ISIS चे आक्रमण_16.12.2021

काही  वर्षापूर्वी इसिसचा प्रमुख बगदादी याने इराक मधील मोसुल या शहरात मस्जिदच्या वर उभे राहून स्वत:ला ‘खलिफा’ जाहीर केले. खलिफा म्हणजे जगातील सर्व मुसलमानांचा प्रमुख. तेंव्हापासून जगाचे लक्ष ह्या प्रचंड क्रूर गटावर केंद्रित झाले. बगदादी जखमी होता. नंतर तो सिरीयात मारलागेला.  त्याने त्याचा व्हिडिओ प्रकाशित केला होता. त्याला अत्यंत ताकदवान शक्तीची मदत होती. पैसा आणि हत्यारांचा मुबलक साठा होता. आज देखील इसिसकडे आहे. जगात प्रत्येक देशात त्याचा गट कार्यरत आहे. काश्मिरमध्ये मोठ्या प्रमाणात घुसण्याची त्याची मनिषा आहे. इसिस जर काश्मिरमध्ये आली तर दहशतवादाचे नियम बदलून जातील. आतापर्यंत दहशतवाद्यांनी हल्ले सैन्यदलावर जास्त केले. सामान्य नागरिकावर नाही. पण इसिसच्या क्रूर लोकांना सामान्य माणसांची कत्तल करण्यात मजा येते.  जेव्हा खोट्या हिंदुत्वाचा प्रचार होतो, त्याचा इसिसला फायदा होतो. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार काबूलवर इसिस (खोरासान) ने बॉम्ब हल्ला केल्यानंतर काही काश्मिरी युवक इसिसमध्ये शामिल होण्यासाठी गेले. ते इसिसच्या दहशतवादी टोळी काश्मिरमध्ये आणण्यासाठी.  मुसलमानात इसिसचा प्रचार होतो कि दुसरे कोणी तुमचे संरक्षण करू शकत नाही. फक्त इसिस संरक्षण करू शकतो. वहाब्बी इस्लामला काश्मिरी मुसलमानांचा विरोध असल्यामुळे अजून कोणी इसिसकडे आकर्षित झाल्याचे दिसत नाही. पण एक गट काश्मिरमध्ये बनल्याची बातमी आहे.

अतिशय हिंसक, निर्दय आणि क्रूर दहशतवादी गट म्हणून इसिस किंवा इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सिरीया (ISIS) ओळखला जातो. तिचा प्रमुख अबू-बकर-अल-बगदादी ५ वर्ष कुठे दिसला नाही. पण श्रीलंका हल्ल्यानंतर अचानक बाहेर आला आणि श्रीलंकेच्या हत्याकांडाची जबाबदारी घेतली. दरम्यानच्या काळात ISIS ने इराक़ आणि सिरीयातील इंग्लंड पेक्षा मोठ्या भागावर कब्जा केला होता. त्यात रक्का इथे आपली राजधानी स्थापन केली व खलीफत स्थापन केली. स्वत:ला इस्लामचा एकमेव प्रमुख मानून पूर्ण जगावर फतवे काढण्याचा सपाटा लावला. जगातील अनेक तरुण ISIS च्या राज्यात स्थलांतरीत झाले. इस्लामच्या तत्त्वावर राज्य करण्याचा प्रयत्न सुरु झाला.  आपलाच वहाब्बी इस्लाम हा खरा इस्लाम मानून इतर पंथ हे इस्लाम विरुद्ध आहेत असे जाहीर केले.  उदा.दर्गा मानणारे सर्व लोक मुस्लिम नाहीत असे त्यांनी जाहीर केले. त्यांच्या राजवटीत ज्यांनी वहाब्बी इस्लाम स्विकारला नाही, त्यांची कत्तल करण्यात आली. पकडलेल्या  स्त्रियांना  गुलाम बनवण्यात आले. त्यांच्यावर बलात्कार करून अतोनात छळ करण्यात आला.

          अशी अमानवी राजवट काही लोकांना आकर्षक वाटली. जगभरातील आतंकवादी इसिस राजवटीत शामिल झाले आणि ५ वर्ष इराक़, सिराया, तुर्की आणि कर्ड समूहाबरोबर युद्ध झाले. अमेरिका आणि रशियाचा पूर्ण पाठींबा या देशांना होता. ईसिसची राजवट संपुष्टात आली. दरम्यानच्या काळात त्याचे सर्व सैन्य जगभरात पांगले. इसिसच्या अनेक संघटना जगात वेगवेगळ्या देशात निर्माण झाल्या होत्याच. जसे भारतातील अनेक युवक इसिसमध्ये शामिल होऊन सिरियाला लढण्यासाठी गेले. आता हे पूर्ण प्रशिक्षित दहशतवादी परत भारतात आले. परिणामत: २० एप्रिलला  श्रीलंकेत अनेक चर्च वर हल्ले झाले. त्यात २०० लोक मारले गेले. फिलीपीनमध्ये सुद्धा चर्च वर हल्ला झाला. हे हल्ले वाढत जाणार. १९९१ ला मी लोकसभेत सरकारला इशारा दिला होता कि, तमिळनाडूत ज्या दिवशी दहशतवाद सुरु होईल तो भारताचा अंत: असेल. श्रीलंकेत भारतीय सैन्याला प्रचंड नुकसान सोसाव लागले  होते. इसिसचा इराकमध्ये पराभव अटळ होता हे दिसल्यावर, त्यांचे सैन्य पूर्ण जगात पसरले. भारत  सरकारने आणि जगाने दुर्लक्ष केले. त्याचा आता परिणाम आपल्याला भोगावा लागणार आहे. बगदादी हा मुळचा अलकायदाचा सैनिक. त्याला अमेरीकन सैन्याने पकडले.  तुरुंगात त्याची अनेक दहशतवाद्यांबरोबर बैठक झाली. बाहेर पडल्यावर त्याने स्वत: ची टोळी बनवली. ती नंतर इसिस म्हणून प्रसिद्ध झाली.

          व्हिडिओमध्ये बगदादी म्हणाला. “आमचे युद्ध शत्रूला सतत हानी पोहचवण्याचे आहे. सगळ्यांना माहित पाहिजे कि जिहाद हा निर्णायक क्षणापर्यंत चालू राहणार.” ह्याचाच अर्थ, बगदादी गेल्यानंतर इसिस अजून जिवंत आहे. इसिसचे आंतरराष्ट्रीय संघटन अचानक आणि अनपेक्षित हल्ले करत राहील. इसिस हल्ल्यामुळे, अनेक गटांना व सहानभूतीदारकांना प्रोत्साहन मिळाले.  बगदादीचे नेतृत्व जगात अनेक गटांना मान्य होते. यात अफगाणिस्तान, पाकिस्तान, काश्मिर आणि भारतात घुसलेले गट आक्रमकपणे काम करतील.

          इसिसचे पूर्ण सूत्र बदलले आहे. बगदादीने २०१४ ला मोसुल ह्या इराकी शहरात खलीफत जाहीर केले व म्हटले ही फक्त चळवळ नाही तर राष्ट्र आहे. असे राष्ट्र जे इस्लामिक धोरणाप्रमाणे राज्य करते. तोपर्यंत इराक आणि सिरियामध्ये इंग्लंडपेक्षा मोठे राष्ट्र इसिसने बनवले. पण आता युद्ध हरल्यामुळे त्यांचे राज्य गेले. बगुझा या सिरियातील शहरात युद्धाचा शेवट झाला. बगदादीने तेव्हा या नुकसानाची चर्चा केली, पण युद्ध संपले नाही असे जाहीर केले. इस्लामचे युद्ध  हे कृसडेर ( ख्रिचन फोकचे सैन्य)  विरोधात ISIS चे आक्रमण आहे. हे अनेक वर्ष चालणार आहे. म्हणून सर्वांनी हे युद्ध जगात सगळीकडे  चालवले पाहिजे असे बगदादी म्हणत होते.  श्रीलंकेवरील हल्ला हा सूड घेण्यासाठी केला गेला. युद्धातील पराभवामुळे इसिस संपल्याचा समज हा फोल आहे. इसिसचे अजून देखिल हजारो सैनिक आहेत, जे भूमिगत आहेत.

          बगदादी अत्यंत गुप्तपणे राहत होता.  तो कुठल्याच इलेक्ट्रॉनिक वस्तूचा वापर करत नव्हता. ओसामा-बिन-लादेनने चुकून  इलेक्ट्रोनिक उपकरणाचा वापर केला त्यात तो मारला गेला.  हे बगदादीला चांगले माहिती होते. म्हणून बगदादी पुर्णपणे आपल्या मनुष्यबळावर अवलंबून राहत होता.  बगदादी  अमेरिकन  सुरक्षा दलाचा  सर्वात  प्रथम लक्ष होता. त्याला जिंदा वा मुर्दा हासील करून आपल्याला स्वाधीन करण्यासाठी अमेरिकेने २५ कोटीचे बक्षीस जाहीर केले होते.  त्याला मारण्याचे अनेक प्रयत्न झाले पण बगदादी काही तेव्हा सापडला नाही. व्हिडिओ मध्ये आपले जगातील स्थान सगळ्यांना सांगण्यासाठी श्रीलंकेच्या हल्ल्याची जबाबदारी स्वत: बगदादीने घेतली. त्याचबरोबर त्याने सुदान आणि अल्जेरीया मधील संघर्ष स्वत:  घडविल्याचे  सांगितले. त्याने जगभर आपल्या अनेक सहकार्‍यांची नावे घेतली. बेल्जीयम, ऑस्ट्रेलिया आणि सौदीअरेबिया ह्या देशात त्याचे लोक आहेत हे जगाला दाखविले.

          इस्लामिक दहशतवाद किंवा इस्लामिक कट्टरवादाचा पाया वाहब्बी इस्लाममध्ये रुजलेला आहे.  ओसामा-बिन-लादेन,  हफ्हीज  शय्यद, अझर मासूद यांचे गट वाहब्बी इस्लामच्या पायावर उभे राहिले आहेत.  बगदादी सुद्धा यातलीच एक कडी होती.  वाहब्बी इस्लामचा उगम सौदी अरेबियात झाला.  भारतात फार कमी लोक वाहब्बी इस्लामला मानतात.  उलट भारतातील बहुसंख्य मुसलमानांचा या प्रकारच्या इस्लामला विरोध आहे.  जसा अलकायद्याचा प्रभाव कमी होत आहे, तसा इसिसचा प्रभाव वाढत चालला आहे. पण अलकायद्याच्या प्रमाणात इसिस अत्यंत क्रूर आहे.  अलकायदा इतर इस्लामिक पंथाबद्दल आक्रमक नव्हता पण बगदादी इतर इस्लामिक पंथाना देखील आपला शत्रू मानतो. प्रचंड खून खराबा करणे हे इसिसचे तत्त्व आहे.  श्रीलंकेत इसिस घुसले आहे.  हळूहळू तमिळ वाघांबरोबर संबंध वाढत आहेत.  श्रीलंकेतून उच्चाटन करून टाकल्यानंतर तामिळ वाघ तमिळनाडू आणि केरळामध्ये घुसले आहेत.  बरेच तामिळ राजकीय पक्ष तामिळ वाघांना मदत करत आहेत.  किंबहुना  कोणचं विरोध करत नाहीत. तामिळवाघ आणि इसिसच अघोरा संबंध झाला, तर भारतात प्रचंड रक्तपात होईल. त्यामुळे श्रीलंकेतील हल्ला ही काही छोटी घटना नव्हे. तर द.आशियात इसिसच्या आगमनाची सुरुवात आहे. भारताने वेळीच स्वत:ला सावरले पाहिजे नाहीतर अनर्थ होऊ शकतो. जिथे CDS बिपिन रावत ह्यांचा  विमान अपघात झाला त्या भागात मोठ्या प्रमाणात तामिळ वाघ राहत आहेत. तामिळ वाघ हे जगातील सर्व आतंकवाद्यांचे गुरु आहेत.  आत्मघातकी पथक पहिल्यांदा तामिळ वाघानीच सुरु केले. अंगाला बॉम्ब बांधून स्वत:ला उडवून घेण्याचे धाडस हे तामिळ वाघानेच निर्माण केले.  त्यातच राजीव गांधीचा खून झाला.  पाकिस्तान मधील दहशतवाद्यांना तामिळ वाघांनी प्रशिक्षण दिलेले होते आणि म्हणून तामिळ वाघांचा नविन अवतार भारतात निर्माण होऊ पाहत आहे. त्याला जर इसिसची साथ मिळाली तर भारतात आपल्याला प्रचंड हिंसेला सामोरे जावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर भारताने या नविन निर्माण होणाऱ्या धोक्यापासून सावध राहिले पाहिजे.

लेखक: ब्रिगेडियर सुधीर सावंत 

वेबसाइट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS