राजपुतांना रायफल्सचे लेफ्टनन उमर फैयाज डिसेंबर २०१६ ला इंडियन मिलिटरी अकॅडेमी मधून पास होऊन सैन्यात दाखल झाले. तो एक उत्कृष्ट अधिकारी, अष्टपैलू खेळाडू होता व राजपूत जवानांमध्ये प्रिय होता. तो काश्मिरी होता. ९ मे ला सुट्टीवर नातेवाईकाच्या लग्नाला गेला असताना ५ दहशतवाद्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्या शरीराची गोळ्यांनी चाळणी करून सोपिअनला हर्मन चौकात फेकून दिले. त्याच दिवशी ३००० काश्मिरी लोक पोलीसमध्ये भरती होण्यासाठी लाईन लाऊन श्रीनगरला उभे होते.
हे काश्मिरी सत्य आहे. एकीकडे दहशतवादी वाढत आहेत तर दुसरीकडे त्यांचा प्रतिकार करणारे जास्त पटीने वाढत आहेत. २००३ पासून आम्ही शरणागती पत्करलेल्या व इतर ८००० काश्मिरी मुस्लीम युवकांना सैन्यात घेवून ८ बटालियन उभ्या केल्या व काश्मीरच्या इतिहासात एक नविनच विभाग बनवला. तत्कालीन प्रधानमंत्री वाजपेयीजी कडून मी परवानगी मिळवली. या सैनिकांनी इतक्या निष्ठेने काम केले की, काश्मिरीमधील दहशतवाद मोडून काढला. काश्मिरी समाजात ह्या सैनिकांचे स्थान मानाचे आहे. २०००० रुपये पगार असणारी दुसरी कुठली नोकरी नाही. म्हणून त्यांच्याशी लग्न करायला काश्मिरी तरुणी अत्यंत उत्सुक असतात. सर्व गावात दहशतवाद्यांना प्रवेश बंद करण्यात आला, असे असताना गेल्या दोन वर्षात असे काय झाले की दहशतवाद नवीन जोमाने वाढू लागला? सैन्य लोकांची मने जिंकते, दहशतवाद संपवते व आपले राजकीय लोक दहशतवाद निर्माण करतात हा आमचा अनुभव आहे. कारण राजकारण जाती धर्मावर चालवण्यात येते व सैन्य जाती धर्म बघत नाही. उमर आणि बाकी उदाहरण मी देशबांधव आणि भगिनी समोर का ठेवले? फक्त एकच बाब सिद्ध करायला की, दहशतवाद हा हिंदू–मुस्लिम खाक्यात कुणी बांधुन ठेवू नये. कारण काश्मिरी आतंकी लोकांपेक्षा त्यांच्या विरुद्ध लढणारे काश्मिरी १०० पट जास्त आहेत. फक्त ४ जिल्ह्यात दहशतवाद केंद्रित आहे. तर पुर्ण एल.ओ.सी. भागात सीमेवर आदिवासी, बक्र्वाल, गुज्जर, राजपूत हे मुस्लिम असून देखील भारताबरोबर आहेत. फक्त श्रीमंत काश्मिरी लोक, जे श्रीनगर, अनंतनाग, सोपिअन भागात राहतात ते स्वतंत्र राष्ट्र मागत आहेत आणि याच भागात गेल्या २ वर्षात दहशतवाद पुन्हा जोमाने सुरु झाला. त्याला मोदी मेहबुबा सरकार पुर्णपणे जबाबदार आहे. भारतीय सैन्य हे जगातील एकमेव सैन्यदल आहे ज्याने भारतामधील अनेक भागात बंडोबाला थंडोबा केला. मग ते खलिस्तान असो का नागालँड, मिझोरम असो. कारण सैन्यात आम्हाला कडक आदेश होते की, बंदुकीच्या गोळीने दहशतवादाविरुद्ध लढता येत नाही. हृदय आणि मन जिंकून दहशतवाद संपवता येतो. म्हणूनच सैन्य जेव्हा हल्ला करते त्याच्यापाठी डॉक्टर असतो जो नागरिकांसाठी काम करतो. ह्याला सद् भावना मिशन म्हणतात. बहुतेक काश्मिरी मुस्लिम दहशतवादाविरुद्ध आहेत. कारण लष्कर–ए–तोईबा, जैश–ए–मुहम्मद सारखे गट अहले हदीत किंवा वाहब्बी इस्लाम मानणारे आहेत. मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ ला हल्ला करणारे कसाब व त्याचे साथी, सर्व अहले हदीत या गटांना मानत होते. इसिस असो का अलकायदा असो हे सौदी अरेबियाचे वाहब्बी गट आहेत. ९०% भारतीय मुस्लिम या पंथाना मानत नाहीत. यांच्या मशिदी, पोषाख, सर्व वेगळे आहेत. इसिसने वहाब्बी पंथाच्या नावे, ९५% मुसलमानच मारले.
एकच कुराण, गीता, बायबल, बुद्धांचा धम्म असला तरी त्यात पंथ अनेक आहेत. धर्मांच्या ठेकेदारांनी आपलीच दुकाने उघडली. हिंदूंचा सर्वमान्य ग्रंथ नाही म्हणून अनेक रूढी परंपरा निर्माण झाल्या. पण जेथे धर्मग्रंथ आहेत तिथे देखील अनेक पंथ असावे हे नवलच आहे. जसे ट्रिपल तलाकची प्रथा कुराणामध्ये तरी ग्राह्य नाही. पण समाजात सर्रास वापरली जाते. एकदा पैगंबराने एका माणसाला तलाक देण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण त्याने मान्य केले नाही. मग पैगंबरानी परवानगी दिली पण त्याला १०० चाबकाचे फटके मारण्याचा दंडदेखील दिला. कारण इस्लामिक कायदा त्याने मानला नाही. तलाकचा अधिकार पुरुषांना आहे, पण तलाक मुळात इस्लामला मान्य नाही. इस्लामप्रमाणे लग्न हे एक करार आहे.
तरी तलाक घ्यायचा असेल तर अनेक मुस्लिम पंथात आधी नवरा बायकोला वेगळे राहावे लागते. मग जेष्ठ लोकांची मध्यस्थी करावी लागते. मग पहिला तलाक म्हटल्यानंतर दुसरा तलाक एका महिन्याने म्हणावा लागतो व तिसरा तलाक आणखी एका महिन्याने बोलावा लागतो. मगच घटस्फोट होतो. पण आपल्या समजुतीप्रमाणे एकाच वेळी तीनदा तलाक म्हटले तर तलाक होतो. हा समज चुकीचा आहे. प्रचलित समजुतीप्रमाणे पुरुषालाच घटस्फोट घेता येतो. पण हे चुकीचे आहे. मुलींना सुद्धा तलाक घेता येतो त्याला ‘खुला’ म्हणतात. पण ही बाब जाणीवपूर्वक लपवून ठेवण्यात आली. इस्लाम मध्ये एकंदरीत स्त्रियांना स्वातंत्र्य आहे. पण माणसांनी रूढी परंपरा बनवली व स्त्रियांना शोषणकारी व्यवस्थेमध्ये जखडून टाकले. धर्माचा आणि परंपरेचे खोटे हत्यार वापरून त्यांना पडद्याआड ढकलून दिले. हे सर्वच धर्मात प्रचलित आहे. जसे आज देखील गावात हिंदु स्त्रिया पदरात राहतात. पर पुरुषासमोर बाहेर येत नाहीत. ख्रिचन धर्मात तर घटस्फोटाला परवानगीच नाही म्हणतात की लग्न स्वर्गात ठरतात आणि पृथ्वीवर साजरी केली जातात. पण समान नागरी कायद्यात घटस्फोट घेता येतो.
धर्माचे ठेकेदार, पुजारी, मौलाना, पाद्री यांनी आपले महत्व कायम ठेवण्यासाठी रूढी व परंपरेत मानवाला जखडून टाकले. कुराणाने कुणाही माणसाला धर्माचा अर्थ लावण्याचा अधिकार दिला नाही. प्रत्येक व्यक्तीने स्वत: कुराण वाचावे अशी अपेक्षा आहे. पण हे शक्य नाही कारण कुराण अरबी भाषेत आहे. फार कमी लोकांना अरबी येते. म्हणून मौलाना/मौलवी कुराण वाचून दाखवतात. बऱ्याचदा स्वत:चेच समज घुसवतात. म्हणूनच शाहू महाराजांनी कुरणाचे मराठी भाषांतर केले. अशा अज्ञानामुळे वेगवेगळ्या लोकांनी धर्म ग्रंथांचा वेगवेगळा अर्थ लावल्यामुळे वेगवेगळे पंथ निर्माण झाले. परिणामत: एकाच धर्माचे लोक एकमेकाचे रक्त पिण्यास अग्रेसर बनले.
