हिंदी चीनी भाई-भाई

१९६२ चे चीन बरोबर युद्ध भारताच्या इतिहासातील एक भयानक स्वप्न होते.त्यावेळी लोकसभेत अनेक  खासदारांनी भाषण केले कि शेवटचा जवान आणि शेवटच्या गोळी पर्यंत लढू. झाले देखील तसेच. आमचे जवान शेवटपर्यंत लढले. आपले प्राण देशाला अर्पण केले. पण खासदार आमदारांचे काहींच नुकसान झाले नाही. फक्त श्रद्धांजली वाहण्यासाठी चाडाओड करताना दिसतात. १९६२ च्या युद्धात,भारताचा दारूण पराभव तर झालाच पण त्याहीपेक्षा सैन्याची प्रचंड हानी झाली. ४००० सैनिक कैदी झाले असंख्य मारले गेले, त्याहून अधिक जखमी झाले. युद्ध हे राजकारणाचे एक तंत्र आहे. असे कुठले राजकीय उद्दिष्ट होते कि ज्याच्यासाठी सैन्याची तयारी नसताना. सैनिकाकडे  बरोबर हत्यार नव्हते, दारुगोळा अपुरा होता. बूट नव्हते. संख्या नव्हती  तरी चीन बरोबर आपण युद्ध केले. युद्ध शास्त्रात हे महापाप आहे. १९५५ ला हिंदी चीनी भाई भाई म्हणणारे लोक एकमेकांच्या नरडीचा घोट घेण्यास प्रवृत्त का झाले? आंतरराष्ट्रीय संबंध असेच असतात.आजचा शत्रू उद्याचा मित्र असतो. ह्या संबंधात राष्ट्रीय हित हे मुख्य तत्व असते. ह्यात राग,लोभ,आनंद, दुख काहींचा विचार होत नाही. फक्त राष्ट्रीय हित. ह्याचा प्रत्यय मोदि झी झिंग पिंग भेटीत आला. अलीकडेच चीन विरुद्ध लढण्याची भाषा मोदिनी बदलली. चीन भारत मैत्रीचे संबंध हे दोन्ही देशासाठी महत्वाचे आहेतच पण मानवतेसाठी महत्वाचे आहेत. असा साक्षात्कार मोदि आणि चीनचे राष्ट्रपतीना  झाला. काही महिने पहिलेच डोकलामच्या संघर्षानंतर अमेरिका आणि इंग्लंड ने भारताला चीन विरुद्ध उभे करण्याचे षड्यंत्र रचले. मोदीसुद्धा अमेरिकेत जाऊन अमेरिकेला खुश करून आले.

चीन आणि भारतातील सर्वात मोठा प्रश्न हा एकमेकाला विश्वासात घेवून काम करण्याचा आहे. सतत चर्चा चालू ठेवले पाहिजे आणि मतभेद दूर होईपर्यंत बोलत राहिले पाहिजे.  निश्चित भारताच्या भविष्यावर शेजारी राष्ट्रांचा  परिणाम जास्त राहणार. संघर्षाचे संबंध दोन्ही देशावर प्रचंड ताण निर्माण करू शकतो. पण त्याच बरोबर मैत्रीचे संबंध दोन्ही देशातील लोकांवर प्रचंड परिणाम करणार. १९६२ च्या युद्धानंतर १९८७ च्या राजीव गांधीच्या चीन दौर्यापर्यंत २५ वर्ष आपल्यात काहीच संबंध नव्हता. १९८७ ला हि कोंडी राजीव गांधीनी फोडली. तेव्हापासून मोदी साहेबांच्या अनौपचारिक चर्चेपर्यंत संबंधात बरीच सुधारणा झाली. आता वार्तालापात खंड नाही.

चीनच्या आर्थिक धोरणामध्ये  औध्योगीकीकरनात भर देण्यात आला. व उत्पादनाची निर्यात करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. त्यामुळे जसे अमेरिकन आणि युरोपियन देशांनी भारताला आपली बाजारपेठ बनवण्याचा सातत्याने प्रयत्न केला तसेच चीनचा प्रयत्न राहिलेला आहे. मी भारतीय शिष्ठमंडळाचा  प्रमुख ह्या नात्यांनी, तत्कालीन राष्ट्रपती झियांग जमीन आणि अनेक लोकांबरोबर ९० च्या दशकपासून अनेक वेळा चर्चा करत आहे.  तेव्हापासून आज मोदी साहेबांच्या भेटीपर्यंत चीनच्या धोरणामाद्ये जे सातत्य आहे तीच त्यांची शक्ती आहे. तेव्हा झियांग जमीन मला म्हंटले होते कि भारत चीन संबंध हे दोन्ही देशांनाच  नव्हे तर पूर्ण जगाला महत्वाचे आहे कारण जगातील ४०% लोकसंख्या  या दोन देशात राहते. हे स्पष्ट आहे कि चीन आपल्या प्रगतीसाठी भारताच्या बाजारपेठेवर लक्ष ठेऊन आहे. त्यामुळे भारताशी संबंध सुधारण्यावर त्यांचा नेहमीच जोर राहिलेला आहे कारण भारताशी संघर्ष करून चीनला काहीच फायदा नाही.

भारत चीनमध्ये  सीमा प्रश्न सोडला तर कुठलाच वाद नाही. जसे पाकिस्तान बरोबर अनेक वाद आहेत.मुळात सामान्य लोकांचा पाककडे बघण्याचा दृष्टीकोन दुषित आहे.  डोक्लाम सारख्या घटनेमुळे संबंधात कितीही तणाव आला तरी शस्त्रांचा वापर होत नाही आणि तोडगा निघतो आता देखील दोन्ही राष्ट्र प्रमुखांनी आपापल्या सैन्याला आदेश दिलेले आहेत कि सीमेवर तणाव होणार नाही याची काळजी घेण्यात यावी.  आंतरराष्ट्रीय सीमावाद सोडवण्यासाठी एक संयुक्त गट काम करत आहे. याचा निर्णय लवकरच लागेल अशी अपेक्षा आम्हाला आहे. याचे कारण दोन देशामधील सीमेचा बहुतांश भाग अत्यंत दुर्गम आणि निर्मनुष्य आहे. त्यामुळे ऐतिहासिक काळामध्ये सीमा निर्धारित करणाऱ्या असा कुठलाही ठोस पुरावा नाही. एखादा स्तंभ एखादी झोपडी एखादा रस्ता असे काही नाही. जे काही आहे ते ब्रीटीशानी  निर्माण केलेले आहेत. हा वाद कसा संपवायचा याची योजना दोन्ही देशांनी केली आहे. त्याला वेळ लागेल म्हणूनच राजीव गांधी ते मोदी साहेबांपर्यंत सीमा वाद बाजूला ठेऊन व्यापार,संशोधन,दहशतवाद अशा अनेक विषयावर काम करण्याचे ठरवले आहे.

राहुल गांधींची तक्रार आहे कि मोदि डोक्लाम वर काहींच बोलले नाहीत. मी मोदींचा निश्चित समर्थक नाही. पण आंतरराष्ट्रीय बाबीत सर्व पक्षांनी एकत्र भूमिका घ्यावी असा माझा आग्रह आहे. ह्याबाबतीत राहुल गांधीनी मोदींशी चर्चा करावी असे माझे स्पष्ठ मत आहे. मोदी जीन्ग्पिंग शिखर परिषदेचा उपयोग, संघर्ष टाळण्यासाठी केलेला दिसतो. ह्याचे दूरगामी परिणाम सह्योगणी आर्थिक विकास दोन्ही देशांनी साधावा असे आहे. युद्ध नव्हे आम्हाला बुद्ध  पाहिजे, असे एक बुद्धिस्त धर्मगुरू मला म्हणाले होते. म्हणूनच शांतीसाठी  दोन्ही देशांनी हिंदी चीनी भाई भाई हा नारा दिला होता. तो पुन्हा आपल्या संबंधांचा पाया बनवा हि धारणा अनेकांची आहे.

२०१३ ला नव्यानी निवडून आलेले चीनचे राष्ट्रपती झी झिंग पिंग आणि ओबामाची बैठक झाली त्या बैठकीत चीनने अमेरिकेकडे आग्रह धरला कि दोन्ही देशांनी एकमेकाच्या उद्दिष्टांचा सन्मान करावा व दोन्ही देशांनी जागतिक महाशक्तीच्या स्वरुपात सहकार्याची भूमिका घ्यावी पण तसे झाले नाही. ट्रम्पच्या राज्यात तर त्याच्या नवीन मंत्रिमंडळात अत्यंत आक्रमक मंत्री समविष्ट झाले आहेत. जे रशिया आणि चीनच्या जवळकी बद्दल साशंक आहे. त्यातून एका दुसऱ्या शीत युद्धाची सुरुवात झालेली आहे. त्यामुळेच युनो चे महासचिव अन्तीनो गुद्रेस म्हणाले कि सर्व देशांना संभाषण ठेवण्यासाठी पहिल्या शीत युद्धात निर्माण झालेली संभाषणाची व्यवस्था पुन्हा सुरु करावी नाहीतर प्रचंड संघर्ष होऊ शकतो. नुकतेच ट्रम्पने अणुस्त्राबद्दल आक्रमक भूमिका घेतली  त्याला विरोध करण्यासाठी १ मार्चला  रशियन राष्ट्रपती पुतीन ने  नवीन अणुस्त्र आणि क्षेपणास्त्रे बनविण्यासाठी   नवीन धोरण बनविले. रशिया  जगाच्या कुठल्याही देशावर हल्ला करू शकतो त्याच बरोबर रशिया आणि चीनने अमेरिकेला इशारा दिला आहे कि कुठल्याही हल्ल्याला प्रतिकार दोघे मिळून करतील. रशिया आणि चीनने जाहीर केले कि अमेरिकन डॉलर ला बाजूला करून  सोन्याचा वापर आंतरराष्ट्रीय व्यवहारात करावा.चीन अनेक वेळा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये युआन चा वापर करते व दोन्ही देशांनी आपल्या चलनावर व्यापार करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिले शीत युद्ध अमेरिका जिंकली आणि रशियानी भांडवलशाही तत्वज्ञान स्वीकारले. त्यामुळे शीत युद्धातील तात्मिक मतभेद आता उरलेले नाहीत. फक्त राष्ट्रीय स्वार्थ हा आंतरराष्ट्रीय व्यवहाराचा पाया झालेला आहे. विजेता सर्व काही हडप करतो हि भूमिका घेऊन अमेरीकेनी पूर्ण जग काबीज करायचा धडाका लावला. पण पुतीनने अमेरिकेच्या स्वप्नांना ब्रेक घातला. त्याचवेळी चीन महाशक्ती बनण्याच्या दिशेने जोरदार मुसंडी मारू लागला. व अमेरिका हळू हळू रसातळाला जाऊ लागली.रशिया हे चीन आणि भारताच्या अत्यंत जवळचे  मित्र आहेत. त्यामुळे भारत चीन रशिया एकत्र आणण्याचा प्रयत्न झाला व होत आहे. दुसरीकडे अमेरीका भारताला आपल्या बाजूने खेचण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. वाजपेयीचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रिजेश मिश्र भारत, अमेरिका आणि इस्राएल अशी आघाडी करण्याबाबत जोरदार प्रयत्न केला.पण पाकिस्तान हा अमेरिकेचा सर्वात जवळचा मित्र आहे त्यामुळे अमेरिका पाकला सोडायला तयार नाही. अशा परिस्थितीत भारताने काय करावे हे आजचे आवाहन आहे.

माझे स्पष्ट मत आहे कि आशिया खंडातील शक्तींनी एकत्र यावे. त्यामुळे मोदीच्या चीन यात्रेकडे आपण या नजरेने पाहूया. चीन  भारत रशिया दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील या देशांनी एकत्र काम करण्याचे ठरवले आहे. ब्रिक्स नावाच्या या संघटनेमध्ये एकत्र काम करून जगातील एकमेव महाशक्ती अमेरिकेसमोर त्याच तोलाची हि शक्ती उभी केली पाहिजे. तरच जगाला स्थिरता येईल नाहीतर ट्रम्प एका आंतरराष्ट्रीय गुंडाप्रमाणे जगाचा कब्जा करत राहील. आपले पूर्ण आर्थिक प्रभुत्व स्थापन करण्यासाठी आम्हा सर्वाना चिरडून टाकेल. मोदी आणि झी झिंग पिंग यांची शिखर परिषद या नजरेतून बघितली पाहिजे. चीनशी संबंध सुधारणे म्हणजे भारतीय सैन्यावरील ताण तर कमी होईल पण जेव्हा केव्हा युद्धाला सामोरे जाऊ तेव्हा पाकिस्तान व चीनबरोबर लढण्याची एकाच वेळी पाळी येऊ नये.पाकीस्तान आपल्या बरोबर लढू शकत नाही पण त्याची दादागिरी अमेरिका आणि चीनच्या प्रबळ पाठींब्यामुळे आहे. पाक ला एकट पडायचे  असेल तर चीन बरोबर चांगले संबंध निर्माण केले पाहिजेत. तशीच  भावना चीन ची आहे. २१ व्या  शतकातील सत्ता समिकरणात हा बदल अपेक्षित आहे. नाहीतर अमेरिकेच्या दादागिरीला उत्तर कोणीच देवू शकत नाही.शेवटी मानवतेच्या कल्याणासाठी  जगातील हिंसा, अहिनसाचार बंद झाला पाहिजे. यासाठी भारताने कोणत्याही  गटामध्ये सामील न होता शांततेसाठी  आघाडीची भूमिका घ्यावी.  हेच आपले राष्ट्रहित आहे.

 

 

लेखक : ब्रिगे.सुधीर सावंत

संपर्क  : ९९८७७१४९२९

इमेल  : sudhirsawant09@gmail.com

Please follow and like us:

Author: Brigadier SS