हिंदुत्त्वाची घोडदोड_20.09.2018

हिंदुत्वाचा चेहरा  अवैद्यनाथ म्हणजे अत्यंत कर्मठ.  युपीचे  ते मुख्यमंत्री झाले. जाणिवपुर्वक राजनाथ सिंह, सिंघल, कलराज मिश्र सारख्या अनुभवी प्रशासकांना बाजूला  ठेवण्यात आले.  प्रशासनाचा अनुभव नसला तरी काही फरक पडत नाही.  कारण काम कमी आणि घोषणा जास्त हे राजकारणातील यशस्वी तंत्र बनले आहे.  भावना भडकवा, लोकांना फोडा आणि राज्य करा.  हा सर्वच पक्षांचा महामंत्र झाला आहे.  आता हिंदुत्वाचे सरकार आल्यामुळे सर्व हिंदुना युपीमध्ये आनंद होत आहे कि सर्व हिंदू संपन्न होणार. सर्वाना घर, नोकरी मिळणार, शेतकरी आनंदी होणार, त्यांच्या शेतमालाला भाव अगदी चांगला मिळणार.  ५०% फायदा होणार. सर्व हिंदुना मोफत शिक्षण  मिळणार.  म्हणूनच कि काय युपीमध्ये नविन मुख्यमंत्र्यांचा पहिला निर्णय कत्तलखाने बंद करा असा आहे.  ह्यामुळे बहुतेक कामगारांना किंवा शेतकऱ्यांना प्रचंड  फायदा मिळणार असेल.  हो अमित शाह पण  म्हणाले  भाकड गाय आणि बैल पाळा आणि दुधाचा  व्यावसाय करा.  गुजरातमध्ये सर्व शेतकरी अशानेच संपन्न झाले. म्हणूनच शेतकरी पटेल समाजानी आरक्षणासाठी संघर्ष उभारला कि काय?  ते उगाचच म्हणतात की काय शेतीमुळे आम्ही भिकेला लागलो.  म्हणून सरकारी नोकर द्या.

एकूण सर्व राजकारणच समजेनासे झाले आहे. ज्याचे सरकार असते त्याला जनता जमीन दोस्त करते. जसे पंजाब, गोवा मध्ये भाजपाला केले. युपीत समाजवादीला केले.  कारण कुठल्याच पक्षाचे सरकार यशस्वी होत नाही. अंबानी अडाणीचे काम करण्यात हे सर्व इतके मग्न असतात कि सामान्य माणूस ह्या देशात राहतो हे भानच कुणाला नसते.  आणि खरी बाब ही आहे कि पक्ष म्हणजे काय हे कोडेच आहे.  मी विदर्भात एका सैनिकांच्या  कार्यक्रमाला गेलो. आता सैनिकांचा कार्यक्रम म्हणून मी माझ्या पूर्वीच्या कॉंग्रेस पक्षाच्या मित्रांना बोलावले. कार्यक्रम संपल्यावर विचारले कि पक्ष कसा चालु आहे. तर ते सर्व हसायला लागले. म्हणाले साहेब आम्ही सर्व आता भाजपमध्ये आहोत. त्यातला एकतर भाजपचा जिल्हा अध्यक्षच होता.  आताच महाराष्ट्रात जिल्हा परिषद अध्यक्षांची  निवड झाली. त्यात अनेकजण पक्ष बदलून निवडून आले. कोण कुठल्या पक्षाचा आहे तेच कळेनासे झाले. गंमत अशी कि अनेक ठिकाणी कॉंग्रेस – भाजपची आघाडी, तर दुसरीकडे शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेसशी भागीदारी.  कुठला पक्ष कुठल्या पक्षाचा मित्र झाला हे कळेनासेच झाले.  आता ५ वर्ष हे भागीदारीत सत्ता गाजवणार.  नाशिकमध्ये तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शिवसेनेबरोबर केला. आचार विचार, सिद्धांत सर्व जमिनीत पुरले आणि नंगे होऊन शत्रूला मिठ्या मारत झोपले. संसार  टाकून पतिव्रता शत्रूकडे केव्हा पळाली हे मालकाला कळलेच नाही. आता विधानसभेत व लोकसभेत हे कॉंग्रेस मुक्त भारताची घोषणा करणार आणि नगरपालिका जिल्हा परिषदेत एकमेकाला मिठ्या मारणार.  हेच आहे भाजप शिवसेनेचे हिंदुत्व आणि कॉंग्रेस समाजवाद्यांचे धर्मनिरपेक्ष राजकारण.

शेवटी रंगलेल्या चेहऱ्याचे मुके घेण्यात मर्दानगी मानणारी आमची नेतेगिरी.  आणखी मोठी गंमत भाऊ-भाऊ वेगळ्या पक्षात.  नातू आजोबा विरुद्ध निवडून येतो.  लोक ह्यांना मते तरी का देतात? तेच कळेनासे झाले आहे.  म्हणून कॉंग्रेस असो किंवा भाजप असो लोक तीच आहेत.  एका नाण्याच्या दोन बाजू.  पूर्ण मॅच फिक्सिंग.  मिल बैठके खाओ. त्यात शरद पवारसारखे तर विनोदच करतात.  म्हणतात कि भाजपाविरुद्ध सर्व पक्षांनी आघाडी करावी.  इकडे भाजपाला पाठींबा दिला म्हणून भाजपचे सरकार चालू आहे.  किंबहुना शरद पवारांमुळेच महाराष्ट्रात सरकार चालू आहे नाहीतर शिवसेनेने केव्हाच सरकार सोडले असते. अरे त्यांनी तर मोदिनाच खुश करून पद्मभूषण मिळवले का?  शेतकरी  आतत्महत्येचा त्यांच्या काळात त्यांनी जागतिक विक्रम केला असावा.  म्हणून स्वतःचे सरकार त्यांनी बुडवले.  त्याचे पारितोषक मोदिसाहेबांनी त्यांना दिले असावे. पुढे कदाचित मोदींच्या विरोधात आघाडी बनवून पुन्हा मोदींना कसे निवडून आणायचे ह्याचे नियोजन करत असावेत.  कारण ह्या सर्वांचेच मित्र अंबानी आणि अडाणी वाटणी करून देतात.

किती छान व्यवस्था आहे. कोणच कुणाचा शत्रू नाही.   अवैद्यनाथाच्या शपथ विधीला तर मुलायम, मोदिजी कसे मिठ्ठ्या मारत होते, कानात बोलत होते.  ह्यांच्यात भांडण झाले तर आहेच, भांडण मिटवणारे भांडवलदार. ‘अरे मिल बांटके खावो भाई, क्यो झगडा करते हो?’  पैश्याला सर्वांचाच सलाम असतो.  म्हणून पैशेवालेच सर्व काही ठरवतात.  हे सर्व नेते महाबिलंदर असतात.  दिवसभर एकमेकाला शिव्या देतात. रात्री एकत्र पार्टी करतात. हे मी अनेकदा बघितले आहे.  मला हे सर्व अजब वाटायचे पण कालांतराने मला पण समजायला लागले कि ही खरी व्यवस्था आहे.  समोर दिसणारे नेते हे नेतेच नसतात तर कटपुतल्या बाहुल्या असतात. खरी सत्ता कुणाकडे असेल ते शेवटी अमेरिका आणि अमेरिकेचे दलाल  ठरवतात.

शेवटी हिंदुत्व  काय आणि धर्मनिरपेक्ष काय. हे केवळ शब्दच आहेत आणि शब्द म्हणजे वारा.  खरे तर व्यवस्थेचे मालक लोकांसमोर एक चित्र बनवतात.  लुटूपुटूच्या लढाया दाखवून जनतेला मंत्रमुग्ध करून टाकतात.  त्यापाठी १% लोक जगात मजा मारत आहेत आणि ९९% फरफटत प्रवाहाबरोबर जात असतात.  प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्यांची कदर जनता करेल, तेव्हाच लोकांचे राज्य निर्माण होईल.   या सर्व पक्षांविरुद्ध एक जबरदस्त आघाडी उभी राहील, तेव्हाच ही व्यवस्था गाढून लोकांची खरी लोकशाही स्थापन होईल.  नाहीतर काहींच्या घरी रोज दिवाळी व दुसऱ्यांच्या घरी अमावस्या.

Please follow and like us:

Author: Brigadier SS