणस, साधनसामुग्री इत्यादी सैन्यदलाकडे स्वत:चे असते. महाराष्ट्रात कमीत कमी हजारांपेक्षा जास्त ठिकाणी जेवणाची व्यवस्था करू शकते.  मुंबई सारख्या पुर्ण शहराला आधार देऊ शकते. विशेष म्हणजे सामान्य माणसाच्या हालअपेष्टा अत्यंत कमी करू शकते. जसे काश्मिरमध्ये दहशतवादाशी लढताना बंदूक आणि गोळ्यापेक्षा सैन्यदलाच्या नागरी मदतीमुळे  बरेच लोक सैन्याबरोबर आहेत आणि म्हणूनच अनेक काश्मिरी मुस्लिम सैनिक भारतासाठी लढत आहेत.  ही सैनिक संस्कृती आणि परंपरा सरकार आणि प्रशासन समजू शकत नाहीत.  सैन्याचे यश लोकांचे मन आणि हृदय जिंकण्यामध्ये आहे. कारण सैनिक प्रामाणिकपणे लोकांना मदत करते.  म्हणून लोकांचा सहभाग ही सैन्याला आपोआप मिळतो.  आज अशा अडचणीच्या काळामध्ये कोणत्याही भौतिक गोष्टीपेक्षा लोकांचा सैन्यदलाबद्दलचा आदर ही सर्वात मोठी शक्ती आहे, जी लोकांना करोनाकाळामध्ये योग्यपणे वागण्यास व सरकारला सहयोग करण्यास प्रवृत्त करू शकते.

            सरकारने lockdown केला व चौथा टप्पा सुद्धा सुरू झाला.  लोकांना विलगीकरण करण्यासाठी त्याचा उपयोग देखील झाला.  पण हा लढा लांबच्या पल्ल्याचा आहे.  यश न मिळाल्यास डिसेंबरपर्यंत सुद्धा चालू शकतो. या काळात कुठलंही उत्पन्न नसणार्‍या लोकांचा धीर खचू शकतो.  लोकांचा उद्रेक सुद्धा वाढू शकतो. म्हणून ताबडतोब lockdown बरोबरच लोकांना योग्य सोईसुविधा पुरविण्यावर सरकारने काम केले पाहिजे.  लोकांना त्यांच्या नशिबावर सोडून देण्याचे काम हे घटनाबाह्य असेल.  कारण कोणत्याही परिस्थितीत लोकांचे संरक्षण करणे हे सरकारचे प्रथम काम आहे.  दाटीवाटीच्या ठिकाणातून लोकांना बाहेर काढून संक्रमण क्षेत्रात किंवा त्यांच्या गावी पाठविण्याचे नियोजन सरकारने लागलीच केले पाहिजे.  त्याशिवाय शेतकर्‍यांचे व कामगारांचे झालेले नुकसान हे भरून दिले पाहिजे.  खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना पेरणी करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली पाहिजे.  त्याचबरोबर कारखाने सुरू करण्यासाठी कारखान्यात राहण्याची व्यवस्था होऊ शकते का? हे बघावे लागेल. शेवटी उद्योगधंदे व व्यापार आर्थिक प्रगतीसाठी चालू ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.  योग्य नियोजनाने ते आपण करूही शकतो.  सरकारने आपल्यापरीने प्रयत्न केले आहेत, पण ते कमी पडू नयेत म्हणून नियोजन करावे लागेल व योजनेची अंमलबजावणी करणारी एक सक्षम यंत्रणा उभी करावी लागणार आहे. आता घोषणांमध्ये, योजनांमध्ये सरकारला १० मार्क्स दिले तर अंमलबाजवणी मध्ये फक्त ४ मार्क्स देता येतील.  ही तफावत दूर करण्यासाठी सैन्याला ताबडतोब पाचारण करावे.  तर लोकांचे अश्रु पुसण्यासाठी राजकीय इच्छा शक्ती प्रबळ करा.  नाहीतर इतिहास कुणालाच माफ करणार नाही. 

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाईट  :  www.sudhirsawant.com

मोबा ९९८७७१४९२९.

Please follow and like us:

Author: Brigadier SS