छत्रपती शिवाजी महाराजांचे यश त्यांच्या अत्यंत कार्यक्षम गुप्तहेर खात्यामुळे आहे.तसे पाहिले तर औरंगजेबाचे हेर खाते प्रचंड होते. पण ते पैशाच्या लोभाने काम करत होते. तर शिवरायांचे हेरखाते स्वराज्याच्या ध्यासाने पेटून उठले होते. ते मर मिटायला तयार होते. बहिर्जी नाईक हा रामोशी पण तो कुणालाच माहीत नव्हता व त्याचे वर्णन कुठेही नाही. महाराज सोडून तो कुणालाच भेटत नव्हता. म्हणून शिवरायांच्या व त्यानंतर, संभाजी महाराज, राजाराम महाराज व ताराराणीचे हेर कुणालाच माहीत नाहीत. इतिहासात म्हणून त्यांची नावे नोंद नाहीत. जास्त करून ते भटक्या समाजाचेच होते. फक्त एकदा एका इंग्रजाने बहिर्जी नाईकना बघितले. म्हणून त्याची माहिती मिळाली.
गनिमी काव्याला जोड हेरगिरीची पाहिजे. शुत्रूची अचूक माहिती म्हणजे अर्धे युद्ध जिंकणे. म्हणूनच संताजी, धनाजी शत्रूच्या छोट्या सैन्यावर अचानक हल्ले करत होते मग आसपास विरून जात होते. छत्रपतींनंतर २७वर्ष मराठे लढले आणि औरंगजेबाला इथेच दफन केले. मराठ्यांच्या सैन्यात स्त्रिया पण होत्या. त्या हेरखात्यात मोठ्या प्रमाणात होत्या. ताराराणी सारखी वीरांगना स्वतः घोड्यावर बसून लढली. पण तिचे नाव इतिहासातून वगळण्यात आले. कारण स्त्री ही योद्धा होऊ शकत नाही. हा मनुवाद छत्रपती शिवरायांनी मोडून काढला व स्त्रियांना योद्धा बनवले.
हेरगिरी हा जगातील सर्वात जुना व्यवसाय आहे. राज्यकर्त्यांनी नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी आपले हेर पेरले. काही लोकांनी तर आपल्या कुटुंबावर सुद्धा हेराकडून पाळत ठेवली आहे. शिवरायांनी अत्यंत उत्कृष्टपणे हेरांची संस्था चालवली नसती तर अनेक लढाया जिंकू शकले नसते. युद्धात शत्रुची अचूक माहिती असणे निर्णायक असते. शाहिस्तेखानच्या महालात घुसून त्याची बोटे कापणे हे शिवरायांच्या पराक्रमाचा रोमांचकारी भाग हेरांच्या अचूक माहितीवर उभा आहे. एवढ्या मोठ्या सैन्याचा सरदार, सर्व बाजूंनी सुरक्षित असताना त्याच्या महालात घुसून त्याला मारू शकले. छत्रपती शिवरायांच्या मदतीला शत्रूच्या गोटात अनेक लोक तयार होते, छत्रपतींनी त्यांचा वापर हेर म्हणून अनेकदा केला. त्यामुळे छत्रपतींना आग्र्यामध्ये कैद असताना तेथून महाराष्ट्रात परत येता आले.
हेरांचा वापर आपले शेजारी देश करत नसतील तर नवलच आहे. पाकिस्तानचे ISI आणि भारताची RAW आमने-सामने लढत आहेत. त्यात ISI ला प्रचंड अधिकार आहेत. ते सेनादल प्रमुखाच्या आदेशावर चालतात. तर आता ते गुप्तहेरखाते RAW हे पंतप्रधानांच्या आदेशावर चालते. म्हणून RAW ला लोकशाहीत मर्यादा आहेत. पाकिस्तान आणि अमेरिकेचे भारतामध्ये प्रचंड प्रमाणात हेर आहेत. अमेरिकेने ISI ला प्रचंड ताकद दिली. भारता विरोधात लढण्यासाठी ISI ने आतंकवाद्यांचे जाळे विणले. व आज देखील अमेरिकन गुप्तहेर खाते CIA पूर्णपणे मदत करत आहेत व अफगाणिस्तान मध्ये त्यांना मोठी ताकद दिली आहे.आजकालच्या काळात मोठ-मोठ्या कंपन्या असतात त्यांचे अधिकारी हे हेरगिरी करतात. त्यामुळे अमेरिकेला पूर्ण जगामध्ये हेर पेरायला प्रचंड मदत झालेली आहे. हे लोक मंत्र्या-संत्र्याच्या अधिकार्यांच्या घरात वावरत असतात. दुसरा हेरगिरीचा मुख्य गट म्हणजे संघटित गुन्हेगार. शित युद्धाच्या काळात, सगळ्या राष्ट्राने विशेषत: अमेरिका आणि रशियाने, पूर्ण जगात हेरांचे जाळे विणले होते. आजचा रशियाचा अध्यक्ष पुतीन हा रशियाचा अत्यंत कार्यक्षम मुख्य हेर संघटना KGB चा प्रमुख होता. या दोन्ही महासत्तांनी गुन्हेगारांचा उपयोग सर्वात जास्त केला होता. जगामध्ये संघटित गुन्हेगारी वाढविण्यामध्ये अमेरिका आणि रशियाचा मोठा वाटा आहे. जगातल्या प्रत्येक देशात त्यांनी संघटित गुन्हेगारांना ताकद दिली, शक्ती दिली आणि पैसे दिले. त्यातूनच १९८० पासून आपण बघत आहोत की पूर्ण जगात इतके शक्तिशाली डॉन बनले. हे डॉन आपल्या सरकारवर पूर्ण ताबा ठेवून होते आणि आज ही आहेत. याला भारत अपवाद नाही.
भारतात सर्व गुप्तहेर खात्याच्या वोरा समितीने म्हटले आहे कि भारतावर भ्रष्ट राज्यकर्ते, माफिया आणि भ्रष्ट अधिकारी यांचे समांतर सरकार राज्य करत आहे. या सर्वाची जाणीव भारत सरकारला आहे. पण या हेरांवर काबू करण्यामध्ये भारत अपयशी ठरलेला आहे.चीनच्या प्रत्येक कंपनीत हेरांचा मोठा वाटा आहे आणि ते सर्व क्षेत्रात घुसलेले आहेत. दुर्देवाने भारत सरकार त्याला उद्योजक म्हणून वागवते. ‘हूआई’ नावाची टेलिकॉम कंपनी चीनच्या मालकीची आहे. पूर्ण जगामध्ये या कंपनीचे टेलिकॉम धंदयामध्ये मोठे वजन आहे. २००६च्या काळात भारतातील सर्व भागात टेलिफोन एक्सचेंज लावण्याचे कंत्राट देण्यात आले. त्यावेळेला आम्ही प्रचंड विरोध केला आणि कंत्राट रद्द करायला भारत सरकारला भाग पाडले. चीनी कंपनीच्या हातात पूर्ण टेलिफोन यंत्रणा देणे म्हणजे प्रत्येकाच्या घरात चीनला घुसण्याची संधि देणे असे म्हणावे लागेल. नवीन आर्थिक धोरणामध्ये भारतात हेरगिरी करायला शत्रू राष्ट्रांना प्रचंड वाव मिळाला आहे.
भारताच्या सीमेवर म्यानमारमध्ये ‘मोरे’ नावाचे गाव आहे. तेथे प्रचंड मोठा बाजार आहे. त्याठिकाणी चीनी माल मिळतो. भारत आणि म्यानमारमध्ये करार आहे की २० कि.मी. डोक्यावर माल घेऊन दोन्ही देशामध्ये कुणीही जाऊ शकते आणि म्हणून चीनी माल भारतामध्ये ढकलण्याचे हे सर्वात मोठे केंद्र आहे. तसेच चीनी हेरांचा व संघटित गुन्हेगारांचा तो प्रचंड मोठा अड्डा आहे. तेथूनच चीन भारताच्या पूर्व भागात दहशतवाद्यांना मदत करतो. तेथूनच म्यानमार मधील अफू भारतात मोठ्या प्रमाणात येते. माझ्या मते हा भाग अत्यंत असुरक्षित आहे. भारताने ताबडतोब हा करार रद्द केला पाहिजे. पण का करत नाही तर डॉन लोक विरोध करतात. डॉन लोकांचे आमदार खासदार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ते सरकारची धोरणे बनवून घेतात. अनेकदा उद्योगपती आणि माफीया ही अमेरिकेच्यासाठी काम करते. १९७१ च्याभारत पाक युद्धात अमेरिका, चीन पूर्णपणे पाकिस्तानच्या बाजूने उभे राहिले. पण रशिया आपल्याबरोबर होता. इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात अमेरिकेचा हेर होता. तो सर्व माहिती अमेरिकेला द्यायचा. ती माहिती पाकिस्तानला अमेरिका द्यायची.
दुसरीकडे नेपाळ हे भारताचे मित्र राष्ट्र म्हणून वावरलेले आहे. नेपाळहून अनेक सैनिक भारतीय सैन्यात आहेत. युद्धामध्ये त्यांची कामगिरी देखील प्रशसनीय आहे. पण आता नेपाळ चीनच्या बाजूला गेला आहे. त्यामुळे चीन नेपाळचा वापर भारतामध्ये हेरगिरी करण्यासाठी निश्चितच करणार. तसेच नेपाळ हा जागतिक संघटित गुन्हेगारांचा अड्डा आहे. एकेकाळी दाऊदचा हस्तक सुनील सावंत यांने नेपाळ आपला अड्डा बनवला होता व तेथूनच मुंबईतील जे.जे. हॉस्पिटल वर हल्ला केला होता. त्यामुळे संघटित गुन्हेगारांना वापरुन चीन मोठ्या प्रमाणात भारतात हेरगिरी करू शकतो व दहशतवाद घडवू शकतो.
पाकिस्तान तर चीनचा मोठा मित्रच आहे व पाकिस्तानचे हजारो हेर भारतात फिरत आहेत. अनेक लोक पकडले गेले आहेत. १९७९ ला जवळजवळ १६० सैनिक सांबामध्ये हेरगिरीच्या आरोपावरून पकडले गेले. त्यात एक ब्रिगेडियर, काही कर्नल, काही अधिकारी होते. अशी अनेक उदाहरणे पाकिस्तानच्या भारतातील हेरांची आहेत. एकंदरीत भारताची काऊंटर एंटेलिजियन्स यंत्रणा अत्यंत कमकुवत आहे. सीमेवर असणार्या भारतीय सैन्याला तर फार मोठा धोका आहे. कारण सैन्याला सीमेवरच्या लोकांवर अवलंबून रहावे लागते. त्यातील कोण हेर आहेत आणि कोण नाहीत हे समजणे कठीण असते आणि म्हणून हेरगिरीचे अनेक प्रकार होत आहेत, पण कुणी पकडले जात नाहीत.
हेरगिरी तेवढी सोपी नसते. सिनेमांमध्ये कुणीतरी जेम्स बॉण्ड, सुपरमॅन हेर दाखवला जातो. दुसऱ्या देशात जाऊन तिथल्या लोकांना आपलेसे करून त्या देशाची माहिती काढण्याचा विषय वेगळाच आहे. पण अनेक वेळा आपले हेर दुसऱ्या देशात जाऊन तेथील व्यवस्थेला उद्ध्वस्त करून टाकण्याचा प्रयत्न करतात. तिथे असलेल्या दहशतवाद्यांना मारताना दिसतात. जेम्स बॉण्डने हेरगिरीला आकर्षक बनवले पण हेरगिरीत काहीच आकर्षक नसते. चुकूनच कुठले तरी हेर फार मोठी माहिती सरकारला देऊ शकतात. मी गुप्तहेर खात्यात अनेक वर्ष काम केले आहे आणि जी माहिती मिळायची त्याच्यात हेरांकडून माहिती फारच कमी असायची. उलट सर्वात जास्त माहिती खुल्या सूत्रांकडून मिळत असे. उदा. वर्तमानपत्रात नेत्यांचे भाषण, लोकसभेत चालेले वेगवेगळे विषय, मासिके, सरकारी आदेश यातून बरीच माहिती शत्रूबद्दल कळते. फक्त खुल्या स्तोत्रांकडून माहिती मिळणे यावर आपण अवलंबून राहू शकत नाही आणि म्हणून दुसरे स्तोत्र असतात. जसे आता वायरलेस आहे. लोक मोबाईलवर बोलतात, रेडिओवर बोलतात आणि त्यामुळे बरीच माहिती मिळते. इंटरनेटवर सगळ्यात महत्त्वाची माहिती असते. सर्वात जास्त माहिती जी आम्हाला मिळायची ती नेटवर केलेल्या संभाषणातून. फोटोग्राफीचा आता मोठ्या प्रमाणात जगामध्ये वापर व्हायला लागलेला आहे. ड्रोन हे दुसऱ्या देशांमध्ये आपल्या सीमेवरून बर्याच दूरवर बघू शकते. त्याचबरोबर सॅटेलाईट आहे. अवकाशयान आहेत. यामधून बरंच काही दिसत. अमेरिकेचे सॅटेलाईट सर्वात जास्त परिणामकारक आहेत. आता अशी माहिती मिळते की एक मीटर पेक्षा कमी असलेला माणूस किंवा वस्तु ओळखता येतात. इतके तंत्रज्ञान वाढत गेले आणि ते फार वाढत जाणार आहे. तर अशाप्रकारे बऱ्याच गोष्टी आता विकसित झालेल्या आहेत. साधारणत: दहशतवादी गट किंवा सरकारच्या विरोधात काम करणारे गट हे इंटरनेटचा वापर करतात आणि इंटरनेटचा वापर करताना गुप्त भाषा वापरतात. म्हणून हेरगिरी ही माणसांवर अवलंबून कमी आणि तंत्रज्ञानावर अवलंबून जास्त आहे.
मलाही अनेकदा परदेशातून वेगवेगळ्यासंघटनांनी बोलवलं. माझ्याबरोबर वार्तालाप केले माझी व्याख्याने लावली, या व्याख्यानाच्या माध्यमातून माझे मत काय आहे हे त्यांना कळतं आणि मत कळल्यानंतर त्या माणसाला आपलंसं करण्यासाठी प्रयत्न करतात. अमेरिकेमध्ये बरेचसे विचारवंत ग्रुप आहेत. भारत सरकारने या हेरगिरीची गंभीर दखल घेतली पाहिजे व एक आयोग नेमून भारतात घुसलेल्या हेरांचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे. नाहीतर देशाची सुरक्षा प्रचंड धोक्यात आहे.
लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा ९९८७७१४९२९.