घटना कलम २५ प्रमाणे प्रत्येकाला आपल्या धर्माचे पालन करायला परवानगी आहे. ह्याचा अर्थ असा होत नाही की रूढी–परंपरा, अंधःश्रद्धा पाळायला परवानगी आहे. आता खरा धर्म काय आहे, हे कोण ठरवणार. हा अधिकारच कुणालाही नाही. धर्माचा अर्थ पुजारी, मुल्ला, पादरी ठरवतात. पण हा अधिकार यांना कोणी दिला? धर्मग्रंथात हा अधिकार कुणालाच दिला नाही. म्हणूनच सर्वच धर्मात अनेक पंथ आहेत. बुवा आहेत. सत्ताधाऱ्यांनी आपल्या मर्जीतल्या पुजाऱ्यांना/मौलाना धर्माचे ठेकेदार बनवले व आपल्याला सोयीचे असेल ते धार्मिक कायदे बनवले. शिय्या–सुन्नी हे मुस्लीमांमधीलच पंथ, आज एकमेकाच्या विरुद्ध युद्ध करत आहेत. सुन्नी पंथामध्येच तालिबान आणि इसिसमध्ये यादवी चालू आहे. कारण स्पष्ट आहे. आपले दुकान चालवण्यासाठी सत्तेच्या खेळात धार्मिक दुकाने बनवली. पुजाऱ्यानी राजाची चमचेगिरी केली आणि धर्माचा उपयोग त्यांना सोयीची असलेली न्यायव्यवस्था बनवण्यात आली. म्हणूनच सत्ताधीशांनी धार्मिक व्यवस्था आपल्या ताब्यात ठेवली व तिचा उपयोग लोकांना दाबून गुलाम करण्यासाठी केला. जसे राजा हा देवाचा अवतार करण्यात आला व त्याला पुजाऱ्यानी अधिकृत दर्जा दिला. आता देखील तेच चालू आहे.
आता सर्वोच न्यायालयात ट्रिपल तलाक वर सुनावणी चालू आहे. त्यात मुस्लीम पर्सनल कायदे मंडळाने मुसलमानांची बाजू मांडली आहे. त्यांना हा अधिकार कोणी दिला. कुराणामध्ये तर त्यांना हा अधिकार नाही दिला. मग हे लोक इस्लामवर कसे भाष्य करू शकतात. तसेच हिंदूंचे प्रतिनिधी भारतात कोण आहेत? मी तरी माझी बाजू मांडायला कुणालाच अधिकार दिला नाही. तरी काही उपटसुंभ हिंदुत्व म्हणून उडया मारत आहेत.
त्यामुळेच समाजात गोंधळ माजला आहे व धार्मिक द्वेष पसरला आहे. बेजबाबदार लोक धर्माचे ठेकेदार झाले व आपली तुंबडी भरत आहेत. जसे बहुसंख्य मराठी वा काश्मिरी मुसलमान, कट्टरपंथी विकृत धार्मिक प्रवृती विरुद्ध कट्टरपणे उभा आहे. त्याचे दोन्हीकडून मरण आहे. दहशतवादी त्याला शत्रू मानतात व हिंदु ही त्यांना आपला शत्रू मानतात. त्यात काश्मिरी आणि मराठी मुसलमान भरडला जात आहे. कट्टरपंथी लोकांना विरोध करत असताना उमर फैयाज सारख्या देशभक्तांना दुर लोटू नका. हाच संदेश उमरचा आहे. कारण शक्तिशाली भारत बनवायचा असेल तर धर्म आणि जातींच्या नावे देशभक्ती ठरवणे बंद झाले पाहिजे व देशांच्या शत्रुना टिपून नेस्तनाबुत केले पाहिजे, पण पाकिस्तानचा कायमचा निकाल लावल्याशिवाय हा रक्तपात थांबणार नाही हे सर्वश्रुत आहे