ZBNF / SPNF _१८.७.२०१९

Zbnf या नावाला म्हणजेच झिरो बजेट नैसर्गिक शेती या नावाला काही लोक विरोध करत होते. म्हणे, शून्य खर्चात शेती कशी होते? म्हणून त्याचे नाव बदलण्यात आले व सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती (spnf) करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे.

Spnf हे पंचस्तरीय लागवडीचे शास्त्र आहे. जंगलात जसे अनेक झाडे एकत्र वाढतात तसेच शेतात सुद्धा ती वाढू शकतात हा या शास्त्राचा केंद्रबिंदू आहे. त्यात मुख्य तत्व सहजीवन आहे.  जसे कमी पाणी लागणारी पीके एकत्र लावू शकतो, मी आवळ्याच्या बागेत सीताफळ, शेवगा, गिरीपुष्प, रामफळ एकत्र लावली आहेत, तसेच केळ्याच्या बागेत सुपारी, मिरी, पपई, शेवगा एकत्र लावले आहेत, त्यातच भाजीपाला लावू शकतो.

Spnf मध्ये 36 x 36 फुटचे मॉडेल आपण लावतो. चारही कोपऱ्यात मुख्य झाड म्हणजे मी आंबा लावला आहे. मधे आवळ्याच झाड लावलं आहे. तसेच शेवगा १६ झाड, २० केळ्याची झाड, २० चवळी, ४ सीताफळ, अगदी खाली मेथी आणि पालेभाज्या मिक्स करून लावल्या आहेत. अशाच प्रकारे 36 x 36 च मॉडेल आवळा, चिकु, पेरूचे अनेकांनी बनवले आहेत. यात शून्य खर्च होतो कारण आंतरपिकांचं उत्पन्न हे मुख्य पिकांचा खर्च भरून काढत. आमच्या अनुभवात कुठल्याही गोष्टीला खर्च येणारच पण महागडे खत कीटकनाशक आणि बियाणे न वापरल्याने Spnf मध्ये खर्च ७० ते ८० टक्क्याने कमी होतो.  उत्पन्न १० ते २५ टक्के वाढल्याचे दिसले. आणखी संशोधन होऊन या तंत्रज्ञानात प्रशिक्षण मिळाल्यास उत्पादन दर हेक्टरी दुप्पट होऊ शकते. अर्थात आतापर्यंतचे प्रयोग हे सुभाष पाळेकर प्रशिक्षित शेतकऱ्यांनी केले आहेत. विद्यापीठाने त्याला पूर्णपणे विरोध केला पण आंध्र सरकार, हिमाचल प्रदेश सरकार व इतर काही विद्यापीठांनी जसे पंत आणि हिस्सार विद्यापीठांनी संशोधन सुरू केले आहे. विद्यापीठांनी कुतुहल म्हणून ह्या शस्त्राकडे बघायला काय झाले होते? नवीन काय शिकायला त्रास होतो का? कुठलेही शास्त्र मोठ्या Monsanto किंवा BAYER नी आणले की लगेच उड्या मारतात. कारण गोऱ्या माणसाने ते शास्त्र निर्माण केले आहे. गोरे करतील ते बरोबर, भारतीय शास्त्र कनिष्ठ. अशी आपल्या अधिकाऱ्यांची मानसिकता देशाला लागलेली खरी कीड आहे. तसेच खते, कीटकनाशके, बियाणे निर्माण करणार्‍या महाकाय बहुराष्ट्रीय  कंपन्या हे सरकारलाच विकत घेतात. शेतकऱ्यांना सरकार रासायनिक शेती करायला लावत. पाळेकर गुरुजी यांनी  अनेक वर्ष प्रयोग केल्यानंतर Spnf हे शास्त्र सरकारने मान्य केले. मी देखील या क्षेत्रात वर्ष प्रयत्न करत आहे. मी चालवत असलेलं कृषी विज्ञान केंद्र (kvk) हे देशातील पहिले आणि एकमेव kvk आहे की ज्यांनी रासायनिक खते आणि कीटकनाशकांना शेतातून हद्दपार केले व spnf शास्त्र लागू केले.  एवढेच नव्हे तर वार्षिक कृती आराखड्यामध्ये icar ला अधिकृतपणे zbnf हा संशोधनाचा विषय म्हणून प्रस्तावित केले.

गेल्या ५ वर्षाच्या अनुभवानंतर सर्वात महत्वाचा परिणाम आम्ही स्वत:च्या आणि कुटुंबियांच्या शरीरावर पहात आहोत. Spnf उत्पादित शेतमाल सेवन केल्यामुळे शरीर अत्यंत निरोगी राहते कारण ते विषमुक्त असते.  उत्पन्नही ४ पट होते.  हे तंत्रज्ञान अत्यंत आधुनिक आहे.  किंबहुना सेंद्रिय शेतीच्या कितीतरी पुढे आहे, पण हे नवीन तंत्रज्ञान असल्यामुळे त्याचे पूर्ण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.  अर्धवट माहितीवर आधारित काम केल्यास नुकसान होऊ शकते. मी बघितले अनेक शेतकरी यांना वाटते की गोमूत्र आणि गावठी गाईच्या शेणाने बनलेलं जीवामृत वापरल्यास शेती चांगली होईल म्हणून ते आच्छादन करत नाहीत. Spnf मध्ये आम्ही तणाचा नाश करत नाही. पण तण, पालापाचोळा व शेतीचे उरलेले अवशेष आच्छादन म्हणून वापरतो. त्याचबरोबर नत्र पुरविणारे झाड झुडपे जसे शेवगा, गिरीपुष्प, तूर व डाळी आंतरपीक म्हणून वापरणे बंधनकारक आहे. ते न वापरल्यास जमिनीला लागणारे पोषकतत्वे मिळणार नाहीत. महाराष्टात अनेक शेतकरी आज spnf चा अवलंब करत आहेत. यांच्याकडून शिकणे सहज शक्य आहे.

केंद्र सरकारने spnf स्विकारल्याने अनेक वर्षाच्या प्रयत्नाला यश आले. आता महाराष्ट सरकार त्यावर लवकरच कारवाई करेल अशी आशा आहे. या शास्त्राबद्दल विद्यापीठे आणि शास्त्राज्ञानी स्वत:ला जाणीवपूर्वक अंधारात ठेवले.  त्यामुळे सरकारला त्यांचेच प्रशिक्षण करावे लागेल. गेल्या वर्षी मी दापोलीला एक आठवड्याचे पालेकर गुरुजींचे शिबीर आयोजित केलं होतं.  त्यावेळी रितसर कुलगुरू डॉ. भट्टाचार्य यांची परवानगी घेतली होती. हॉल वैगरे देण्याचं कुलगुरूंनी मान्य केले होते पण ऐनवेळी त्यांनी विरोध केला. ऐनवेळी परवानगी नाकारली. अत्यंत कठीण  परिस्थितीत आम्ही शिबिर आयोजित केले, पण विद्यापीठाने शिबिरात येण्यापासून सर्वाना बंदी घातली.  नंतर कळले की बहुराष्ट्रीय कंपनीचे अधिकारी दापोली विद्यापीठाला भेट देऊन गेले होते.  या गोर्‍या अधिकाऱ्यांचे आमचे काळे शास्त्रज्ञ गुलाम झाल्या सारखेच वागतात. मला अनुभव अनेकदा आलेला आहे. १९९८ साली कणकवली येथे भव्य शेतकरी मेळावा विद्यापीठाने आयोजित केला होता. त्यावेळी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आंब्यावर cultaar वापरण्यावर प्रचार करत होते. Cultaar मुळे आंब्याच्या उत्पादनात प्रचंड वाढ होते असा समज करून देण्यात आला.  पण ते आंब्याला अत्यंत धोकादायक आहे अशी माहिती मला मिळाली होती भर सभेत मी कुलगुरूंना विचारले की तुम्ही कारखानदारांचे दलाल सारखे का वागता. cultaar मुळे आंब्याची झाडे उद्ध्वस्त होतील. शेतकऱ्यांनी विद्यापीठाचे ऐकले. फळांचा राजा देवगड हापूस जवळजवळ नष्ट झाला. आता कुठे spnf वापरून काही बागांचे पुनर्जीवन पाळेकर गुरुजी मुळे झाले. शैक्षणिक संस्थानी एवढा दुष्टपणा करू नये कारण शास्त्रज्ञ हे शेतकऱ्यांसाठी असतात. अनेकदा शेतकरी संशोधन करतात. त्यातून विद्यापीठानी शिकले पाहिजे. आपण साहेब असल्याच्या थाटात कधी वावरू नये  असे माझे विद्यापीठाकडे नम्र निवेदन राहील.   तातडीने या पावसाळ्यात spnf च्या प्रयोगाला संशोधनाला सुरू करावे त्यासाठी विद्यापीठ क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक शेतकरी आहेत.  त्यांना बरोबर घेऊन त्यांच्याच शेतात सुरुवात करावी . महाराष्ट सरकारला हे धोरण बनवण्यासाठी आम्ही नुकतीच मागणी केली आहे त्यावर सर्व अधिकारी व कुलगुरूना घेऊन सविस्तर बैठक लावावी व पाळेकर गुरुजींकडून सर्व माहिती घेण्यात यावी. कृषिमंत्री बोंडे यांनी याला अनुकूलता दाखवली आहे, तरी लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारने spnf ची अंमलबजावणी करण्यासाठी ठोस पाऊले उचलावीत.

लेखक :  ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट  : www.sudhirsawant.com

मोबा. नं.   ९९८७७१४९२९

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS