नुकतेच सैन्यदल मुख्यालयात संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना भेटायला गेलो तेव्हा जुन्या आठवणीना उजाळा आला. मी अनेक वर्ष संरक्षण मंत्रालयाच्या वास्तूत काम केले. ब्रिटीश कालीन भव्य इमारतीत पंतप्रधान आणि संरक्षण मंत्रालय स्थित आहे. आमच्या काळातील सैन्य आणि आताच्या सैन्यातील फरक प्रदर्शित होत होता. तो रुबाबात फिरणाऱ्या महिला अधिकाऱ्यांमुळे. कुठल्याही कार्यालयात जा, मुली जबाबदारीने मोठी मोठी कामे हाताळताना दिसत होत्या. आता तर जोखीम असलेली कामे सुद्धा जबाबदारीने हाताळताना महिला अधिकारी दिसल्या. अनेक मोठ्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामाबद्दल पुष्टी दिली. त्यातच भारतीय सैन्याचे प्रमुख बिपीन रावत यांनी वक्तव्य केले कि, लढाऊ कामात मुलीना घालणे ठरलेले नाही. ह्यामुळे वादाला नवीन वळण लागले. जगात महिलांचे योद्धा म्हणून स्थान चुकूनच प्रस्थापित झाले आहे. मुलांना वाढवणे हे स्त्रीचे प्रमुख काम आहे अशी सामाजिक प्रथा राहिली आहे. पद्मिनीची कहाणी सर्वश्रुतच आहे. लढण्या ऐवजी स्वत:ला जाळून घेणे हे राजपूत स्त्रियांनी पसंत केले. जगाच्या इतिहासात नावाजलेल्या योद्धा अपवादानेच सापडतात. रजिया सुलतान, चांद बीबी, कित्तूरची चन्नमा, झाशीची राणी ही नावाजलेली नावे येतात. पण इतिहासातील सर्वात सक्षम आणि विजयी स्त्रियांचे नामो निशाण मिटवून टाकण्यात आले आहेत.
तसे पहिले तर जिजामातेनेच शिवरायांना घडवले आहे. युद्ध कौशल्यात, पारंगत केले. शिवरायांनी भारतात पहिल्यांदाच स्त्रियांना युद्ध शास्त्रात तयार केले. मनुस्मृतीत जखडलेल्या स्त्रियांना त्यांनी मुक्त केले. संभाजी महाराजांनी आणि राजाराम महाराजांनी ताराराणी निर्माण केली. राजाराम महाराज गेल्यानंतर १७०० साला पासून १७०७ पर्यंत मराठा साम्राज्याची संपूर्ण धुरा त्यांनी चालवली. २५ वर्षाची विधवा स्त्री घोड्यावर बसून थेट औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला केला. ७ वर्ष सतत औरंजेबाशी झुंजत राहिली. औरंगझेबाला ह्या महाराष्ट्रातच देह सोडावा लागला. अशा भारतातील एकमेव सर्वश्रेष्ठ स्त्री योद्धयाचे नाव इतिहासातून बेदखल केले, असा अमानवी गुन्हा कोण करू शकते? तर मनुस्मृती. स्त्री आणि युद्ध ही कल्पनाच मनुला मान्य नव्हती. मुले सांभाळायची नवऱ्याची सेवा करायची आणि नवरा मेला कि स्वत:ला जाळून घेणे हिच स्त्रीची कहाणी होती. ताराराणीला पेशव्यांनी खलनायिका करून टाकली.
मी हाच इतिहास लोकसभेत १९९१ ला मांडला. स्त्री सर्व बाबतीत पुरुषांबरोबर काम करायला सक्षम आहेत हे लोकसभेला दाखवून दिले. प्रधानमंत्री नरसिंहराव यांनी नंतर बैठक बोलवून स्त्रियांना भारतीय सैन्यात घेण्याचा आदेश दिला. १९९२ पासून स्त्रिया मग सैन्यात येवू लागल्या. पण आमची मागणी एवढीच मर्यादित नव्हती. अनेकदा लढाऊ पलटणीत १००० स्त्रियामध्ये १ स्त्री अधिकारी असते. मी अनेकदा हा विषय उचलला कि स्त्रियांना लढाऊ क्षेत्रात घेण्यात यावे. एवढेच नव्हे तर स्त्रियांना फक्त अधिकारी नाहीच तर सैनिक म्हणून घेण्यात यावे. स्त्रियांच्याच फक्त बटालियन उभारण्यात याव्या. ज्या स्त्री अधिकाऱ्यांच्या हाता खाली राबतील. पण सैन्याच्या वरिष्ट अधिकाऱ्यांचा त्याला नेहमीच विरोध राहिला. संरक्षण मंत्र्यासामोरील बैठकीत त्यांना वेगळे बाथरूम लागेल असे बाष्कळ मुद्दे पुरुषांकडून उभे करण्यात आले.
पहिल्यांदा अधिकृतपणे रशियात १९१७ मध्ये रशियन सरकारने २ पलटणी महिलांच्या उभ्या केल्या केल्या. त्यावेळी कॉमुनिस्ट हे पहिल्या महायुद्धाला विरोध करत होते. अलेक्झांडर कुडाशेवा ह्याच्या नेतृत्वाखालील रशियन सरकार ने स्त्रियांना सैन्यात घेवून लढाईवर पाठविले. मारिया बोच्केरेवा ह्या महिला अधिकारीने ह्या पलटणी स्थापन केले. तिचा विश्वास होता कि युद्धात ती रशियाची सन्मानपूर्वक भूमिका निभावेल. त्यांचे पहिले युद्ध मारीयाच्या नेतृत्वाखाली स्मागोर्नन येथे झाले. १९१७ साली घनघोर संघर्ष झाला. त्यातच बराच भाग महिलांनी कब्जा केला. पण पुरुषांनी पुढे जावून मदत न केल्याने त्यांची प्रचंड हानी झाली. रशियन राज्य क्रांतीमध्ये कम्युनिस्ट पक्षाने खऱ्या अर्थाने युद्धात थेट जबाबदारी महिलांना दिली. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटन, अमेरीकन, क्यानेडा यांनी लढाऊ सैनिक न बनवता रेडीओ, नर्सेस, गुप्तहेर अशा अनेक इतर कामांमध्ये उपयोग करून घेतला.
आज भारतीय सैन्यात हवाई दलात ८ .३ टक्के, सैन्य दल ३ टक्के, नाविक दल २.८ टक्के महिला कार्यरत आहेत. २०११ मध्ये स्यापोर शांती पहिली महिला सैनिक शिपाई पदावर घेण्यात आली. प्रिया सेमवाल २०१४ मध्ये पहिली सैनिकाची बायको कि जीने अधिकारी म्हणून भारतीय सैन्यात पदार्पण केले. तिचा नवरा दहशतवादी हल्ल्यात अरुणाचल प्रदेशात २०१२ मध्ये मारला गेला होता. मिताली मधुमिता लेफ्ट.क. भारतातील पहिली महिला अधिकारी कि जीने सेना पदक मिळविले. तिने काबुल दूतावासातील हमल्यामुळे आणि काश्मीरमध्ये उत्तम कामगिरी बजावली होती. अश्या प्रकारे १९९३ पासून महिलांनी सैन्यात नेत्रदीपक काम केले आहे. मला स्वतःला त्यात कारगिल युध्द असो कि दुर्गम ठिकाणी काम करायचे असो, स्त्रिया कुठे कमी पडताना दिसल्या नाही.
हे जरी खर असल तरी स्त्रियांना पुरूषां पेक्षा जास्त त्रास होतो. हे काही नाकारता येत नाही. भारत चीन सीमेवर मी गेलो असताना तिथे ८०० पुरूषांमागे एकच स्त्री अधिकारी दिसली. कुणी कधी माझ्याकडे तक्रार केल्याची बाब नाही. पण इतक्या पुरूषांमध्ये एकच स्त्री असल्यावर मानसिक दबाव असतोच २०१७ मध्ये १२ महिला अधिकाऱ्यांना सापत्न वागणुकीने भेदभावाने तक्रारी केला आहेत. भारतीय सैन्यात ६६,००० एकूण सैनिकांमध्ये केवळ ३५०० महिला सैनिक आहेत. सैन्य दलात महिलांचा खरा सहभाग तेव्हाच वाढेल जेव्हा लढाऊ महीला सैनिक निर्माण होतील . केवळ अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या कामा घेण्याबरोबरच महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वखाली महिला सैनिकांची १२० तुकड्या उभ्या केल्या पाहिजेत. त्या मागणीला सैन्य दल का विरोध आक्रीत आहे ते मला समजत नाही.
विषय स्त्री पुरुष समतेचा नाही. विषय देशातील नागरिकांच्या स्वाभिमान व सन्मानाचा आहे. हजारो वर्षे मनुस्मृतीमध्ये झालेल्या स्त्रियांचा छळ व शोषण याने भारताला निश्चितपणे विकलांग केले आहे. त्याचा पद्मिनीने स्वतःला जाळून घेणे एवजी सर्व स्त्रियांना सोबत घेवून अल्लाउद्दीन खिलजी विरोधात हल्ला करून शहीद झाल्या असत्या तर भारतीय नारीच्या शौर्याची कीर्ती जगभर दुमदुमली असती. त्याच बरोबर ज्या प्रमाणे शिवरायांनी दलितांच्या हातात तलवार दिली त्याचप्रमाणे हजारो वर्षे दलितांना सैनिक केले असते तर कदाचित सिकंदर ते बाबर ते इंग्रज यांनी देशाला तुडवायचं धाडस केलं नसत. पुढल्या काळात स्त्रियांना प्रशिक्षित करून सर्व अक्षेत्रात वाव दिला पाहिजे तरच खर देशहित लपलेलं आहे.
लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत
वेबसाइट : www.sudhirsawant.com
मोबा. नं. ९९८७७१४९२९