२१ व्या शतकातील महिलांचे स्थान

धर्म आणि अधर्माची व्याख्या काय असू शकते?धर्म कशासाठी? धर्म म्हणजे कर्मकांड आहे का? धर्म म्हणजे मंदिर मस्जिदमध्ये जाऊन पूजा करणे आहे का? कि त्यापेक्षा उच्च आणि उदात्त आहे? धर्म मानवी जीवनावर सुख आणि आनंद आणतो का? धर्म दुसऱ्या धर्माच्या लोकांवर अत्याचार करायला प्रवृत्त करतो का? धर्म कुणा मुलीला जाळून टाकायला शिकवतो का? धर्म माणसाला पशु बनवतो कि सात्विक बनवतो? एकीकडे हिंदू शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि दुसरीकडे असंख्य हिंदू स्त्रियांवर हिंदू पुरुष बलात्कार करत आहेत. या प्रश्नाचे उत्तर हिंदुत्ववादी लोक देऊ शकतात का? या बद्दल मोदींचे मत काय आहे? हे जाणून घ्यायला मी अतिशय उत्सुक आहे.

धर्माच्या नावावर रक्तपात अनेकदा झाले. परंतु त्यातून निष्पन्न काय झाले? धर्माचा वापर अनेक संघटनांनी दुसऱ्या धर्माच्या लोकांवर आक्रमण करण्यासाठी केला आहे. अल्लाउद्दिन खिलजीच्या स्त्री लालचेपोटी एक भयानक युदध झाले. त्यांनी या युद्धासाठी इस्लामचा वापर केला.  पण इस्लाममध्ये दुसऱ्याच्या पत्नीवर वाईट नजर ठेवणे हा गुन्हा आहे.  अशा अनके इस्लामिक किंवा हिंदू राजांनी अनेक स्त्रियांवर अत्याचार केले.  हे सर्व धर्माविरुद्ध होते. अनेक राजकीय नेत्यांनी  धर्म हे व्यवस्थेचे हत्यार म्हणून अनेकदा वापरले. राज्यकर्त्यांनी लोकांना फोडले, द्वेष-भावना निर्माण केली. दंगली घडविल्या. यातूनच  पाकिस्तान  निर्माण झाला.  म्हणूनच प्रश्न पडतो कि हिंदुत्व म्हणजे नेमकं काय? हिंदुत्व म्हणजे हिंदू लोकांच्या कल्याणासाठी एक व्यवस्था आहे का? की दुसऱ्या धर्मातील लोकांना मारण्यासाठी निर्माण केलेलं हत्यार आहे? त्यातच सर्वात मोठा विषय स्त्रियांचे धर्मामधील  स्थान.

रामायण, महाभारतापासून ते वेद आणि पुराणामध्ये हिंदुत्व किंवा हिंदु शब्द सापडत नाही. मग राम असो किंवा कृष्ण असो हे हिंदू धर्माचे दैवत होते का?  का कुठला तरी वेगळाच धर्म होता.  हिंदू हा शब्द धार्मिक ग्रंथात का मिळत नाही?  हिंदुत्व हा शब्द केवळ आरएसएसने निर्माण केला तो ही अलीकडच्या काळात. प्राचीन काळामध्ये एक वेगळीच संस्कृती होती.  हे रोमिला थापरने सिद्ध केले आहे. ही व्यवस्था अत्यंत क्रूर होती. मानवाच्या यातनेचे भयानक स्वरूप बघून गौतम बुद्ध या तरुण राजकुमाराला असंख्य वेदना झाल्या आणि सर्व वैभव त्यांनी सोडले.  माणसाने माणसाला जिवंतपणे मरणप्राय आयुष्य देणे त्यांना पहावलं नाही.   त्या चातुर्वर्णातील अधिकृत शोषणाची, अत्याचाराची  व्यवस्था म्हणजे हिंदुत्व आहे का?

रामायण महाभारत जर आरएसएसच्या हिंदुत्वाचे  ग्रंथ असतील तर आरएसएसचे लोक तत्कालीन समाज व्यवस्थेला मान्य करतात असे आपण धरू. रामायणात गरोदर असलेल्या सीतामातेला एका धोब्याच्या बडबडीवरून जंगलामध्ये सोडून देण्यात आले.  यातच आणि शेवटी हाय खाऊन सीतामातेने पृथ्वीच्या उदरात स्वतःला गाडून घेतले.  अशी यातना लाखो स्त्रियांनी भोगली आहे. यालाच हिंदुत्व म्हणतात काय? तसेच महाभारतात चित्रित केल्याप्रमाणे कौरवानी  पांडवांना जुगार खेळण्यासाठी आमंत्रित केले हे  हिंदुत्व का?   जुगारात पांडवानी घरदार व राज्य गमावले. मग द्रोपदीला म्हणजे आपल्या बायकोला डावावर लावतात. तिला पण गमावतात.  आपल्या बायकोला जुगारात डावावर लावणे म्हणजे हिंदुत्व का?  कौरव तिला अंगवस्त्र खेचून फाडून नग्न करतेवेळेस इतिहासातील महापुरुष म्हणजे भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, दानशूर कर्ण हे उघड्या डोळ्यांनी बघत होते.  याला हिंदुत्व म्हणतात काय?  ही स्त्रियांबाबतीत  मानसिकता, संस्कृती यालाच आपण मनुवाद म्हणतो कि हिंदुत्व म्हणतो हे कुणीतरी  स्पष्ट करावं.

या तुलनेत छत्रपती शिवाजी महाराज कुठे बसतात.  ज्याने आपले राजकारणच रांज्याच्या पाटलाचे हाथ कलम करून सुरु केले.  ‘कितीही मोठा माणूस असला आणि स्त्रीचा अनादर केला तर त्याचा चौरंग करून टाकला जाईल’ असा जबरदस्त संदेश पुर्ण भारताला त्यांनी दिला. असे उदाहरण जगात कुठेच नाही.  ज्याने परस्त्रीला मातेसमान मानले.  ज्याने कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सन्मानाने सासरी पाठविले.  शिवरायांनी फक्त  स्त्री जातीला सन्मानच नाही तर यौद्धा बनविले. २५ वर्षाची विधवा ताराराणी घोड्यावर बसून तळपती तलवार घेऊन औरंगजेबाच्या छावणीवर थेट हल्ला करते त्यांची जगात कुठेही तुलना नाही.  जिने ७ वर्षे औरंगजेबाशी निकराचा लढा दिला. तिला इतिहासातून पेशव्यांनी नामशेष केले.  कारण स्त्रीचे स्थान केवळ पुरुषाची गुलामगिरी हेच आहे. हे मनुवादी तत्वज्ञान म्हणजेच आरएसएसचे तत्व. शिवरायांनी सती प्रथेला ठोकारले व जिजामातेला सती जाऊ दिले नाही. एकंदरीत शिवरायाचा राज्य कारभार हा न्याय, समता आणि बंधुत्वावर आधारित राहिला आहे. मनुवाद्यांनी शिवरायाचा राज्याभिषेक करण्यापासून नकार दिला.  कारण राहुल गांधीप्रमाणे ते जाणवेधारी हिंदू नव्हते. या धार्मिक विरोधाला छत्रपती शिवाजींनी कधीच जुमानले नाही.

लैंगिक समतेचे महापुरुष महात्मा ज्योतिबा फुलेना म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.  कारण पेशवाईमध्ये स्त्री शिक्षण म्हणजे धर्माची विटंबना असे समीकरण मनुवादात निर्माण झाले. याला छेद देऊन सावित्रीबाई फुलेंनी महिलांची पहिली शाळा पुण्यात सुरु केली.  त्यांचा प्रचंड छळ करण्यात आला.  महिलांचे अज्ञान व अडाणीपणा म्हणजे हिंदुत्व का? ते मनुवाद्यांनी स्पष्ट करावे.  कारण आज देखिल सामाजिक विषमतेच्या सापळ्यात असंख्य स्त्रिया अडकलेल्या आहेत.  चातुवर्णात मनुवाद्यांच्या अत्याचाराची शिकार स्त्री होती. आज देखील स्त्रीभ्रुण हत्या किंवा जन्माला आल्यावर मुलीची अमानुष हत्या धर्माच्या नावाने करतात.  त्यातून इस्लामिक, ख्रिस्ती किंवा कुठल्याही धर्माचे लोक सुटलेले नाहीत. म्हणूनच मला आज ठामपणे मांडायचं आहे कि या अधर्मी, क्रूर आणि शोषणकारी चालीरीती ज्या धर्माच्या नावावर चालल्या आहेत त्याला सर्व स्त्रियांनी झुगारून द्यावे.

मी खासदार झाल्यानंतर माझी पहिली मागणी स्त्रियांना सैन्यात घ्यावे अशी होती.  ती मी पंतप्रधान नरसिंहरावकडून लगेच मान्य करून घेतली व आज भारतीय सैन्यामध्ये स्त्रिया उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. एवढेच नव्हे तर स्त्रिया फायटर पायलेट सुध्दा झालेल्या आहेत.  तरी देखील स्त्रियांना सैन्यामध्ये कायमची नोकरी नाही. मी गेले अनेक वर्ष प्रयत्न करतोय कि पोलीस लष्करी दलाप्रमाणे स्त्रियांना सैनिक म्हणून सैन्यात घेतले पाहिजे.  नाहीतर आज स्थिती अशी आहे की ८०० पुरुषामध्ये १ स्त्री अधिकारी असते.  पुढे जाऊन मी पंचायतराज विधायक मंजूर करण्यासाठी व त्यात ३३ टक्के स्त्रियांना राखीव जागा ठेवण्यासाठी आघाडीची भूमिका घेतली व विधायक मंजूर करून घेतले.  पण आज या स्त्रिया राजकारणात येतात त्या बहुतेक कुणा पुढाऱ्याच्या बायका किंवा कन्या असतात. जोपर्यंत स्त्रिया आपल्या हिंमतीवर निवडून येणार नाहीत तोपर्यंत स्त्रियांची राजकीय क्षेत्रात दुय्यम भूमिका असेल. तिसर क्षेत्र म्हणजे शिक्षण असून, स्त्रिया पुर्ण शिक्षित आणि उच्चशिक्षित झाल्या पाहिजेत. म्हणून मी कॉग्रेस पक्षाचा संसदीय सचिव असताना आग्रह धरुन शाळांमध्ये मध्यान भोजनाचा कार्यक्रम मंजूर करून घेतला. त्यामुळे सर्व क्षेत्रात मुलींची प्रगती झालेली आपल्याला दिसत आहे.

भारतीय नारीला २१ व्या शतकात  आपल्या आरोग्याकडे, व्यायामाकडे आणि आहाराकडे फार लक्ष दिले पाहिजे.  कारण जीजामातेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला तर एक माताच शिवरायाला जन्म देऊ शकते.  म्हणून बाळ संगोपनाचा, संस्काराचा मोठा भार स्त्रियांवर येऊन पडतो.  मातृ सत्तेवर आधारित समाज सुसंस्कृत व प्रगतशील असतो  व पुरुषप्रधान समाज हा रानटी असतो. २१ व्या शतकात झपाट्याने पुढे जात असताना आपला उद्देश स्त्री प्रधान समाज निर्माण करण्याचा असला पाहिजे.  ते करण्यासाठी स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कडक शासन झाले पाहिजे.  तेवढ्यावर थांबून चालणार नाही, तर गावागावामध्ये गल्ली गल्लीमध्ये स्त्री सुरक्षा दल उभे केले पाहिजेत. तसेच स्त्रीला स्वावलंबी करण्यासाठी गावागावात उद्योग उभे केले पाहिजेत.  जसे गावत ज्या ज्या गरजा लागतात  त्या गावातच निर्माण केल्या पाहिजेत.  उदा. साबण, लक्स पेक्षा उत्कृष्ट साबण, शँम्पू, धुण्याचा साबण, पापड, लोणचे, मसाले इ. सर्व गावात बनवा.  परदेशी उद्योगाच्या मालावर बहिष्कार घाला. गावातला पैसा गावातच ठेवा.  रासायनिक खते, किटकनाशके, परदेशी बियाण्यावर बहिष्कार टाका. स्त्रियांनाही जीवनाचा आनंद लुटण्याचा अधिकार आहे तो अधिकार मिळवा, हिच माझी आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त तुमच्याकडे मागणी आहे.

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाइट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

 

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS